ओ...ड्यूड! भाग १२

शुभम आज कॉलेजसाठी निघणार. खरं तर तिला खूप वाटत होतं त्याची तयारी करावी. बरोबर खायचे पदार्थ करून द्यावेत. त्याच्या आवडत्या चकल्या तिने आधीच केल्या होत्या. पण आणखी काय करायचं? स्वत:ची तयारी तोच करत होता. लहान असताना छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठी तिच्यावर अवलंबून असणाऱ्या शुभमने आधीच घोळ न घालण्याबद्दल बजावलं होतं. गेल्या आठवडय़ात त्याला पत्र लिहायचं राहूनच गेलं. खरंतर तिला प्रचंड काळजी वाटायला लागली होती ती त्याच्या सेलफोनच्या वापराची. बातम्यांमध्ये हल्लीच तिने ऐकलं होतं की हेदेखील एक व्यसनच आहे आणि शेवटी आजार म्हणूनच त्याच्याकडे पाहावं लागणार अशी चिन्हं आहेत इतकी मुलं, मोठी माणसंही सेल फोनचा वापर करतात. कधीही शुभमला पाहा. कानात कायम हेडफोन नाहीतर फोनवर बोलणं चालू. गेल्या वर्षीपासून रात्री दहानंतर फोन त्याने आई किंवा बाबाकडे द्यायचा हा मग नियमच करावा लागला. त्याआधी एकदोनदा तिने शुभमला सांगायचा प्रयत्न केलाही. पण त्याचं नेहमीसारखंच.

"कुठे वापरतो मी इतका?"

"तासन्तास गाणी ऐकत असतोस सेलफोनवर. नाही तर मग गाणी डाऊनलोड करणं चालू असतं कॉम्प्युटरवरून. ते नाही तेव्हा मित्रमंडळींशी गप्पा."

"पण अभ्यासात "ए" आहे की कायम."

"अभ्यासाचा आणि एखाद्या गोष्टीचं व्यसन असण्याचा काय संबंध आहे, शुभम?"

"व्यसन कुठे?"

"नाहीतर काय? त्या दिवशी एक दिवस तुझा फोन मागितला वापरायला तर किती कटकट केलीस. मला लागतो, मी वापरतो, खेळायला गेलं तर तुम्हाला फोन कसा करू? कुणाशीच गप्पा मारता येणार नाहीत. कारणंच कारणं."

"हो पण त्याला व्यसन काय म्हणतेस? खरी तर कारणं आहेत सगळी."

तिने मग तो नाद सोडून दिला. शब्दाशब्दाचे खेळ करण्यापेक्षा त्याला पत्र लिहिलेलं चांगलं. टेक्सास विद्यापीठाकडून प्रवेश मिळाल्याचं कळल्यानंतर घरात गडबडच उडाली. पत्र लिहायचा विचार बाजूला राहिला. शुभमने जेव्हा क्रिमिनल टेक्नॉलॉजीमध्ये (गुन्हा अन्वेषण तंत्रज्ञान) पदवी घ्यायचं ठरवलं तेव्हा ती नाराज झाली होती. शुभमचा मेडिकलचा ओढा कळल्यावर जेवढी ती खूष होती तितकीच त्याच्या बदललेल्या बेताने ती निराश झाली. माहेरी, सासरी शुभम पहिला होणारा डॉक्टर याच कल्पनेत ती गेली तीन-चार र्वष रमली होती. पण हेही खरं होत की शुभमच्या आवडीने त्याला काय करायचं ते त्याने ठरवावं याबद्दल पालक म्हणून दोघांची भूमिका ठाम होती. शेजारी आलेल्या नेथनच्या उदाहरणाने तो हेलावून गेलेला तिला जाणवलं होतंच पण त्यासाठी तो त्याचं क्षेत्रचं बदलेल याची अपेक्षा नव्हती. पण एकदा ते स्वीकारल्यानंतर दोघांनी त्याचं कौतुकच केलं. पाठिंबा दिला.

