शिंगरू मेलं हेलपाट्यानं!

मी शाळेत जात होते तेव्हा सर्व आयांप्रमाणे माझ्या आईने पण माझ्यामागे सायकल शिकून घे असा लकडा लावला आणि मी सायकल शिकले. सायकल शिकले म्हणजे सायकल हे यंत्र चालवायला शिकले! आमचे गाव खूपच लहान. शाळा तर पंधरा मिनिटांच्या रस्त्यावर. गावातले जास्तीत जास्त लांब अंतरही चालत जाण्याच्या आवाक्यातले. त्यामुळे सायकल शिकले तरी ती चालण्याचा सराव काहीच झाला नाही. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी पुण्याला आले. पुण्यातले घर तर महाविद्यालयापासून पाच मिनिटांच्या अंतरावर. त्यामुळे पुण्यातही कधी सायकल चालवण्याची जरूर पडली नाही. त्यानंतर नोकरीसाठी मुंबईला आले. मुंबईत बस, लोकल ही वाहतुकीची साधने इतकी छान आणि सोयीची आहेत (निदान तेव्हा तरी होती) की तिथेही सायकल चालवण्याची वेळ आली नाही.

इथपर्यंत सर्व कसे छान, छान चालले होते पण माझे लग्न ठरले आणि हे सुख संपले! होणाऱ्या नवरोबांनी विचारले, "सायकल चालवता येते नं? कारण भुबनेश्वरात सार्वजनिक वाहतूकसेवा नाही. तेव्हा तुला मोपेड, स्कूटर असं काही वापरावं लागेल. " मी म्हटलं, "हो, सायकल येते, स्कूटर शिकीन. " लग्न झाले. मला हवी तशी नोकरी भुबनेश्वरात लगेच न मिळाल्याने काही वर्षे मी मुंबईतच राहिले आणि मुंबईतले वाहनसौख्य अनुभवले! त्यानंतर मला भुबनेश्वरात नोकरी मिळाली. पतिराजांनी मोपेड घेऊन दिली. कॉलनीच्या आवारात, नंतर बाहेर रस्त्यावर मोपेड चालवण्याचा सराव केला. ह्या वेळेपर्यंत माझी पस्तिशी उलटली होती,   रिफ्लेक्सेस मंदावायला सुरुवात झाली होती. शाळेत असताना सायकलवर बसले होते, त्यानंतर आता इतक्या वर्षांनी. त्यामुळे  एकूण ’प्रकर्ण’ आपल्याला झेपण्यातले नाही हे लक्षात आले.   पण हिय्या करून मोपेडवरून ऑफिसला जायला लागले. रस्त्यात कोणी शाळकरी मुले समोर आली की माझ्या मनात विचार सुरू. माझी मुले पण असाच रस्ता ओलांडत असतील. त्यांना काही होणार तर नाही नं? शिवाय कधी कधी मी समोरून आडव्या येणाऱ्या वाहनाला जाऊ देण्यासाठी जरा जास्तच वेळ थांबायचे तर कधी अगदी अल्पावधीत पुढे जायचे आणि आजूबाजूचे लोक ही बाई वाचली कशी याचे आश्चर्य करायचे! असे एकदोनदा झाल्यावर माझ्या लक्षात आले की मला ते जजमेंट का काय म्हणतात ते अजिबात नाही. म्हणजे देव तो गुण वाटत होता तेव्हा मी तिथे हजर नव्हते. तरी काही महिने अशीच ’रामभरोसे’ मोपेड चालवत राहिले आणि जे लवकरच केव्हातरी घडणार होते ते घडले! एक दिवस ऑफिसच्या समोरच उजवीकडे वळत असताना काय होतंय ते कळायच्या आत एका स्कूटरशी माझी टक्कर झाली. स्कूटरवरच्या माणसाची पॅंट थोडी फाटली आणि त्याला जरासे खरचटले. माझ्या अंगावर साधा ओरखडा सुद्धा उठला नाही. पण मला तेवढे निमित्त पुरले आणि ओढून ताणून आणलेला आत्मविश्वास ’पक्व फळापरी गळला हो! ’ तेव्हापासून दुचाकीवर बसवलेले रडतराऊत पाय-उतार झाले ते कायमचेच!    

मग एकमेव पर्याय होता तो सायकलरिक्षाचा. त्यासाठी एक रिक्षावाला ठरवला. तो रोज ऑफिसच्या वेळेला घरी यायचा, पुन्हा संध्याकाळी ऑफिसमधून घरी आणून सोडायचा.   लोकांना मी सांगायचे माझी ’शोफर ड्रिवन कार आहे. फक्त ती जरा हळू चालते इतकंच. ’ लोकही ते खेळीमेळीने घ्यायचे. कधीकधी माझी रिक्षा येऊन दारात थांबली असेल तर मला सांगायचे, ’तुमची मर्सिडिज येऊन थांबलीय! ’ रिक्षावाल्याचे खाडे, पैशाच्या मागण्या हे मधूनमधून चालायचे पण एकंदरीत पाहता ही व्यवस्था बरी चालली होती. त्या वीस पंचवीस मिनिटांच्या वेळात मला ’भीडके बीच’ छान ’अकेलापन’ मिळायचे. कुठे व्याख्यान वगैरे द्यायचे असेल तर त्याची तयारी/उजळणी करायला हा विनाव्यत्यय वेळ फारच उपयोगी पडायचा.  

