ओ डय़ूऽऽड! - भाग ४

"तुम्ही विसरलात का?" गजनी बघण्यात गर्क झालेल्या आई-बाबांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न शुभमने केला. दोघांनी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.

"पुढच्या आठवडय़ात नेहाच्या घरी जायचं आहे. दोघं मिळून एका स्पर्धेसाठी पोस्टर करणार आहोत."

"कसं सांगायचं समजत नाही आम्हाला. पण नीट ऐक."आई-बाबांचे गंभीर चेहरे पाहताना जेमतेम १६ वर्षांच्या शुभमच्या चेहऱ्यावर आता काय हाच भाव उमटला. "हे बघ! फोन, ऑन लाइन चॅट इथपर्यंत ठीक. प्रत्यक्षात भेटणं जरा अतीच होतंय." बाबांचं होतंय तोच आईने विचारलं. "नेहाची आई "हो" म्हणाली आहे का?" शुभमने नुसतीच मान हलवली.

"फार लहान वय आहे तुमचं. असे भेटायला लागलात आणि काही विपरीत घडलं तर सगळं महागात पडेल."

"थांब मी सांगतो स्पष्ट." शुभमच्या बाबानेच सूत्र हातात घेतली.

"थोडक्यात आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे नो टचिंग. नो सेक्स ते चित्रपटात दाखवतात तसे फर्स्ट बेस, सेकंड बेस नकोत.

"गॉट इट डॅड!" शुभम चांगलाच संकोचला.

"नाही..ऐक. तुझ्यामुळे ती मुलगी प्रेग्नंट राहिली तर.. एवढाच विचार कर. दोघांच्या आयुष्याचा  खेळखंडोबा होईल. शिक्षण, करिअर यावर लक्ष केंद्रित करायचं वय आहे हे. तुम्हाला दोघांनाही पुढे काय करणार आहोत ते माहीत नाही."

"मी आर्किटेक्चरसाठी प्रयत्न करणार आहे. तिलाही तेच करायचं आहे."

"तसं नाही रे. हे सगळं होईलच की नाही हे कुठे ठाऊक आहे तुम्हाला? तुमची मैत्री किती दिवस टिकणार हेही माहीत नाही. कॉलेजसाठी कदाचित दोघं वेगवेगळ्या गावात असाल. भविष्यात एकमेकांबद्दल आकर्षण राहीलच असंही नाही. मैत्रीपर्यंतच संबंध राहू दे. हे सांगांयचं आहे, आम्हाला."

"ठाऊक आहे हे सगळं. एकाच कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहोत आम्ही."

"घेणार आहोत म्हणजे? मिळायला हवा ना. इतकं सोपं आहे का सगळं? जाऊ दे, त्यावरून नको वाद घालत बसायला. भेटायला हरकत नाही पण जे सांगितलंय ते लक्षात ठेवावस असं वाटतं."

"पोस्टर करायचं म्हणून भेटणार आहोत आम्ही." शुभम रुसक्या स्वरात म्हणाला.

"ते ठीक आहे, पण कधी ना कधी हे बोलायचंच होतं ते या निमित्ताने सांगतोय." जास्त न ताणता दोघांनी आटोपतं घेतलं. बाबा तर पुन्हा गजनी बघण्यात मग्नही झाले. तो मात्र आई- बाबांच्या बोलण्यावर विचार करत राहिला. किती स्पष्टपणे बोलले ते त्याच्या आणि नेहाच्या मैत्रीबद्दल. संभाषण आठवूनही त्याचे कान लाल झाले. थोडीशी लाज वाटतेय मोठय़ांकडून हे सगळं ऐकताना. गेल्या तीन-चार वर्षांत अधूनमधून अशा प्रकारच्या कोणत्या ना कोणत्या विषयावरून चर्चा व्हायचीच. गेल्या वर्षीच सिगरेट, मद्य, धुंद करणारी औषधं.. याबाबत सांगितलं होतं दोघांनी. आईने टी.व्ही.वरच्या जाहिरातीचाच दाखला दिला होता. "तुम्ही मुलांना सांगा-बोला. मुलं नक्कीच ऐकतात." अशी जाहिरात होती. हे मात्र खरंच. हे त्याने स्वत:शीच मान्य केलं. नाही म्हटलं तरी इतकं सोपं आणि स्पष्ट करून आणखी कोण सांगणार? फक्त संधी मिळाली की दोघं भाषणच ठोकतात ते कसं थांबवायचं ते त्याला समजत नव्हतं. त्यापेक्षा आईला सांगायला हवं. पत्रच लिहीत जा. त्यातून तिच्या लहानपणीच्या गमतीजमती समजतात. भारत कसा आहे, होता तेही  समजतं. आईच्या पत्रातलं जग तर अद्भुतच. पत्रात "ता. क." असतं ते काय ते एक कोडंच. जेवणातला ताक हा शब्द ती इथे का वापरते कुणास ठाऊक. जेवणाच्या शेवटी ताक पितात. तसं पत्राच्या शेवटी पचावं म्हणून हे ताक असेल कदाचित. मजाच. बाबांनाच विचारायला हवं. विचारांच्या नादात तो तिथून निघून गेला.

