ओ...ड्यूड! भाग ११

शुभम शर्टाच्या घडय़ा करून व्यवस्थित बॅगेत भरत होता. एकीकडे कॉलेज जीवनाची उत्सुकता, काहीशी भीती, दडपण आणि या घराचा आता निरोप घ्यावा लागणार म्हणून आलेली अस्वस्थता. सगळं लहानपण याच घरात गेलेलं. खिडकीतून बाहेर डोकावलं की मागच्या अंगणातलं ते झाडाजवळचं बाकडं म्हणजे त्याचा विसावा होता. घरातल्यांचा राग आला, खूप थकवा, निराशा आली की, आणि आनंद झाला तेव्हादेखील तिथेच तो बसायचा. दुसरीत असताना त्याने त्याच्या प्रिय माशाला, बेट्टाला, तो मेल्यानंतर बाजूलाच पुरलं होतं. शुभमने त्या ठिकाणी लावलेल्या रोपटय़ाचं मोठं झाड झालं होतं. आई, बाबा हा गृहीत धरलेला त्याच्या आयुष्याचा भाग होता. तेच तर काळजी घ्यायचे त्याची. जमेल एकटय़ाने राहायला? विचाराचं चक्र मनात गरगर फिरत होतं पण हात नकळत एकेक काम आटपत होते. कपडे भरता भरताच बाजूला पडलेला पुस्तकांचा ढीग त्याला खुणावत होता. सगळी पुस्तकं वाचनालयात आईलाच परत करावी लागणार. या पुस्तकांनी त्याला आईच्या खूप जवळ आणलं होतं. शाळेत ऐकलेलं, शिक्षकांनी सांगितलेलं पुस्तक याबद्दल तो बोलला की आई आवर्जून ते पुस्तक वाचनालयातून आणायची. शुभमही झपाटल्यासारखा वाचायचा. अभ्यासाच्या व्यापात वेळ मिळाला नाही की कधी गाडीत, कधी जिन्यात असं करून पुस्तक कधी संपायचं ते कळायचंही नाही. आईलाही तो गोष्टीत खेचून घ्यायचा. तीही उत्साहाने ऐकायची. पुढे काय होत असेल त्याचा अंदाज व्यक्त करायची. त्यामुळेच त्यालाही प्रत्येक पुस्तक कधी वाचून संपवतोय असं व्हायचं. आता हे सगळं संपणार होतं. पुढच्या आठवडय़ात तो कॉलेजसाठी बाहेर पडणार होता. कुणाला सांगणार आता गोष्टी? नेहाला गोष्टींमध्ये अजिबात रस नव्हता. ती कवितात रमणारी, बाबाही "बोअर नको करूस, पटकन संपव" म्हणायचा. त्यातून आईने त्याला लिहिलेली पत्र! आता लिहील आई पत्र? आत्तापर्यंत त्याने तिच्या पत्रांचा पुसटसा उल्लेखही कधी केला नव्हता. आईला गोष्ट सांगताना, गप्पा मारताना कितीतरी वेळा त्याला तिला सांगावसं वाटायचं की तूही फार छान लिहितेस. तू का नाही अशा गोष्टी लिहीत? पण जणू तिची पत्र ही त्याची खासगी मालमत्ता होती. तोंडातून शब्दच फुटायचा नाही. कदाचित आईने विचारलं असतं तर तो बोललाही असता पण तिनेही कधी एका शब्दाने विचारलं नाही. त्याच्या घशात कढ दाटून आले. आई, नेथन आणि रहस्यकथा यांनीच तर डॉक्टर व्हायचा ध्यास  सोडून टाकावासा वाटला की काय? गेली चार र्वष कार्यानुभव म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या विभागांचीच त्याने चाचपणी केली होती. आणि प्रत्यक्षात त्यालाही शक्यता न वाटलेलं क्षेत्र त्याने निवडलं. सगळं तसं अचानकच बदललं होतं. गेल्या काही आठवडय़ांतल्या घडामोडी आठवत राहिल्या.

