ओ.. ड्यूड! - भाग ५

नेहाचं गादीखाली लपवलेलं पत्र शुभमने हळूच काढलं. इन मिन चार- पाच पत्रं गेल्या वर्षभरात. कधी चुकून भेटायला मिळालं की एकमेकांना दिलेली. पत्रातलं अक्षर न अक्षर पाठ झालं होतं, पण पुन्हा पुन्हा वाचावसं वाटायचं. ती लिहीते ते वाचून वाटतं की जगात माझ्याएवढं हुशार, देखणं कुणी नाहीच. मी बोलतो ते ऐकत राहावंसं वाटतं तिला. माझ्यासारखे गुण तिच्यात असावेत असं वाटतं नेहाला. नाही तर घरी, किती बोलतोस,.. असं कसं बोलतोस.. असं कसं वागतोस.. माझं चुकीचंच असतं सर्व. त्यामुळेच नेहाच्या पत्राची पारायणं करणं किती छान वाटतं. पुन्हा पुन्हा त्याने ते पत्र वाचून काढलं. तेवढय़ात फोन वाजला. एकदम तरतरीच आली त्याला. "कशी गेली सुट्टी? " नेहा तीन आठवडे भारतात जाऊन परत आली होती. दोघांनाही एकमेकांना किती तरी सांगायचं होतं.

"मजा आली. जाताना हॉलंडला थांबलो होतो. "

"किती देश झाले बघून तुमचे? " शुभमच्या आवाजातला हेवा लपत नव्हता. नेहालाही त्याला चिडवायला आवडत होतं. बराच वेळ ती तीन आठवडय़ातल्या गमतीजमती सांगत राहिली. शुभम वैतागला.

"तू मला काही विचारतच नाहीस. आठवतंय तुला, तू त्या परागबद्दल सांगितलं होतंस? तसाच आणखी एक देशी मुलगा असाच उद्योग करत होता. तो सापडला कुणाला तरी ड्रग विकताना. "

"गॉश शाळेत झालं हे? " नेहाला इतक्या उघडपणे तो मुलगा पकडला गेला त्याचं आश्चर्यच वाटलं.

"कॅफेटेरियात शाळेच्या. एक वर्ष शाळेतून काढून टाकलंय त्याला. ही गोष्ट कायम त्याला अडचणीत आणणारी ठरणार. आता कुठल्याही शाळेत दाखला घेताना किंवा नोकरीच्या वेळेस हा कायमचा ठपका. "

"बाप रे, वर्ष गेलं त्याचं. " ती हळहळली.

"कदाचित भारतात जावं लागेल शाळेसाठी. इथे सहजासहजी नाही घेणार परत. घरी बाबांनी बदडून काढलं असेल एव्हांना. " शुभमच्या अंगावर एकदम काटा आला. कधीतरी तो खोटं बोलला म्हणून खाल्लेला मार परत अनुभवल्यासारखा. त्यावेळेस बाबा म्हणजे दुष्टपणाचा कळसच वाटला होता, पण त्यानंतर खोटं बोलायचं धाडस त्याला कधीच झालं नव्हतं. आणि खरं बोललं तर आपण ते का केलं हे आई-बाबा दोघंही समजून घेतात हे त्याच्या लक्षात आलं होतं, पण आपण ड्रग्ज घेऊन बघायचं ठरवलं तर सांगू आई-बाबांना? काय करतील ते? त्याचाच विचार जाणल्यासारखी नेहा म्हणाली.

