रेल्वे स्टेशन

नायक आणि नायिका यांची भेट. कधी अपघाताने, कधी गैरसमजातून, तरी कधी आणखी कशीतरी. कधी त्यांच्यातली किंचित भांडणे, वाद आणि मग त्यातूनच हळूहळू फुलत जाणारे प्रेम. या सगळ्यात कधी मध्ये असलेला सूक्ष्म खलनायक, तर कधी काळ आणि परिस्थिती यांनीच ओढलेल्या रेघा. समजूतदार नायक आणि हतबल नायिका यांनी परिस्थितीचा केलेला स्वीकार आणि शेवटी आगगाडीतून निघून जाणारे त्यांच्यापैकी कुणीतरी. शेवटच्या भेटीसाठी धावतपळत स्टेशनवर आलेले कुणीतरी आणि निघून जाणारी पाठमोरी आगगाडी.

हिंदी चित्रपटांचा एके काळी हा लाडका प्लॉट होता. अर्थात भारतीय प्रेक्षकाला 'आणि मग राजा आणि राणी सुखाने नांदू लागली' असा शेवट हवा असतो, त्यामुळे निघून गेलेल्या गाडीपलीकडे उभा असलेला नायक (मग त्याच्याकडे पाहून नायिकेच्या चेहऱ्यावर हास्य फुलणे) , किंवा गाडी निघून गेल्यानंतरही स्टेशनवर एका बाकड्यावर विमनस्कपणे बसलेली नायिका (नायकाने येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवणे, तिने वर बघणे आणि तिच्या चेहऱ्यावर...इत्यादी इत्यादी ) , किंवा नायिकेला स्टेशनवर बघून नायकाने चालत्या गाडीतून उडी मारून परत येणे - बहुदा असा सुखांत त्याच्या पदरात पडतो. 'तीसरी कसम' सारखा एखादा अपवाद सोडला तर रेल्वे स्टेशन हे बहुदा नायक आणि नायिकेच्या मीलनाचे साक्षीदार बनून राहिले आहे. 'तीसरी कसम' ची बातच न्यारी पण त्यावर दुवा क्र. १ लिहून झाले आहे.

'बंदिनी' चे आणखी एक उदाहरण. शामळू नायकाच्या प्रतिमेतून बाहेर पडलेला अशोककुमार आणि नैसर्गिक अभिनयाची उपजत जाण असलेली नूतन यांनी हा प्रसंग सुरेख फुलवला आहे. 'मेरे साजन है उस पार' ला तर जगात तोड नाही. कृष्णधवल चित्रीकरणाचे स्वतःचे एक बलस्थान आहे. जुने कोळशाचे इंजीन, वाफेचे आणि धुराचे भपकारे, रात्र याला कृष्णधवल चित्रीकरणाने एक वेगळी 'डायमेन्शन' - मिती येते. 'प्यासा', 'जागते रहो', 'देवदास' अशी या संदर्भात आठवणारी काही उदाहरणे. बंदिनीमधला हा अंधाऱ्या जागेत चित्रीत केलेला प्रसंग आणि त्याला साक्षीदार ते रेल्वे स्टेशन ही एक सुंदर आठवण आहे. आता बिमलदा नाहीत, दादामुनी नाहीत, शैलेंद्र नाही, सचिनदा नाहीत आणि नूतनही नाही. त्यामुळे जराशी हळवी वाटणारी ही आठवण.

'परिचय' हे पुढचे उदाहरण. 'साउंड ऑफ म्युझिक' पासून प्रेरणा वगैरे सोडून द्या. रमाचे रवीवरचे प्रेम अगदी शेवटच्या क्षणी कळाल्यानंतर तिला घेऊन रवीला शोधण्यासाठी स्टेशनवर धावपळ करणारे रायसाहब. (प्राणचा माझ्या मते सर्वोत्कृष्ट परफॉरमन्स. अगदी जवळचा स्पर्धक म्हणजे 'बॉबी'. 'पूरब और पश्चिम' ला कांस्यपदक. अर्थात ही वैयक्तिक मते.) . रवीला सोडायला आलेले किंचित बहिरे रवीचे मामा. एकही शब्द न बोलता केवळ डोळ्यांतून तगमग दाखवणारी रमा - जया भादुरी आणि अगदी शेवटच्या क्षणी चालत्या गाडीतून उडी मारणारा रवी जीतेंद्र. तो गुलजारच्या सिनेमातला साधासुधा नायक असल्याने तो गाडीतून उडी मारल्यावर थेट गाणे सुरू न करता लंगडून पडतो. मग त्याला आधार देऊन उठवणारी रमा. आणि केवळ गुलजारच लिहू शकेल असा रायसाहेबांनी मामा हंगलजींना म्हटलेला "पंडीतजी, बुजुर्गी इसी में है के हम लोग अब यहां से चले" हा संवाद.

'परिचय' चे हेच वैशिष्ट्य आहे. त्या काळात उत्तमोत्तम हिंदी चित्रपट आले, पण 'परिचय' ची एक खास जागा आहे. त्यातल्या बाल कलाकारांकडून करवून घेतलेला सहजसुंदर अभिनय ( हे मला वाटते, संपूर्णपणे दिग्दर्शकाचे कौशल्य आहे. 'मासूम' हे आणखी एक उदाहरण), 'नारायण' सारख्या साध्या घरगड्याच्या पात्राला असरानीने दिलेली उंची, संजीवकुमारने (आणि विनोद खन्नाने) छोट्याशा भूमिकेत पाडलेली खोल छाप, ए. के. हंगल आणि लीला मिश्रासारखे आपल्याला असावेत असे वाटणारे मामा-मामी , (लीला मिश्राला तर तोडच नाही. पदर सावरण्यासारख्या साध्या गोष्टीतून ती अभिनेत्री दुर्गाबाईंसारखे एक खानदानी वातावरण पडद्यावर तयार करते. शिवाय हाताशी गुलजारचे संवाद आहेत. जागेवर जेवणाचे ताट मागणाऱ्या नवऱ्याला 'अंग्रेज चले गये, इन्हें छोड गये' हा तिचा फणकारा कुठल्याही पन्नास-साठ वर्षे एकत्र नांदलेल्या जोडप्याची आठवण करून देतो! ) गाण्यांचा अप्रतिम वापर (मुसाफिर हूं यारो, सारे के सारे आणि अविस्मरणीय बीती ना बितायी रैना), सुरेख संगीत (रवीने नीलेशच्या खोलीत बसून वाजवलेला सतारीचा सुंदर तुकडा आठवा! ) आणि जया भादुरी व प्राण. या सुगरणीच्या ताटात अंमळ मीठ कमी पडलेला जीतेंद्र सहज चालून जातो. चालत्या गाडीतून उडी मारल्याने पाय दुखावलेला जीतेंद्र जया भादुरीच्या आधाराने विव्हळत पण हसतहसत रेल्वे स्टेशनच्या बाहेर पदतो आणि त्या फ्रेमवर फ्रीझ होऊन हा सिनेमा संपतो.

अगदी असेच 'चितचोर' मध्येही घडते. इथे बाकी नायक अमोल पालेकर आणि नायिका झरीना वहाब यांच्यामध्ये आलेला विजयेंद्र घाटगे नावाचा एक सुगंधित खोडरबराचा तुकडा आहे. बाकी हंगलबाबू आणि मास्टर राजू इथेही आहेतच, आणि तितक्याच झोकात आहेत. लीला मिश्राच्या जागेवर तिची नवी आवृत्ती दीना पाठक आहे - तितकीच दिलखुलास आणि नैसर्गिक. मराठीत जशी सुलोचना, रत्नमाला, शांता तांबे अशा गुणी अभिनेत्रींची मालिका आहे, तशा हिंदीतल्या दुर्गा खोटे, दुलारी (एखाद्या प्रसंगातही जिंकून जाणारी - उदा. 'दीवार'. तेथे तर समोर शशीकपूरसारखे युकॅलिप्टसचे झाड आहे. 'इतनी बडी शिक्षा एक टीचरके घरसेही मिल सकती है'.बाजूला हंगल नावाचे लिंबाचे लोणचे आहेच! 'भई मै म्युनिसिपल टीचर था, पिछले साल रिटायर हुवा हूं, अब कुछ ट्यूशन व्यूशन कर लेता हूं', दुलारीचे दुसरे उदाहरण 'जॉनी मेरा नाम' मधले), सुलोचना, लीला मिश्रा आणि दीना पाठक या अभिनेत्री. मला वाटते, या अभिनेत्र्यांना दिग्दर्शकाने 'या सीनला तुम्ही अमुक असे करा' असे काही सांगावे लागत नसावे. त्यांची नैसर्गिक शैलीच इतकी लोभस आहे, की दिग्दर्शकाला फक्त त्यांना प्रसंगाची सिच्युएशन काय आहे, इतकेच सांगावे लागत असावे.