शुभम तिथून गेला तरी तिच्या मनात काही ना काही घोटाळत होतंच. आधीच्या पत्राबद्दल शुभमच्या प्रतिक्रिया तिला कळल्या नव्हत्या. पण कुठे नाराजीचा सूरही दिसला नव्हता. हेच खूप होतं. किती लेखातून टी. व्ही.वरच्या कार्यक्रमातून वाढत्या वयातल्या मुलांशी कसं वागावं हे ती ऐकत होती, वाचत होती. पालकांनी पालकच राहावं, उगाचच मित्र होण्याचा प्रयत्न करू नये, हे कुठेतरी वाचलेलं तिला फार आवडलं होतं. ती ते अमलात आणायचा प्रयत्नही करीत होती. पालक म्हणून आपल्याला काय वाटतं ते पत्रातून पोचविण्याचा मार्ग मुलाला आवडतोय की नाही हे तो बोलेल तेव्हाच कळेल. तिची वाट पाहायची तयारी होती. तो स्पष्ट काही सांगत नाही तोपर्यंत ती लिहीत राहणार होती. आणि काही नाही तर बालपणातल्या शाळा- कॉलेजच्या आठवणी लिहिताना पुन्हा एकदा तिला तरुण झाल्यासारखं नव्हतं का वाटत? शुभमला मराठी वाचण्याचा सराव होईल. पत्रलेखनातून खूप काही साध्य होईल याचा भरवसा वाटत होता तिला. बैठकीतून ती उठलीच. ऑफिस रूममध्ये जाऊन तिने कॉम्प्युटरचं बटण दाबलं.

___________________________________

प्रिय शुभम,

माझं हे दुसरं की तिसरं पत्र तुला, कशी वाटतायत माझी पत्रं? आलं का नीट मराठी वाचता? तसं आज सेक्सबद्दल स्पष्ट बोललोच आम्ही तुझ्याशी, तरी मुद्दाम लिहितेय. आम्ही वयात येताना असं काही कुणी सांगणारं नव्हतं. आईने सांगितलं होतं पण पुढच्या स्वाभाविक येणाऱ्या गोष्टी मनमोकळेपणे नव्हतो बोललो. प्रश्न होते ते मनातच राहिले. आता खूप माहिती वेगवेगळ्या माध्यमांतून मुलांना समजते. आम्ही तुझ्याएवढे असताना नुकतंच दूरदर्शन सुरू झालं होतं, पण त्या वेळेस टी.व्ही.वर नंगा नाच, नको नको त्या जाहिराती असली नसती प्रलोभनं नव्हती. चित्रपटांमध्येही उत्तान, सवंग दृश्यं नसायची. त्यातून आम्ही अमेरिकेत कुठे वाढत होतो? अरे पण आजकाल सगळी म्हणतात की मुलं भारतात वाढविण्यापेक्षा इथेच नीट वाढतात. खरं असेल का हे? मागच्या वेळेस आपण भारतात गेलो तेव्हा आठवतंय ना काकांचे एक मित्र बोलताना सारखं माझ्या मुलीचा बॉयफ्रेंड- बॉयफ्रेंड म्हणून सांगत होते. आपण अमेरिकेत राहतो म्हणून ते बोलणं होतं की खरंच या गोष्टी तिकडे "कॉमन" झाल्या आहेत. आणि तुझ्याच वयाचा मुलगा आई कामावर गेली की शेजाऱ्यांच्या घरी जाऊन "ब्लू फिल्म्स" बघतो म्हणून सांगत होता ना? मी हे तुला लिहितेय, कारण तुम्हा मुलांना हे धडे देताना कुठेतरी सारखं मनात असतं की त्यापेक्षा भारतात असतो तर बरं झालं असतं की काय? पण तिकडची परिस्थिती ऐकली, अर्थात नक्की कल्पना नाही की खरंच अशी परिस्थिती आहे का; पण तसं असेल तर वाटतं की तुम्ही मुलं इथे वाढताय तेच चांगलं आहे. निदान जे काही आहे ते स्पष्ट बोलतो आपण इथे. भारतात सुट्टीत गेलं की आपल्याला बदलत चाललेल्या त्या त्या भागाचं तसं वरवरचंच चित्र दिसतं. आम्ही सोडून आलो तेव्हाचा भारत आम्ही तुमच्या डोळ्यासमोर उभा करतो. प्रत्यक्षात बदललेला भारत आम्हाला तरी कुठे कळतो? तुम्हीदेखील आमच्याकडून ऐकलेला भारत शोधत राहता, असे बदल होतच राहणार. जगात कुठेही गेलं तरी प्रलोभनांपासून दूर राहणं सोपं नाही. ते तुला जमावं एवढीच इच्छा. परवा आपण बघितलेला ओपरा विन्फ्रेचा शो आठवतोय ना? जेमतेम बारावीत गेलेली मुलं, भेटून वर्ष झालं तर आता सेक्स करायचा या निर्णयावर पोचलेली. त्यांच्या हताश पालकांना काय करावं ते उमगत नव्हतं. मानसोपचारतज्ज्ञाने तीनच प्रश्न विचारून त्यांच्या खऱ्या प्रेमाची साक्ष मागितली.