मात्र एरवी कुठे बाहेर जाताना पतिराजांवर अवलंबून राहायला लागायचे. आता स्कूटरवर त्यांच्यामागे बसून मी निमूटपणे जिथे जायचे तिथे जावे की नाही? पण तसे होत नसे कारण माझा स्वभाव! ते जरा विस्तारानेच सांगते. आमचे इथे महाराष्ट्र मंडळ आहे. मधल्या काळात एक बॅकेत नोकरी करणारे व्यावसायिक नट आणि हौशी गृहस्थ बदली होऊन आले होते. ते आम्हाला सगळ्यांना घेऊन नाटके नाही तरी नाट्यप्रवेश वगैरे बसवायचे. त्यांचा उत्साह इतका दांडगा की आम्हालाही त्याची लागण व्हायची. मग मंडळाच्या कार्यक्रमात कधी कधी कलाकारांची संख्या प्रेक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त होत असे! सगळेच नोकरी करणारे त्यामुळे तालमी सर्वांच्या कचेऱ्या सुटल्यावर संध्याकाळी होत असत. त्या तालमींना स्कूटरवरून जाताना मात्र माझा जीव वरखाली होत असे. एक तर महामार्गावरून बरेच अंतर जावे लागे. महामार्ग तेव्हा फारसा रूंदही नव्हता आणि संध्याकाळच्या वेळी ट्रकांची वाहतूक जरा जास्तच असायची. सामानाने भरलेले ट्रक मागे-पुढे असायचे. कधीकधी एखादा ट्रक एवढा भरलेला असायचा की मला शाळेतल्या विज्ञानाच्या पुस्तकातील गुरुत्वमध्याच्या प्रकरणातील ते चित्र आठवायचे. खूप भरलेला ट्रक आणि त्याच्या गुरुत्वमध्यातून जाणारी जमिनीला लंबरूप रेषा पायाच्या बाहेर जात आहे असे ते चित्र असे. समोरच्या ट्रकाची तीच अवस्था झाली तर आपले काय अशी भीती मला वाटत असे. हे तालमी संपेपर्यंत चालूच असे! असो.

काही वर्षांनी पतिराजांनी चारचाकी गाडी घेतली आणि आम्ही गाडीवरून नव्हे तर गाडीतून ये-जा करायला लागलो. गाडीसंबंधातला हा फंडा मला पुण्यात कळला. दुचाकी आणि चारचाकी- दोन्हीला गाडीच म्हणायचे पण ’गाडीवरून’ म्हटले की दुचाकीवरून आणि ’गाडीतून’ म्हटले की चारचाकीतून असा अर्थ घ्यायचा. असो. थोडे विषयांतर झाले. तर आम्ही गाडीतून ये-जा करायला लागलो. आता ट्रकांची भीती वाटेनाशी झाली. एकूणच ’यातायात’ कमी त्रासदायक झाली असे वाटले. पण नाही!   मूळ स्वभावाला औषध नाही. भुबनेश्वरच्या वाहतुकीला शिस्त कशी ती नाही. काही रस्ते सोडले तर वाहने समोरून, डावीकडून, उजवीकडून- कुठूनही येतात. शिवाय अपघात झाल्यावर जे काही होते त्यातला पहिला अंगुष्ठनियम म्हणजे चूक कोणाचीही असली तरी मोठ्या वाहनाच्या चालकाला बडवणे -शाब्दिक किंवा कधी कधी प्रत्यक्ष! आमच्या सुदैवाने अजूनपर्यंत आमच्या बाबतीत असे काही झाले नाही पण माझ्या मनात सारखी धाकधूक असते. शिवाय समोरून येणाऱ्या वाहनाच्या दिव्यांचा प्रखर प्रकाश डोळ्यावर आला की मलाच धडधडायला होते. एकदा असेच आम्ही कुठे तरी चाललो होतो. वाटेत कोणत्यातरी पूजेच्या निमित्ताने एका देवळावर लुकलुकणाऱ्या, उघडझाप करणाऱ्या दिव्यांची रोषणाई केलेली होती. पतिराज म्हणाले, प्रखर दिव्यांपेक्षा ह्याचा त्रास जास्त होतो. झाले! माझी धडधड वाढवायला आणखी एक कारण मिळाले.

