स्मृतिगंध-१२ "व्हेळ ते फ्रांकफुर्ट : एक प्रवास"

मोठा मुलगा बी. कॉम झाल्यावर त्याने काँप्युटरचा कोर्स केला. शेजारच्या वसंत शेजवलकरांनी ऍप लॅबमध्ये त्यास नोकरीला लावले. १९८९ साली ही हृदयविकाराने आजारी पडली आणि तिला नोकरीची दगदग झेपणार नसल्याने वैद्यकीय कारणामुळे तिने स्वेच्छानिवृत्ती घेतली. ती. वहिनीचीही तब्येत खालावत चालली होती. तिची आजारपणे सुरू झाली होती. वर्षातून २, ३ वेळा तरी तिला हास्पीटलाची वारी करावी लागत असे. ती गमतीने त्याला माहेरपणाला जाते असे म्हणत असे. अखेरीस ९१च्या डिसेंबरमध्ये दत्तजयंतीच्या दिवशी तिला देवाज्ञा झाली. आमचा मोठाच आधार हरपला.

१९९२ साली जमिनीचे भाव बरेच वाढले होते. घैसरची शेती करणेही दिवसेंदिवस जिकिरीचे होत होते आणि चांगली किंमत आल्यामुळे ती जमीन मी विकली. ती. आईही आता थकली होती. कोंकणात एवढ्या लांब तिने एकटे राहणे गैरसोयीचे होऊ लागले म्हणून तिला इकडे आणली आणि कोंकणातले नांदते घर बंद करावे लागले. मुलांच्या सुटीत मात्र आम्ही आवर्जून तेथे जात होतो. परंतु १०, १२ तासाचा प्रवास करून व्हेळास जाणे, बंद घरात 'हाती धरून झाडू.. ' सारी सफाई करणे यातच २, ३ दिवस जात असत. मोठा नोकरीला, धाकटा इंजिनीअरिंगला तर मुलगी कॉलेजात असल्याने एकाच वेळी सर्वांना सुटी मिळणेही अवघड होऊ लागले. तशातच वहिनी गेल्यामुळे घर बंद ठेवून जाणे अशक्य होऊ लागले. येथे जवळच कोठेतरी जमीन घेऊन लहानसे घर बांधावे म्हणजे सुटीत तेथे राहता येईल असा विचार करून मी कर्जत, पनवेल, पळस्पे, तळेगाव अशा ठिकाणी जमीन वा घर घेण्यासाठी प्रयत्न करू लागलो पण यश येत नव्हते.

याच वर्षी धाकटा बी. ई. तर मुलगी बी. ए. झाली. पुढे तोही नोकरीसाठी प्रयत्न करू लागला तर मुलीने एम ए ला ऍडमिशन घेतली. ९४ च्या ऑगस्ट मध्ये ती एमए होऊन तिला लेक्चररची नोकरी मिळाली, नोकरीबरोबरच तिने पीएचडीचा अभ्यास सुरू केला तर धाकटा जे. के सोडून क्रॉम्टनग्रीव्हजमध्ये गेला. १९९४ च्या मे महिन्यात १९ तारखेला मोठ्या मुलाचा विवाह झाला आणि १९९५ मध्ये त्यास कन्यारत्न झाले. आईला पणती झाली. याच सुमारास आई अर्धांगाच्या झटक्याने आजारी पडली. १९९५ च्या मार्चपर्यंत म्हणजे वयाच्या ६२ वर्षापर्यंत व्होल्टासमध्ये मी नोकरी करत होतो. त्याच वर्षी श्रावणात आम्ही उभयतांनी व्रतांचे उद्यापन केले. मुले मार्गाला लागली होती तरी आता मला स्वतःला एंगेज ठेवण्यासाठी व्होल्टास सोडली तरी वकिल &सन्स मी चालूच ठेवली होती. विसाव्याचे दोन क्षण आता कुठे येत होते. १९९७च्या मार्च महिन्यात आम्ही दोघे, धाकटा मुलगा आणि मुलगी वैष्णोदेवीला जायचे ठरवले. हिमालयाचे परिसरात आम्ही प्रथमच जात होतो. तेथील निसर्गसौंदर्य डोळे भरून पाहिले आणि देवीचे दर्शनही घेतले.

१९९८ च्या फेब्रुवारीत धाकट्या मुलाच्या हाताला मोठा अपघात झाला. मशीन दुरुस्त करत असताना एका कामगाराच्या चुकीने त्याचा हात मशीनखाली आला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच त्याचा हात वाचला. हाताच्या ट्रीटमेंटसाठी त्यास ४, ५ महिने रजा मिळाली होती. त्या रजेचा सदुपयोग करून त्याने सॅप कनस्लटंटच्या सर्टीफिकेशनचा कोर्स पूर्ण केला. १९९९ च्या जूनमध्ये त्याचा विवाह झाला. पुढे क्रॉम्टन सोडून एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीत तो जॉइन झाला. त्याच सुमारास मुलगी डॉक्टरेट झाली. इकडे ती. आईचे आजारपण जवळपास ५ वर्षे चालू होते. ती आता खूप थकली होती. ४ नातवंडांची लग्ने तिने पाहिली. पंतवंडांना मांडीवर खेळवले. तिच्या कृतार्थ जीवनाची २०००च्या फेब्रुवारीत अखेर झाली. त्याच्या अगोदर केवळ महिनाभरच आधी वत्सू पार्किन्सन्सच्या आजाराने स्वर्गवासी झाली. असा उनपावसाचा खेळ चालू होता. पुढे २००२च्या दिवाळीत आम्ही सर्व भावंडांनी काशी, प्रयाग, गया ही त्रिस्थळी यात्रा केली. नंतर गंगापूजन व गोदान केले. याही वेळी आम्ही खरी सवत्स धेनू दान केली.

