मैफल

आण्णांनी तळव्यावरची तंबाखू नीट मळून घेतली. दोन-तीनदा ती या हातातून त्या हातात अशी केली. आणि मग तिचा एक तबीयतदार  बार भरला. हात झटकून टाकत ते म्हणाले, "ऐका बांडुंगअली... "
गोऱ्यापान, घाऱ्या डोळ्यांच्या बुवांनी हातातल्या सिग्रेटवरची राख झटकली. ते थोडेसे पुढे सरकले.
"माझ्या व्हटाचं डाळिंब फुटलं
सांगा राघू मी न्हाई कधी म्हटलं
आता नका रुसू
जरा जवळ बसू
खुदुखुदू हसू
दोन जिवाचं भांडण मिटलं"
"व्वा, आण्णा व्वा! " बुवांनी दाद दिली. आण्णाही आता रंगात आले.
"नका वळवू हो मान
करा शब्दाचा मान
बघा देऊन ध्यान
माझ्या अंगावर काटं उठलं

आम्हा बायकांची सवय
नाही म्हणजेच होय
आता कशाचा संशय
राजाराणीचं नातं पटलं"
"आण्णा,आण्णा... गावरान लिहावं तर तुम्हीच! " आण्णांचे हात हातात धरून बुवा म्हणाले. "आमची पेनं आम्ही भंगारात विकावी बघा! "
"अहो तसं नाही बुवा! " आण्णा गमतीनं म्हणाले "गद्यनगरीचे तुम्ही सरदार, तर पद्याच्या राऊळातले आम्ही पुजारी! काय खरं की नाही रामभाऊ?"
रामदादांनी मान हलवली. दादांच्या शेजारी बसलेले साध्या शर्ट-पँटमधले लहानसर चणीचे गृहस्थ हळूच म्हणाले, "बुवा, आण्णांची लेखणी पाहिली की भाईंचे शब्द आठवतात. सगळे शब्द 'हमारे लिये कुछ सेवा' म्हणून उभे असतील येथे! आमच्या 'मुंबईचा जावई'च्या वेळेची गोष्ट सांगतो तुम्हाला, बुवा. शृंगारिक गाणं पाहिजे होतं आम्हाला. शृंगारिक, पण सभ्य. जरासं सूचकही. आण्णांनी जरा विचार केला आणि एका बैठकीत 'का रे अबोला' लिहून काढलं. त्यातली सूचकता मी तुम्हाला सांगायला नको...
रात जागवावी असे आज वाटे
तृप्त झोप यावी पहाटे पहाटे
आणि यातलं मीटर इतकं नेमकं आहे रामदादा, की मला फारसं काही करावंच लागलं नाही. नारळात जन्मतःच पाणी असावं तशी आण्णांच्या शब्दातच चाल दडलेली असते. बाकी पुढचं काम आशाबाईंनी अगदी सोपं केलं... "
आण्णा खुशीत येऊन हसले.

पलीकडे संगीताची बैठक रंगात आली होती. "'न तुम बेवफा हो' ची काय चाल दिल्यायस भय्या! मान गये तुमको! " केस आणि मिशा पिकलेल्या दादांनी त्या पंजाबी तरुणाचे हात हातात घेतले होते. "और तेरे 'कदर जाने ना' के तो क्या कहने! "
"आपका आशीर्वाद है दादा! " तो पंजाबी लाजल्यासारखा झाला होता. "आपके सामने तो बच्चा हूं दादा! आप तो पारखी हो! कुठूनकुठून असली रत्नं शोधून आणता खुदा जाने! आता या तपनकुमारचंच बघा ना... " गर्दीत मागे लपलेल्या तपनकुमारला त्या पंजाब्यानं पुढं ओढून आणलं. "कहांसे लाये इस मुलायमसी आवाज को, दादा? "
"अल्लाची देन आहे भय्या! मैं तो इक बहाना हूं जिसके जरिये भगवान किसीसे कुछ करवा लेते हैं! या तपनलाही मी पहिला चान्स दिला खरा, पण त्याचं खरं चीज तूच केलंस भय्या! 'बेरहम आसमां' मध्ये काय धून आहे तुझी! आणि काय गायलाय बरखुरदार!
"शुक्रिया, दादा! मेहेरबानी.. " तो लाजरा संकोची तरुण म्हणाला.
कोपऱ्यातून मेंडोलिनचे विलक्षण करुण सूर ऐकू आले. एक देखणी पण उग्र चेहऱ्याची व्यक्ती सगळ्यांकडे पाठ फिरवून एकटीच मेंडोलीन छेडीत बसली होती.
"आप अकेले क्यूं बैठे हो मियां? महफिलमें आ जाईये.. " दादा म्हणाले.
"मला या वाजंत्रीवाल्यांच्यात बोलावू नका दादा. मी एकटा आहे तेच बरं आहे. "
"असं कसं म्हणता मियां...? "
"मग काय म्हणू दादा? " त्याने मेंडोलीन खाली ठेवलं. "इस पंजाबी छोरे की तारीफ कर रहे थे आप. इतरांच्या धुना चोरून त्यावर जगणारे लोक हे.माझ्या 'ये हवा ये रात ये चांदनी' वरुन उचलून यानं 'तुझे क्या सुनांऊ मैं दिलरुबा' बांधलं. आणि हा म्हणे संगीतकार! "
"अरे हो, हो, मियां! संगीत अल्लाघरची देन आहे. आप क्यूं खफा हो रहे हो? सात सुरांवर सगळ्यांचा तितकाच अधिकार आहे.. " दादा म्हणाले.
"हां, फार तारीफ करू नका दादा. आपकोभी नही बक्षा इसने. आपल्या 'सीनेमें सुलगते हैं अरमां' वरनं यानं हुबेहूब 'तुम चांद के साथ चले आओ' घेतलंय. खोटं वाटत असेल तर विचारा त्याला.. "
भय्या जरासा शरमला. "कुबूल मियां, कुबूल. वो तर्ज है ही इतनी प्यारी.."
"हम्म. " तो उग्र चेहऱ्याचा माणूस म्हणाला. "पण लताकडून तू जे काही करून घेतलंस त्यासाठी एक जाम भरतो भय्या मी, खुदा मुआफ करे. माझ्याखालोखाल लताला न्याय देणारा तूच. 'एक लता गाती है, बाकी सब रोती हैं' असं मी म्हणालो
तर सगळी इंडस्ट्री तुटून पडली माझ्यावर. तू बाकी तेच सच आहे, हे दाखवून दिलंस सगळ्यांना. शाब्बास, शाब्बास बे फौजी. "
" पण मियां, याच लताला तुम्ही म्हणे ऐकवलं होतं, ' लताजी ठीक से गाईये, ये हमारी तर्ज है, उस मियां की नही'? "
"हां जरुर. आणि अगदी नौशादचं नाव घेऊन ऐकवलं होतं. अरे, लता असली म्हणून काय झालं? संगीतसे बडा कौन होता है? और हम? हम उसके पुजारी है भाई, कोई नौकर नही हैं.  अल्लाचा हात डोक्यावर घेऊन पैदा झालेला असतो संगीतकार. मजाल है की कोई ऐरा गैरा हमसे ऐसी वैसी बात करें? भय्या, दुनियेला जूत्याखाली ठेवलं आपण. भूखे मर गये, पर कभी किसीके पास काम मांगने नही गये... "
त्या पंजाबी तरुणाच्या डोळ्यांत पाणी तरारलं. "सच्ची बात मियां, सच्ची बात. ही अकड फार जालिम चीज असते. हमसे अच्छा भला कौन जाने... "
त्या उग्र चेहऱ्याच्या माणसानं मेंडोलीन उचललं. हलके हलके हिमवृष्टी सुरू व्हावी तसे हृदय पिळवटून टाकणारे करुण सूर पुन्हा हळुवारपणे बरसू लागले.

स्वत:शीच कुणीतरी म्हटलेल्या काही ओळी ऐकू आल्या आणि सगळ्यांचीच नजर तिकडे गेली.
"सीमा ओलांडून पलीकडे जाण्याची वेळ येत आहे. पण मला नेण्यासाठी पताका लावलेला रथ येणार नाही. मी जात असता तुतारी निनादावी अगर मला येताना पाहून चौघडे वाजू लागावेत असे काही भव्य मी निर्माण केले नाही. मी लावलेल्या रोपट्यांचे आकाशस्पर्शी देवदार झाले नाहीत, की माझ्या शब्दांनी दिव्यत्वाशी नाते जोडणारे महाकाव्य निर्माण झाले नाही. येथे माझ्यासाठी महाद्वार उघडले जाणार नाही. माझा साराच प्रवास धुळीतून अनवाणी पावलांनी झाला आहे. परंतु माझ्यासाठी लहान दिंडी उघडणाऱ्या द्वारपालांनो, मी हीन-दीन, दरिद्री होऊन तुमच्याकडे आलो नाही, ही गोष्ट ध्यानात असू द्या. सर्वत्र पसरलेल्या जळजळीत सूर्यप्रकाशात मी माझा स्वतःचा एक लहान तारा पाहिला आहे. समुद्रात बुडालेल्या द्वारकेची एक गोकुळसरी मी क्षणभर त्याच्या सुवर्णवैभवात पाहिली आहे. येत असताना माझे हात रिकामे असले तरी रिते नाहीत. त्यांच्या बोटांना मारव्याचा वास लागला आहे. त्यांनी भरवलेला घास घेताना काही अगदी लहान मुलांना फार आनंद झाला आहे. लाल डोळ्यांचा एक पक्षी त्यांच्यावर फार प्रेमाने आणि विश्वासाने उतरला आहे. मी एक क्षुद्र याचक म्हणून येथे येत नाही. मी माझ्या पायभार खेड्यासाठी विनादैन्य येथे पाऊल टाकत आहे... "
हा कोण बुवा आणि तो हे काय म्हणत आहे या अर्थाने काही लोकांनी एकमेकांकडे भुवया उंचावून पाहिले.
पण त्या काळा चष्मा घातलेल्या पाठमोऱ्या माणसाने काही मागे वळून पाहिले नाही.

दुसऱ्या एका बाजूला चारच लोक काहीतरी बोलत होते. त्यातले एक चष्मेवाले, पातळ मागे फिरवलेले केस असणारे साध्या बुशशर्ट-पँटमधले गृहस्थ म्हणाले, "मलाही माझी वाट सापडायला फार वेळ लागला. सुरवातीला सामाजिक कादंबऱ्या, कथा... कायकाय लिहिलं. अहो, तुम्हाला खरं वाटणार नाही, एक नाटकही लिहून पाहिलं. मग ठरवलं की भय्या, आपली वाट वेगळी. फारशी मळलेली नाही, फार लोकप्रियही नाही. पण हेच आपण करायचं. "
"पण कधी खंत नाही वाटली तुम्हाला? तुम्ही लोकप्रिय झालात, तुमचा स्वतःचा असा वाचक वर्ग निर्माण झाला, तुमच्या कथा कादंबऱ्या गाजल्यापण. समर्थ आणि अप्पा म्हणजे मराठीतले होम्स -वॉटसन असं लोक म्हणतात. पण... माफ करा हं,  कधी पहिल्या फळीतले लेखक म्हणून तुमचं नाव आलं नाही. कुठले पुरस्कार, संमेलनाचं अध्यक्षपद असलं काही नाही. कधी... कधी आपल्यावर अन्याय होतोय असं वाटलं नाही? "
ते चष्मेवाले गृहस्थ फक्त मंदपणे हसले.

मुख्यमंत्री जिवाजीराव शिंद्यांनी सिगारचा एक दीर्घ झुरका घेतला. आपल्या चष्म्यावरून एकदा प्रतिस्पर्ध्याकडं बघून घेतलं आणि पटावरील घोडा अडीच घरं पुढं नेला. "चेक, डिकास्टा" ते म्हणाले.
डिकास्टा किंचित हसला. "वाटलंच होतं! ब्रिलियंट मूव्ह, जिवाजीराव! पण हा डिकास्टाही काही कच्च्या गुरुचा चेला नाही. हा आला आमचा राजा पांढऱ्या घरात! "
खेळ कुतुहलानं बघणाऱ्या माणिकरावांनी अडकित्त्यात बराच वेळ धरून ठेवलेली सुपारी अखेरीस फोडली. "पन मी काय म्हनतो सीयेमसायेब, तुमी आपापसात समेट का नाय करून राह्यले. "
"अहो तसं नाही, माणिकराव.... " जिवाजीराव म्हणाले. एवढ्यात पटावर कुणाची तरी सावली पडली म्हणून त्यांनी मान वर करून बघीतलं. साधा कॉटनचा झब्बा पायजमा, चष्मा, उधळलेले कुरळे केस, खांद्याला शबनम अशी एक किरकोळ आकृती शेजारी उभी होती.
"अरे, ये ये ये.. " जिवाजीराव उत्साहानं म्हणाले. "तुझी वाटच बघत होतो. किती उशीर केलास? काय डिकास्टा, आता आमची बाजू झाली की नाही भक्कम? "
"तुमची? की आमची? " डिकास्टानं मिष्किलपणे विचारलं.
"हम्म. बघूया कोणाची ते. बस, तू बस रे गड्या. "
दिगू टिपणीस शेजारच्या खुर्चीत बसला.