स्मृतिगंध-१ "व्हेळातले दिवस"

तसे पाहिले तर आमचे कुटुंब ना श्रीमंत ना गरीब. मध्यमवर्गीयच म्हणा ना! घरात आई, वडील, मी, प्रभाकर, वत्सू आणि बाळ अशी आम्ही ४ भावंडे. तसेच कै. सावत्र भावाची पत्नी ती. गं. भा. आनंदीवहिनी आमच्याकडेच. वहिनी आमच्या आईपेक्षा २ वर्षांनी मोठी. वडिलांची खोती आणि शेती. खोती म्हणजे मामलेदाराने ठरवून दिलेली ठराविक रक्कम कुळांकडून वसूल करून मामलेदार कचेरीत भरणा करायची. त्याच्या मोबदल्यात भरलेल्या रकमेच्या १/४ सरकारकडून मिळत असे. गावचा पट १२०० रु. चा आणि ३ खोतात विभागलेला, म्हणजे आमचा हिस्सा ४००रुपयांचा. सरकारदरबारी ३० जूनपूर्वी दरवर्षी ४०० रु भरणा कुळांकडून वसुली करून करायचा असे. तो जर वेळेवारी झाला नाही तर घरावर जप्तीचे सावट! कितीतरीदा द्यायला कुळांकडे पैसे नसत. कोण २रु, कोण ५रु भरे तर कोणी भाताचे पोते अंगणात आणून टाके. कोणी २/४ दिवस गडी म्हणून कामाला येई. ठरलेली रक्कम तर सरकारला भरावीच लागे, मग कितीतरीदा पदरमोड करून भरणा केला जाई.

खोतीचा मोबदला म्हणून मिळालेले साधारण १०० रु घरचा खर्च भागवीत असत. राजापुराहून गुळाची १ ढेप, मिठाचे पोते, तिखट कांडण्यासाठी सुक्या लाल मिरच्या, ५/५ शेर तूरडाळ आणि हरबरे, गोडेतेलाचा १ डबा आणि कडूतेलाचा डबा समई आणि लामणदिव्यासाठी येत असे. गुळाची ढेप राजापुरातून आली की पडवीत ठेवलेली असे. भेली (गुळाची ढेप) फोडून देवाजवळ २ खडे ठेवून मग घरात वापर करायचा अशी प्रथा असे आणि आम्ही भावंडे ती कधी फोडतात याची वाट पाहत असू. शेवटी न राहवून भेलीचेच चावे घेत असू मग मात्र 'चांगलीच' विचारपूस होई. वीज गावातच काय पण राजापुरातही नव्हती. म्हशी आणि जोताच्या बैलांसाठी पेंडीचे १पोते एवढे सामान वर्षातून एकदा भरले जात असे. घरच्या शेतीचे भात साधारण वर्षाला पुरेल एवढेच. भातानंतर उडदाचेही पीक घेत असू. त्यामुळे तूरडाळ सणावारी आणि एरवी उडदाचे वरण, कुळथाचे पिठले असेच असे. भात, तांदळाची भाकरी, परसातल्या भाज्या, लोणचे मिरची असे जेवण! गव्हाची पोळी तर माहितीच नव्हती. चहा फक्त आई आणि वहिनी घेत. बाकी आम्ही सारे दूध घेत असू. म्हैस घरात होती ती कधी जास्त दूध देई तर उन्हाळ्यात आटे. नेमका तेव्हाच लहान प्रभाकर भांडे भरून दूध हवे म्हणून हटून बसे. सफरचंदे, चिकू, अननसासारख्या फळांची माहितीसुद्धा नव्हती. दारातला फणस, करवंदे, जांभळे, रायवळ आंबे हा मेवा मात्र असे. फणसाचे गरे, भाजी, सांदणे असे अनेक प्रकार होत असत कारण एकेका झाडाला ४०/४०, ५०/५० फणस लगडत. सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सारे फणसमय असे. पण हे फक्त उन्हाळ्यात.

