ओ.. ड्यूड! भाग ९

बसचा प्रवास, एकटय़ाने, त्यातून पब्लिक ट्रान्सपोर्ट! सकाळी सहा वाजता धडधडत्या मनाने शुभम थांब्यावर उभा होता. एकटाच. कुणीही नव्हतं तिथे. बापरे, बसने जातच नाही की काय कुणी. बाबाची परत फिरलेली गाडी थांबवावी असं त्याला वाटून गेलं. तेवढय़ात हिरव्या रंगाची बस फुसफुस आवाज करत थांबली. ड्रायव्हरने केलेल्या गुड मॉर्निगला त्यानेही तोंडातल्या तोंडात पुटपुटत प्रतिसाद दिला आणि झुलपं उडवीत तो सीटवर बसला. बसला म्हणजे काय चक्क उडालाच. इंटरनेट! बसमध्ये इंटरनेट, वाव! आता अध्र्या तासाचा प्रवास क्षणभरात संपेल. एकदा बस बदलून परत अर्धा तास. त्यातही असेलच म्हणा इंटरनेट. पण त्याची ही नशा फार वेळ टिकली नाही. बाजूच्या माणसाने त्याला काही तरी विचारलं आणि मग गप्पाच सुरू झाल्या. गाडीत म्हटलं तर माणसं पाच- सहाच होती. त्यात मध्ये एक "देसी" मुलगाही चढला. सायकल घेऊन थांबला होता तो बसथांब्यावर. सायकल लावली त्याने बसच्या मागे. प्रत्येकजण एकमेकाला ओळखत होता. त्यात आज शुभमची भर. त्याच्याशी ओळख करून घ्यायला सर्वानाच उत्सुकता होती. शुभमलाही प्रचंड कुतूहल होतं. इतकी र्वष आई, बाबाच सोडायचे. त्याचा एकटय़ाने सुरू केलेला हा पहिला प्रवास. काय करू आणि काय नको असं झालं होतं शुभमला.

हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मात्र त्याचा उत्साह निवळला.

"कुठून या फंदात पडलो असं झालंय. तुला आवडतंय हे व्हॉलेंटियरिंग?" नेहा त्याला कॅफेटेरियात भेटली तेव्हा त्याचा फुगा फुगलेलाच होता.

"काय झालं? कुणावर भडकलायस?"

"अगं ती सुपरवायझर, माहीत होतं मी जेवायला गेलोय तरी आल्यावर किती वेळ, कुठे होतास, हे घे पाकिटांवर नावं घालून ठेव.. सूचना नुसत्या. आईगिरीच चाललेली. दरडावीत होती नुसती. दहाच तर मिनिटं उशीर झालेला आणि ते डॉक्टर्स. पांढरा पोशाख घालून नुसते टेचात फिरत असतात. काही विचारायला गेलं की गुरगुरल्यासारखी एकाक्षरी उत्तरं. हॉस्पिटलमध्ये व्हॅलेंटिररिंग करतोय म्हणजे शस्त्रक्रिया बघायला मिळेल असं वाटलं होतं. हे काय? वैताग नुसता."

"अरे, पहिलाच आठवडा आहे आपला. मिळेल बघायला एखादी तरी शस्त्रक्रिया आणि पहिले दोन दिवस आठव. किती रुबाबात होतो आपण डॉक्टरांबरोबर काम करणार म्हणून. आपल्या कॉलेजच्या प्रवेशाकरिता हे तास दाखवता येतील. जॉन हॉप्किन्ससारख्या नामांकित हॉस्पिटलमध्ये व्हॉलेंटियर होतो म्हटल्यावर प्रभाव पडेल हेच आहे ना आपल्या मनात." नेहाचं खरंच होतं, त्याला पहिला दिवस आठवला.

स्क्रब, हॉस्पिटलचा पोशाख, आयकार्ड, शुभम रुबाबात वावरत होता. डॉक्टर झाल्यासारखंच वाटत होतं त्याला. ऑपरेटिंग रूम तर टीव्ही, मुव्हीतल्या दृश्यासारखीच. महिनाभर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या बरोबर काम करायला मिळणार होतं. दोन महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतला हा कार्यानुभव. केवढी धडपड केली होती शुभमने. पाचशे मुलांतून दोनशे मुलं निवडणार. त्यासाठी लिहिलेला निबंध, नंतर मुलाखत, हा अनुभव निश्चितच महाविद्यालयातल्या प्रवेशासाठी उपयोगी पडणार होता. आज तो जसा वैतागला, तेवढाच उत्साह त्या पहिल्या दिवशी होता आणि सगळाच काही आनंद नव्हता. टिनाने, तिथल्या रिसेप्शनिस्टने, त्याच्यासाठी मुद्दाम राखून ठेवलेला केक त्याला आठवला. तिने खाऊन टाकलेलं त्याचं चॉकलेट. त्याला आताही हसायला आलं. टिना म्हणाली होती. तुझीच चूक ती, का ठेवलंस ते चॉकलेट उघडय़ावर. मला खूप आवडतं म्हणून मी खाऊनपण टाकलं. डॉक्टर मंडळींपेक्षा ही लोकं फ्रेंडली वाटलीच की. त्याचा फुगलेला फुगा निवळल्यासारखा झाला. त्यातच नेहालाही इथेच काम करायला मिळालं होतं. त्यामुळे अधूनमधून सगळे मित्रमैत्रिणी एकत्र जेवायला हॉस्पिटलच्या कॅफेटेरियात भेटत होते हीदेखील त्याच्या दृष्टीने जमेची बाजू होती. तो परत खुलल्यासारखा झाला. पहिला दिवसाच्या आठवणीकडे ते सगळे पुन्हा वळले.

"ऑसम, मला तर फक्त पेशंटसाठी शुभेच्छा कार्डस् करायला दिली. कुणाचा तरी वाढदिवस होता तिथे. आईस्क्रिम आणि पिझ्झा खायला मिळाला." बाकीच्यांचा दिवसही तसाच होता साधारण.

"एवढंच दिवसभर?" सर्वानाच प्रश्न पडला. मग त्यांनीच त्याचं उत्तरही शोधून काढलं.

"पहिलाच तर आठवडा आहे. नंतर मिळेल आवडीचं काम." त्यातही बाकीच्यांनी न केलेली एक गोष्ट शुभमने केली होती.

"आज मी पहिल्यांदा पब्लिक बसने प्रवेश केला."

"आवडला?"

"मग? खूप स्वतंत्र झाल्यासारखं वाटलं. नाही तर कायम आपल्याला आई, बाबांवर अवलंबून राहावं लागतं. बस मस्त आहे. एकदा बदलायला लागते. तिथे जरा भीती वाटत होती. फारशी वस्तीच नाही त्या भागात. पण बसमध्ये चक्क इंटरनेट आहेआणि सायकल लावायला स्टॅण्डपण, रिअली कूल."

"माणसं होती का? आय मीन गर्दी."" सर्वानाच त्याच्या बस प्रवासाचं कुतुहल होतं.

"अर्धी बस भरलेली. त्यात माझा वेक मेड व्हॉलेंटियरचा शर्ट बघून ड्रायव्हर विचारत होता काय करावं लागतं तिथे काम करायचं तर? त्याला सोळा वर्षांची मुलगी आहे. मी माहिती तर सांगितलीच, पण एक जास्त अर्जही होता माझ्याकडे तोही दिला. बाबा सांगतो नेहमी की आपल्याला शक्य असेल तेव्हा जी होईल ती जरूर मदत करावी. कधी त्या मदतीचा कुठे उपयोग होईल, हे सांगता येत नाही. माझी ही मदतच झाली की."

"मग ड्रायव्हर खूष का एकदम?"

"यस्, आणि एक सीक्रेट." बाकीचे मित्र तिथे नाहीत असं बघून पटकन त्याने नेहाला सांगितलं.

"बोलू नकोस कुणाला. माझं आणि ड्रायव्हरचं संभाषण ऐकत होता एक माणूस. ते सिस्को कंपनीचे डिरेक्टर आहेत बहुधा. त्यांनी सांगितलं की त्यांच्या कंपनीत पण असं कार्यानुभवाचं काम करता येतं. मी त्याचं कार्ड घेतलंय. पुढच्या वर्षी करता येईल. बाकी कुणाला सांगणारच नाहीये मी. तू येऊ शकतेस अर्थात."

"शुअर, माझं तेच तर स्वप्न आहे. जितक्या ठिकाणी एकत्र राहता येईल त्या गोष्टी करायच्या. आपण एकाच कॉलेजात शिकत असू. संध्याकाळी तिथल्या हिरवळीवर गप्पा मारू. एकत्र अभ्यास करू. खरं तर माझ्या शाळेत मैत्रिणी चिडवतात मला की कसली स्वप्न पाहतेस. हायस्कूल संपलं की नवीन मित्र मिळेल तुला. पण मला तुझं आणि माझं नातं टिकवायचं आहे.

"मला पण. दोघांनीही यशस्वी व्हायचं. स्पर्धामध्ये एकत्र भाग घ्यायचा." आजूबाजूचे कँटीनमध्ये बसलेले डॉक्टर्स, लोक उठायला लागले तसे सगळेच जण भानावर आले. निघता निघता तो म्हणाला.

"मी ठरवलंय. झालोच डॉक्टर तर असं नाही वागायचं हाताखालच्या लोकांशी. मुख्य म्हणजे हसतमुख राहायचं, टिनासारख्यं. इतर लोक काम सांगतात तेही उपकार केल्यासारखं, त्यामुळे काम झाल्यावर कौतुक बाजूलाच राहिलं." सगळ्यांनी माना डोलावल्या. आता आपापल्या विभागात जाऊन काम करायला हवं होतं. या सुट्टीत कार्यानुभवाचे १०० तास तरी भरायलाच हवेत. चांगल्या महाविद्यालयातील प्रवेशासाठी ते तास फारच उपयुक्त आहेत याची प्रत्येकाला जाणीव होती.

****************

चि. शुभम,

संध्याकाळी आज थोडा वैतागलास आल्या आल्या. तुला मी म्हटलं बसच्या प्रवासाची कटकट होत असेल तर सोडू आम्ही तुला. पण तुझा राग होता तो हॉस्पिटलमधल्या लोकांवर. त्यात मी तुला म्हटलेलं, "वेलकम टू रिअल लाईफ" ते रुचलं नाही कदाचित तुला. तुम्ही मुलं हॉस्पिटलमध्ये इतकी मदत करता त्याचं कौतुक तिथल्या कर्मचाऱ्यांना वाटत नाही याचं फार दु:ख वाटतंय तुला. पण तिथेच टिनासारखीही माणसं असतात हे विसरू नकोस. यातून एक चांगला निर्णय घेतलास आणि तो कायमचा लक्षात ठेव. तू म्हणालास ना की जर तू डॉक्टर किंवा एखादा मोठा माणूस झालास, तर हाताखालच्या लोकांशी असं वागणार नाहीस, तेच म्हणतेय मी. या कार्यानुभवाच्या निमित्ताने घडलेली आणखी एक चांगली गोष्ट. तू बसने जायला लागलास. भारतात आम्ही सहज चालत, नाहीतर सायकलीने, बसने कुठेही फिरायचो तुमच्या वयाचे असताना. या देशात ते शक्य नाही. रस्ता माणसांसाठी नसतोच इथे. पुन्हा मोठी शहरं सोडली तर बसची सोय तरी कुठे आहे? त्यातूनही असली तरी किती पालक मुलांना बसने जायला देतात? हे प्रश्न आहेतच. तू बसने जायचं ठरवलंस तेव्हा थोडीशी धाकधूक होतीच. पण मला माहीत आहे तू खूष होतास, उपदेशाचा एक डोस कमी झाला. हो ना? नाहीतर आम्ही तुला सोडतो, आणतो. सगळीकडे याची तुला किंमत नाही हे कधी ना कधीतरी ऐकावं लागलेलं आहेच. तो भाग सोडला तरी कुठेतरी स्वतंत्र झाल्याची जाणीव पण सुखदायक वाटते. खरं ना? मला तू बसमधले अनुभव सांगतोस ना ते आवडतात ऐकायला. तुझं निरीक्षण बरोबर आहे. बसमधली सर्वसामान्य परिस्थितीतली माणसंही समाधानी वाटली ना तुला, त्या डॉक्टर लोकांपेक्षा. फार ताणतणाव नसले की माणसं खूष असतात, हे तुला बघायला मिळतंय हे चांगलंच झालं. तू म्हणालास तसं कधीतरी खरंच आपण सगळे एक चक्कर टाकू बसने. पंधरा वर्षांपूर्वी इथे आलो तेव्हा घरात गाडी यायच्या आधी बसने फिरायचो आम्ही. किती वेळा उभं राहायला लागायचं थांब्यावर. तेव्हा भारतात सहजासहजी मिळणाऱ्या वाहनांचं मोल समजलं. नंतर गाडी आल्यावर बसने जायचा कधी प्रसंगच आला नाही इतक्या वर्षांत. पण तुझ्या नजरेतून ऐकायला मिळणारा बस प्रवास आणि बसमधले प्रवासी फारच रंगतदार वाटतायत. तुझ्या वयाच्या मुलांनाही त्यांच्या आई वडिलांनी हा अनुभव घ्यायला द्यायला हवा असं नाही वाटत तुला? त्यांची शोफरगिरी वाचेल आणि मुलांसाठी एक नवीन अनुभवविश्व. तू सांगायला हवंस तुझ्या मित्रमैत्रिणींना. कदाचित त्यांनाही वाटेल बसच्या प्रवासाचं आकर्षण आणि मग त्यांच्यामुळे त्यांच्या पालकांना.

तुझी सौ. आई

ता.क. आज मुद्दाम चि. आणि सौ. शब्द वापरले आहेत. काळाच्या ओघात हे शब्द नष्टच होतील पत्रलेखनातून कदाचित. बघ तुला उत्सुकता वाटली तर सांगेन त्याचा अर्थ.

_________________________

ओ.. ड्यूड! ही लोकसत्तात प्रसिद्ध झालेली लेखमालिका म्हणजे भारतीय पालकांच्या अमेरिकन असलेल्या तरुण मनांच्या स्पंदनाचा आलेख आणि आईने मुलाला पत्र लिहून तिला काय वाटतं हे व्यक्त करण्याचा केलेला प्रयत्न. यातून ओळख होईल ती तिथल्या हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांच्या जीवनशैलीची समस्यांची प्रगतीची, शाळांमार्फत नवीन नवीन राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची

____________________________