"हं. नशीब आपण काही करत नाही असलं. "

"तुमचं मुलींचं काही तरी वेगळंच असतं. म्हणजे बॉयफ्रेंड असायलाच हवा, बारीकच राहायचं. मॅरोवानापण घेतात मुली असं ऐकलंय. "

"बराच अभ्यास केलायस, मुली काय काय करतात त्याचा, या सुट्टीत. "

"तू नाही ना करत? "

"कमॉन शुभम. ए, पण माझी एक मैत्रीण आहे. आय अॅम वरीड अबाऊट हर. "

"कोण मैत्रीण? आणि काय झालं? "

"पॅम. खातच नाही काही. अठरा वर्षांची आहे. हॉस्पिटलमध्ये हलवलंय तिला. "

"बारीक राहायचं म्हणून? "

"हो, शेजारीच राहतात आमच्या. आई, म्हणतेय की फार उशिरा, बुलीमियाचं निदान झालं. तिला जबरदस्ती नळीतून खायला देत होते तर ती रात्री नळी काढून टाकायची.   वजन व्यवस्थित वाढताना दिसत होतं. आता कळलंय की वजन करताना ती कपडय़ांच्या आत कपडे, छोटी उशी अशा गोष्टी खोचून ठेवायची वजन जास्त दिसावं म्हणून. "

"मग आता? "

"जास्त दिवस जगणार नाही म्हणतात. आय फिल लाइक क्राइंग. " नेहा फोनवर एकदम मुसमुसायला लागली तसं त्याला काय करावं ते समजेना. तो तसाच फोन कानाला लावून राहिला. थोडय़ा वेळाने नेहा शांत झाली.

"चल, मी नंतर बोलते तुझ्याशी. "

"ठीक आहे पण वेलकम बॅक नेहा. "

"इटस् नाइस टू बी बॅक. "

दोघांनी फोन ठेवला. त्याच्याही शरीरात अस्वस्थपणाची लहर पसरली. तितक्यात आईने जेवायला बोलावलं. जेवताना तसं त्याचं लक्ष नव्हतं. दोन्ही गोष्टी त्याने आई-बाबांना सांगितल्या. दोघंही समजुतीचं काही तरी बोलत राहिले. दोघांच्याही मनात असलं काही तरी आपल्या नशिबात लिहिलेलं नाही याचं समाधान आणि आशा तेवत राहिली. शुभम झोपायला गेला खरा पण आजच शाळेत पार पडलेला डेनवरमधला कोलंबाईन हायस्कूलचा स्मृतिदिन त्याला आठवत राहिला. दहा वर्षांपूर्वी दोन मुलांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात बारा मुलं बळी पडली. त्या दोघा मुलांनी स्वत:लाही संपवलं. सुदैवाने कॅफेटेरियात ठेवलेला बॉम्ब फुटला नाही आणि पुढची भीषण दुर्घटना टळली होती. दहा वर्ष झाली या गोष्टीला? त्याला तसं फार आठवत नव्हतं. जेमतेम सहा वर्षांचा होता तो. पण आईकडून ऐकलं होतं त्याने, त्यात आज टीव्हीवरची बातमी बघून त्याला वाटत होतं की, आपणही अशा गोष्टी घडू नयेत म्हणून काही तरी करायला हवं. काय करायचं पण? त्या शाळेतही पाच मुलं जी त्या गोळीबाराची साक्षीदार होती. ती पाच मुलं त्याच शाळेत शिक्षक म्हणून काम करत होती. त्यांच्या आजच पाहिलेल्या मुलाखती त्याला खूप आवडल्या होत्या. प्रत्येकाचं एकच म्हणणं होतं.

"आमच्या बाजूला मुलांवर गोळ्या झाडलेल्या होत्या. आमच्याच शाळेतली मुलं. मारणारी आणि मृत्यू पावलेलीही. सोळा वर्षांचे असताना आम्ही बंदुका, गोळीबार हा विचार नव्हता केलेला. शाळा म्हणजे मजा करायची. खेळायचं, अभ्यास करायचा, पण हे घडलं आणि कधी तरी ठरवलं गेलं की आपण शिक्षक व्हायचं. आमच्या शिक्षकांनी आम्हाला वाचविण्यासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा केली नाही. आपल्यालाही हे जमायला हवं. त्यांच्यासारखं शिक्षक व्हायचं. मुलांना माणुसकी शिकवायचा प्रयत्न करायचा. " त्या पाच शिक्षकांमधली मॅडी अश्रू पुसत म्हणाली, ते त्याला आठवलं.

