स्मृतिगंध-२ "व्रतबंध"

आठव्या वर्षी माझी मुंज करायचे ठरले. अंगण चोपून दारात मांडव घातला गेला. मांडव घालायला गावातले कुळवाडी आपणहून येत. जेवणावारी काम करीत असत. त्यांना अंगणात पत्रावळीवर भात, उडदाचे वरण नाहीतर कुळथाचे पिठले, लोणचे मिरची, पापड असे जेवण वाढले जाई.
कुंकुमाची बोटे लावून शुभचिह्ने काढलेल्या पत्रिकेस 'कुंकुमपत्रिका' म्हणत. पत्रिका छापून आणायचा काळ अजून यायचा होता.
एका स्वच्छ कोऱ्या कागदावर कुंकुमतिलकाने सुशोभित करून काळ्या शाईत वळणदार मोडीत पत्रिका लिहिली गेली.
श्रीमंत सकलगुणालंकरण अखंडित लक्ष्मीअलंकृत त्रिभुवनमंडित जगत चालक श्रीआर्यादुर्गादेवी यांचे सेवेसी चरणी नतपर दासानुदासाचे दोन्ही कर जोडून त्रिकालचरणी मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार ही विज्ञापना. " अशा मायन्याने सुरुवात करून " तरी त्यास स्वामींनी आपले गणासह परिवारे येऊन कार्यसिद्धी निर्विघ्नपणे तडीस न्याल अशी दासाची नियुक्ती आहे. सेवेसी श्रुत व्हावे ही विज्ञापना. " असा शेवट असे.
घरच्या देवांना आणि गावातल्या देवळात ताशेवाजंत्र्यासह गावातील चार प्रतिष्ठित मंडळीसह वाजतगाजत निमंत्रण दिले. नंतर गावातील प्रतिष्ठित घरात निमंत्रणासाठी लवाजम्यासकट सारे तासे वाजंत्र्यांच्या गजरात सारे गेले. अक्षत देऊन तोंडीच आमंत्रणे केली. लिखित पत्रिका फक्त देवाला! आमंत्रणाला गेले की ज्यांच्याकडे आमंत्रण करू त्यांनी नारळ द्यायची पद्धत होती. एक कुळवाडी सवाष्ण बाई हारा घेऊन ते नारळ उचलायसाठी सोबत असे. गावच्या पाटलाला आमंत्रण दिले की तो मग बाकी साऱ्या कुळवाड्यांना खबर देत असे.
लग्नमुंजीसारखी कार्ये ३ /४ दिवस आरामात चालत असत. कार्याआधी साधारण आठ दिवस सोवळ्यातले पोहे कांडले जात. दळणकांडण सारे घरातच असे. भात(तांदूळ) गरम पाण्यात २४ तास भिजवून ठेवत आणि दुसऱ्या दिवशी हाऱ्यामध्ये (बुरडाची टोपली)ओतत. त्यावर आधणपाणी घालत आणि निथळत ठेवत. एका खापरामध्ये हे भात ओतत, त्यास एक भोक असे आणि त्यात एका दांड्याच्या एका टोकाला चेंडूसारखे करुन फडके गुंडाळून ठेवलेले असे. त्यास ढवळणा म्हणत. हे खापर चुलीवर ठेवत आणि दांड्याने म्हणजेच ढवळण्याने ढवळत असत. काही वेळाने फोलपटे निघावयास लागत व लाह्या फुटू लागत, ह्या लाह्या वायनात(उखळीत) घालून मुसळाने कांडीत आणि एकीकडे पुढचा घाणा खापरात ओतत असत. हे काम करायला गावातल्या ब्राह्मणाच्या बायाबापड्या उत्साहाने येत असत. सोवळ्यातले पोहे करताना बायका शुचिर्भूत होऊन सोवळे नेसून हे काम करत. हे पोहे मग नेवैद्य, भटजी आणि सोवळ्याने जेवणाऱ्यांसाठी वापरीत असत. पोह्यांबरोबरच कार्या अगोदर उडदाचे पापड, सांडगे, चिकवड्या इ. गोष्टीही एकत्र जमून करीत. ह्या करता विशेष ओव्या म्हणून वातावरण मंगल करत असत.
कार्याआधी चार आठ दिवस अगोदरपासूनच माहेरवाशिणी आणि इतर नातलगांची लगबग सुरू होई. कार्याचे उपाध्येही सहकुटुंब २/३दिवस अगोदरच तळ ठोकीत असत. घर पाहुण्यारावळ्यांनी गजबजून जात असे. ४०/५० माणसांचा घरात सहज राबता असे.
घरातील बायका रात्रीच्या शांत वेळी बुंदी पाडून लाडू करीत असत. मुंजीच्या भिक्षावळीचे खास लाडू शहाळ्याएवढे मोठाले करत असत.
आदल्या दिवशी ग्रहमुख आणि केळवण असे. घाटले म्हणजे कण्या, गूळ, खोबरे घालून केलेली खीर आणि वडे घारग्यांचा बेत असे. घरातील ओटीवर पाहुण्यांची पंगत बसत असे. पाट, केळीची पाने, प्रत्येकाचे निराळे तांब्याभांडे, रांगोळ्या, उदबत्त्या असा सगळा थाट असे तर इतर मंडळीची पाने मांडवात पत्रावळी मांडून वाढत असत. वाढपी, आचारी असे काहीच नसे, तर घरातल्या आणि वऱ्हाडी मंडळीतल्या बायकाच पंगती घेऊन उष्टी काढण्यापर्यंतची सर्व कामे करीत असत. कार्याच्या स्वयंपाकाची भांडी घासण्यासाठी मात्र गावातील कुळवाडी मुद्दामहून आपणहून येत असत. त्यांना मोबदला असा नसेच. फक्त जेवणखाण मात्र घरच्यासारखे वाढण्यात येई.
बटूचा घेरा करण्यासाठी अर्जुन न्हाव्याचा मान असे. मांडवात मुंज लागल्यावर सर्वांना पान सुपारी देण्यात येई. नारळ, साखरेची पुडी, विड्याची २ पाने आणि सुपारी उपस्थितांना दिली जात असे. नंतर जेवणाचा बेत असे. बुंदीचे लाडू, भात, वरण, चटणी, कोशिंबीर, पापडसांडगे आणि लाल भोपळ्याची भाजी असा मेन्यू! जास्तीत जास्त लाडू खाण्यासाठी स्पर्धा लागे. काही मंडळी एकेका वेळी २०/२० लाडू सहज उठवीत असत.
सोवळ्याची लंगोटी नेसून, दर्भाची दोरी करून कमरेस मृगाजीन बांधून, हातात दंड घेऊन एका पाटावर बसून 'ॐ भवति भिक्षां देही ' म्हणत असल्याचे आठवते. घरातील बायकामाणसे भिक्षा वाढत. हीच भिक्षावळ! वरात, ब्यांड असे काही नव्हते. फोटोग्राफर, व्हिडिओ शूटिंग हे शब्द सुद्धा आम्हाला माहीत नव्हते.
मुंजीच्या दुसऱ्या दिवशी 'पळसुला' नावाचा एक विधी असे. कुंडीत पळसाची फांदी लावून तिची पूजा केली जाई. हा कार्यक्रम झाल्यानंतर मुंजीचे विधी समाप्त होत असत. दुपारीही मोठी पंगत असे. गूळभात, वडे, घारगे हाच बेत असे.
पाहुणे मंडळींना नारळ देऊन संध्याकाळी पाठवणी करीत असत.
मुंजीनंतर दररोज सूर्याला अर्घ्य देऊन गायत्रीचा १००० जप करायला लागत असे. वडील अगर विष्णू पाध्ये म्हणून एकजण होते ते संध्या शिकवत असत. मी नुसताच जानव्यास हात लावून बसत असे.
एकीकडे खामकर मास्तरांची शाळाही चालू होती. पुढे लगेचच आषाढात २ दिवस वडिलांना खोकला आणि तापाचे निमित्त होऊन अगदी अचानक आषाढ शु. १३ दिवशी देवाज्ञा झाली. स्मशानात नेऊन अर्जुन न्हाव्याकडून माझे क्षौर करण्यात आले आणि पुढचे विधी माझ्याकडून करवून घेण्यात आले असे पुसट आठवते. नक्की काय करवून घेतले ते आठवत नाही आणि अग्नी दिल्याचेही आठवत नाही. सर्वजण घरी आल्यावर मला पुन्हा अंघोळ घालण्यात आली आणि मग मी बेशुद्ध झालो असे इतर घरची इतर माणसे सांगत असत. त्यावेळी मोठा मी ८ वर्षाचा, प्रभाकर ६, वत्सू ४ तर बाळ १. ५ वर्षाचा होता. आम्ही पोरके झालो असे इतर सगळी माणसे म्हणत असत आणि त्यामुळे घरातून बाहेर येऊन लोकांना तोंड दाखवायची लाज वाटत असे. आम्ही सारी भावंडे जवळजवळ महिनाभर घरातून बाहेरच पडलो नाही.
एक दिवस खामकर मास्तर आणि २/३ मुले घरी आली आणि आम्हा दोघा भावांना शाळेत घेऊन गेले व शाळा सुटल्यावरही दोघे तिघे घरी पोहोचवायला आले. कितीतरी दिवस आम्ही दोघेही शाळेत एक अक्षर बोलत नसू, मान खाली घालून नुसते बसून राहत असू पण मास्तरांनी हळूहळू इतर मुलांशी बोलायला आम्हाला भाग पाडले आणि हळूहळू आम्ही अभ्यासात लक्ष घालू लागलो.
दुसऱ्या वर्षी मला ४थीत बसवण्यात आले तर प्रभाकरास २ रीत. तात्याचा बाळू, दत्तू आणि मी एवढेच जण ४थीत होतो. ३रीत ५/७मुले, २रीत प्रभाकरासहित ४ जण आणि पहिलीत ७/८ जण एवढ्या मुलांची शाळा एकाच ओसरीवर चाले. एका वर्गाचे शुद्धलेखन तर दुसऱ्या वर्गाचा हिशेब, तिसरीची पुस्ती आणि आणि एका वर्गाचे पाढे घेत एकच मास्तर शाळा हाकीत असत. अशातच आमची वार्षिक परीक्षा झाली. आम्ही तिघेही पास झालो त्यात माझा नं पहिला आला.