"तुमचं हे नातं किती दिवस टिकेल असं वाटतं?" या पहिल्याच प्रश्नावर दोघांचं उत्तर एकच होतं.- "दीर्घकाळ."

दीर्घकाळाची दोघांची व्याख्या मात्र फार वेगळी होती. ऐकून श्रोत्यांना हसावं की रडावं तेच समजेना. मुलगा म्हणाला, "एक ते दोन वर्षे, मुलीची मात्र दीर्घकाळ म्हणजे "चिरंतन" अशी व्याख्या होती.

"संततीनियमनासाठी काय करणार?" दोघांनीही यावर फारसा विचार केला नव्हता.. "कंडोम वापरू". एकमेकांकडे साशंकपणे बघत त्यांनी उत्तर दिलं.

"दोघांनी एकाच वेळी मुलाचे आणि मुलींचे कंडोम वापरायचे असतात, इतकी काळजी घेऊनही गर्भधारणेची शक्यता पाच टक्के उरतेच. अशी वेळ आली तर तुम्ही काय कराल?" हा तिसरा प्रश्न होता.

मुलाने मुलीची गर्भपात किंवा मूल वाढवणे, जी काही तिची इच्छा असेल तसं करू असं विचारपूर्वक सांगितलं. लग्न करू असं मात्र त्याने म्हटलं नाही. मुलीने या शक्यतेचा विचारच केलेला नव्हता. मुलीने हे सर्व संभाषण झाल्यावर संबंध पुढे वाढवायचे की नाही याचा पुनर्विचार करावासा वाटतोय असं म्हटल्यावर, किती टाळ्यांचा कडकडाट झाला ते ऐकलंस ना? शेवटी जगात कुठेही आणि कुठल्याही पिढीमध्ये, पालक म्हणून मुलांबद्दल चिंता असते, काळजी असते, ते तुला कळणं कठीणच.

बघताना सारखा एक विचार मनाला छळत होता, अमेरिकेतील भारतीय मुलं लवकर वयात येतात असं म्हणतात. खरं असेल का हे? का सर्व उघड बोललं जातं, व्यक्त केलं जातं म्हणून असं वाटतं? तुला काय वाटतं?

- तुझी आई

_____________________________________________

ओ.. ड्यूड! ही  लोकसत्तेत प्रसिद्ध झालेली लेखमालिका. यातून दिसेल भारतीय पालकांच्या अमेरिकन असलेल्या तरुण मनांच्या स्पंदनाचा आलेख आणि आईने मुलाला पत्र लिहून तिला काय वाटतं हे व्यक्त करण्याचा केलेला प्रयत्न.  ओळख होईल ती तिथल्या हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांच्या जीवनशैलीची समस्यांची प्रगतीची, शाळांमार्फत नवीन नवीन राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची.