स्मृतिगंध-७ " कापडाची मिल आणि टायपिंगचा क्लास"

गोरेगावात नाना जेथे राहत होता त्याच्या शेजारीच अण्णा बिवलकर आणि विद्वांसदादा यांचा कोळशाचा कारखाना होता. सुटीच्या दिवशी मी बरेचदा नानाकडे जात असे. तेथे अण्णा व दादांशी ओळख झाली. पुढे नानाजवळ बिवलकरांनी "हा मुलगा कोण? काय करतो? शिक्षण किती? " अशी चौकशी केली आणि एक दिवस नानाकरवी मला आपल्याकडे बोलावून घेतले. वरळीच्या वसंतविजय मिलमध्ये काम करशील काय? अशी विचारणा त्यांनी केली. रात्रपाळी, तसेच कोणतेही काम करावे लागेल हे सांगितले. मी दुसऱ्या चांगल्या नोकरीच्या शोधात होतोच. रोजंदारीवरच्या प्लॅस्टिक कं पेक्षा ही मिल बरी.. असे म्हणून बिवलकरांबरोबर मिलमध्ये गेलो. त्याच दिवशी ३ ते १२ अशा रात्रपाळीवर मला रुजू करून घेतले आणि माझी मिलमध्ये कामाला सुरुवात झाली. मोठमोठ्या चाकंवाल्या पेटाऱ्यात कापडाची ठाणे भरून ती एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये नेण्याचे काम मी तेथे करू लागलो. मॅट्रिक होऊनही हे काम करीत राहिल्याबद्दल तेथील इतर लोक मला टोकत असत. पण दुसरी अजून चांगली नोकरी मिळेपर्यंत मला इथे राहणे क्रमप्राप्तच होते. महिना पूर्ण झाल्यावर एकही खाडा न केल्यामुळे १२२ रु. पगार मिळाला. आनंदाने उड्या मारीतच मी अण्णाकडे आलो आणि अण्णावैनीला पगार दाखवला. त्या दोघांनाही फार आनंद झाला.

१२०रु पगारातून मी घरी साधारण ४०रु पाठवीत असे. खानावळ आणि पासाचा खर्च सोडला तर माझा खर्च फारसा नसेच. पण मधल्या बेकारीच्या काळात मी अण्णाचे ८००रु. देणे होते. तो मात्र म्हणे, " तुला अजून चांगली नोकरी लागली की मग माझे पैसे दे, घाई नाही. " मग मी दुसऱ्याच महिन्यात मोहन बिल्डिंगमध्ये जी. सी. डी. म्हणजे गव्हर्नमेंट कमर्शिअल डिप्लोमा (इन कॉमर्स) साठी क्लास लावला. त्याची फी दरमहा १५रु आता ह्या पगारातून देणे शक्य होते. संध्याकाळी ६॥ ते ८॥ अशी त्याची वेळ होती. मिलमध्ये सांगून मी सकाळी ८ ते ४ ची ड्यूटी घेतली. एकीकडे बर्व्यांकडे टाइपिंग व शॉर्टहँड चालू होतेच. बर्वे मला वेळ ऍडजेस्ट करून देत असत. शॉर्टहँडची १०० शब्दांची आणि टाइपिंगची हायर प्रोफिशन्सीची परीक्षा मी एकीकडे पास झालो. बर्व्यांनी मग मला त्यांच्या क्लासमध्ये १५रु. पगारावर इनस्ट्र्क्टर म्हणून काम पाहण्यास सांगितले.

सकाळी तासभर क्लास करून मी वरळीला मिलमध्ये जात असे. ४ वाजता मिल सुटली की परत बर्व्यांकडे क्लाससाठी येत असे. ६॥ च्या जीसीडीच्या क्लाससाठी तेथूनच जात असे. तेथून परत इन्स्टिट्यूट मध्ये येऊन क्लास बंद करून ९ च्या सुमारास जेवावयास मुगभाटात जात असे. मिल वरळीला आणि हे दोन्ही क्लास तसेच अण्णाचे घर, मुगाभाटातील खानावळ गिरगावात चालत ५, १० मिनिटाच्या अंतरावर असल्याने वेळेचे गणित बसवणे शक्य झाले. असे जवळजवळ २ वर्षे, अगदी नेमकेच सांगायचे तर २३ महिने चालू होते.

अशातच एकदा बर्व्यांनी ग्रांटरोडच्या एका पारशी वकिलाकडे डिक्टेशन घेण्याकरता मला पाठवले. सकाळी सात वाजता त्याचेकडे जावयाचे. साधारण अर्धा तास डिक्टेशन घेऊन परत क्लासमध्ये यायचे आणि टाइप करून साडेनऊच्या आत त्यास नेऊन द्यायचे असे १५, २० दिवस चालले. बरोबर टाइपिंग झाले की पारशीबावा ५रु देत असे. ह्या कामामुळे मिलमध्ये खाडे होऊ लागले आणि तासाभराच्या कामाला ५रु मिळून दिवस दुसरे काम करण्यास मोकळा मिळू लागला म्हणून मग मिलमध्ये जाणे मी बंद केले आणि सबंध दिवस बर्व्यांच्या क्लासमध्येच काम करू लागलो. बर्वे टाइपिंगची बाहेरची कामेही आणत असत. सिंगल लाइन एक पान बिनचूक टाइप केले की ते २ आणे देत. अशी १५, २० पाने दिवसाला मिळत असत. हे काम क्लासमध्ये बसूनच मी करीत असे. १००रु च्या आसपास पैसे मिळू लागले पण हे बाबूकाम मिळाल्यामुळे गाड्या ढकलण्याचे मिलचे काम बंद केले. असे ५, ६ महिने गेले.

म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेचे जनरल मॅनेजर जोशी नावाचे एक गृहस्थ होते. बर्वे आणि ते एकाच बिल्डिंगमध्ये राहत असत. त्यांच्या बँकेत जागा रिकाम्या होत्या. जोशांनी बर्व्यांना क्लासमध्ये कोणी होतकरू मुलगा आहे काय अशी विचारणा केली असता बर्व्यांनी त्यांना माझे नाव सुचवले. जोशांबरोबरच मी फोर्टातील बँकेत गेलो. तेथील एका खुर्चीवर त्यांनी मला बसावयास सांगितले. समोर काउंटर होता. श्री. गोडबोले म्हणून तेथे अकाउंटट होते. त्यांना सांगितले, हा माणूस तुम्हाला दिला आहे. ह्याचे नाव मस्टरवर घाला आणि रुजू करून घ्या. परीक्षा नाही, इंटरव्ह्यू नाही, एवढेच काय अपॉईंटमेंट लेटर सुद्धा नाही. पगार दरमहा १२०रु. आणि मी टाइपिंग करत असे म्हणून टाइपिंग अलाउन्स १५रु असे १३५ रु मिळत. सकाळी लवकर आणि संध्याकाळी बँकेतून आल्यावर साधारण ९ पर्यंत इन्स्टिट्यूट चालू होतीच. त्याचेही १५रु मिळत, असे १५०रु महिना आमदानी झाली. खूप काही मिळत आहे असे वाटू लागले. तिकडे कोंकणात मुलांची शिक्षणे चालू होती. प्रभाकरही एव्हाना मॅट्रिक पास झाला.