काम करता करता तिला काय काय आठवत राहिलं. तो लहान होता तेव्हा त्याच्या शाळेच्या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात तिने मागे लागून त्याला घालायला लावलेला कुडता- पायजमा. शाळेत पोचल्यावर रडून रडून त्याने तो बदलायला लावला तेव्हा झालेली तिची चिडचिड. रस्त्यावर दिसलेलं जंगली कासव. इतर गाडय़ा थांबवून दोघांनी अलगद ते कासव घरात आणलं होतं. पण कायद्याने कासव घरात ठेवता येत नाही हे समजल्यावर त्याला जवळच्या तळ्यात परत सोडावं लागलं होतं. हिरमुसल्या शुभमची समजून घालण्याचा तिने केलेला आटापिटा, सायकलवरून पडल्यावर कपाळाला घालावे लागलेले टाके, शुभमचा गोल्डफिश गेल्यावर प्रथमच माणसंही मरतात या सत्याला स्वीकारताना त्याला झालेला त्रास. कधी खोटं बोलल्याबद्दल, कधी दिलेल्या वेळेत घरी परत न आल्याबद्दल, वेळोवेळी त्याला मिळालेल्या शिक्षा आणि बाकीच्या मुलांप्रमाणे निन्टेंडो, गेमबॉय असले खेळ दिले नाहीत तेव्हा सगळ्यांना सगळं मिळतं, प्रत्येकाकडे या गोष्टी असतात असं म्हणत त्याने केलेलं आकांडतांडव. तिला आत्ताही हसायला आलं. त्या वेळेस शांतपणे तिने तू त्या सगळ्यांकडे खेळायला जातोस तेव्हा वापरतोसच की त्या गोष्टी असं म्हटल्यावर "दॅट्स नॉट फेअर" म्हणत दाणदाण पाय आपटत केलेला त्रागा.. त्या वेळेस तू त्यांच्याकडेच जाऊन राहा. पाहा ती लोकं दत्तक घेतात का, असं म्हटल्यावर तो गप्प झाला होता. कधीतरी शुभमने स्वत:च

अशा गोष्टी नव्हत्या म्हणून त्याला लागलेलं वाचनाचं वेड मान्य केलं तेव्हा तिला मनस्वी आनंद झाला होता. त्यानंतर पुस्तकांचं जग हा मायलेकातला मोठा दुवा बनला. आत्ताही तिला खात्री होती की फोन करून अगदी टेक्सासमधूनही तो त्याने वाचलेल्या पुस्तकाबद्दल चर्चा करेल. पण आता त्याच्या भेटी सुट्टीतच. घर अगदी सुनंसुनं होऊन जाणार तो गेल्यावर.

कल्पनेनेच आत्ताही ते भलं मोठं घर तिला अंगावर आल्यासारखं वाटायला लागलं. पाखरांना पंख फुटल्यावर ती उडणार हे सत्य स्वीकारणं भाग असलं तरी जीव कासावीस व्हायचा थोडाच थांबतोय?

आज पाच वाजताचं विमान होतं त्याचं. तयारी झील तशी मग तो गप्पा मारायला खालीच येऊन बसला. त्याचा बाबा आणि तो बराच वेळ टेक्सासबद्दलच बोलत बसले. शुभमचा उत्साह पाहिल्यावर तिने प्रयत्नपूर्वक आपली अस्वस्थता दूर सारली.

"तू बॅग नीट भरलीस ना?"

"अगं भरली गं."

"नंतर आठवतं तुला हे राहिलं ते राहिलं. या वेळेस परतही येता येणार नाही राहिलं म्हणून."

"घेईन मी तिकडे विकत."

"मग काय? बोलायलाच नको."

"सायकल नाही ना नेता येणार माझी?"

"नाही. आणि इतक्यात विकत पण घ्यायची नाही. कॅम्पसमधल्या कॅम्पसमध्ये कशाला लागेल?"

"बरं नाही घेणार मी विकत." शुभमने फारसा वाद घातला नाही.

"रोज रात्री फोन करायचा." बाबाने असं म्हटल्यावर शुभमला हसायला आलं.

"पण तुम्ही तर म्हणता मी फार जास्त वापरतो फोन."

"कामासाठी वापरायला कुठे मना करतो आम्ही? आणि आम्हाला रोज रात्री फोन करायचा म्हणजे तुझ्या दृष्टीने कामच की."

