स्मृतिगंध-१० "घर पाहावं बांधून.. "

माझे लग्न झाले त्यावेळी आम्ही विष्णुनगरात राहत होतो. एव्हाना प्रभाकराचेही लग्न झाले होते. विष्णुनगरातील जागा अपुरी पडू लागली होती. ती. गं भा वहिनीच्या बहिणीचे पोष्टाजवळ घर होते आणि ती मंडळी जळगावास राहत असत. त्यांचे घर रिकामेच होते म्हणून त्यांनी घराची दुरुस्ती करवून घेऊन आम्हांस तेथे राहण्यास सुचवले. बरेच दिवस रिकामे असल्यामुळे लोक त्या घराला भुताचे घर म्हणत पण आम्ही तिकडे लक्ष दिले नाही. त्यांचे घराची डागडुजी करून आम्ही तेथे राहायला गेलो. पुढे दोनेक वर्षे तेथे राहत असताना आम्हाला कोणताही विपरीत अनुभव आला नाही. आता घरात आम्ही तिघे भाऊ आणि सौ. अशी चारजणं कमावती झालो होतो. हातात पैसे येऊ लागल्यावर घराचा विचार परत डोके वर काढू लागला.

बाबूसही घर बांधायचे होतेच. आर्किटेक्ट श्री. सातवळेकर यांच्याकडून आमच्या व बाबूच्या घराचा प्लान काढून घेऊन म्युनिसिपालिटीतून पास करवून घेतला. श्री. पाटणकर यांना घराचे काम देण्यास सातवळेकरांनी सुचवले. त्या काळी सिमेंट सहजपणे मिळत नसे. कलेक्टरकडून त्यासाठी परमिट घ्यावे लागत असे. आम्ही परमिटसाठी अर्ज केला होता. आता सिमेंटची वाट पाहणे आले. एक दिवस १२० गोणींचा पहिला हप्ता मंजूर केल्याचे पत्र आमचेकडे आले. त्या पत्रात सांगितल्याप्रमाणे आठ दिवसांच्या आत भिवंडीच्या एका विशिष्ट दुकानातून सिमेंट घेणे आवश्यक होते. परमिट आल्यावर माझी धावाधाव सुरू झाली. पाटणकरांनी आमचे ३ डबलरुम्सचे घर १५, ००० रु. त तर लळितांचे ४ डबलरुम्सचे घर २०, ००० रु. त बांधून देतो असे सांगितले आणि दोन्ही घरे एकदम बांधावयास सुरुवात केली. बाबूने १०, ०००रु. दिले पण आमच्या घरासाठी पैसे देण्याचे काहीच बोलणे झाले नाही. पुढे काही दिवसांनी मी त्यांना ६०००रु दिले. दिवाळीपर्यंत दोन्ही घरांचे स्लॅब घालून झाले होते. बाबू दिवाळीच्या सुमारास कोंकणातून इकडे आला. येताना २०००रु त्याने आणले होते. जागेसाठी भाड्याने गिऱ्हाइके येऊ लागली. लखू बोडस हे त्यात पहिले. त्यांचेकडून ४०००रु डिपॉझिट घेतले आणि पुढे दीक्षित, केळकर आणि पत्कींकडून १२, ००० रु डिपॉझिट मिळाले ते एकूण १६, ०००रु पाटणकरांना दिले. आता घर पुरे करण्यास वेग आला आणि डिसेंबरात दोन्ही घरं पूर्ण झाली. बाबूकडे ४ बिऱ्हाडे तर आमचेकडे एक बिऱ्हाड राहावयास आले. आमचेकडे २ डबलरुम्स रिकाम्या होत्या तेथे आम्ही राहायला जाणार होतो पण नांदुर्डीकरांनी त्यांच्या घरातून आम्ही जाऊ नये अशी गळ घातल्याने आम्ही त्या दोन्ही डबलरुम्स भाड्याने दिल्या.

