स्मृतिगंध-४ "मुंबईमार्गे व्हेळ ते राजापूर"

मी व्ह. फा. चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर मला पुढे इंग्रजी शाळेत घालायचे ती. आई, वहिनी आणि आजोबांनी ठरवले. माझे चुलतभाऊ ती. अण्णा मुंबईस होते. व्हेळातून पोटासाठी बाहेर पडलेले आमच्या कुटुंबातले पहिले म्हणजे अण्णा. एका किराणा मालाच्या दुकानात २, ३ वर्षे नोकरी करून आता त्यांनी गिरगावात स्वतःचे किराणा आणि स्टेशनरीचे दुकान काढले होते. अण्णा मला मुंबईस नेण्यास तयार झाला त्याप्रमाणे वाकेडच्या शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला घेऊन १९४४ साली मी अण्णाबरोबर मुंबईला येण्यास निघालो. मला झालेले मुंबईचे ते पहिलेच दर्शन! त्या काळी व्ह. फा. नंतर इंग्रजी १ली, २री, ३री असे ७वी पर्यंत यत्ता असत. इंग्रजी ७वी म्हणजे मॅट्रिक! व्हफा झालेले असले तर इंग्रजी १ली, २री, ३री एका वर्षात करून घेत आणि पुढच्या वर्षी एकदम इंग्रजी ४थीत बसवीत असत.

आंग्रेवाडीतल्या हिंद विद्यालयात माझे नांव घातले आणि शाळा सुरू झाली. घरापासून दूर राहायची सवय जरी वाकेडास असताना झाली होती तरी त्या बिऱ्हाडात प्रभाकर आणि वहिनी होती, शिवाय ४ मैलच दूर असल्याने शनिवार, रविवारी घरी जाता येत असे; पुन्हा वाकेड आणि व्हेळाच्या वातावरणात फारसा फरक नव्हता, त्यामानाने मुंबई झकपक होती. व्हेळासारख्या लहानशा खेड्यातून आलेला मी मुंबईच्या मुलांपुढे अगदीच गावंढळ दिसत असे मी आपला एका बाकावर एकटाच बसून राही. पुढे इंग्रजी लिपी वगैरे शिकवायला सुरुवात झाली. इतर मुले पटापटा उत्तरे देत पण मला बुजायला होत असे. मला त्यांच्या मानाने काहीच येत नाही हा ग्रह दृढ होत चालला त्यात आणि घराची ओढ मन व्याकूळ करू लागली. मला तेथे अजिबातच करमेनासे झाले. कशीबशी सहामाही परीक्षा झाली आणि दिवाळीच्या सुटीच्या आदल्या दिवशी आमचा 'निक्काल' लागला. शंभरात १६ गुण मिळाले. अण्णास किंवा इतर कोणासही ते न सांगता मी कोंकणात जायची तयारी करू लागलो. श्रीराम ठाकूरदेसाईंच्या सोबतीने व्हेळात आलो. सुटी संपली तरी माझे मुंबईला जायचे नाव नाही. काहीतरी निमित्त काढून मी मुंबईस जाणे पुढे ढकलत राहिलो. शेवटी शाळेत न गेल्यामुळे माझे ते वर्ष फुकट गेले. तो पर्यंत प्रभाकर वाकेडच्या शाळेतून ६वी पास झाला होता त्यामुळे वाकेडासारखेच राजापुरास बिऱ्हाड करून आम्हा भावंडांना घेऊन वहिनीने तेथे राहायचे ठरले.

माझी आई आणि वहिनी शाळेत गेल्या नव्हत्या पण त्यांना पांडवप्रताप वगैरे पोथ्या वाचता येत असत. लिहिता मुळीच येत नसे. सही देखील करता येत नसे. अंगठा! पण दोघींनाही शिक्षणाचे महत्त्व समजले होते. आम्ही मुले व्ह. फा. नंतर गावात किंवा आजूबाजूच्या खेड्यात प्राथमिक मास्तर होऊन शेतीला मदत करीत राहिलो असतो तर घराचा गाडा बऱ्यापैकी सुरळीत चालला असता, पण दोघींनीही पोटाला चिमटा घेऊन, प्रसंगी स्त्रीधन विकून आम्हा मुलांना शिकवले. आई तर आपल्या मुलांसाठी खस्ता काढतेच पण वहिनी? ती सुद्धा सावत्र, पण तिने कधीच सावत्रपणा केला नाही. लग्नाचा अर्थ न कळताच तिच्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली होती. वडिलांनी तिचा दुसरा विवाह लावून देण्याचे ठरवले, परंतु माघारपणाला गेली असता तिच्या माहेरच्यांनी तिचे वपन करून सोवळी केली. त्यानंतर मात्र ती माहेरी न जाता आमच्या घरी चंदनासारखी झिजत राहिली. पुढे वडील गेल्यावर आईच आमचे वडील होऊन राहिली. आईने व्हेळात राहून शेती सांभाळली तर वहिनी आमची आई होऊन वाकेडास, राजापुरास राहिली.

