मराठी अभ्यास केंद्राचे समाजकार्यात रस असणाऱ्या मराठीप्रेमी तरुणांना आवाहन

मराठी अभ्यास केंद्र ही मराठी भाषेला संसाधनसंपन्न करण्यासाठी तसेच मराठी समाजाच्या भाषिक सक्षमीकरणासाठी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे. केवळ देशाच्याच नव्हे तर एकूणच जगाच्या भाषिक-सांस्कृतिक विविधतेविषयी ह्या संस्थेला आदर आणि अभिमान आहे.   समाजाच्या भाषिक प्रश्नांवर तात्त्विक व वस्तुनिष्ठ भूमिकेतून काम करत असताना लोकशाही व मानवी मूल्यांचे भान सुटता कामा नये याकडे संस्थेचा कटाक्ष आहे. प्रत्येक समाजाला स्वभाषेचा आणि तीद्वारा स्वत:चा विकास करण्याचा अधिकार आहे. मराठी समाजालाही तो आहे. त्या अधिकाराचा यथोचित वापर न झाल्यामुळे आणि विकासाच्या व्यक्तिकेंद्री, तात्कालिक धारणेमुळे केवळ मराठीच नव्हे तर अनेक समाज स्वभाषेपासून दूर जात आहेत. मराठी अभ्यास केंद्राचा इंग्रजी भाषेला विरोध नाही. विरोध आहे तो स्वभाषा सोडून इंग्रजीला शरण जाण्याला; भाषिक व सांस्कृतिक  विविधतेच्या मुळावर येणाऱ्या इंग्रजीच्या  वर्चस्ववादाला. भाषिक विविधता हा सांस्कृतिक विविधतेचा मूलाधार आहे. म्हणूनच स्वभाषेचा वापर हा जसा आपला अधिकार आहे तसेच स्वभाषेचे जतन व संवर्धन करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. स्वभाषेचा वापर न करणे ही एक प्रकारे सामाजिक प्रतारणा आहे अशी मराठी अभ्यास केंद्राची धारणा आहे.
मराठी भाषेच्या व भाषकांच्या सक्षमीकरणाचे काम करत असताना मराठी अभ्यास केंद्राने मराठीच्या साहित्येतर विकासाला केंद्रस्थानी ठेवलेले आहे. एका बाजूला वाङ्मयविकास हाच भाषाविकास मानून मराठीची ‘समस्या’च नाकारणारा आत्मसंतुष्ट वर्ग आहे तर दुसऱ्या बाजूला जागतिकीकरणाच्या काळात प्रादेशिक भाषांना प्रगतिविरोधी, कालबाह्य मानणारा व्यक्तिकेंद्री वर्ग आहे. या दोन्ही वर्गांनी मराठीच्या चळवळीचे अपरिमित नुकसान केले आहे. तरीही ना राजाश्रय ना लोकाश्रय अशा प्रतिकूल परिस्थितीत मराठीचे निशाण खांद्यावर घेऊन समाजातील  एक छोटा वर्ग विखुरलेल्या स्थितीत मराठीचे काम करतो आहे. मराठी अभ्यास केंद्र त्यापैकीच एक. प्रादेशिक, भाषिक अस्मितेच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक, सांस्कृतिक ‘समस्या’ म्हणून मराठीच्या मुद्द्याची शास्त्रीय व वस्तुनिष्ठ मांडणी करणे आणि ह्या समस्येच्या सोडवणुकीसाठी सर्व संबंधित घटकांना संघटित, कार्यान्वित करणे; नियोजनबद्ध रचनात्मक कार्याची यंत्रणा प्रस्थापित करणे यासाठी मराठी अभ्यास केंद्र कटिबद्ध आहे. मराठी अभ्यास केंद्राची अशी स्पष्ट धारणा आहे की, मराठीचे जग विस्तारायचे असेल, समृद्ध करायचे असेल तर मराठी ही समाजाच्या भौतिक प्रगतीचे माध्यम बनली पाहिजे. अर्थार्जनाशी जोडली गेली पाहिजे. ती ज्ञानभाषा बनली पाहिजे. त्यासाठी शिक्षण, संज्ञापन, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, वाणिज्य, प्रशासन, विधी व न्याय आदी प्रगत व्यवहार क्षेत्रांत तिचा गुणवत्तापूर्ण वापर झाला पाहिजे. मराठी ही खऱ्या अर्थाने लोकभाषा व व्यवहार भाषा व्हायची असेल तर साहित्यव्यवहाराच्या पलीकडे असलेल्या समाजाच्या जीवनव्यवहारावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.  

प्रगत व्यवहारक्षेत्रांत भाषेचा गुणवत्तापूर्ण वापर आपोआप होत नाही. तो अभ्यासपूर्वक व जाणीवपूर्वक करावा लागतो. त्यासाठी नियोजनाची व नियमनाची गरज असते. येथे शासनाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. पण शासन आपली भूमिका नीट पार पाडत नसल्यामुळे मराठी अभ्यास केंद्रासारख्या स्वयंसेवी संस्थांना ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पुढे यावे लागते. समाजाच्या  भाषाजागृतीबरोबरच भाषेचे आधुनिकीकरण, तिच्या गुणवत्तापूर्ण वापराचे प्रशिक्षण आदी कामे हाती घ्यावी लागतात. अशी अनेक कामे आज प्रलंबित आहेत. मनुष्यबळाअभावी मराठी अभ्यास केंद्र इच्छा असूनही एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करू शकत नाही. लोकभाषा, राजभाषा असलेल्या मराठीला ज्ञानभाषा करण्याच्या अखंडित व सामुदायिक प्रयत्नांसाठी अनेक तरुण व धडाडीच्या कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. ‘मराठीकारणासाठी’ आपला वेळ  देऊ शकणाऱ्या व इच्छिणाऱ्या तरुणांच्या प्रतीक्षेत मराठी अभ्यास केंद्र आहे. आपण त्यापैकी एक आहात का? असाल तर कृपया marathivikas@gmail.com वर अथवा केंद्राचे अध्यक्ष प्रा. दीपक पवार यांच्याशी ९८२०४३७६६५ या चलध्वनीवर संपर्क साधावा.