ओ डय़ूऽऽड! भाग २

आज उशीरच झाला. धावत धावत शुभम बस स्टॉपवर पोचला. बस आलीच लगेच. आता शाळेपर्यंत पोचायला अर्धा तास. त्याला आईचं एकदा वाचलेलं पत्र परत वाचायचं होतं. बाजूला बसलेल्या मित्राच्या बडबडीला हो, हो करत खिशात ठेवलेलं पत्र त्याने काढलं.

‘गर्ल फ्रेंडचं पत्र? ’ त्याने एकदम डोकंच खुपसलं.

‘कमॉन डय़ूड. इटस नॉट इन इंग्लिश. अँड इटस फ्रॉम माय मॉम. ’

‘मॉम? ’ भूत दिसावं तसा त्याचा चेहरा झाला, पण शुभमच्या पत्रात डोकं खुपसण्याचा मोह त्याच्या अमेरिकन मित्राला आवरला नाही. शुभमने त्याला बाजूला ढकललं ते त्या मित्राला अजिबात चाललं नाही. दोघांची बाचाबाची संपेपर्यंत शाळेपुढे गाडी थांबली. खाली उतरताना दोघांनीही सुस्कारा सोडला. आता दिवसभरात एकमेकाचं तोंड बघायला नको.

घामाघूम होऊन संध्याकाळी पाचच्या सुमारास शाळेच्या बाहेर शुभम उभा होता. कधी एकदा घरी जातोय असं झालं होतं. वीस-पंचवीस मुलं तरी उभी होती. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. दोन-दोन मैल धावून सर्वाच्याच अंगातलं त्राण नाहीसं झालं होतं. त्यात धावून धावून आलेला घाम, ट्रॅकवर धावलं की जीवच जातो. भरीला अचानक पडलेल्या थंडीमुळे डोकं दुखायला लागलं होतं. इतक्यात रांगेत उभी असलेली टोयोटा त्याला दिसली. त्याने हात हलवला तसं बाबांनी रांगेतून थोडीशी बाहेर काढत गाडी पुढे आणली. शुभम धावत आत शिरला.

‘दोन मिनिटं तीस सेकंद. ’

‘आं? ’

‘माझं आजचं रेकॉर्ड. बरा धावलोय असं वाटतंय. अरे एका मुलाला रक्ताची उलटी झाली धावून धावून. ’

‘बापरे, मग? ’

‘काही नाही. बरं वाटलं त्याला नंतर, मला पण वाटलेलं मलाही होईल की काय. थंडीत धावावं लागलं की आतडीच पिरगळतात आतल्या आत. ’ बोलता बोलता एकदम त्याला आठवलं आईने लिहिलेलं पत्र पुन्हा वाचायचं ठरवलं पण विसरायलाच झालं होतं. शुभमने सकाळी बसमध्ये घाईघाईत खिशात ठेवलेला तो चुरगळलेला कागद काढला.

‘आई किती छान लिहिते. ’ त्याने पत्राची पुन्हा घडी घातली.

‘काय लिहिलंय एवढं? ’

‘पत्रं! ’

‘कुणाला? ’

‘मला ’

‘तुला? ’ बाबाला एकदम आश्चर्यच वाटलं.

‘हो, का? ’

‘अरे घरातल्या घरात कशाला लिहायचं ते पत्र? बोलू शकते की ती. ’

‘हो. पण आपण तिला बोलू देत नाही असं वाटतं तिला. ’

बाबा एकदम हसायला लागला, पण शुभम शांतच होता.

‘मला दे ना वाचायला. बघू तरी काय लिहिलंय तिने लाडक्या लेकाला. ’

‘गाडी चालवताना कसं वाचशील. आणि ते मला लिहिलंय. ’

‘तर काय झालं. दे की, नाही तर तू वाचून दाखव. ’

‘देतो. आणि मला नीट समजावून सांग तिला काय म्हणायचं आहे ते. एकदा वाचलंय मी पण कळलं नाही बरंचसं. ’

त्याने नाइलाजानेच ते पत्र बाबाच्या हातात दिलं, पण आईला हे कळलं तर पुढचं पत्र तो बाबाला वाचायला देणार नव्हता.

घरी पोचल्या पोचल्या चिप्स, बिस्किटं तोंडात कोंबत त्याने पाण्याचा ग्लास तोंडाला लावला.

‘दोन मिनिटं तीस सेकंद’ असं म्हणत त्याने मागून मिठीच मारली, तशी आई वैतागली. ‘लहान आहेस का तू आता? मिठय़ा कसल्या मारतोस. पोळी करतेय मी. किती कोंबलं आहेस एकदम तोंडात आणि आल्या आल्या अरबट चरबट खाऊ नकोस रे. तेच तेच किती वेळा सांगायचं? ’

‘दोन मिनिटं तीस सेकंद. ’ त्याने तिच्या पोटाभोवती आवळलेले हात बाजूला केले नाहीतच.

‘ओ. पण किती मीटरसाठी? ’ त्याला कसलं कौतुक करून हवंय ते एकदम तिच्या लक्षात आलं.

‘आठशे मीटरसाठी. ’

‘वाव, दॅटस गुड. ’

‘नाही गं. बहुतेक दहावा नंबर असेल माझा पंचवीस मुलांमध्ये. ’

‘हे बघ, काही असलं तरी तू या संघात आहेस हेच खूप. इथल्या मुलांच्या तुलनेत आपण कमी पडतो धावण्यात, खेळात. ’

‘येस. पुढचं मला माहीत आहे. किती कमी देसी पोरं भाग घेतात. टिकतात.. ’ ती नुसतीच हसली. तो धावत धावत वरच्या खोलीत गेला. हायस्कूलमध्ये आल्यापासून त्याचं क्षितिज विस्तारलं होतं. आतापर्यंत छोटय़ा- मोठय़ा स्पर्धामध्ये तो भाग घेत होता.

पण आता सगळं करायचं होतं ते कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणं सोपं जावं या दृष्टीने. नववी ते बारावी सगळ्या विषयात चांगले गुण तर पाहिजेतच पण लायब्ररी, वृद्धाश्रम, अपंग मुलं अशा ठिकाणी कामं केली की त्याचे गुण, स्पर्धामधून मिळवलेली बक्षिसं आणि वरच्या वर्गातले विषय (अडव्हान्स प्लेसमेंट, ए. पी. कोर्सेस) आधीच करण्याची धडपड, महाविद्यालयं प्रवेश देताना या गोष्टी बघतात. नुसतं अभ्यास एके अभ्यास करून नाही चालत. चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवायचा तर सगळा घोळ डोक्यात विचारांचा थैमान घालत होता. अंगावरचे कपडे पलंगावर भिरकावत त्याने लॅपटॉपचं बटन दाबलं. जी मेल, फेस बुक, आय. एम. सुरू केलं. शाळेच्या वेबसाईटवर चाचणी परीक्षेचे गुण पाहायचे होते. ट्रॅकमध्ये (धावण्याचा सराव) कुठल्या नंबरवर आहोत ते बघायचं होतं. तितक्यात आय. एम. वर नेहाचे शब्द यायला लागले.

‘कसा झाला तुझा ट्रॅक? ’

‘इट सक्स, नववा नंबर दिसतोय माझा. पहिल्या आलेल्या मुलात आणि माझ्यात फक्त बावीस सेकंदाचा फरक आहे. ’

‘नॉट बॅड. चाचणी परीक्षा? ’

‘इन दॅट, आ डिड रिअली गुड. ’

‘सगळ्या विषयांत ‘ए’ (श्रेणी) का? ’

‘हो. तुझं काय?

‘मला पण. फक्त केमिस्ट्रीत ‘सी’. शेवटच्या परीक्षेत नव्वदच्यावर मिळाले नाहीत तर ‘ए’ जाईल माझा केमिस्ट्रीतला. नशीब माझं आई-बाबा काही बोलले नाहीत. फक्त काय झालं इतके का खाली घसरलीस असं म्हणाली आई. ’

‘माझ्या आईने पत्र लिहलंय मला. ’

‘अं? का पण? एकाच घरात तर राहता ना तुम्ही? बोलत नाही का तुम्ही? ’

‘मी वाद घालत राहतो ना- ऐकण्याऐवजी म्हणून. पण लेट मी टेल यू. कसलं मस्त लिहिलंय आईने. आवडलंय मला. अगदी रोज लिहिलं तरी वाचेन मी. पण मी ठरवलंय तिला काही बोलायचं नाही. मी फक्त वाचेन. ’

‘ए, कसला खुलला आहेस सांगताना. ’

‘मी कसा वागतो ते कळतं ना त्यातून. काय होतं वाद- विवाद स्पर्धेत भाग घेतल्यासारखा भांडतो मी. निरर्थक. ऐकायचंच नसतं मला. काल ते पत्र वाचल्यावर कळलं आईचं काय म्हणणं आहे. ’

‘कशाबद्दल लिहिलेलं तिने? ’

‘तेच गं ते. तू सांगितलेलं. परागच्या ड्रग डीलिंगबद्दल. आता मलाही वाटायला लागलंय सांगावं की काय त्याच्या घरी जाऊन. ’

‘ओ. एम. जी. (ओ माय गॉड) आर यू गोईंग मॅड? तो आणि त्याचे ते ड्रग डीलर्स मारून टाकतील तुला. ’

‘काही तरी मार्ग शोधायला हवा. त्यांना कळायला तर हवं पण मी सांगितलंय हे नको कळायला. ’

‘हं. पण आपण हे कशाला बोलत बसलोय. आय. एम. वर. तू म्हणतोस माझ्याशी बोललं की डायरी लिहिल्यासारखं वाटतं. मग सांग ना दिवसभरातल्या गोष्टी. ’

शुभम मग बराच वेळ त्या पत्राबद्दल बोलत राहिला. आईने तिचं चुकलं हे कबूल केलं होतं पत्रात, त्याचा तर त्याला फार आनंद झाला होता. नेहाही कुतूहलाने ऐकत होती.

‘बरं आपल्याला पोस्टर करायचं आहे एकत्र. लक्षात आहे ना? ’

आईच्या पत्रातून तो बाहेर आलाय असं वाटल्यावर तिने विचारलं.

‘भीती वाटतेय घरात सांगायला. तू विचारलं आहेस आईला? ’

‘हो आमच्या घरी भेटलं तरी चालेल असं म्हणाली आई. ’

‘मी दोन दिवसांत सांगतो. म्हणजे सोमवारी, शनिवार, रविवारी विषय काढेन. नुसतं आईला विचारून नाही चालत. ती म्हणणार बाबांना विचार. दोघं एकदम असतील तेव्हाच विचारावं लागेल. ’

‘गुड नाईट. ’

‘गुड नाईट. ’

____________________

मोहना जोगळेकर


ओ डय़ू.. ड! ही सहा भागांची लेखमालिका म्हणजे भारतीय पालकांच्या अमेरिकन असलेल्या तरुण मनांच्या स्पंदनाचा आलेख आणि आईने मुलाला पत्र लिहून तिला काय वाटतं हे व्यक्त करण्याचा केलेला प्रयत्न. यातून ओळख होईल ती तिथल्या हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांच्या जीवनशैलीची, समस्यांची प्रगतीची, शाळांमार्फत नवीन नवीन राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची.