ओ.. ड्यूड! - भाग ७

"अरे पण, तुम्ही मला कामं करूच देत नाही आणि सारखं सांगता, जॉनी शू पॉलिश करतो, जॉनी लॉन मोविंग करतो (ग्रास कटिंग), जॉनी ग्रोसरी स्टोअरमध्ये काम करतो, जॉनी हे करतो आणि जॉनी ते करतो.." शुभमने बाबाच्या हातातला कागद हिसकावला. जॉनीने आजूबाजूच्या घरांच्या पत्रपेटीवर अडकवलेल्या जाहिरातीचा तो कागद होता.

"पण तुला काय झालं एवढं चिडायला?" बाबाला मुळी त्याचा राग कळेचना.

"काय झालं म्हणजे? सारखं तुमचं चालू असतं जॉनी पुराण. जॉनीला शेजारीपाजारी लॉन मोव्ह करताना पाहिलं की लगेच त्याचे वडील किती मोठय़ा कंपनीत मॅनेजर आहेत तरी इथल्या मुलांना कमीपणा वाटत नाही. पॉकेटमनीसाठी अशी कामं करताना, यावरच चर्चा."

"त्यात काय चुकीचं आहे पण? चांगली गोष्ट आहे ती."

"मग मला पण करू देत की, तुम्ही म्हणता ना अमेरिकेत आल्यावरच कोणत्याही गोष्टींची लाज वाटू न देता काम करायचं हे शिकायला मिळालं. मग मला का नाही करू देत? अं? का? का नाही करू देत? तिथे लगेच देसी होता तुम्ही." शुभमचा फुटाणा ताडताड फुटत होता.

"देणार आहोत ना. एखादा महिना तरी ग्रोसरी स्टोअर्समधून काम करायचा अनुभव हवाच. थोडय़ाशा पैशांसाठी किती श्रम करावे लागतात. हे कळायलाच हवं तुला, म्हणून." शुभमच्या रागाचा फुगा एकदम फुटलाच. त्याला बाबाकडून एकदम अशा शरणागतीची अपेक्षाच नव्हती. तितक्यात आईने सूत्रे ताब्यात घेतली.

"त्याचा अर्थ असा नाही की लगेच या सुट्टीत तू काम करशील. पण तसं करू शकतोस एवढंच म्हणायचंय आम्हाला."

"म्हणजे नाहीच! मला वाटलंच, एवढय़ा पटकन कसं काय मान्य केलंत. मी निदान घरचं लॉन मोविंग करतो या सुट्टीत. त्याच्या मोबदल्यात तुम्ही पैसे मलाच द्या."

"पण घरचं काम करायला तुला पैसे कशाला हवेत?"

"बरं नको देऊस पैसे. खूष?" कुठून पैसे मागितले असं त्याला झालं. ती पुढे काही बोलायच्या आत थांब थांब करत त्याने स्पष्ट केलं.

"पण प्लीज, तुझं सुरू करू नकोस. तोंडपाठ आहे ते मला. मी स्वयंपाक करते, भांडी घासते, कपडे घडय़ा करते. तुमच्या वेळा सांभाळते, शोफरगिरी करत तुला जागोजागी नेणं-आणणं करते, त्याचे कोण देणार पैसे.. सांग म्हणणार होतीस ना? होतीस ना?"

"शुभम, बास झालं आता, नाही तर आपल्याला आजचं जेवण पैसे दिले तरी मिळणार नाही." बाबाने वातावरण हलकं करायचा प्रयत्न केला.

"मी जातोच आता इथून."

"पैसे तर नाही मिळणार, पण एक मार्ग आहे तुला माझ्याकडून तुझ्या आवडत्या गोष्टी मिळवायच्या."

"कुठला?" शुभमने उत्सुकतेने विचारलं.

"सांगितलेलं काम लगेच करायचं. पाच मिनिटांनी, नाही तर दिवसभरात कधी तरी करेन. झोपायला जायच्या आधी झाल्याशी कारण अशी आश्वासनं नकोत."

"करतो की मी कामं घरातली."

