स्मृतिगंध-३ "वाकेडची शाळा"

आजोबा म्हणजे आईचे वडील, आई आणि वहिनी यांनी मला पाचवीत घालायचे ठरवले पण गावात पुढे शाळाच नव्हती. राजापुरास सातवीपर्यंत आणि पुढची इंग्रजी शाळा होती पण घरापासून २० मैल दूर, मुलाला कोणाकडे ठेवणार? पुढे कसे करायचे ह्यावर आई आणि वहिनीची बोलणी होत असत पण मला त्यात काही फार रस नव्हता. मी आपला गुरेवासरे आणि गडीमाणसे यात रमलेला असे. पुढे एक दिवस गं. भा. बयोआत्ते आमच्याकडे आली असताना म्हणाली, "नारायणास वाकेडला गोदीकडे ठेवा. तिथे मराठी सातवीपर्यंत शाळा आहे. " वाकेड गाव घरापासून ४ मैलांवर, चालत जायला तास दीड तास सहज लागत असे. मी गोदीआत्त्याकडे वाकेडास राहू लागलो. तिचे यजमान आबा पाध्येंनी राजापुराहून मला ५ वीची पुस्तके आणून दिली आणि माझी रेग्युलर शाळा सुरू झाली. सकाळी ७ते १० आणि दुपारी ३ ते६ अशी शाळेची वेळ, मध्ये जेवणाची सुटी. मी शाळेत जात होतो पण मन रमत नव्हते. सकाळ संध्याकाळ शाळेत जात असे एवढेच, अभ्यास तर मुळीच होत नव्हता. घराची, गुरावासरांची आठवण व्याकूळ करत असे. पुढे दिवाळीची सुटी लागल्यावर मी घरी आलो तो परत वाकेडला शाळेत जाण्याची इच्छाच झाली नाही. ते वर्ष वायाच गेले.

ती. आई आणि ती. वहिनीस मात्र आम्ही मुलांनी शिकावे असे वाटे म्हणून मग पुढच्या वर्षी वाकेडास बिऱ्हाड केले. ती. आबांनी आम्हाला १ खोली दिली तिथे मी, प्रभाकर आणि आई किंवा वहिनी पैकी एक जण असे राहत असू. वत्सू आणि बाळ अजून लहान होते त्यामुळे बरेचदा आई व्हेळात त्या दोघांना घेऊन तेथील शेती इ. पाहायची आणि वहिनीबरोबर आम्ही दोघे वाकेडास शाळेसाठी राहत असू. आबा आम्हाला ताक देत असत पण २ पैशांचे दूध मात्र वहिनी त्यांचेकडून विकत घेत असे. प्रभाकर आणि वहिनी जवळ असल्याने आता वाकेडात मन रमू लागले होते. त्या आमच्या पाचवीच्या वर्गात ११ मुले होती. वार्षिक परीक्षेत आम्ही दोघेही पास झालो आणि माझा दुसरा नंबर आला. ६वी आणि सातवी ह्या दोन्ही यत्ता वाकेडातच पूर्ण केल्या.

सकाळची शाळा संपली की जेवणासाठी आम्ही घरी येत असू आणि नंतर ५/६ दोस्तमंडळी जवळच असलेल्या राम आणि विठोबाच्या देवळाच्या आवारात हुतुतू, खोखो, लंगडी असे खेळ खेळत असू. विठोबाच्या देवळात एका कोनाड्यात गणपती आणि दुसऱ्या कोनाड्यात मारुती होता. एकदा वसंताला खेळता खेळता काय लहर आली, त्याने गणपतीस कोनाड्याबाहेर काढले आणि नाचवायला लागला. दुसऱ्याने मारुतीला बाहेर काढले आणि तोही नाचवायला लागला. मी वसंताकडून गणपती घेतला आणि नाचवू लागलो एवढ्यात एक गृहस्थ देवळात आले. समोरचे दृश्य पाहून आम्हाला ओरडू लागले. आम्ही चुपचाप ऐकून घेऊन मुकाट्याने शाळेत पळालो, मनात जरा धास्ती होतीच. संध्याकाळी जणू काही घडलेच नाही असे घरी आलो. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत गेलो असता ९ वाजायच्या सुमाराला ते कालचे गृहस्थ, देवळाचे पुजारी आणि आबा पाध्ये शाळेत आले. त्यांना पाहिल्यावर आपले पुढे काय होणार? ते कळून चुकले. मास्तरांनी वसंता आणि मला ५/५ छड्या मारल्या आणि घरी आईला हकिगत कळल्यावर दुपारीही उपाशी ठेवण्यात आले.