धाकट्याला कंपनीच्या कामासाठी परदेशी धाडले. त्याने नवी झेप घेण्याचा आनंद होताच पण त्याचवेळी तो दूरदेशी जाणार ह्याने मनात कालवाकालव होत होती. पण फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून आम्ही त्याच्या सतत संपर्कात होतो. निवांतक्षणी कधीतरी मुंबईबाहेर लहानसे घर घेण्याचा विचार परत डो़कं वर काढत होता. आमचे उपाध्ये श्री. नाखरे यांच्या ओळखीने निळुभाऊ बोडस आणि श्री. गणेश कानडे यांचेशी परिचय झाला. त्यांनी मला जांभूळपाडा आणि आसपासच्या गावातील काही जागा दाखवल्या. तोपर्यंत जांभूळपाडा म्हणजे १९८९च्या पुरात वाताहात झालेले गाव एवढेच माहिती होते. खोपोली पासून अगदी जवळ पालीमहडच्या रस्त्यावर वसलेले हे टुमदार गाव मला आवडले. आनंदाश्रम आणि स्नेहबंधन असे दोन वृद्धाश्रम ह्या गावात आहेत सिद्धलक्ष्मी गणपतीचे सुंदर देवस्थान आहे शिवाय मुंबईपासून २ तासाच्या अंतरावर आणि डोंबिवलीतून तर थेट एसटीची सोय आहे हे समजल्यावर तर अजूनच बरे वाटले. एस टी स्टँडपासून अगदी पाचच मिनिटे चालत अंतरावरची कानड्यांनी दाखवलेली जागा आम्हाला आवडली ती जागा गावठाणात येत असल्याने एन ए वगैरे करावयाची गरज नव्हती. २००५च्या एप्रिल महिन्यात आम्ही ती जागा विकत घेतली. धाकटा व सून परदेशी असल्याने अक्षय्य्यतृतीयेच्या दिवशी भूमिपूजन करून घर बांधायला सुरुवात करायची व वास्तूशांत ते दोघे इकडे आले की करायची असे ठरले. धाकट्या सुनेच्या आर्किटेक्ट बहिणीने घराचा प्लॅन काढून दिला. ग्रामपंचायतीतून तो पास करवून घेऊन पाण्याचे कनेक्शन देखील घेतले आणि घराचे बांधकामास सुरुवात केली. माझ्या जांभूळपाड्याला अनेक खेपा होऊ लागल्या. जून उजाडला तरी आम्ही बांधकाम चालूच ठेवले होते. जूनच्या १४ तारखेला मोठ्या मुलाला पुत्ररत्न झाले. आमची सौ. रात्रंदिवस बाळालाच घेऊन बसलेली असे. १२ व्या दिवशी थाटात बारसे केले.

दुसऱ्याच दिवशी सौ. ला थोडा ताप आला. बारशाची दगदग असेल असे वाटून तिने विश्रांती घेतली. प्रभाकराच्या दुसऱ्या मुलाचे लग्न ग्वाल्हेरला होते. आम्ही सर्व त्याच गडबडीत होतो पण सौ. ला एक दिवस एकदम चक्कर आली. मुले लग्नासाठी ग्वाल्हेरला गेली पण मुलगी मात्र घरीच थांबली होती. डॉक्टरांकडे नेऊन सर्व तपासण्या करण्याचे ठरले. आपल्या पाटल्याबांगड्या तिने काढून मजजवळ दिल्या आणि माझ्या काळजात चर्र झाले. मी काही न बोलता त्या कपाटात ठेवल्या. स्वतः जिना उतरून ती रिक्षात बसली आणि तिला दवाखान्यात नेले. रात्री तिची शुगर अचानक एकदम डाउन झाली. सलाइन लावल्यावर ठीक झाली. धाकट्या मुलाचा फोन आल्यावर बरी होऊन पुढच्या महिन्यात त्याच्याकडे येणार असल्याचे सांगितले. तसेच पासपोर्ट हातात आल्याचेही सांगितले. प्रभाकराकडचे लग्न पार पडले व वऱ्हाड डोंबिवलीला परत आले. एक दिवस बरा गेला आणि तिची शुगर २००च्या वर गेली. तिची शुगर ४५ पासून ३०० पर्यंत झोके घेऊ लागली. डॉक्टरांचे प्रयत्न चालू होते. तिला आयसीसीयूत हालवले. सारेजण येऊन तिला भेटून गेले. धाकटा मुलगा आणि सुनेला बोलावून घेतले. दुसऱ्याच दिवशी तातडीने ती दोघे आली. जणू त्या दोघांना भेटण्यासाठीच ती थांबल्यासारखी होती. तिला लगेचच ४० एक मिनिटातच व्हेंटिलेटरवर घ्यावे लागले आणि दुसऱ्याच दिवशी सायंकाळी तिची प्राणज्योत मालवली. जांभूळपाड्याचे घर आम्ही पूर्ण केले. पण ती काही ते पाहू शकली नाही. आज तिन्ही मुले चांगल्या नोकऱ्यांमध्ये उच्चपदावर आहेत पण हे सारे वैभव पाहायला आज सौ. नाही ही खंत आहे. धाकट्या मुलाकडे परदेशात जायचे सौ. चे स्वप्न अपुरेच राहिले म्हणून मी त्याच्याकडे त्याच वर्षी गेलो. व्हेळसारख्या नकाशावरही नसलेल्या खेडेगावातून येऊन युरोपवारी करण्यापर्यंत मजल कशी गेली याचे आज विचार करता नवल वाटते. हे आईवडील आणि वहिनीच्या आशीर्वादांचेच संचित.

(समाप्त)