त्या काळी गावात शाळा नव्हती. गावात ब्राह्मणाची ८ घरे, त्यातील एका कुटुंबाची मुले तालुक्याच्या ठिकाणी शिकत. आमच्या घरी आम्ही भावंडं आणि चुलतभाऊ वगैरे मिळून ५/७ लहानमोठी मुले होती. नाटेकर नावाचे मास्तर जेवणावारी शिकवायला ठेवले होते. घरच्या ओटीवरच शाळा भरे. गावातली इतर मुलेही ह्या ओटीवरच्या शाळेत येत असत. अंगात सदरा, चड्डी नाहीतर लंगोटी आणि डोईवर टोपी असा पोषाख! सकाळी उठल्यापासून साधारण १२ वाजेपर्यंत आणि नंतर जेवणानंतर साधारण २ पासून संध्याकाळपर्यंत अभ्यास चालत असे. यत्ताबित्ता काही नव्हते. मुळाक्षरे, बाराखड्या, मोडीलिपी, बे ते ३० पाढे. पावकी पासून औटकीपर्यंत तसेच अकरकी, एकोत्रीही शिकवीत असत. मणाला ४०रु तर अडीच शेराचे किती? असले हिशेब असत आणि त्याकरता शेर, मणाची कोष्टके पाठ करावी लागत. तसेच पुस्ती काढण्यावर भर असे. खुरमांडी घालून, पुष्टिपत्रावर कागद ठेवून, शाईत बोरू बुडवून पुस्ती काढावी लागत असे. रोज तास दोन तास पुस्तीचा तास चाले. "श्रीमंत सकलगुणालंक अखंडित त्रिकाल चरणी मस्तक ठेवून कृतानेक शिर साष्टांग नमस्कार.. " अशा मायन्याने सुरुवात करून मोडी पत्रलेखन चाले. बोरुसाठीचे बारीक बांबू तासून लेखणी तयार करत असत आणि शाई तयार करायला ताम्हणात पाणी ओतून त्यात हरडे फोडून टाकायचे आणि लोखंडी खिळा टाकून उन्हात ठेवून आटवायचे की त्याला काळा रंग येत असे. तीच शाई!

एकदा असाच पुस्तीचा तास चालू असताना माझा चुलत भाऊ म्हणाला, "मास्तर, माझा बोरू मोडला. " "गाढवा, लेखणीस बोरू काय म्हणतोस? तुझ्या मनगटास गाढवाचं xxx म्हटले तर चालेल काय? " सगळे मोठ्याने हसलो म्हणून प्रत्येकाला २/२ रट्ट्यांचा प्रसाद मिळालाच. नाटेकर मास्तर मारायचे, ओरडायचे पण घरात तक्रार करायची सोय नव्हती. एकतर घरातच शाळा असल्याने आई, वहिनीचे लक्ष असेच आणि मास्तर मुलांच्या भल्यासाठीच ओरडतो, मारतो ह्यावर दृढ विश्वास! एकदा नेहमीसारखीच ओटीवर शाळा भरली होती. मास्तर शिकवत होते म्हणजेच पावकी, निमकी घोकणे चालू होते इतक्यात मास्तरांच्या डोक्यावर अभिषेक झाला. गडबडीने मास्तर उठून म्हणाले, " वरतून मांजरू मुतले वाटते. " वरून आवाज आला, " मांजरू नव्हे, मी मुतलो, तुम्ही मला मारलेत म्हणून.. " आम्ही सारे हसू दाबत, मनातून खूश होऊन ५-६ वर्षाच्या प्रभाकराची करामत अवाक होऊन पाहत होतो. पुढे मग ही ओटीवरची शाळा बंद होऊन गावात शाळा सुरू झाली. नाटेकर मास्तर जाऊन खामकर मास्तर आले.