"हो करतोस ना, पण ती वेळेवर करण्याबद्दल म्हणतेय मी."

"काय मिळेल पण आवडीचं?"

"ज्या ज्या दिवशी कामं वेळेत पूर्ण होतील त्या दिवशी तुझ्या आवडीचा पदार्थ जेवणात मिळेल."

"कूल! डील?"

"हो."

"बघ हं तिरामिसू, बाकलावा, गुलाबजाम.. मी यादीच करतो. चालेल?"

शुभम आणि बाबा दोघांनीही एकमेकाला टाळी दिली. गोडखाऊ बापलेकांना आताच मिष्टान्न्ो समोर दिसायला लागली होती. तावातावाने सुरू झालेल्या संभाषणाचा सुखद शेवट, नेहाला सांगितल्याशिवाय शुभमला कुठलं चैन पडायला. न राहून त्याने तिला फोन केला. तिचे आईबाबा आजूबाजूला असले की ती त्याला लॅपटॉपच उघडायला लावायची. आयएमचं (इन्स्टंट मेसेज) बरं पडायचं. फोनवर बोलता बोलताच त्याने लॅपटॉप चालू केला.

"तू करतेस का आईला मदत घरात?" त्याने एकदम तिला विचारलं.

"म्हणजे?"

"जेवायच्या वेळेला ताटं घ्यायची, भांडी डिशवॉशरमध्ये टाकायची, कचरा काढायचा, बागेत झाडांना पाणी घालायचं वगैरे वगैरे."

"तू करतोस हे सगळं?" नेहाला धक्काच बसला.

"सगळं नाही. पण बरचंसं."

"मी फक्त माझी खोली आवरते. तीदेखील नावापुरतीच. बेड खालची जागा कशासाठी असते रे?"

"म्हणजे कचराखोली आहे तर तुझी. माझी खोली तर मी कधीच आवरायला लागलोय. आईचं म्हणणं आहे की देसी पोरांचे आईवडील फारच लाडावून ठेवतात मुलांना. कशाची म्हणून सवय नसते."

"हं, मेऽबी. पण माझी आई म्हणते नंतर करावं लागणारच मग कशाला आतापासून. अभ्यासाचं वय आहे, अभ्यास करा. कचरा, बाथरूम स्वच्छ करायला महिन्याने मेड सव्‍‌र्हिस आहेच."

"यू आर व्हेरी लकी नेहा. माझे बाबा म्हणतात की, बाथरूम, संडास त्या लोकांनी कशाला साफ करायचा, आपण घाण करतो तर आपल्या आपणच या गोष्टी करायला हव्यात."

"ते तर माझा बाबाही म्हणतो. पण ते नुसतं म्हणायचं. प्रत्यक्षात कोण करतंय ही कामं?"

"मजा आहे बुवा तुझी. मी पण एकटा आहे, तरी काही काही कामं करावीच लागतात. बऱ्याचदा विसरतोच मी. वैतागून आई करून टाकते. मग बाबाचं ऐकावं लागतं तिला. "सवय कशी लागणार त्याला कामांची?" मग आई तिच्या ऑफिसमधल्या कितीतरी पुरुषांची उदाहरणं देते. एक दोघांकडे तर पुरुषच स्वयंपाक करतात आणि त्यांच्या बायका थोडीफार मदत. मग आईचं सुरू होतं. "घरातल्या प्रत्येकाला काम करायची सवय हवीच.."

"ग्रोनअप्स्! सोडा पाजल्यासारखे उपदेशाचे घोट पाजतात. गप्पा मारायला बस म्हणून मागे लागतात आणि गप्पांच्या जागी उपदेश कधी सुरू करतात ते त्यांनाही समजत नाही इतका रक्तात भिनलाय उपदेश त्यांच्या. सगळी मजाच जाते मग गप्पांची."

"ए, तू पण काम करायला शिक हं. नवऱ्याचं काही खरं नाही, नाही तर तुझ्या."

"ई! त्यात काय आहे. नवराच कुक असेल आमच्या घरात."