निफाडकर मास्तरांच्या घरात दरमहा १ रुपया भाड्याने खोली घेऊन आम्ही राजापुरास बिऱ्हाड केले. मी इंग्रजी ४थी, प्रभाकर मराठी ७वी, वत्सू तिसरीत तर बाळ पहिलीत असे सारेच जण राजापूर हायस्कूल मध्ये शिकू लागलो. वहिनी आईच्या मायेने आमचे सारे करू लागली तर आई व्हेळात राहून शेती राखू लागली. दोघींनीही मुलांच्या चांगल्या शिक्षणाचा ध्यास घेतला होता. घरात पिकलेले भात कधीकधी वर्षभर पुरत नसे, अशा वेळी पावसाळ्यात सावकाराकडून सवईने भात घ्यावे लागे. सवई म्हणजे पावसाळ्यात ४मण भात घ्यायचे आणि २, ३ महिन्यांनी पाच मण भात त्यास परत करायचे. भाताच्या गिरण्या त्यावेळी नव्हत्या. घरीच आई आणि वहिनी भात घिरटीवर भरडून काढीत त्यामुळे टरफले निघत असत, मग सुपात पाखडल्यावर टरफले बाजूला होत; नंतर ते दाणे वाईनात म्हणजे उखळीत घालून कुटत असत, त्यामुळे कोंडा बाहेर येत असे. परत सुपात पाखडून तो कोंडा आणि तांदळातल्या कण्या निराळ्या काढून कणीकोंडा एकत्र दळून त्याची भाकरी करीत असत. कण्या नसलेल्या तांदळाचा रोजच्या भातासाठी वापर होई. तांदूळ वर्षभर पुरावा म्हणून आई न्याहारीला पातळ भात करत असे. भात इतका पातळ असे की मूठभर तांदूळ किंवा कण्यांमध्ये तांब्याभर पाणी घालून शिजवीत असे. बाळ म्हणायचा, " आई, किती पातळ आहे हा भात! एकदा बुडी मारली की एक शीत मिळते. " असे दिवस चालले होते.

अशात माझी मॅट्रिकची परीक्षा आली. पुन्हा वासू चहावाल्याकडेच (विहार हॉटेलवाले) माझे बस्तान ठोकले. पेपर्स बरे गेले होते. रिझल्ट लागून मला ५१% मार्क मिळाले. आमच्या घराण्यातला पहिला मॅट्रिक झालेला पाहून आई आणि वहिनीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी आता जाणता झालो होतो. त्यांचे पांग फेडायला आणि घरचा मोठा म्हणून आता मला नोकरी शोधणे आवश्यक वाटू लागले. अण्णाला पत्र पाठवून मी नोकरीसाठी येतो अशी विचारणा केली परंतु कदाचित मागच्या अनुभवावरून त्याचे उत्तर आले नाही. इकडे पावसाळा सुरू झाला होता. शेतीची बरीच कामे होती. लावण्या करायच्या होत्या पण आमचेकडे जोतासाठी एकच बैल होता, दुसरा म्हातारा झाल्यामुळे जोताला चालत नसे. दुसरा तरणा बैल घ्यायला पैसा आणायचा कोठून? आणि बैलजोडी नसेल तर जोत धरणार तरी कसे? मोठाच प्रश्न उभा राहिला. पाऊस पडायला सुरुवात झाल्याने लोकांनी पेरे करायला सुरुवात केली होती. वेळ फुकट जात होता, आम्ही सारे चिंतेत होतो.

अशातच एका रात्री कंदील घेऊन हरिभाऊ आमचे घरी आले आणि म्हणाले, " माझाही एक बैल निकामी झाला आहे. आपण वारंगोळे करूया. " वारंगोळे म्हणजे एक आमचा आणि एक त्यांचा बैल बांधून जोत करायचे आणि पेरणी करायची. एक दिवस त्यांच्या शेतात तर एक दिवस आमच्या शेतात जोत फिरवून शेत नांगरत असू. सगळीकडेच नांगरणी चालू असल्याने गडीमाणसांचा तुटवडा असे. मी मग वेळेला जोत धरत असे. अशा रीतीने भाताचे पीक घेतले. दिवाळीच्या सुमारास भातझोडणी झाली आणि उन्हाळी कुळीथ करण्यासाठी पुन्हा वारंगोळे करायचे ठरवले. हरिभाऊ आणि आम्ही कुळथाच्या आलेल्या पिकातून बियाणापुरते बाजूला ठेवून उरलेले कुळीथ निम्मे निम्मे वाटून घेऊ असे ठरले आणि कामाला सुरुवात झाली.