ओ.. ड्यूड! - भाग ६

चॅरिटी बॉल डान्स! वर्गातली बरीच मुलं जाणार होती! शुभम खूश होता ते नेहा भेटणार म्हणून. पोस्टरसाठी ते दोघं भेटले त्यालाही तीन-चार महिने होऊन गेले होते. आई-बाबांना सांगायचं म्हणजे प्रश्नच प्रश्न. तसंच झालं. किती प्रश्न विचारले आईने. त्याला एकदम तो सातवीत असताना शाळेतच डान्स होता तेव्हाचा प्रसंग आठवला. आई, बाबा दोघांनाही या डान्स प्रकाराची काही कल्पना नव्हती.

"नाचायचं म्हणजे मुलीबरोबरच की मित्र चालतो?" त्यांचं गोंधळलेपण पाहून शुभमला भारतात असं काही नव्हतंच की काय ते शाळेत असताना, असंच वाटलं होतं.

"एकटं नाचलं तरी चालतं? तू काय करणार आहेस?"

"मित्राबरोबर जाणार आहे. नाचायचं की नाही ते नाही ठरवलेलं."

"पण मग तिथे जाऊन काय करणार?"

"गप्पा मारत बसू. आणि शाळेच्याच तर हॉलमध्ये आहे. पोलीस असतात. बहुतेक मुलांचे आई-वडीलही येतात."

"खरंच? पण तू तर पहिल्यांदा जाणार आहेस. एवढं सगळं कसं काय माहीत तुला?"

"मित्रांकडून. आणि तुम्ही आलात तरी चालेल."

त्यावेळेस दोघांनी जायचं टाळलं. बाबांनी त्याला नेऊन सोडलं होतं. त्याला कंटाळाच आला तिकडे. नाचणं तर जमलं नाहीच. गप्पा पण कुणाशी फार रंगल्या नाहीत. त्यानंतर दोन वर्षे तो गेलाच नव्हता डान्स नाईट्सना.

पण नेहाशी मैत्री झाल्यावर पहिल्यांदाच त्यांच्या शाळेने आजूबाजूच्या शाळांना आमंत्रित केलं होतं. बऱ्याच शाळा भाग घेत होत्या. दोनशेच्या आसपास मुलं येणार होती.

तिकिटांतून मिळालेले पैसे शाळा कुठल्यातरी संस्थेला देणार होती. अंदाज घेत त्याने आई-बाबांसमोर विषय काढला. दोघांनी परवानगी दिली.

शुभमला कधी एकदा नेहाशी बोलतोय असं झालं.

"डान्स नाइटला सूट घालावा लागेल ना? शाळेच्या नोटीस बोर्डवर लिहिलं होतं."

"अजून दोन आठवडे आहेत." त्याचा उतावळेपणा नेहाला गुदगुल्या करत होता.

"आय कॅन्ट वेट टू सी यू."

"मला पण खूप गप्पा मारायच्या आहेत." दोघांनाही कधी एकदा भेटू असं झालं होतं.

"नवीन पत्र लिहिलं आहेस नं? बऱ्याच दिवसांनी तुझं पत्र वाचायला मिळेल. मला आवडतात तुझी पत्र वाचायला."

"का? तुझ्याबद्दल लिहिते म्हणून."

"ते तर आहेच गं. पण तू तुझ्या शिक्षकांबद्दल, मैत्रिणींबद्दल लिहितेस ना. ते देखील. तुझा अभ्यास, विषयातले गुण, तुझे पुढचे बेत वाचताना मला ते चित्र समोर दिसायलाच लागतं."

"ए, पत्रावरून आठवलं. बऱ्याच दिवसात तुझ्या आईच्या पत्राबद्दल नाही सांगितलंस."

"लिहिलंच नाही काही तिने. तुझी आणि तिची आधीचीच पत्र वाचतोय मी परत परत."

"विचारलं नाहीस तिला?"

"मी तिची पत्र वाचतो हेही सांगितलेलं नाही तिला. मग एकदम पत्र का नाही लिहिलंस असं कसं विचारायचं?"

"त्यात काय? आईला सांग की तिची पत्रं आवडतात आणि तू वाट पाहत असतोस."

"हं बघू" दोघं नंतर कितीतरी वेळ बोलत राहिले. फोन बंद केल्या केल्या त्याला "टीचर्स अ‍ॅप्रिसिएशन वीक" आठवला. तेव्हा काय करता येईल ते आईला विचारायचं होतं. त्याच्या इतिहासाच्या शिक्षिकेने मध्यंतरी घरी फोन करून आई-बाबांकडे त्याचं खूप कौतुक केलं होतं. त्याचीही त्याने आईला आठवण करून दिली. लगेचच काही तिला सांगता आलं नाही. पण आपण तिच्या डोक्यात किडा घातलाय हे शुभमच्या लक्षात आलं. तो पळालाच मग खेळायला.

तिनेही कागद-पेन पुढे ओढलं. नाहीतरी कितीतरी दिवसात शुभमला पत्र नव्हतं लिहिलं. काय करतो देव जाणे पत्राचं. वाचतो तरी का? तिला प्रश्न पडला. त्याच्या वागण्या-बोलण्यातून तो वाचतोय हे कळायचं, कुठेतरी पुसटसे उल्लेख, थोडासा समंजसपणा.. तिला उगाचच वाटत होतं की खरंच तसं आहे हे तिला ठरवता येईना. पण ती त्याला विचारणार नव्हती. "बोअरिंग" असं एका शब्दात त्याने पत्रांबद्दल म्हटलं असतं तर तिला ते सहन नसतं झालं. आणि खूप बोलला असता, आवडतायत असं म्हणाला तर? पण ते तर तो कधीही सांगू शकत होता. तो जोपर्यंत तू लिहू नकोस, असं सांगत नाही तोपर्यंत ती लिहिणार होती.

...

शुभू,

तुला डान्सला हो म्हटलंय खरं पण थोडीशी भीती वाटतेय. म्हणजे कधी कधी वाटतं की खूपच चांगलं आहे, आपण घरात मोकळेपणाने बोलतो, जे काही तुझ्या आयुष्यात चालू आहे ते आमच्यापर्यंतही पोचतंय (असं आम्हाला उगाचच तर नाही ना वाटत?) पण केव्हातरी वाटतं हे थोडं अती होतंय की काय. नसावं पण. आमच्या वेळेस गॅदरिंग असायचीय की शाळेची. आणि ते फिशपॉन्ड! इथे नसावं बहुधा असलं काही. पण मुद्दा काय सर्वानी एकत्र जमायचं, मजा करायची. आणि आम्हाला जे वाटायचं की अमेरिकन मुलं म्हणजे स्वैराचारच. तसं नाही हे केव्हाच समजलंय. आठवतंय? तू पहिल्यांदा शाळेत डान्ससाठी गेलास. हजारो प्रश्न विचारले होते, आम्ही तुला. शेवटी तू सागितलं होतंस की तुम्ही येऊ शकता. आम्ही आलो नाही पण तुला आणायला आलो तेव्हा मी अवाकच झाले. हॉलच्या बाहेर बहुतेक सर्व अमेरिकन पालक होते. मुलांवर लक्ष असायला हवं म्हणून केव्हाचे आले होते म्हणे ते. किती भ्रामक समजुती आहेत आमच्या इथल्या पालकांविषयी. मला खात्री आहे की आतमध्ये वावरणाऱ्या मुलांच्या मनात आपले पालक बाहेर उभे आहेत ही जाणीव सतत असणार. मनात असलं तरी उथळ वागणं शक्यच नाही अशा वेळेस. आम्ही खरे पालक असं मानणारे भारतीय तिथे दिसले नाहीत. आमच्यासारखे परत न्यायला आलेलेच होते सगळे. बरं आता मुद्दय़ाचं. तुला पुढच्या आठवडय़ात शिक्षकांसाठी काय करायचं असा प्रश्न पडलाय. आमच्या शाळांमध्ये असं काही नव्हतं. (खरं तर किती छान कल्पना आहे ही) बागेतली फुलं बाईंना दिली. बाईंच्या चेहऱ्यावरचं स्मित बघितलं की आमचा दिवस सार्थकी लागायचा. एखाद्या बाई घरगुती ओळखीतल्या असल्या आणि त्या हळदीकुंकवाला आल्या की लाजत लाजत त्यांना अत्तर लावायचं मोठं काम केलं की खूप काही केल्यासारखं वाटायचं. सरांसाठी मात्र यात काहीच नसायचं. मला वाटतं तुम्हाला शक्य झालं तर वर्गातल्या प्रत्येक मुलाने एखादी आठवण त्या त्या शिक्षकाबद्दल लिहावी आणि त्या सगळ्या आठवणी छोटय़ाशा वहीत प्रत्येक पानावर चिकटवून ती वही शिक्षकांना द्यावी. कितीतरी प्रसंग त्यात असतील की तुमचे शिक्षक विसरूनही गेले असतील. कधी ना कधी तुम्हाला त्यांच्याकडून उत्तेजन मिळालेलं असतं. कौतुक झालेलं असतं. वाचताना पुन्हा एकदा कदाचित ते प्रसंग त्यांच्यासमोर उभे राहतील. बघ आवडतेय का ही कल्पना. एका शिक्षिकेने तिच्या आयुष्यातील लिहिलेला प्रसंग आत्ताच मी वाचला, ऑनलाईन. पाणावले डोळे. कदाचित तुला माहीतही असेल. पण लिहावासा वाटतोय तुझ्यासाठी. बघ काही वेळेस शिक्षक तुमचं आयुष्यच कसं बदलून टाकतात.

त्या दिवशी वर्गातल्या प्रत्येक मुलाला त्या शिक्षिकेने भाषा विषयाचा प्रकल्प (प्रोजेक्ट) म्हणून एकेक कागद दिला. प्रत्येक मुलाचं नाव लिहून त्या खाली थोडीशी रिकामी जागा ठेवायला सांगितली. त्या रिकाम्या जागेत मुलांनी त्या त्या विद्यार्थ्यांबद्दल त्यांना वाटणारी सर्वात चांगली गोष्ट लिहायची होती.

नंतर शिक्षिकेने प्रत्येक मुलाचं नाव एकेका कागदावर लिहिलं आणि त्याखाली इतर मुलांना त्या मुला, मुलीबद्दल काय वाटतं ते. ते कागद तिने मुलांना दिले. मुलांचे खुललेले चेहरेच सारं सांगत होते. कुणी म्हणत होतं.

"खरंच मला माहीतच नव्हतं मी बाकीच्या मुलांना आवडतो." तर कुणी म्हणालं,

"मी इतक्या जणांना माहीत आहे याची कल्पनाही नव्हती."

वर्गातल्या मुलांनी एकत्र यावर कधी चर्चा केली का, किंवा त्यांनी आपापल्या घरी हे सांगितलं का, हेही त्या शिक्षिकेला माहीत नव्हतं.

कितीतरी वर्षांनी त्या वर्गातल्या एका मुलाला व्हिएतनाम युद्धात वीरमरण आलं. ती शिक्षिका त्याच्या अंत्यदर्शनाला गेली. वर्गातली बरीच मुलं जमली होती. एकेक करून सर्वजण त्याच्या शवपेटीशी जाऊन त्याचा शेवटचा निरोप घेत होते. त्या शिक्षिकेला पाहिल्यावर मार्कच्या सैन्यातील मित्राने तिला विचारलं.

"तुम्ही मार्कच्या गणिताच्या शिक्षिका?"

तिने नुसतीच मान डोलावली.

"खूप ऐकलं आहे आम्ही तुमच्याबद्दल."

तिने स्मितहास्य केलं. मुलं आपल्याला विसरली नाहीत ही जाणीव सुखदायक होती. मार्कच्या वर्गातली मुलं आणि त्यांचे आई-वडील एकत्र जेवायला थांबले.

"आम्हाला काहीतरी दाखवायचं आहे." भरलेल्या डोळ्यांनी मार्कच्या वडिलांनी पाकिटातून एक चुरगळलेला कागद बाहेर काढला.

"मार्कच्या खिशात सापडला हा कागद. तुम्ही कदाचित ओळखाल असं वाटलं." जीर्ण झालेला. कितीतरी ठिकाणी चिकटवलेला तो कागद पाहताक्षणी तिने ओळखला. तो कागद तोच होता ज्याच्यावर मार्कबद्दल इतर मुलांनी लिहिलं होतं. चांगलं, त्याचे गुण दर्शविणारं.

मार्कची आई म्हणाली.

"तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाही. इतकी वर्ष जपून ठेवला त्याने तो कागद."

"तो कागद माझ्याकडे अजून आहे. दागिन्यांच्या पेटीत जपून ठेवलाय मी."

"लग्नाच्या अल्बममध्ये माझा कागद आहे."

"मी पर्समध्येच ठेवला आहे. मला वाटतं त्या वर्गातल्या प्रत्येकाकडे हा कागद आहे."

एकेकजण बोलत होता आणि ऐकता ऐकता अश्रू लपविण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी त्या मुलांची शिक्षिका शेवटी हमसाहमशी रडली. तिने केलेली एक छोटीशी गोष्ट, कृती. किती महत्त्वाची ठरली मुलांसाठी. असे क्षण दुर्मिळच नाहीत का? नाहीतर शाळा म्हणजे स्पर्धा, एकमेकांना चिडवणं, द्वेष असंच समीकरण होत चाललं आहे. बघ कदाचित हो गोष्टही तू वर्गात सर्वच शिक्षकांसाठी पोस्टरबोर्डवर लावू शकतोस. असे शिक्षक तुम्हा मुलांनाही मिळोत असं मनापासून वाटतं.

तुझी आई

________________________________________________
ओ.. ड्यूड! ही लोकसत्तेत प्रसिद्ध झालेली लेखमालिका म्हणजे भारतीय पालकांच्या अमेरिकन असलेल्या तरुण मनांच्या स्पंदनाचा आलेख आणि आईने मुलाला पत्र लिहून तिला काय वाटतं हे व्यक्त करण्याचा केलेला प्रयत्न. यातून ओळख होईल ती तिथल्या हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांच्या जीवनशैलीची समस्यांची प्रगतीची, शाळांमार्फत नवीन नवीन राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची.

________________________________________________________