स्मृतिगंध-८ " आम्ही मिळवते झालो.. "

प्रभाकर मॅट्रिक झाल्यावर तो ही नोकरीच्या शोधात मुंबईस आला. अण्णाकडेच आम्ही राहत होतो. त्या दोन खोल्यांत अण्णा, वहिनी, तीन मुले राहत असल्याने माझ्याबरोबरच प्रभाकरही गॅलरीत अथवा गच्चीत झोपू लागला. पुढे पावसाळा आला तरी प्रभाकराच्या नोकरीचे काही जमेना. कोंकणात शेतीची कामे अडली होती आणि इकडे ग्यालरीत पावसामुळे झोपायची पंचाईतच होत असे. त्यामुळे त्यास कोंकणात परत पाठवून दिले आणि नोकरीचे काही जमले की त्याने परत येण्याचे ठरले. इकडे बाळही मॅट्रिक झालेला होता. त्यामुळे राजापुरातले कानेटकर मास्तर काही दिवसांनी त्यास घेऊन मुंबईत आले. आले ते अण्णाकडेच. प्रभाकराऐवजी आता बाळ आणि मी राहू लागलो. मास्तर त्याच्या नोकरीची खटपट करत होते. शॉर्टहँड टाइपिंगसाठी त्यालाही बर्व्यांच्या क्लासात घातला. दोघेही ग्यालरीत नाहीतर गच्चीवर झोपत असू. गिरगावात ४ वाजता नळ येत असे. त्यामुळे साडेचारच्या सुमारास उठून, आवरून कपडे धुऊन वाळत घालीत असू. साडेपाचच्या सुमारास वहिनी चहा देई. तो घेऊन सहाला मी जो बाहेर पडत असे तो बर्व्यांचा क्लास, बॅंक सारे करून रात्री काळ्यांच्या गजानन भोजन गृहात जेवून नवाच्या सुमारास घरी परतत असे.

बाळचा टाइपिंग क्लास आणि नोकरीची खटपट चालू होती. अशातच तो तापाने फणफणला. ताप काही उतरेना. टायफॉइडचे निदान झाले. नवलकर डॉक्टरांचे औषध सुरू केले. अण्णाच्या त्या २ खोल्यांतील एका खोलीत हा निजून असे. तापाने त्याची शक्ती पूर्ण गेली होती. मोसंबीचा रस आणि दूध याखेरीज दुसरे काही त्यास द्यायचे नसे. मी मध्येच येऊन त्यास रस काढून देई. १४व्या दिवशी ताप काढला. अंगाखालील गादी घामाने चिंब भिजली आणि बाळ अंग दुखते म्हणून रडत असे. मी सकाळ, संध्याकाळ त्याचे अंग पुसत असे. रस देत असे. हळूहळू त्यास पेज देण्यास सुरुवात केली. वहिनी दुपारी पेज करून देत असे. पाच सहा दिवसांनी तो चालायला लागला. नंतर तो माझ्याजवळ सारखे भूक, भूक करत असे परंतु त्यास पेज, पातळ भात याखेरीज दुसरे इतक्यात देऊ नका असे सांगितल्यामुळे पंचाईत होत असे. अण्णावैनीकडे काही मागायला नको वाटत होते. ते आमच्यासाठी करत होते तेच खूप होते. एक दिवस तो माझेबरोबर काळ्यांच्या भोजनगृहात आला. इतक्यातच तो टायफॉइडमधून उठला आहे असे समजल्यावर काळ्यांनी त्याला पोटभर पातळभात खायला दिला. मग दुपारी काळ्यांच्या खानावळीत त्याचे पथ्याचे जेवण सुरू झाले. १५, २० दिवसात त्याची तब्येत सुधारली. त्याच्या नोकरीच्या शोधास आम्ही परत सुरुवात केली.

एक दिवस एका सरकारी कचेरीत कारकून भरती करणेकरता अर्ज मागवत असल्याची जाहिरात त्याने आणली. पण बाळ त्यांच्या नियमात अंडरएज होता. प्रभाकर मात्र त्या रिक्वायरमेंटमध्ये बरोब्बर बसत होता, पण तो तर कोंकणात! चर्चगेटच्या त्यांच्या ऑफिसातून मी फॉर्म आणला आणि प्रभाकराच्या नावाने भरून त्याची सही ठोकून अर्ज पाठवूनही दिला. पुढे दोन महिन्यांनी परीक्षेला बसण्याचे पत्र आले. परीक्षा त्याच रविवारी सिडनेहॅम कॉलेजातच होती. त्या काळी फोनबीन काही नव्हते. दोनच दिवसाच्या अवधीत व्हेळात प्रभाकरास हा निरोप देणार तरी कसा? चालून आलेली संधी घालवायला जीव होईना, काही सुचेना. शेवटी परीक्षेच्या दिवशी त्याच्या नावचे पत्र घेऊन मीच सिडनेहॅम कॉलेजात परीक्षेला बसलो. त्या काळी पत्रावर नुसता सीट नंबर असे. फोटो बिटो काही नसे, त्यामुळे ते चालून गेले. संध्याकाळी घरी आल्यावर अण्णाने रविवार असून दिवसभर कोठे होतास अशी विचारणा केली. तेव्हा पत्र दाखवून प्रभाकराच्या नावे परीक्षा देऊन आल्याचे सांगितले. अण्णा, वैनी दोघेही आनंदाने हसू लागली. पण अण्णा म्हणाला, "बाहेर कुठे बोलू नकोस, कुठे समजले तर पकडून नेऊन फिर्याद करून तुरुंगात घालतील. " मी जरा घाबरलो पण रोजच्या रहाटगाडग्यात ती बाब मागे पडली. पुढे चार, आठ दिवसातच बाळला चर्चगेटच्या फिलिंजर ह्या घड्याळ कंपनीत ५०रु पगारावर स्टेनो म्हणून नोकरी लागली.

अशातच एक दिवस प्रभाकराच्या नावे पत्र आले. लेखी परीक्षेत पास होऊन त्यास मेडिकलसाठी बोलावले होते, मध्ये १०, १२ दिवसांचा अवधी होता म्हणून लगेचच व्हेळात पत्र धाडून त्यास बोलावून घेतले. भायखळ्याच्या सरकारी हॉस्पिटलात मेडिकल परीक्षा होती. मी अर्ज भरतेवेळी वजन, उंची अंदाजानेच लिहिले होते, त्यात बराच फरक पडला होता. आम्ही जरा मनातून घाबरलोच होतो. पण तशी काही अडचण न येता १५ दिवसातच त्यास नेमणूक केल्याचे पत्र आले. आम्ही आता खरंच आनंदलो, परंतु एखाद्या निवांत क्षणी कांदिवलीच्या 'इंडियन प्लॅस्टिक'चे दिवस आठवत. अण्णा मे महिन्यात कोंकणात गेला की मी गोरेगावला नानाकडे बेलवलकरवाडीत राहायला जात असे. त्यावेळी तळवलकरांच्या खानावळीत मी जेवत असे. दुपारच्या डब्यासाठी पोळी आणि गूळ ते मजला देत असत. त्यावेळी गोरेगावात पाण्याचा फार तुटवडा होता. वाडीत पाण्याची मोठी विहीर होती पण उन्हाळ्याच्या मध्यावर विहिरीचे पाणी तळ गाठू लागे. काढण्याने पाणी काढणे जिकिरीचे होत असे. मग मी विहिरीत उतरून भांड्याने पाणी काढण्यात भरत असे आणि नाना ते वर ओढून घेत असे. रोजंदारीवरचे ते १रु १०आणे सुद्धा तेव्हा आधार वाटत. त्या दिवसांपेक्षा आता खूपच बरे दिवस आले होते.

अण्णाच्या त्या लहानशा जागेत आम्ही तिघे भाऊ आणि त्याची ३ मुले, अण्णावैनी राहत होतो. पण आता अण्णाला किती त्रास द्यायचा असे सारखे वाटू लागले. गिरगावात तर जागा घेणे शक्य नव्हते. गोरेगाव, मालाडसारख्या ठिकाणी नाना, काकांच्या मदतीने जागा पाहू लागलो पण डिपॉझिट साठी १०००रु, कुठून आणणार? पैसे उभे कसे करायचे ही चिंता परत भेडसावू लागली. आमचे मामा त्यावेळी कल्याणला कवडीकरांकडे राहत होते. डोंबिवलीत जागा असल्याची बातमी त्यांनी आणली. स्टेशनपासून चालत १० मिनिटाच्या अंतरावर २ खोल्यांची जागा होती. जरी लाइट, नळ नव्हते, विहिरीचे पाणी शेंदून घ्यायचे होते तरी जागा बरी वाटली. अर्थात दुसरा पर्याय तरी कोठे होता? ३५रु, भाडे दरमहा आणि डिपॉझिट म्हणून तीन महिन्यांचे भाडे त्यांनी सांगितले तेव्हा लगेचच १०५रु आठल्यांना देऊन आम्ही जागा ताब्यात घेतली. मामांनी थोडी भांडी आणून दिली. स्टोव्ह आणला आणि आम्हा भावांचे बिऱ्हाड सजले. आई व वहिनीस पत्र पाठवून राजापूरचे बिऱ्हाड बंद करून वत्सू आणि वहिनीस डोंबिवलीत आणले.
त्या दोघी डोंबिवलीत आल्याने आम्हाला आता घरचे जेवण मिळू लागले होते. सारेजण एकत्र आल्यामुळे त्या बिऱ्हाडाला घरपण आले होते, आईच तेवढी व्हेळात राहून शेती पाहत होती.

वत्सू १०वी झाली तरी तिच्या नोकरीचे काही कुठे जमत नव्हते. आता तिच्या लग्नाचेही पाहायला हवे होते. त्यातच अण्णा आणि वैनीने माझ्यासाठी मुली पाहायला सुरुवात केली. त्यांनी एकदा मला फसवून मुलगी पाहायला नेले. एकुलती एक मुलगी आणि तिचे वडील रिटायर्ड झाले होते. हिचे लग्न झाले की मुंबैतील जागा मुलगी आणि जावयास देऊन ते गावी जाणार होते. अण्णा वैनीला हे स्थळ अगदी पसंत होते. मुलगीही चांगली होती, शिवाय मुंबईतील जागा, खरोखरच कुठेही नाव ठेवायला जागा नव्हती. पण मनात विचार आला, हिच्याशी लग्न करून मुंबईत राहावयास गेलो तर घरातल्या इतर सर्वांकडेच दुर्लक्ष होईल. शिवाय वत्सूचे लग्न नोकरी नसल्याने जमायला अवघड जात होते. आठ दिवस विचार केला आणि शेवटी, वत्सूचे लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही असे अण्णा, वैनीस सांगितले. अण्णा वैनी दोघेही माझ्यावर हातची चांगली संधी घालवली म्हणून वैतागले. पुढे अनेक दिवस दोघेही माझ्याशी बोलणे टाळत असत. ते माझ्या हिताचेच पाहत होते आणि मी घराचे हित!