ओ.. ड्यूड! - भाग ८

"उद्या आम्ही इथून निघणार. आय जस्ट कान्ट वेट टू टॉक टू यु. "सी.यु." असं म्हणता येत नाही कारण तसं आपण फारसं भेटतच नाही. पण आता मी आल्या आल्या आपला कार्यानुभवाच्या निमित्ताने भेटता येईल." रात्री गच्चीत झोपल्या झोपल्या शुभमने सातासमुद्रापलीकडे असलेल्या नेहाला टेक्स्टिंग केलं. उद्या आय.एम. करायचं ठरवूनच तो निद्राधीन झाला. भारताबद्दल त्याला तिच्याशी खूप बोलायचं होतं. या खेपेला शुभमने सिंहगड पाहिला. अपेक्षाभंगच झाला. काय ती दूरवस्था आणि का? काका म्हणाला, पैसेच नाहीत हे सगळं जतन करायला आणि त्यापेक्षा इच्छाही. अमेरिकेत त्याने इतिहास जतन करण्यातली कल्पकता आणि नियोजन पाहिलं होतं. रायगड अशा पद्धतीने जपल्याचं काकूने आवर्जून सांगितलं. शिवाजी महाराजांबद्दल इतकं वाचलं होतं की या खेपेला एक तरी किल्ला बघून झाला यातच तो खूश होता. या वर्षी त्याच्या शाळेतल्या पाठय़पुस्तकात भारतातल्या रामायण- महाभारतातल्या व्यक्तींचा उल्लेख दंतकथा म्हणून होता. त्या संदर्भातही माहिती विचारून घ्यायची होती. त्याला मिळालेली माहिती जमवून वर्गातली "देसी" मुलं शाळेला पत्र लिहून कळवणार होती, त्याच्या तयारीचा हा एक भाग होता. भारतात जायच्या अगोदर दर वेळेला "गुगल" करून शुभम अधिक माहिती मिळवायला कधीच शिकला होता. मग कुठली कुठली ठिकाणं पाहायची हे नक्की व्हायचं. आई, बाबांच्या तोंडून ऐकलेला भारत क्वचित दिसायचाही. आजही गड चढताना त्याला तशीच उत्सुकता होती. पुणं कधी संपलं आणि गडाच्या पायथ्याशी कधी आलो तेच त्याला कळलं नाही. पायथ्याशीच फळं विकणाऱ्या मुलाशी गाठ पडली. त्याला त्याच्याशी गप्पा मारण्याचा मोह आवरला नाही. खरं समाजजीवन असंच कळतं हे घरात ऐकलेलं मनात भिनलेलं होतंच. तो मुलगा शाळेतही जातो कळल्यावर भारतात आल्या आल्या आईने एका संस्थेला दिलेल्या कपडय़ातले एकदोन गाडीतून घेऊन आलो असतो तर बरं झालं असतं असंही वाटून गेलं. त्याने त्या मुलाला पैसे देऊ या, म्हणून लकडा लावला पण आई- बाबांचा पैसे द्यायला मात्र विरोध होता. गोष्टी दिल्या की त्याचा नक्की वापर केला जातो. मुलांच्या हातात पैसे पडले तर त्याचा वापर कसा होईल हे सांगता येत नाही, यावरच त्यांचा विश्वास. मागेही एकदा त्याला अशाच एका मुलीसाठी काहीतरी करायला हवं असं वाटलं होतं. त्यावेळेस केलेला दर महिन्याला एक दोन डॉलर्स बाजूला ठेवायचे हा निश्चय तो अमेरिकेत परतल्यावर विसरूनही गेला होता. या वेळेस तसं होऊ द्यायचं नव्हतं. ते सिमल्याला गेले तेव्हा ढाब्यावर भेटलेला पराठे करणारा मुलगा त्याला आठवला. तो शाळेत जात नव्हता, पण तास- दोन तास चालत त्या खोपटय़ात यायचा. आधी शुभमला वाटलं की त्याचे आई- बाबा ते चालवतात आणि तो मुलगा मदत करतो. पण तसं नव्हतं. दिवसभर काम करून जेमतेम एक वेळचं जेवण होईलएवढेच पैसे त्या मुलाला मिळत होते. त्याचा पत्ताही शुभमने आवर्जून घेतला होता.

अमेरिकेत असलं काही त्याने अद्याप पाहिलं नव्हतं. घरात वेळोवेळी "तुम्हाला सगळं आयतं मिळतं म्हणून कशाची किंमत नाही. किती तरी मुलांना साध्या जीवनावश्यक गोष्टी मिळत नाहीत," असं आई म्हणायची तेवढच. भारतात आल्यावर मात्र गाडीवर टकटक करत पैसे मागणारी, नको म्हटलं तरी गाडी पुसणारी आणि पैशासाठी हात पुढे करणारी मुलं दिसायची. ती मुलं मुद्दाम असा हात का लावतात हे कोडं त्याला उलगडलं नव्हतं. अमेरिकेत पाहिलेले भिकारी फारच वेगळे होते. बऱ्यापैकी कपडय़ातले, हातात "प्लीज हेल्प" असा फलक घेतलेले किंवा रस्त्यावर गाणी म्हणत उभे राहिलेले. बाजूला टिप्ससाठी डबा आणि सगळे मोठे. लहान कुणीच नाही. अमेरिकेतल्या लोकांना भिकारी असून चांगले कपडे कसे परवडतात हे ही त्याच्या आकलनापलीकडचं होतं.