संपूर्ण चित्रपटात नायकाने नायिकेला स्पर्शही न करणे (चूभूदेघे) , संपूर्ण चित्रपटभर नायिका अंगभर साडीत आणि नायक चक्क बुशकोट-पँटमध्ये- तोही शर्ट पँटमध्ये न खोचता बाहेर सोडलेला, आणि नायक हा चक्क बावळट वाटणारा (अमोल पालेकरने आपण ओव्हरऍक्टिंगही करू शकतो हे इथे दाखवून दिले आहे) असली सगळी वजाबाकी घेऊनही 'चितचोर' हा सदा तरुण, ताजा चित्रपट आहे. राजश्री प्रॉडक्शनचे पुढे 'हम साथ साथ है' सारखे देवानंदी भजे झाले ते सोडून द्या, पण 'चितचोर' आजही सदासुहागन आहे. 'चितचोर' मधली गाणी आणि त्या गाण्यांचे चित्रीकरण हे एक आनंदाचे सुगंधी बेट आहे.पण त्यांविषयी काही लिहू नये. या 'चितचोर' मध्ये रेल्वे स्टेशन येते ते कपाळावर एखादी आठी उमटवण्यापुरते. हताश नायिका नायकाला शोधायला स्टेशनवर जाते तेही तिच्या साताठ वर्षांच्या छोट्या दोस्ताला बरोबर घेऊन. इथे दिग्दर्शकाच्या निरिक्षणाला एक सलाम केला पाहिजे. मानसिक खळबळ उडालेल्या या तरुणीला आधार वाटतो तो तिच्या लहान मित्राचा. हा छोटा मुलगा तिला मदत काय करणार? पण 'एक रुका हुवा फैसला' मधील अनू कपूरच्या शब्दांत म्हणायचे तर 'औरतोंकी फितरतही कुछ और होती है' त्या वेळी तिला हा लहान आधारही महत्त्वाचा वाटतो. स्त्रीमनाचे इतके अचूक वाचन करणाऱ्या दिग्दर्शकाचे कौतुक आहे. हताश नायिका स्टेशनवरून घरी येते तेंव्हा तिचा चितचोर तिची वाट बघत असतो. इथे चित्रपट संपतो.

हृषीदांच्या 'खूबसूरत' मध्ये उलटे घडते. निघून जाणारी नायिका आणि तिला स्टेशनवर शोधायला आलेला नायक आणि त्याची आई. दीनाजी आणि अशोककुमार हे 'खूबसूरत' चे आधारस्तंभ. अशोककुमार हे तर 'खूबसूरत' चे 'युनिक सेलिंग प्रपोझिशन' आहे. डायनिंग टेबलवर काफिया जुळवताना बायकोची चाहूल लागून चूप होणारा हा बुजुर्ग 'पिया बावरी' मध्ये सुनेच्या नृत्याला 'धा तिकता, ता धिक ता' असा सुरेल ठेकाही धरतो. या सगळ्या चित्रपटांचे आणखी एक वैशिष्ट्य पहा, यात दुय्यम भूमिका करणारे कलाकारही आपापले सीन खाऊन जातात. उदाहरणार्थ 'खूबसूरत' मधले डेव्हिड आणि केस्टो मुखर्जी. तसेच रेखाच्या बहिणीच्या लग्नात मध्यस्थी करणारा दादामुनींचा मित्र आणि राकेश रोशनच्या लग्नासाठी मध्यस्थी करणारा त्याचा मित्र. हे एकदोन प्रसंगाचे धनी, पण ते प्रसंग आणि हे अभिनेते लक्षात राहातात. मग 'खूबसूरत' मध्ये रेखा ही राकेश रोशनची मोठी बहीण वाटते आणि राकेश रोशन हा स्वतःचाच मादाम तूसाँ म्यूझियममधला पुतळा वाटतो, या गोष्टी खटकत नाहीत. रेल्वे स्टेशनवरील शेवटच्या प्रसंगाबरोबर 'खूबसूरत' मधली अशोककुमार - दीना पाठक यांची अदाकारी लक्षात राहाते आणि 'संगीत में तो ये कमाल है, और नृत्यमें तो... कमाल अमरोही' असे गंमतीदार संवाद लक्षात राहातात.

असे हे रेल्वे स्टेशनवरचे हिंदी चित्रपटांचे शेवट. 'अंगूर' चा गमतीदार शेवटही रेल्वे स्टेशनवर होतो. 'इजाजत' हा तर सगळा सिनेमाच रेल्वे स्टेशनवर घडतो. पण वेगवेगळ्या चित्रपटांत, वेगवेगळ्या प्रसंगांत सुखदुःखाचे साक्षीदार बनून राहाते एक साधेसे रेल्वे स्टेशन.