मध्यंतरी एकदा मोठा सप्ताहान्त आला होता. तेव्हा आम्ही सातकोशिया नावाच्या एका जागी जायचे ठरवले. सातकोशिया हे नदीचे नाव आहे. नदीकाठी मोठे वाळवंट आणि वाळवंटाच्या दुसऱ्या बाजूला जंगल अशी अगदी निसर्गरम्य जागा आहे. ओरिसा शासनाच्या पर्यटन विभागाने तिथे वाळवंटात तंबू ठोकून राहण्याची, जेवणाखाणाची सोय केलेली आहे. सातकोशियाच्या जवळचे मोठे गाव अनुगुल. तिथे आमचे एक स्नेही असतात. त्यांच्याकडे जाऊन मग पुढे जायचे असे ठरले होते. आम्ही दोघे सकाळी घरून निघालो. जेवायच्या वेळेला अनुगुलला पोहोचलो. हा प्रवास अगदी छान झाला कारण बहुतेक सर्व प्रवास राष्ट्रीय महामार्गावरूनच झाला आणि सकाळची वेळ असल्याने ट्रकांची गर्दी नव्हती. जेवण झाल्यावर स्नेह्यांनी जरा विश्रांती घेऊन, चहा घेऊन मग निघा असा आग्रह केला. सोबतीला त्या भागातला एक माणूसही देतो असे सांगितले. तर हे सर्व होऊन निघायला संध्याकाळ झाली. पंधरावीस मिनिटात अंधारही पडला. गावाबाहेर गेल्यावर तर वस्ती नसल्याने सगळा अंधारच. थोड्याच वेळात आम्ही जंगलात पोहोचलो. दोन्हीकडे दाट झाडी, उजेड फक्त आमच्या गाडीच्या दिव्यांचा. मध्येच आपण चढ चढत आहोत असे मला वाटले. म्हणजे हा घाट आहे की काय? एका बाजूला दरी असणार!   पतिराज शांतपणे गाडी चालवत होते. माझी मात्र रामरक्षेची पारायणं चालली होती!   शेवटी तिथे पोहोचलो. वाटाड्या नंतर म्हणाला कधी कधी गाडीसमोर हत्ती सुद्धा येतात. ते ऐकूनच अंगावर काटा आला! असो. एकदा तिथे पोहोचल्यावर मात्र एक दीड दिवस मजेत गेला.

आमचा एक नेहमी घडणारा सहप्रवास म्हणजे भुबनेश्वर ते कटक. हे अंतर फक्त २४/२५ किलोमीटर आहे. तेही चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरून. त्यामुळे तो प्रवास १५/२० मिनिटात आणि सुखावह होतो. पण एकदा गावात शिरल्यावर मात्र पाचसहा किलोमीटर अंतराला सुद्धा पंधरावीस मिनिटे लागतात. त्याला कारणे अनेक आहेत. सुमारे ५०/५५ वर्षांपूर्वी कटक ही ओरिसाची राजधानी होती. त्यामुळे शहरात तशी बाजारपेठ खूप मोठी. अगदी भुबनेश्वरात न मिळणाऱ्या वस्तूसुद्धा कटकमध्ये मिळतील अशी परिस्थिती. पण शहर जुने! त्यामुळे बऱ्याच भागातले रस्ते अगदी बोळकंड्या म्हणावेत इतके अरुंद. पण त्या रस्त्यांवरून आम्हाला जावेच लागते. कारण कटकला मिळणाऱ्या चांदीच्या फिलिग्रीच्या सुंदर वस्तू. पाहुणे आले की त्यांना खरेदीसाठी कटकला न्यावे लागते. चांदीचा भाव कितीही वाढला तरी पाहुण्यांना फिलिग्रीच्या वस्तू घ्यायच्या असतात! तर आम्ही त्यांना घेऊन कटकला जातो. पतिराजांचा रोड सेन्स खूपच चांगला आहे, शिवाय कटकला आमचे जाणे पण बऱ्याच वेळा होते, पण कटकच्या त्या बोळांच्या चक्रव्यूव्हात त्यांचाही जरा गोंधळ होतो. लगेच माझी धडधड सुरू. आता इथून उलटे फिरायला लागले तर कसे करायचे?   अरुंद रस्ता, दोन्हीकडे गटारे, रस्त्याच्या कडेला लावलेल्या स्कूटरी, शिवाय ती सदोदित चालणारी बांधकामे आणि त्यामुळे रस्त्यावर वाळूचे ढिगारे, तसेच रस्तारुंदी, केबल टाकणे ह्यासाठी खोदलेले रस्ते. नेहमीच ह्या सर्व गोष्टी एका वेळेला असतात असे नव्हे पण ह्यातील तीन तरी असतातच! मग त्यातून कुणाला तरी रस्ता विचारायचा. कधी कधी उलटे फिरणे आवश्यक असते पण ते शक्य नसते म्हणून लांबचा वळसा, तोही अशाच रस्त्याने घेऊन एकदाचे इच्छित स्थळी पोहोचतो. तेव्हा लक्षात येते की मी इतका वेळ मुठीत धरून ठेवलेला जीव कुठल्याशा भांड्यात पडलेला आहे!

तर थोडक्यात काय? प्रवास दूरचा असो वा जवळचा, शहरातल्या शहरात असो वा शहराबाहेर, मी त्या एका जुन्या म्हणीतल्या शिंगरासारखी काहीही काम न करता शिणत असते.   पण त्यातल्या त्यात समाधान हे की आयुष्याच्या सहप्रवासात मात्र ओझी वाहण्यामध्ये शिंगराचा सहभाग घोड्याच्या बरोबरीने असतो!