परत आल्यावर मूलभूत प्रश्नालाच नेहाने हात घातला.

"आवडतं तुला भारतात जायला?"

"ठाऊक नाही. कदाचित कॉलेज झाल्यावर नोकरीसाठी. पण तिकडे टॅक्सी ड्रायव्हर सांगत होता की मराठी असाल तर नोकरी नाही, जानवं, शहाण्णव कुळी अशा बऱ्याच गोष्टीही मध्ये येतात. मला फारसा अर्थच कळत नव्हता. पण नोकरी मिळणं सोपं नाही एवढंच कळलं. मी बाबाला विचारलं, कारण अमेरिकेत तर आपण नाही असं पाहात. मार्टिन ल्यूथर किंगनी इथे साठच्या दरम्यान केलेल्या चळवळीचं उदाहरण बाबानं दिलं. गांधीजींनी भारतात केलेल्या चळवळीसारखीच होती म्हणे ती. त्यानंतरही इतक्या वर्षांनी कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष झाले ओबामा. आई- बाबाला वाटतं की भारतातल्या मुलांवर वेस्टर्न कल्चरचा प्रभाव आहे पण त्यातूनच कदाचित हळूहळू जात, धर्म, भाषा याचाच विचार नष्ट होईल. हे व्हायला खूप र्वष लागतील. पण होईल. माझ्या बाबतीत मला तर हे गाव म्हणजेच माझा देश वाटतो. इथून मी नाही जाणार कुठे. तुला आवडतं भारतात जायला?" शुभमने तिलाच उलट विचारलं.

"अं, हं.. मला नाही आवडत तिकडे फारसं. एक तर वाट्टेल ते प्रश्न विचारतात कुणीही. पहिला प्रश्न, बॉयफ्रेंड आहे का तुला? चौथी पाचवीत होते तेव्हा विचारलेलं कुणी तरी. जसं काही जन्म झाल्या झाल्या अमेरिकेत प्रत्येकाला बॉयफ्रेंड असतो आणि गल्लोगल्ली लोकं किस करत असतात, असं वाटतं त्यांना आणि ते सगळ्या नातेवाईकांना भेटायला जायचं प्रकरण."

शुभमला चेवच चढला. "एका तासात पाच-सहा घरी तरी जातात. शेवटच्या घरी गेलं की पहिला नातेवाईक कोण होता तेच मला आठवत नाही. आणि तो खायचा आग्रह! नाही खाल्लं तर काही तरी टोमणा मारून हसतात."

नेहाला हसायला आलं.

"जाऊ दे, आई, बाबा खूष असतात ना, आपल्या मागची कटकट थोडी कमी होते. पण मनासारखं नाही वावरता येत. एवढय़ा अटी घालते आई, अंग पूर्ण झाकलं जायला हवं, तोकडे कपडे नकोत, मेकअप नाही करायचा.. काय तर म्हणे चांगल्या नजरेने पाहत नाहीत रस्त्यावर. त्यातच टक लावूनही पाहतात. दे मेक मी नव्‍‌र्हस. मजा म्हणजे तिथली सगळी मात्र असेच कपडे घालतात, शॉपिंग मॉलमध्ये पैसे उडवतात. आपणही नाही इतकी चैन करत इथे."

"तू म्हणतेस तसं मलाही पाचवी-सहावीतच गर्लफ्रेंड आहे का विचारायचे. ते गर्दीतले मुद्दाम मारलेले धक्के, मुलींकडे बघून डोळे मारतात याबद्दलही खूप ऐकलंय आईकडून. मुलींना पाहून जिभ पण फिरवतात ओठावरून. यक्!.. काय न काय. आई म्हणते बाकी काही नाही तरी या गोष्टींपासून सुटका मिळवायची तर यावं अमेरिकेला, इकडे घालतात तसे कपडे, फॅशन तिकडे करतात पण अमेरिकेत असे कपडे घातल्यावर कुणाच्या नजरा वारंवार वळत नाहीत किंवा कुणी जिभल्या चाटत नाही हे विसरतात भारतातील लोक."

"पण काही काही मजेशीर गोष्टी करून बघितल्यायत मी तिकडे गेल्यावर." शुभमला आताही त्या आठवून हसायला यायला लागलं.

"मी लहान होतो तेव्हा कुठे गेलं की काही काही इमारतींच्या जिन्यात देवांचे फोटो असतात ना, ते कुठल्या देवाचे आहेत ते ओळखून नमस्कार करायचो. सारखे नमस्कारच चालू राहायचे. आईने देवाला नमस्कार करायला शिकवलं होतं. त्याचा परिणाम." शुभमला तो पहिलीत होता तेव्हाची आठवण  झाली.

"मला सर्वात घाण वाटते ती पान आणि तंबाखू खाऊन थुंकतात ना त्याची." नेहाच्या अंगावर आताही काटा आला. शुभमला तिला सांगायचं की नाही ते ठरविता येईना पण त्याने लिहलंच.

"मी पण एकदा रस्त्यावर थुंकून बघितलं होतं. सगळे थुंकत होते ना जागोजागी. मग वाटलं आपणही तसं बघावं करून."

"ग्रोस! शुभम. घाणेरडा कुठला."

"अगं पहिली की दुसरीतच होतो. ए, आता आपण बघतो की इथेही थुंकतात ते."

"हो पण इतकं सर्रास नाही आणि लाल रंगाच्या पिचकाऱ्या नसतात."

"पुरे आता. थुंकी हा काय विषय आहे गप्पा मारण्याचा?"

"पण आपण थोडेसे पैसे साठवून मी म्हटलं तशी मदत करायला हवी."

"चालेल. आणि इकडे तिकडे जातो तेव्हा कपडे, पुस्तकं असं काहीतरी बरोबर ठेवायचं म्हणजे तुला जसा सिंहगडच्या पायथ्याशी मुलगा दिसला तसं पटकन कुणी दिसलं, वाटलं की देता येईल."

"ग्रेट. मी आता खरं सांगायचं तर आईच्या पत्राची वाट पाहतोय. तुला सांगितलं ते आईशी गप्पा मारताना तिलाही सांगितलंय. मला ठाऊक आहे की ती या संदर्भात लिहिलच.

प्रिय शुभम,

आज खूप बोलणं झालं आपलं भारताबद्दल. तू म्हणत होतास की तुमच्या पुस्तकात रामायण, महाभारत या सगळ्या दंतकथा आहेत असं म्हटलंय. तुम्ही मुलांनी शाळेला पत्र पाठवून त्याची अधिक माहिती द्यायची ठरवलं आहे ते ऐकून वाटलं, चला त्या निमित्ताने तुम्हालाही आम्ही वाचलेल्या गोष्टी कळतील. मी असते तर, असं शाळेला पत्र लिहिण्याने काही फरक पडत नाही म्हणून सोडून दिलं असतं. पण तू म्हणतोस तसं हा मुद्दा चर्चेला आला, संघटित कृती झाली तर होईलच बदल. एकजुटीने पाठपुरावा करणं हीच इथली गुरुकिल्ली असावी.

तुझ्याकडून भारताबद्दल नकारार्थी ऐकलं की त्रास होतो. त्यातून हे गाव म्हणजेच तुला तुझा देश वाटतो हे ऐकलं की तर फारच अस्वस्थता येते. पण ते मान्य करणं भाग आहेच. या देशातच तू वाढलेला, पालक भारतीय आणि दर दोन वर्षांनी महिनाभर भारतात घालवलेले दिवस एवढय़ावर आमचा देश तुला तुझाही वाटावा असं वाटण्याचा अट्टाहास आम्ही तरी का करावा? तरीही तुझी निरीक्षणशक्ती आणि बोलण्यातून सकारात्मक गोष्टी ऐकल्या की बरं वाटतं. तुला भारतातल्या मुलांसाठी काहीतरी करावंसं वाटतंय ही फारच चांगली गोष्ट आहे.

खूप मुलांच्या बाबतीत असं झालं आहे. त्यांना कधी ना कधी तरी आपली "रूटस्" शोधावीशी वाटतात. इथल्या मुलांप्रमाणे जग फिरायचं या संकल्पनेतून आपल्या मायभूमीचे अंतरंग पाहायचं भान येतं. ही मुलं कोणत्या ना कोणत्या संस्थेतून भारतातल्या खेडय़ापाडय़ातलं जीवन पाहायला म्हणून जातात आणि मग जातच राहतात. तिथलं काम आवडतं म्हणून, शांत, तणावविरहित जीवनाचा अनुभव घ्यावासा वाटतो म्हणून आणि शहरीजीवनापलीकडच्या आपुलकीचं, माणुसकीचं सहजदर्शन सुखावतं म्हणून. तुझ्या सुदैवाने कितीतरी गट, संस्था तुला मार्ग दाखवायला आहेत आणि मुंबई, पुणे म्हणजे महाराष्ट्र नव्हे हेही यातून तुझ्या लक्षात येईल आणि माझ्या दृष्टीने एवढं जरी झालं तरी खूपच.

तुझी आई

______________________________________________________________________
ओ.. ड्यूड! ही  लोकसत्तेत प्रसिद्ध झालेली लेखमालिका म्हणजे भारतीय पालकांच्या अमेरिकन असलेल्या तरुण मनांच्या स्पंदनाचा आलेख आणि आईने मुलाला पत्र लिहून तिला काय वाटतं हे व्यक्त करण्याचा केलेला प्रयत्न. यातून ओळख होईल ती तिथल्या हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांच्या जीवनशैलीची समस्यांची प्रगतीची, शाळांमार्फत नवीन नवीन राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची.

_______________________________________