सकाळची शाळा सुटल्यावर जसे विठोबाच्या देवळात खेळायला जात असू तसेच कधीतरी जवळच्या राईत सुद्धा जात असू. एकदा मी, प्रभाकर, वसंता, त्याची बहीण इंदू असे राईत खेळायला गेलो होतो. वसंताने आबांच्या चंचीतून चोरून तंबाखू आणला होता. कुड्याच्या पानात तंबाखू घालून आम्ही त्याची विडी वळली आणि ओढून पाहिली. आम्हा दोघांना काहीतरी मोठ्ठे साहस केल्यासारखे वाटले. घरी आल्यावर प्रभाकराने आईस हा पराक्रम सांगितल्यावर मार तर खावा लागलाच पण दुपारी जेवणही मिळाले नाही. तसाच उपाशी, रडत रडत शाळेत गेलो, पण आईच्या तेव्हाच्या शिक्षेचा परिणाम म्हणजे आजतागायत विडी, पान, सिगरेट, तंबाखूला हात लावायला धीर होत नाही.

सातवीचे वर्ष सुरू झाले. वर्गात आम्ही ६ मुले होतो. वाकेडात शाळेची मराठी ७वीची परीक्षा होत असे पण लोकल बोर्डाच्या व्हर्नाक्युलर फायनल परीक्षेसाठी मात्र रत्नागिरीस जावे लागत असे. व्ह. फा. पास असले तर मास्तराची नोकरी मिळत असे. मी नुसते मराठी ७वी पास न होता व्ह. फा. व्हावे असे आईस वाटत होते. लोकल बोर्डाच्या परीक्षेसाठी आम्ही सर्व मुले वाघुमल्हाराच्या बैलगाडीतून रत्नागिरीस गेलो. आमच्या बरोबर आमचे शेजारी शंकर श्रीधर उर्फ दादा होते. रत्नागिरीला सगळ्या मुलांची वेगवेगळ्या घरातून राहावयाची सोय आपापल्या घरूनच केलेली होती. दादा आणि मी वासू चहावाल्यांच्या घरी गेलो. तेथे माझे जेवणखाणे आणि राहणेची सोय परीक्षेसाठी केलेली होती. दुपारचे जेवण झाल्यावर परीक्षेचे सेंटर पाहण्यासाठी विचारत विचारत निघालो तेव्हा एका गृहस्थांनी व्ह. फा. ची परीक्षा पटवर्धन शाळेत असल्याचे सांगितल्यावर ते हायस्कूल शोधून तेथे नाव, नंबराच्या यादीत नाव हुडकून काढले. वासू चहावाल्यांच्या घरी येईपर्यंत संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले होते.

वासूच्या बायकोनेही माझी विचारपूस करून जेवायला घातले व माडीवर माझी झोपण्याची व्यवस्था केली. त्यांची मुलगी, तिला मी ताई म्हणत असे ती बी. ए. च्या वर्गात होती. सकाळी ताईनेच मला उठवले, अंघोळीस पाणी दिले आणि नंतर अभ्यासास बसवले. बरोबर ९ वाजता आम्हा दोघांना जेवायला वाढले. ताईनेच मला पटवर्धन शाळेत सोडले. रोज दोन पेपर असत. १ला पेपर १० ते १ आणि दुसरा २ ते ६ अशी ३ दिवस परीक्षा चालत असे. संध्याकाळी त्यांचे घरी गेल्यावर पोहे खायला देऊन, पेपर कसे गेलेची विचारपूस करून परत अभ्यासास बसवीत असत. मला पेपर्स चांगले गेले होते. परीक्षा संपल्यावर दादांबरोबर मी व्हेळात परतलो. मे महिन्याची सुटी गुरावासरात, शेतातली किरकोळ कामे करण्यात गेली.

१जूनला रिझल्ट लागला आणि मी ५८% मार्क मिळवून व्ह. फा. पास झालो. त्या काळी ५८% म्हणजे भरपूर मार्क मिळाले असे समजत, त्यामुळेच आई, वहिनी आणि आजोबांना अस्मान ठेंगणे झाले.