पुढे जागेचे भाव वाढू लागले आणि नांदुर्डीकरही डोंबिबलीत आमच्याच घरी येऊन राहिले. त्यांना आता जागा हवी होती. पण आम्ही तर त्यांच्याच सांगण्यावरून आमच्या जागेत भाडेकरू ठेवून बसलो होतो. घरात वर्षाचा माझा मुलगा आणि प्रभाकराची मुलगी, आम्ही चौघे, बाळ आणि वहिनी एवढे जण होतो. एकदम जागा तरी कुठे मिळणार? जागेचा भुंगा सतत डोक्याला लागला. एकदा असेच बॅंकेत बोललो असता भागवत म्हणाला, " अरे, तू घरावर मजला का नाही चढवत? पैशाची काळजी करू नको. सन्मित्र बँकेतून कर्ज घे. मी तेथे चेअरमन आहे. " त्याच्या बोलण्याने धीर आला आणि मी कर्जासाठी बँकेत अर्ज केला. प्रभाकर आणि लेले नावाचा माझा एक मित्र गॅरेंटर राहिले. मला बँकेतून कर्ज पास झाले. आता घराच्या कामाने उचल खाल्ली. कर्जाचा हप्ता जरी दरमहा जाऊ लागला तरी आम्ही चौघं मिळवते होतो त्यामुळे सर्वांनाच आपले घर पूर्ण होण्याची आस लागली. तळमजल्याचे बांधकामाचे वेळी मला त्यातील बरीच माहिती झाली होती त्यामुळे वरचा मजला त्रिभुवनमोहनकडून मीच बांधवून घेतला. अडचणीचे डोंगर तर होतेच. कधी सिमेंटचे परमिट वेळेवर मिळत नसे, कधी कामगारांची कुरबूर चाले. पैशाची चणचण तर कायमचीच.

त्यातच एकदा जीवावर बेतण्याचा प्रसंगही आला. कल्याणचा हसन फ़क्की वाळू पुरवित असे. त्याचे पैसे देण्यासाठी शनिवारी संध्याकाळी ६च्या सुमारास मी पारनाका, कल्याण येथील मुसलमानवाड्यात चाललो होतो. मोहल्ल्यात शिरताना आजूबाजूने शिट्यांचे आवाज येऊ लागले. १०, १५ जणं माझ्या रोखाने येऊ लागले. हसन फक्कीचे घर आले, दार उघडेच होते आणि हसन समोरच बसलेला होता. मला पाहताच तो बाहेर आला आणि त्याने मला लगबगीने घरात नेले. दंगा सुरू झाल्याचे मला माहित नाही काय? अशी विचारणा केली. तेव्हा त्या शिट्ट्यांचा आणि लोकं माझ्या रोखाने का येत आहेत ते उमजले. त्याच्या बायकोला माझ्याजवळ बसवून मला एकटा न सोडण्याबद्दल तिला बजावून तो परत बाहेर जमलेल्या लोकांसमोर गेला. त्या लोकांशी त्याची बाचाबाची चालली होती. माझ्या छातीत धडकी भरली होती, पण करणार काय? तिथेच मुकाट्याने बसून राहिलो. त्याची बायकोही बाहेरच्या लोकांसमोर गेली आणि त्या दोघांनी जमावाला सांगितले तो आमचा माणूस आहे, त्याला मारण्याआधी आम्हा दोघांना आधी मारा.. हे शब्द मी ऐकताच माझी पाचावर धारण बसली. घर आठवू लागले. पिल्लं डोळ्यासमोर आली. आता पुढे काय ताटं वाढून ठेवले होते? ५/१० मिनिटे एकदम शांतता पसरली. कोणीच काही बोलेना. वातावरण सुन्न झाले. ही दोघेही दारातून हलायला तयार नव्हती. समोरचा जमावही तसाच होता. थोड्या वेळाने ही दोघे दारातून हलत नाहीत बघून जमाव हळूहळू पांगू लागला. हसन आणि त्याची बायको माझ्याजवळ आली आणि मला भिऊ नका, आम्ही आहोत असा धीर दिला. साधारण तासभर दोघेही माझ्याजवळ बसून होती. त्या काळी फोन बीन नसल्यामुळे घरी काहीच कळवता येत नव्हते. एव्हाना नऊ वाजायला आले होते. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती. हसनने टांगा आणला आणि ती दोघे मला सोडायला स्टेशनवर आली. मला गाडीत बसवले आणि गाडी चालू झाल्यानंतर ती दोघे परत गेली. मला घाम फुटलेला होता. डोंबिवली स्टेशनात गाडी येईपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. अशा अनंत अडचणी पार करून एकदाचे घर पुरे झाले.

१९६६ च्या दसऱ्याच्या दिवशी आम्ही आमच्या घरात राहावयास गेलो. मुंबईत आल्यापासून आमची वास्तू होण्यास १६ वर्षे जावी लागली. हे आमचे सीमोलंघनच होते. आमच्या घराभोवती लहानसे अंगण होते. तेथे तुळशीवृंदावन बांधले आणि आवारात थोडी फुलझाडे लावली. दिवाळी लवकरच येऊ घातली होती. आमच्या घरातील ही पहिलीच दिवाळी! व्हेळात वसुबारसेला घरच्या गाईवासराची पूजा होत असे. येथेही घरच्या गाईची पूजा व्हावी या हेतूने वसुबारसेच्याच दिवशी बद्रीभैयाकडून लक्ष्मी तिच्या पांढऱ्या धोप कालवडीसह आमच्या घरात आली. त्या कालवडीचे आम्ही गिरिजा असे बारसे केले. डिसेंबर महिन्यात मला दुसरा मुलगा झाला तर मार्चमध्ये प्रभाकरास मुलगा झाला. घरात गोकुळ भरले पण बाळगोपाळांना घरचे दूध भरपूर उपलब्ध झाले. लक्ष्मी सकाळ संध्याकाळ ५, ५ लिटर दूध देत असे. आलागेला, पैपाहुणा आला तरी घरात भरपूर दूध, दही, तूप असे. उरलेले ताक, दूध इतरांना देत असू. पुढे काही महिन्यानी देवधरांच्या तबेल्यातून राणी म्हैस विकत घेतली. ती तर दहा, दहा लिटर दूध देत असे. लक्ष्मीच्या धारा मी काढत असे पण राणीच्या धारा काढणे मला कठिण जाई म्हणून जामू नावाचा काठेवाडी भैया तिच्यासाठी ठेवला.

पुढे पुढे कर्जाचे हप्ते वेळेवर जाईनासे झाले. घरात आम्ही २, आमची २ मुले, प्रभाकर, त्याची पत्नी व २ मुले, बाळ आणि ती. वहिनी अशी १० माणसे होतो. घरातला खर्च दिवसेंदिवस वाढत होता. बँकेच्या हप्ता भरणेबद्दल बँकेकडून तगादा होऊ लागला. ह्याच वर्षी बाळ बी ए झाला व त्याने एलएलबी साठी ऍडमिशन घेतली. पुढे एलएलबी होऊन बाळने एलएलएम सुद्धा पूर्ण केले. ६८ साली बाळचेही लग्न झाले. पुढे बाळने नोकरी सोडून पूर्णवेळ वकिली करण्याचा निर्णय घेतला. घराचा पसारा आता वाढला होता. आम्ही तिघांनी वेगळे व्हायचे ठरवले. त्या दोघांनी वेगळ्या जागा घेतल्या आणि त्यांचा हिस्सा देऊन घर आणि कर्ज आम्ही घेण्याचे ठरवले. एका गावात आमची ३ घरे झाली. वहिनीने आपल्याकडे राहावे असे सर्वांनाच वाटत होते पण आमच्यावरचा कर्जाचा बोजा आणि सौ. ची नोकरी ह्या २ कारणांमुळे वहिनीने आमच्याकडे राहण्याचा निर्णय घेतला.