"यू आर राईट." शुभमने असं म्हटल्यावर सगळ्यांनाच हसायला आलं.

आईला, बाबाला घट्ट मिठी मारत त्याने दोघांचा निरोप घेतला. एअरपोर्टवर ती त्याला सोडायला जाणार नव्हती. दारापाशी उभं राहून हात हलवताना तिचे डोळे भरून येऊ नयेत याचा ती आटोकाट प्रयत्न करत होती. तितक्यात गाडीपाशी पोचलेला शुभम परत आला.

"तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं."

"आय लव्ह यू म्हणणार आहेस इकडच्या स्टाईलने?" तिने कसनुसं हसत विचारलं.

"नाही. माझ्या खोलीत एक खोका आहे. तो जपून ठेव. मी नंतर कधीतरी तो नेणार आहे." ती पुढे काहीतरी विचारणार तितक्यात बाबाची जोरदार हाक आली.

"चल पळतो मी. आय लव्ह यू मॉम." तो हात हलवत निघून गेला. दार बंद करीत ती त्याच्या खोलीकडे वळली. पलंगाखाली पडलेला खोका तिने अतीव उत्सुकतेने ओढला. आणि तिला आनंदाश्रू आवरेनासे झाले. शुभमने लिहिलेलं पत्र त्यावर चिकटवलेलं होतं. तिला लिहिलेलं पत्र. उतावळेपणाने तिने पत्र उघडलं.

---

"प्रिय आई,

मराठीत पत्र लिहितोय मी. खूप चुका असतील पण माझं मराठी पत्र पाहून तुला झालेला आनंद माझ्या डोळ्यांसमोर येतोय. मी कधीच तुला सांगितलं नाही पण तुझ्या प्रत्येक पत्राची मी फार आतुरतेने वाट पाहिली. नेहानेही. कधीतरी तू पत्र लिहायची नाहीस तेव्हा फार बेचैन व्हायचं. एकदा तर मुद्दाम भांडण कर म्हणजे आई पत्र लिहिल असं नेहाने सुचवलं होतं. बाय द वे, बाबाकडून मला "ता. क.". "चि.", "सौ." अशा शब्दांचे अर्थ समजले. कुठलीही गोष्ट फार जास्त स्पष्ट करत राहतो तो, त्यामुळे समजलं नाही असं होतच नाही. तुझे शाळेतले दिवस तर फारच छान होते. तू लिहायला कशी लागलीस ते नंतर लिहिलं नाहीस. पण मी बाबाला विचारलं. तो म्हणाला तुझा निबंध एकदा शाळेतल्या भिंतीवर लावला होता. वर्गात सरांनी वाचून दाखवला आणि त्यांनी सांगितलं की इतकी र्वष शिक्षक म्हणून काम केलं पण पहिल्यांदाच निबंधाला पैकीच्या पैकी गुण दिले. त्यानंतर मग तू लिहायला लागलीस. हाच प्रसंग लिहिणार होतीस ना तू शिक्षकांमुळे विद्यार्थी कसे घडतात ते सांगताना? पण अशा कितीतरी गोष्टी लिहिशील म्हटलंस आणि विसरलीस बहुधा. का मी विचारीन म्हणून वाट पाहत होतीस? या गोष्टी विसरलीस की काय असं विचारावंसं वाटायचं पण असंही वाटायचं की पत्रं वाचण्यात जी मजा आहे ती वेगळीच. एकदा का मी तुला विचारलं असतं की मग बाकीच्या पत्रांबद्दलही असतो आपण. मला नेमकं तेच नको होतं. तू लिहिलेली सगळी पत्र मी या खोक्यात जपून ठेवली आहेत. ती तशीच ठेव. मला ती माझ्या मुलांसाठी ठेवायची आहेत.. हं हं, हसू नकोस काय माझे बेत म्हणून. तुझ्या पत्रांमुळे माझ्यात किती बदल झाला याची तुला कल्पनाही करता येणार नाही. प्लीज सगळी पत्रं जपून ठेव. कितीदातरी मी ती परत परत वाचतो. आत्ताही मला ती घेऊन जाता आली असती पण कधीतरी तुला कळायला हव्यात नं पत्राबद्दल माझ्या भावना. पुढच्या वेळेस नेईन मी. प्रॉमिस कर की त्या पत्रांच्या गठ्ठय़ात भर पडलेली असेल. नाहीतर असंच का नाही करत? तू मला चक्क पोस्टानेच का नाही पत्र पाठवत? हसू आलं ना मी ई-मेलच्या जमान्यात पोस्टाने पत्र पाठव म्हणतोय. अगं, मलाही तुम्ही जशी आतुरतेने पोस्टमनची वाट पाहायचात तसं करून बघायचं आहे. पाठवशील ना?