हायस्कूलचं शेवटचं वर्ष. बारावी. शुभमने कितीतरी ठिकाणी महाविद्यालयीन प्रवेशांचे अर्ज भरायचे ठरवले होते. ज्या शाखांसाठी अर्ज कराल त्याला अनुसरून त्याच्याबरोबर लिहावे लागणारे निबंध. या निबंध लिहिण्याच्या प्रकारातून बरीच मुलं लेखक होतील असंच त्याला वाटायला लागलं होतं. या चार वर्षांत त्याने दर मे महिन्याच्या सुट्टीत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून पाहिलं होतं. माध्यमिक शाळेत असतानाच केलेला वैद्यकीय क्षेत्राची ओळख करून देणारा पंधरा दिवसांचा कॅम्प त्याला आठवला. सगळ्या विभागांची तोंडओळख तेव्हाच झाली. त्या वेळेस मिळालेल्या कितीतरी गोष्टी त्याने अजून जपून ठेवल्या होत्या. कॅलक्युलेटर, कंपास पेटी, मॅग्नेटिक पॅड.. नंतर नववीत गेल्यावर हॉस्पिटलमध्ये घेतलेला कार्यानुभव. तोपर्यंत होईन तर डॉक्टरच म्हणणाऱ्या शुभमचं मत अचानक बदललं. त्याला क्रिमिनल जस्टिस टेक्नॉलॉजीने (गुन्हा अन्वेषण तंत्रज्ञान) वेड लावलं. गेल्या वर्षी शेजारच्या घरात आलेला नेथन हेच त्याचं मुख्य कारण होतं. नेथनला बाबा नव्हते. आई किरकोळ कामं करत चार मुलांचं कसंबसं भागवीत होती. घर म्हणजे हा कचरा. सतत भावंडांची खडाजंगी. एकदा चढे आवाज ऐकून कुणीतरी पोलिसांना बोलावलं आणि ती सगळी भावंडं विखुरली गेली. मुलांकडे दुर्लक्ष होतंय या कारणाने आईकडून चारी भावंडं सरकारने जबरदस्तीने ताब्यात घेतली. कायद्याने ती आता सरकारच्या ताब्यात होती. आता अशी मुलं स्वीकारतील त्यांच्याकडे रहायचं. गेल्या दोन-तीन वर्षांत नेथन दोन-तीन घरात राहून आता शेजारच्या घरी आला होता. त्याची आणि त्याच्या भावंडांची भेट दुर्मिळ होती. आई कोर्टाच्या पायऱ्या झिजवून थकून गेली होती. दुखावलेला, संतप्त, बेफिकीर नेथन फुटबॉलसारखा वेगवेगळ्या घरांत टोलावला जात होता. सतत बदलल्या जाणाऱ्या पालकांना स्वीकारायचा अयशस्वी प्रयत्न करत होता. कधीतरी त्याच्याशी बोलण्याची वेळ यायची तेव्हा म्हणायचा.

"आम्ही कुणीच काही गुन्हा केला नव्हता. ना आईने, ना भावंडांनी. तरी ही वेळ का आली आमच्यावर? का, का असं झालं? मी घरात मोठा पण मला काहीच करता आलं नाही."  जेमतेम तेरा वर्षांचा नेथन स्वत:ला मोठा समजत होता. नेथनने बेसबॉल, बास्केटबॉल खेळायला यावं म्हणून शुभमने केलेल्या प्रयत्नांना त्याने दादच दिली नाही. त्याचं लहानपण त्याला सोडून गेलं होतं. मनात दडलेली भीती सतत फणा काढून उभी राही. या घरात त्याचं वागणं आवडलं नाही तर पुन्हा रवानगी दुसऱ्या घरी. शुभमला वाटायचं या यंत्रणेतच काहीतरी बदल करायला हवा. असं दुसऱ्यांच्या घरी जबरदस्ती राहण्याऐवजी त्याच मुलांच्या घरची परिस्थिती बदलायचा का प्रयत्न करत नाहीत? याचाच परिपाक होता त्याने गुन्हा अन्वेषणमध्ये पदवी घ्यायचं ठरवण्याचा. सुरुवातीला त्याने हा विचार नेहाला बोलून दाखवला तेव्हा तिला धक्काच बसला.

"नेथनमुळे वाटतंय तुला हे. पण खरंच त्या विषयाची आवड आहे का ते कसं कळणार तुला आता. इट्स टू लेट टू ट्राय समथिंग लाईक धिस."

"आवड आहे की नाही हा प्रश्नच नाही. तू पहायला हवंस नेथनला. किती एकलकोंडा झालाय तो. आमचे शेजारी अथक प्रयत्न करतात त्याने सर्वाशी मिळून मिसळून वागावं, हसतमुख रहावं म्हणून. पण हा कायम निर्विकारच असतो. कुठल्याही भावना चेहऱ्यावर येऊच देत नाही. त्यामुळे त्यांनाही समजत नाही काय करावं. मग शेवटी त्यांनी त्याला परत पाठवलं तर? खूप भीती वाटते मला या विचाराने. नेथनला हे समजावून सांगितलं, पण तो बदलतच नाही."

"अरे, पण त्यासाठी तू तुझं वैद्यकीय शाखेचं स्वप्न सोडणार?"

"स्वप्न म्हणजे काय गं? इतर क्षेत्र तशी फारशी माहीत नसतात. आपणच डोक्यात घेऊन बसतो काही तरी. डॉक्टर, इंजिनीयर म्हटलं की कोण कशाला नाही म्हणतंय? त्यामुळे तेच मनात रहातं. पण लेट मी पुट धिस इन अनदर वर्डस. नाऊ धिस इज माय ड्रीम. आय वाँट टू मेक अ चेंज इन सिस्टिम अँड दीज किड्स."

नेहाने पटकन टाईप केलं- "एल ओ एल."

"काय. लाफिंग आऊट लाऊड करतेस? तुला नाहीच कळणार एखाद्या गोष्टीसाठी वेडं होणं म्हणजे काय."

"अरे, तू दीज किड्स म्हटलंस म्हणून हसतेय मी. तू काय असा मोठा माणूस झालायस का? आणि वेडं होणं म्हणजे काय ते माझ्यापेक्षा कुणाला कळणार चांगलं? झालेय की मी तुझ्यासाठी वेडी."

त्याने हसऱ्या चेहऱ्याचं चिन्ह (स्माईली फेस) पडद्यावर ओढलं.

"तू जर आता हे करायचं ठरवलंस तर मग माझं काय?"

"तुझं काय? तू जाऊ शकतेस की मेडिकलला."

"अरे हो, ते कळतंय रे मला. पण मग आपली स्वप्नं? दोघांनी एकत्रच शिकायचं ठरवलं होतं ना?"

"अगं, मी नुसतं म्हणतोय. अर्ज केले की ते स्वीकारले गेले पाहिजेत ना."

"आणि तुझा सगळा कार्यानुभव आहे तो मेडिकलचा."

"हो, म्हणूनच थोडीशी धाकधूक वाटतेय. त्यामुळे मी मेडिकलसाठीही अर्ज भरणार आहे. ते तर आपण एकत्रच भरू. म्हणजे माझं नाही झालं क्रिमिनल जस्टिसचं तर निदान मेडिकलला एकत्र असू."

"आय होप सो."

"आणि मी क्रिमिनलला आणि तू मेडिकलला असं असलं तरी कदाचित एकाच युनिव्हर्सिटीत मिळेलही प्रवेश. कॅम्पस असतील वेगळे, पण मग भेटूच की आपण आणि तू म्हणतेस तसं दगडी चौथऱ्यावर झाडांच्या सावलीत गप्पा मारू."

"खरंच तसं झालं तर बरंच. बेस्ट लक शुभम."

"बेस्ट लक टू यु टू नेहा."

त्यानंतर त्याने घरात सांगितलं होतं. आई, बाबा दोघांनाही थोडंसं आश्चर्य वाटलं, पण कुणीच नाकं मुरडली नाहीत. कदाचित नेथनचं जितंजागतं उदाहरण समोर होतं म्हणून? त्याने त्यावर फारसा विचारच केला नाही. मेडिकललाच गेलं पाहिजे म्हणून मागे लागले नाहीत हेच त्यांच्यासाठी खूप होतं. शाळेत म्हणतात की, भारतीय मुलांचे आईवडीलच त्यांनी काय करायचं, व्हायचं ते ठरवतात. पण तो काय किंवा नेहा काय, दोघांच्याही आईवडिलांनी त्यांना पुरेपूर स्वातंत्र्य दिलं होतं. पण ते देताना स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही हेही वारंवार बजावायला विसरले नव्हतेस म्हणा ते. आता फक्त वाट पहायची होती.

टेक्सास राज्यातल्या विद्यापीठाकडून त्याचा अर्ज स्वीकारल्याचं पत्र आलं आणि मग त्याची एकच धांदल उडाली. आईचा थोडा हिरमोड झाल्यासारखा झाला. जवळपासच्या विद्यापीठांमध्ये त्याने अर्ज केले होते तिथेच प्रवेश मिळाला असता तर जाणंयेणं सोयीचं झालं असतं असं तिला वाटत होतं. आता टेक्सास म्हणजे विमानप्रवासाशिवाय मार्गच नाही. त्याचाच दुसरा अर्थ सारख्या सारख्या भेटीही नाहीत. पण नेहालाही तिथेच प्रवेश मिळाल्याचं समजल्यावर दोघांच्याही आईबाबांना फार बरं वाटलं. दोन्ही मुलांना आता एकटेपणा वाटणार नव्हता; किंबहुना एकमेकांच्या सहवासात आपली आठवण राहिली तरी खूप असंही त्यांच्या मनात येऊन गेलं.

एकेक करून सगळं आवरलं आणि त्याला अगदी मनापासून वाटलं यावेळेस तरी आईला सांगायला हवं तिच्या पत्रांबद्दल. तो धाडधाड जिने उतरत अध्र्यावर आलादेखील तिला सांगायला. पण एकदम त्याने विचार बदलला. तशीच दमदार पावलं टाकत तो त्याच्या खोलीत शिरला. टेबलावर पडलेला कागद त्याने उचलला आणि कोऱ्या कागदावर शब्द उमटायला लागले.

प्रिय आई..

_____________________________

ओ.. ड्यूड! ही लोकसत्तेत प्रसिद्ध झालेली लेखमालिका म्हणजे भारतीय पालकांच्या अमेरिकन असलेल्या तरुण मनांच्या स्पंदनाचा आलेख आणि आईने मुलाला पत्र लिहून तिला काय वाटतं हे व्यक्त करण्याचा केलेला प्रयत्न. यातून ओळख होईल ती तिथल्या हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांच्या जीवनशैलीची समस्यांची प्रगतीची, शाळांमार्फत नवीन नवीन राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची.

_______________________________