द्रोण पत्रावळींच्या खादाड आठवणी

श्रावण-भाद्रपदाचे दिवस म्हणजे घरात विशेष पूजा, होम- हवन, धार्मिक कार्यांचे दिवस. ह्या कालाला त्यांमुळे एक वेगळाच सुगंध प्राप्त असतो. वेगवेगळी फुले, पत्री, पूजा द्रव्य, प्रसादाचे जेवण, होमाच्या धुरांचे वास स्मृतिपटलावर बहुधा कायमचे कोरून ठेवले गेलेत. निरनिराळ्या सणांच्या निमित्ताने घरात भरपूर पाहुणे जेवायला येणेही त्यातलेच! पण सध्याच्या 'फास्ट' जमान्यातील प्लास्टिक, स्टायरोफोम, फॉईलच्या ताटवाट्यांची तेव्हा डाळ शिजत नाही. आजही तिथे पत्रावळी, द्रोणच लागतात. मग भले पत्रावळीतून पातळ कालवणाचा ओहोळ जमिनीच्या दिशेने झेपावो की द्रोण कलंडू नये म्हणून त्याला पानातीलच अन्नपदार्थांचे टेकू द्यावयास लागोत! पत्रावळीतील जेवणाची मजाच न्यारी! निमित्त कोणते का असेना - अगदी पाणीकपातीपासून मोलकरणीच्या खाड्यापर्यंत! पत्रावळींचा बहुगुणी पर्याय गृहिणींचा लाडकाच!

पत्रावळींचेही कितीतरी प्रकार आहेत. त्या त्या प्रदेशात सहज मिळणाऱ्या पानांपासून पत्रावळी टाचायचे काम पूर्वी घरीच केले जायचे. पण शहरीकरणाबरोबर ह्या पत्रावळीही बाजारात आयत्या मिळू लागल्या. अर्थात म्हणून त्यांचे महत्त्व कमी झाले नाही. कधी वडाच्या तर कधी पळसांच्या पानांची असते ही पत्रावळ. एकमेकांना काड्यांनी टाचलेली ही पाने जेवणात किती अनोखा स्वाद आणतात! अनेक बायाबापड्यांचे चंद्रमौळी संसार त्यांच्या आधारावर चालतात. पंक्तींच्या जेवणाचा अविभाज्य हिस्सा ठरलेल्या ह्या पर्यावरणपूरक (तेव्हा असे शब्दही माहीत नव्हते) पत्रावळी - द्रोण घरात कार्य निघाले की आम्ही मंडईच्या मागील बाजूला जाऊन शेकड्यात आणायचो! त्या पानांचा घमघमाटही खास असतो. अन्नाच्या स्वादात लीलया मिसळणारा आणि तरीही त्याची वेगळी ओळख कायम राखणारा.

कधी केळीच्या पानावर जेवलाय तुम्ही? हिरवेगार निमुळते पान, त्यांवर देखणा सजलेला पांढराशुभ्र वाफाळता भात - पिवळेधम्म वरण, भाजी, कोशिंबीर, चटण्या, मिष्टान्ने, पापड - कुरडया... सगळी मांडणी सुबक, नेटकी. अगदी चित्र काढावे तशी. केळीच्या पानावर जेवायचा योग तसा क्वचितच यायचा, पण  जेव्हा यायचा तेव्हा त्या आकर्षक रंगसंगतीला पाहूनच निम्मे पोट भरत असे. पानात वाढणी करण्या अगोदर  ते पान स्वच्छ धुवून घ्यायचाही एक सोहळा असायचा. हमखास घरातील वडीलधारी मंडळी त्या वेळी आजूबाजूला असायची. मग ते पान कसे स्वच्छ धुवायचे यावर सप्रात्यक्षिक निरूपण व्हायचे! जेवण संपल्यावरही आपले खरकटे पानात गोळा करून पान अर्धे दुमडून ठेवायचे, म्हणजे वाढपी मंडळींचा घोटाळा होत नाही, हेही ठासून सांगितले जायचे. पूर्वी घराजवळ गायीम्हशींचा एकतरी गोठा हमखास असायचा, किंवा रस्त्यातून गायीम्हशींना धुंडाळून धुंडाळून आम्ही मुले त्यांच्या पुढ्यात  खरकट्या पत्रावळी ठेवत असू आणि त्या पत्रावळींमधील अन्न फस्त करीत असताना मोठ्या धैर्याने व प्रेमाने त्यांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांच्याशी बोलत असू. कोणत्याही सांडलवंडीची विशेष पर्वा न करता केळीच्या पानावर वाढलेल्या जेवणावर ताव मारायचे स्वप्न काही वर्षांपूर्वी जेव्हा दक्षिण भारतात प्रवासाचा योग आला तेव्हा पूर्ण झाले. अनेक ठिकाणी केळीच्या पानावर उदार हस्ते वाढलेल्या सुग्रास व वैविध्यपूर्ण दाक्षिणात्य जेवणाचा आस्वाद घेता आला व ती सफर अजूनच संस्मरणीय झाली.

पानांवरून आठवले, कर्दळीच्या पानांनाही सत्यनारायणाच्या प्रसादाच्या शिऱ्याबरोबर मिळणारा मान आगळाच! गरम गरम शिऱ्याने कर्दळीचे पान काळवंडते खरे, पण त्या प्रसादाच्या शिऱ्याची रुची अजून वाढविते. पानग्यांना येणारा हळदीच्या पानांचा गंधही अविस्मरणीय! आमच्या लहानपणी माझी आई दर रविवारी सकाळी आम्हाला देवपिंपळाच्या लुसलुशीत हिरव्यागार पानावर गरमागरम तूपभात खायला घालत असे. भाताच्या उष्णतेने पिंपळपान अक्षरशः काळेठिक्कर पडत असे! पण त्या भाताची चव अजूनही जिभेवर रेंगाळते.

मागे एकदा धर्मस्थळनामक दक्षिणेतील पवित्र क्षेत्री मंजुनाथाच्या देवळातील प्रसादाचे भोजन घेतानाची आठवण! बसायला चटया होत्या आणि समोर पानाच्या जागीही चटयाच! स्वच्छ धुतलेल्या! जेव्हा त्यांच्यावर ठेवायला केळीची पाने आली तेव्हा माझा पुणेरी जीव भांड्यात पडला. तोवर मी 'आता चटईवर वाढतात की काय' ह्या शंकेने चिंतातुर झाले होते. त्या भोजनशाळेतील बाबागाडीवजा ढकलगाडीतून बादल्यांच्या माध्यमातून आमच्या पानांपर्यंत पोचलेल्या 'सारम भातम'ची आठवण मनात आजही ताजी आहे.

सुपारीच्या झाडापासून बनवलेल्या सुंदर गोमट्या पत्रावळी मी सर्वात प्रथम बंगलोरच्या एका ख्यातनाम आश्रमातील  नवरात्रोत्सवात पाहिल्या. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भक्तगणांच्या प्रसादव्यवस्थेसाठी अतिशय उत्कृष्ट! त्या वर्षी माझ्या सेवा टीमकडे पत्रावळींचे गठ्ठे खोलायचे व ओल्या अन कोरड्या फडक्याने त्यांना साफ करण्याचीच सेवा होती. असे किती गठ्ठे खोलले व पत्रावळी पुसल्या ते आता आठवत नाही. मात्र तेव्हा आमची सर्वांची बोटे पत्रावळी हाताळून काळी पडली होती एवढे खरे! सर्वात मजा परदेशी पाहुण्यांची - मोठ्या नवलाईने व कुतूहलाने ते हातात त्या पत्रावळी घेऊन त्यांना उलटून पालटून, निरखून आमच्याकडून त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते! पुढे पुढे तशा पत्रावळी व द्रोण आपल्याकडेही मिळू लागले. आता तर आपल्याकडे ह्या द्रोणांनी मानाचे स्थान पटकावले आहे. पूर्वी द्रोणातील कुल्फी, जांभळे फक्त लोणावळ्यातच मिळायची. द्रोणातील कुल्फी खाताना निम्मी भूमातेला व कपड्यांना दान व्हायची. तरीही त्या चिकट ओघळांची तमा न बाळगता सर्व बच्चेकंपनी द्रोणातल्या कुल्फीवर तुटून पडत असे. शहरांमधून द्रोणाला फक्त देवळांमधून मिळणारे प्रसाद व हलवायाच्या दुकानातील मिठाई-फरसाणातून मिरवता यायचे. पण आता तर भेळवाल्यांपासून चाट, पाणीपुरी, रगडा विकणारे 'पार्सल' साठी द्रोणाला पसंती देतात. इतकेच काय तर 'खैके पान बनारसवाला' वाले पानही द्रोणांतून मिळते. आपण 'विडा' खातोय की एखादी स्वीटडिश असा प्रश्न पडण्याइतपत मालमसाला त्यात ठासून भरलेला असतो.

द्रोणांचे तरी आकार किती असावेत! बनवणाऱ्याच्या मर्जीने व बनवून घेणाऱ्याच्या गरजेनुसार त्यांची आकृतीही बदलत जाते. उज्जैनला एका रम्य गारठलेल्या धुके भरल्या सकाळी हातगाडीवर घेतलेल्या उभट हिरव्या द्रोणातील 'पहुवा' (पोहे) व शुद्ध तुपातील गरम इम्रतीची आठवण अशीच कधी थंडीच्या दिवसांत हुरहूर लावते.

आयुष्यातील खाद्यप्रवासात आपल्या ह्या द्रोण पत्रावळींना नक्कीच कोठेतरी खास महत्त्व आहे. एरवी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही आणि सणासुदींच्या दिवसांत त्यांचे अस्तित्व उत्सवाला अजून रंगत आणते. बारशापासून सुतकापर्यंत साथ निभावणाऱ्या ह्या द्रोण पत्रावळींनी पुढील काळातही आपले अस्तित्व असेच जोपासावे व त्यांना भरभरून लोकाधार मिळावा हीच मंगलकामना!

--- अरुंधती कुलकर्णी.