लव्ह यू मॉम, लव्ह यू मॉम.. आय नो! बाबा म्हणेल, "शुभम! असं लव्ह लव्ह व्यक्त करत नाही होत प्रेम. यू हॅव टु फिऽऽऽल द लव्ह". पण तू म्हणतेस तसं रोज नाही पण कधीतरी सांगितलं तर काय बिघडलं, इथल्या लोकांसारखं? लव्ह यू मॉम!

तुझा,

चि. शुभम.

----

तिच्या हातातलं पत्र डोळ्यांतल्या अश्रुंनी ओलंचिंब झालं होतं. खोक्यातलं एकेक पत्र काढत तिनेच लिहिलेल्या त्या पत्रांवर ती मायेने अलगद हात फिरवीत राहिली.

निरोपाची वेळ

शुभमला गेल्या आठवडय़ात एका वेगळ्याच अनुभवाला सामोरं जायला लागलं. ऑनलाइन फ्रॉड! अगदी पोलिसांपर्यंत जाण्याची वेळ आलेला प्रसंग. इतक्या वेळा बोलून, बजावून, वेगवेगळी उदाहरण समोर असतानाही मुलं कशी आपली सगळी माहिती त्रयस्थ व्यक्तीला ऑनलाइन सहज देतात आणि जवळजवळ फसतात हा एक लेखाचा विषय. पण आजच्या लेखाचा नाही. आज मला आणि शुभमला तुमचा निरोप घ्यायचा आहे. आम्हा दोघांनाही तुमच्याशी "ओऽऽ डय़ूड!" मधून संवाद साधायला फार आवडत होतं.

बऱ्याच पालकांनी जसं शुभम हा माझाच मुलगा आहे का विचारलं आहे, तसंच त्यांनाही त्यांच्या मुलांना अशी पत्रं लिहायला आवडेल, असे म्हटलं आहे. किती तरी तरुण मुलांची ई-मेल आली. प्रत्येकाची अर्थातच शुभमच्या ई-मेलच्या पत्त्यासाठीही विचारणा होती.

ही लेखमालिका फक्त माझ्या मुलाच्या अनुभवांवर नक्कीच नव्हती. पण काही त्याचे अनुभव, काही ऐकलेले, वाचलेले तर काही त्याच्या मित्र-मैत्रिणींचे या सर्वाचा परिपाक म्हणजे "ओऽऽ डय़ूड!" मी त्याला नियमित पत्र लिहीत नाही, पण तो जेव्हा ऐकून घ्यायलाच तयार नसतो, निर्थक वाद घालत राहतो तेव्हा पत्र लिहून माझी भूमिका स्पष्ट करते. अर्थताच फार मोठं पत्र नाही. बऱ्याचदा सहज म्हणून त्याला आवडतील, कळतील अशी एक-दोन वाक्यं लिहिलेली मराठी चिठ्ठी लिहिते. त्यामुळेच आईने पत्र लिहिण्याची कल्पना सुचली.

अमेरिकन जीवन स्वच्छता, भरपूर पैसा, डेटिंग, किसिंग, ड्रग्ज, बॉल डान्स या सर्वसाधारण कल्पनाव्यतिरिक्त फार वेगळं आहे. विशेषत: शाळकरी मुलांचं. ते या लेखातून आपल्यापर्यंत पोहोचलं याचा आनंद वाटतो. आपल्याकडच्या दहावी-बारावीच्या परीक्षांसारखा ताण इथे मुलांवर पडत नसला तरी नववीपासून बारावीपर्यंत महाविद्यालयीन प्रवेशांसाठी मुलांना चांगले गुण मिळवावे लागतात. एखाद्या परीक्षेवर प्रवेश ठरत नाही. त्यासाठी चार वर्षे गुणांची पातळी समान राखण्यासाठी सतत जागरूक राहावं लागतं. बारावीपर्यंत अभ्यासक्रमातले विषय पूर्ण करणं ही मुख्य अट पूर्ण करताना या चार वर्षांत कधी आणि कोणते विषय निवडायचे ते विद्यार्थ्यांनीच ठरवायचं. काही मुलं हे करीत असतानाच महाविद्यालयीन विषयही आधीच पूर्ण करतात. ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेवर हे अवलंबून असतं. याचा एक फायदा होतो की, फार लहानपणी स्वतंत्र निर्णय घ्यायची क्षमता मुलांमध्येच निर्माण होते. भारतीय सर्वसाधारण शिक्षण पद्धतीत ही मुभा आणि सोय अद्याप नाही. कार्यानुभवातूनही मुलं कशी गुण मिळवतात तेही मी या लेखातून मांडलं होतं. आपल्याकडच्या समाजसेवा विषयासारखाच हा विषय. पण ते करताना मिळणारं विस्तृत ज्ञान, अनुभव दोन्हींकडे वेगळ्या पद्धतीचे आहेत.

भारतात हल्ली पाश्चात्त्य संस्कृतीचा अनुभव नसतानाही अपुऱ्या माहितीद्वारे, प्रसारमाध्यमातून जे पाहतात त्यावरून मुलं अंधानुकरणाच्या मागे लागलेली दिसतात. पालकही मुलांशी मैत्रत्वाचं नातं जपण्यासाठी पालकत्व विसरतात. पण इथल्या भारतीय आणि अमेरिकन मुलांचंही दैनंदिन आयुष्य फार वेगळं आहे. साधं उदाहरण म्हणजे अमेरिकेत मुलांना बरीच वर्षे वाहन चालविता येत नाही. त्यामुळे जरी ती पालकांवर अवलंबून असली तरी त्यामुळेच ती पालकांच्या जवळही येतात. त्यांच्या जीवनातल्या घडामोडीपासून पालकांना दूर ठेवणं जवळजवळ अशक्य असतं आणि त्यातूनच पालकांना त्यांच्याशी संवाद साधण्याचं तंत्र जमलं तर तरुण मुलं असूनही "चक्रम आहे", "ऐकत नाही", "घरी असतात कुठे ही मुलं" असं म्हणायची वेळ येत नाही. मला आलेल्या पत्रातून हे लक्षात आलं की पालक वयात आलेल्या मुलांशी मोकळेपणाने बोलत नाहीत. त्यांना माहिती देत नाहीत. हे सारं आता बदलायला हवं. आधुनिक तंत्रज्ञानाला कवेत घ्यायला तरुण रक्त अतिशय उत्सुक आहे, पण त्याच्या विखारी परिणामांपासून मुलांना रोखण्यासाठी पालकांनीच मार्ग शोधणं भाग आहे.

"लोकसत्ता"मध्ये मी अधूनमधून बरीच वर्षे लिहीत आहे. शुभदा पटवर्धनच्या प्रोत्साहनामुळे ही मालिका लिहिता आली आणि तुमच्या प्रतिसादामुळे उत्साह वाढत राहिला. शुभम आणि मी तुम्हा सर्वाचे मनापासून आभारी आहोत.

______________________________

ओ.. ड्यूड! ही लोकसत्तेत प्रसिद्ध झालेली लेखमालिका म्हणजे भारतीय पालकांच्या अमेरिकन असलेल्या तरुण मनांच्या स्पंदनाचा आलेख आणि आईने मुलाला पत्र लिहून तिला काय वाटतं हे व्यक्त करण्याचा केलेला प्रयत्न. यातून ओळख होईल ती तिथल्या हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांच्या जीवनशैलीची समस्यांची प्रगतीची, शाळांमार्फत नवीन नवीन राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची.

_____________________________