"मी खोटं नाही बोलणार. शिक्षक झाल्यावर मध्ये एकदा बॉम्बस्फोटाची अफवा पसरली तेव्हा वाटलं पुन्हा सोळा वर्षांचं व्हावं आणि कुणी तरी आपल्या संरक्षणासाठी धावावं. पण ती भूमिका आता आम्हाला करायला हवी. शाळेत कोण धावणार? शिक्षकच ना? तेच आम्ही करतोय इथे. ही आमची शाळा आहे. "

कोलंबाईनच्या या दुर्घटनेने कुणी कसा धडा नाही शिकत? नाही तर आज दहा वर्षांनी या प्रकारांना आळा नको होता बसायला? त्यानंतरही कितीतरी घटना घडल्याच अशा. हल्लीच नाही का व्हर्जिनियामध्ये एका कॉलेजमधल्या मुलाच्या गोळीबाराने बत्तीस मुलांना प्राणाला मुकावं लागलं. हल्लीच? शुभमने स्वत:लाच प्रश्न केला. त्यालाही दोन र्वष उलटली होती, पण झोपता झोपता तो स्वत:लाच तपासत होता, असं असूनही आपल्याला का नाही वाटत इथल्या शाळांमध्ये भीती? एकदा मुलांनी हातबॉम्ब फोडला शाळेत. ड्रग्जच्या विळख्यात माहितीतली मुलं अडकतायत.

हल्लीच एका मुलाने तो "गे" असल्याचं पूर्ण शाळेत सांगून टाकलं आहे. सीनियर्सकडून होणारा छळ तर सर्वज्ञात. एकदा काही तरी चेष्टा केली म्हणून सीनियरने नाकावर मारलेला गुद्दा. त्याने नकळत नाक चिमटीत पकडून चोळलं. बाबांना त्याने खरं काय ते सांगितलं, पण आईला मात्र खेळताना पडलो हे पुढे केलं. तिने उगाचच जास्तच काळजी नको करायला म्हणून. नेहाची मैत्रीण बारीक राहायच्या ध्यासाने मृत्यूच्या दाढेत सापडली आहे. अभ्यास करायचा कंटाळा येतो म्हणून कितीतरी ओळखीच्या मुलांनी हायस्कूलनंतर पुढे शिकायचं नाही हे पक्क केलं आहे, पण आपण मात्र याची भीती नाही बाळगायची का? या सगळ्याला पुरून उरणाऱ्या चांगल्या गोष्टीही असंख्य आहेत म्हणून? वेगवेगळ्या स्पर्धा जिंकत पुढच्या योजना करणारे मित्र आहेत. नेहासारखी त्याने सगळीकडे बक्षिसं मिळवावीत म्हणून मदत करणारी, दोघांनी एकाच कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा तर जीव तोडून अभ्यास करायला हवा हे बजावणारी मैत्रीण आहे. भाषेचा अभ्यास झेपत नाही. तो विषय समजत नाही म्हणून सीनियर असलेला मित्राचा मित्र विषय समजावून द्यायला तयार आहे, म्हणून? म्हणून इतर बाबींचा बागुलबुवा वाटत नाही?

त्याचं त्यालाही ठरवता येईना तेव्हा त्याने तो नाद सोडून दिला. नाही तरी आज सगळं तसं गंभीर-गंभीरच घडलं होतं. घटना आणि विचार. थकवाच आला एकदम त्याला. नेहाच्या त्या मैत्रिणीचं आयुष्य अचानक संपू नये, अशी मनोमन प्रार्थना करत त्याने डोळे मिटले.


ओ.. ड्यूड! ही लोकसत्तेत प्रसिद्ध झालेली लेखमालिका म्हणजे भारतीय पालकांच्या अमेरिकन असलेल्या तरुण मनांच्या स्पंदनाचा आलेख आणि आईने मुलाला पत्र लिहून तिला काय वाटतं हे व्यक्त करण्याचा केलेला प्रयत्न. यातून ओळख होईल ती तिथल्या हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांच्या जीवनशैलीची समस्यांची प्रगतीची, शाळांमार्फत नवीन नवीन राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची.