स्मृतिगंध-६ "चाकरीसाठी मुंबईत.. "

टिपूर झाले तरी मी व्हेळातच होतो. हरिभाऊंशी बोलल्याप्रमाणे वारंगोळे करून कुळीथ लावून झाले होते. बाकीच्या भावंडांची शिक्षणे राजापुरात चालू होती. वहिनी तिथे मुलांना घेऊन राहत होती तर मी आणि आई व्हेळातली शेती पाहत होतो. राजापुरातले बिऱ्हाड एका खोलीचे, तेथे दूध विकत घ्यावे लागे तर घरात म्हैस होती. मग मी सोमवारी दूध, दही घेऊन व्हेळ-राजापूर १५ मैल अंतर चालून जात असे. गाडीभाड्यासाठी पैसे कुठे असत? आठवड्यातून एकदा तरी पोहे, तांदूळ असे जिन्नस तेथल्या बिऱ्हाडाकरता घेऊन जाई. वहिनी सोवळी होती. तिचा सारा स्वयंपाक सोवळ्यातला असे. सोवळ्याचे पोहे, तांदूळ, पापड असे जिन्नस तिस राजापुरात कोठून मिळणार? मग आई घरी सोवळ्याचे जिन्नस करे आणि सकाळी उठून, अंघोळ करून मी सोवळ्याने इतर कोठेही न शिवता, पायात चपला घातल्याशिवाय राजापुरास ते घेऊन जात असे. असे दिवस चालले होते.

एक दिवस आई म्हणाली, "अरे, असे इथे किती दिवस काढणार आहेस? बाहेर कुठे नोकरी पाहणार आहेस की नाही? " माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. व्हेळात राहून जास्त काही करता येणार नाही तर आपण राजापुरास जावे. ते तालुक्याचे ठिकाण आहे, आपले बिऱ्हाडही तेथे आहे. काहीतरी हातपाय मारता येतील तर पाहावे. हे आईला सांगणार तर एवढ्यात तिवऱ्याचे श्रीकृष्ण पाध्ये आमचेकडे आले आणि मज म्हणाले भांबेडातील शाळेत मास्तर हवा आहे. तू माझ्याबरोबर भांबेडास चल. व्हेळापासून भांबेड ५, ७ मैल. दुपारची जेवणे झाल्यावर आम्ही भांबेडास जायला चालतच निघालो. संध्याकाळ झाल्यावर कुडूवाडीस फणसळकरांकडे मुक्काम केला. सकाळी उठून भांबेडास जायचे तर सकाळी ते म्हणाले आज आपण परत जाऊया, परत दोन दिवसांनी येऊ. मग काय? परत घरी येण्यास निघालो. वाटेत ते मला म्हणाले, " मास्तरची नोकरी करू नको. " परत व्हेळास का जायचे? मास्तरची नोकरी का करायची नाही? हे विचारण्याचे धाडस मजकडे नव्हते. मी आपला निमूटपणे त्यांचेबरोबर घरी परत आलो. दुसऱ्या दिवशी ते तिवऱ्यास निघून गेले आणि मी राजापुरास गेलो. गाडीतळाजवळ शिरवलीचे तात्या ठाकूर भेटले. ते उद्याच मुंबईस निघाले होते. मला अण्णाकडे नेऊन सोडावयास ते तयार झाले होते.

दुसऱ्या दिवशी १२ च्या गाडीने मुसाकाजीला जाऊन बोटीने मुंबईला जाण्याचे ठरले. घरी वैनीस सांगितले पण आईला सांगावयास हवे होते. तिकिटासाठी पैसेही आणायला व्हेळात जाणे जरूरीचे होते. मी व्हेळात जाऊन आईला मुंबईस जाण्याचे सांगावयास जातो आहे हे तात्यांच्या कानावर आले. तात्यांनी मला आईसाठी चिठ्ठी लिहून देण्यास सांगितले. त्यांच्या गाडीवानाबरोबर चिठ्ठी आईकडे पोहोचती झाली असती. पण उताराचे (तिकिटाचे) पैसे कोठून आणणार? त्यावेळी बोटीचे तिकिट होते ८रु. तात्यांना हे कळल्यावर ते मजवर ओरडले, "पैशाचे काय घेऊन बसलास? चल मुकाटपणे. " दुसऱ्या दिवशी ११ वाजताच जेवून एका पिशवीत शर्ट, चड्डी घेऊन मी गाडीतळावर हजर झालो. तेथे तात्या, त्यांची मुलगी आणि अण्णा पाध्येंची मुलगी आलेले होतेच. त्या दोघीजणींना मुंबईस दाखवावयास नेत होते. मुंबैत पोहोचताच तात्यांनी मला अण्णाकडे पोहोचते केले.