"बेस्ट लक मग तुला त्यासाठी. उपाशी राहायची तयारी ठेव आतापासून."

"हॉटेल्स्! हॉटेल्स कशासाठी असतात मग?"

"जाऊ दे ते. नंतरचं नंतर बघता येईल. मला इथली मुलं करतात तशी कामं करायची आहेत. बघू बाबा परवानगी देतील असं वाटतंय."

"ओ.के. चल मग. नंतर बोलू. लव्ह यू."

"लव्ह यू." लॅपटॉप बंद करत त्याने पुस्तक डोळ्यासमोर धरलं. "अ फेअरवेल टू आम्र्स्" पुस्तकाने त्याला वेडच लावलं होतं.

त्याचं काय चाललं आहे हे बघायला आई हळूच डोकावली. तो पुस्तक वाचनात गुंग आहे म्हटल्यावर तिने तिथेच त्याच्या टेबलावर बसत वहीचं पान ओढलं. शुभम बरोबरचं संभाषण नाही तरी डोक्यात घोळत होतच.

************

प्रिय शुभम,

आज भांडणाचाच मूड होता तुझा. आम्ही म्हणजे तमाम देसी, मुलांना नोकऱ्या करायला देत नाही त्याचं एकच कारण रे, तुमचा अभ्यास. असं वाटतं की करू शकतो आम्ही तुमचं शिक्षण तर कशाला तोशिस करायला लावायची. इथली जीवनशैली वेगळी आहे. उपभोगतेला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे अमेरिकन पालकांचं बचत खातं तसं रिकामंच असतं. मुलांना पुढच्या शिक्षणासाठी नोकरीशिवाय पर्यायच नसतो. कितीतरी लोकबरीच र्वष नोकऱ्या करतात, कॉलेजसाठी पैसा जमवितात आणि तिशीनंतर कॉलेज करून पस्तिशीच्या दरम्यान स्थिरावतात. दहावी-बारावीपर्यंत शिक्षण मोफत होतं पण त्यानंतर इथल्या मुलांचं शाळा सोडण्याचं, महागडं कॉलेज शिक्षण, हेच तर मुख्य कारण असतं ना? पण पुढे शिकण्याची जिद्द ज्यांच्याकडे आहे ते त्यासाठी किती प्रयत्न करतात ते तर आपण पाहतोच. मला मान्य आहे की, जॉनीचे बाबा त्याचं शिक्षण करणार आहेत आणि तरी तो लहान सहान कामं करून पैसे मिळवायची धडपड करतो. तुला तसं करावसं वाटतं याचं कौतुकही वाटतं. फक्त घरातली कामं ही वाटूनच घ्यायला हवीत. त्यासाठी पैसे द्या. हे म्हणणं चुकीचं नाही का वाटलं तुला? पण ठीक आहे, सौदा गोड पदार्थावरच मिटला. माझी आई बरेच वेगवेगळे पदार्थ घरी करायची, आवडीचं सतत मिळायचं खायला. आताच्या माझ्यासारख्या आया नाही करत मुद्दाम हा खटाटोप हेही खरं. त्याची कारणंही आहेत पण त्याचं नको स्पष्टीकरण या क्षणाला. या निमित्ताने माझं पाककौशल्य क्वचित दिसण्याऐवजी रोज रोज दिसेल म्हणा. त्यासाठी अर्थात तुलापण कामं वेळेवर करायला शिकावं लागेल हे विसरू नकोस.

तुझी आई

____________________________
ओ.. ड्यूड! ही लोकसत्तेत प्रसिद्ध झालेली लेखमालिका म्हणजे भारतीय पालकांच्या अमेरिकन असलेल्या तरुण मनांच्या स्पंदनाचा आलेख आणि आईने मुलाला पत्र लिहून तिला काय वाटतं हे व्यक्त करण्याचा केलेला प्रयत्न. यातून ओळख होईल ती तिथल्या हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांच्या जीवनशैलीची समस्यांची प्रगतीची, शाळांमार्फत नवीन नवीन राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची.
___________________________________