अण्णाने आपल्या ओळखीच्या लोकांस सांगून माझ्या नोकरीची खटपट सुरू केली. घरात बसून तरी काय करणार आणि आयते तरी किती दिवस जेवणार? म्हणून मग मी अण्णाच्या दुकानात पडेल ते काम करीत असे. दिवसभर नोकरी शोधणे आणि अण्णाच्या दुकानात काम करणे चालू झाले. त्याचेही घर म्हणजे गिरगावातील दोन खोल्या. तो, वैनी आणि ३ मुलांसह तो राहत असे. मी ग्यालरीत किंवा गच्चीवर झोपत असे. असे ४, ६ महिने गेले तरी नोकरीचा पत्ता नाही. मे महिन्याच्या सुटीत अण्णा, वहिनीचे कोंकणात जाण्याचे ठरले. मलाही बरोबर नेण्यास अण्णा तयार होता पण नोकरी मिळाली नसताना घरी जाण्यास माझे मन तयार होईना. हो ना करता अण्णाचा धाकटा भाऊ यशवंता उर्फ नानाकडे गोरेगावास राहण्याचे ठरले. मुगभाटातील गजानन भोजनगृहात अण्णांनी माझी जेवणाची सोय केली. सकाळी गिरगावातील दुकानात येत असे. दुपारी व रात्री मुगभाटात जेवून रात्री गोरेगावात नानाकडे राहावयास जात असे पण फुकटचे जेवायची लाज वाटत होती. दिवस नोकरीच्या शोधात जात होता, प्रत्येक ठिकाणी अर्ज करत होतो पण उत्तर नाही.. नाही म्हणायला अण्णाच्या दुकानात काम करीत होतो पण खाणावळीचे पैसे अण्णाच देणार होता. नोकरी लागली की त्यांचे पैसे मी परत करणार होतो पण आज तरी माझ्या हातात काहीच नव्हते.

मी मग एकदाच जेवावयास सुरुवात केली. रात्री नानाकडे झोपायला गेल्यावर वहिनी जेवावयास विचारायची. तिला मी जेवून आलो आहे असे खोटेच सांगत असे. अण्णावैनी कोंकणातून परत आले आणि मी ही गोरेगावातून गिरगावास येण्यास निघालो. त्या दिवशी खिशात फक्त ७ आणेच होते तर गोरेगावपर्यंतचे तिकिट ८ आणे होते. मी ग्रँटरोडपर्यंतचे तिकिट काढले आणि चर्नीरोडला उतरलो आणि नेमके टीसीने त्या दिवशी मला पकडले. ९ आणे दंड मागू लागला. खिशात पैसा नव्हता तर ९ आणे देणार कोठून? मांगलवाडीतच मी राहतो, घरी जाऊन पैसे घेऊन येतो असे मी त्यास सांगितल्यावर त्याने मला तेथे चपला काढून ठेवावयास सांगितल्या. दंड भरल्यावर चपला घेऊन जाण्यास सांगितले. मी तसाच अनवाणी घरी आलो तर वैनी पोळ्या करीत होती. काही घडलेच नाही अशा स्थितीत मी दोन दिवस वावरत होतो. दुसऱ्या दिवशी मालाडला राहणारा अण्णाचा धाकटा भाऊ श्रीराम आला. त्यास आम्ही काका म्हणत असू. आम्ही दोघेजण चौपाटीला गेलो असता माझ्या पायात चपला नसल्याचे त्याच्या लक्षात आले आणि ही गोष्ट त्याने अण्णाच्या कानावर घातली. सकाळी गणपतीच्या देवळात गेलो असता तेथे चपला गेल्या अशी थाप मी मारली तेव्हा काकाजवळ पैसे देऊन अण्णाने माझ्यासाठी चपला घेऊन येण्यास सांगितले.

पुढे काही दिवसांनी काकाने इंडियन प्लॅस्टिक कं त नोकरी असल्याचे सांगून केतकर नावाच्या गृहस्थांकडे नेले. त्या कंपनी त प्लॅस्टिकच्या बाहुल्या तयार करत असत. त्यांचे डोईवरील केस काळ्या रंगाने रंगवणे हेच काम होते. मला काहीतरी काम हवेच होते. मी तेथे नोकरीला सुरुवात केली. सकाळी ९ ते ६ ही कामाची वेळ, दुपारी तासभर जेवणाची सुटी असे. रोजचा १रु. १० आणे मिळत. रविवारी सुटी असे पण रविवारचा पगार मिळत नसे. २६ दिवसाचे ४२, ४३ रु मिळत पण फुकटचे खातो आहे असे तरी वाटत नसे. खानावळीचा खर्च ३०रु. आणि पासाचे ६ रु. एवढाच खर्च.. बाकी ३, ४ रु उरत असत. असे ६ महिने काढले. त्यावेळी कधी दुपारी तर कधी रात्री असे एकदाच जेवत असे आणि खाणावळीचे पैसे वाचवीत असे. पैशासाठी शक्यतो अण्णा किंवा इतरांकडे तोंड न वेंगाडता जगत होतो. रात्री घरी आल्यावर अण्णावैनी जेवावयास विचारीत पण मी तेथेही जेवून आलो आहे असे खोटेच सांगत असे. संध्याकाळ मोकळी होती त्यामुळे बर्वेंच्या मॅजेस्टिक शॉर्टहँड -टाइपरायटिंग इन्स्टिट्यूट मध्ये क्लास लावला. त्याची ४ महिन्याची फी १६ रु. होती. दिवसा इंडियन प्लॅस्टिक आणि संध्याकाळी टायपिंगचा क्लास असे दिवस जाऊ लागले.