कोण बरोबर ?

विरोधाभासाचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून मला आलेल्या विरोपाचे हे भाषांतर आहे.
    एका कायद्याच्या प्राध्यापकाकडे
एक असा शिष्य येतो ज्याच्याकडे त्याची फी द्यायला पैसे नव्हते.तरीही
त्याने प्राध्यापकाला त्याला
शिकवण्याचा आग्रह केला. त्यावर प्राध्यापकाने "तू फी कशी देणार?
"विचारल्यावर "आता माझ्याकडे पैसे नाहीत पण मी असे वचन देतो की मी माझा
पहिला खटला जिंकला की तुमची फी देईन" त्याची शिकण्याची तीव्र इच्छा पाहून प्राध्यापकाने या बोलीवर  त्याला शिकवण्याचे  मान्य केले.शिक्षण पूर्ण झाल्यावर प्राध्यापकाने त्या शिष्याला बरेच वेळा फी मागितली पण प्रत्येक वेळी शिष्याने त्याला आपल्या वचनाची आठवण करून दिली. शेवटी कंटाळून प्राध्यापकाने आपल्या शिष्यावरच दावा लावण्याचे ठरवले. व तसे त्या शिष्याला सांगून विजयी स्वरात तो म्हणाला."आता या केसमध्ये काहीही झाले तरी तुला फी द्यावीच लागणार. कारण तू जिंकलास तर कराराप्रमाणे तुला फी द्यावी लागेल. आणी तू हरलास तर अर्थातच तुला कोर्टाच्या हुकुमानेच फी द्यावी लागेल.
मात्र शिष्यही शेरास सव्वाशेर होता आणि त्याने उत्तर दिले, "अगदी चूक उलट काहीही झाले तरी मला फी द्यावी लागणार नाही. "
"कसे काय? "प्राध्यापकाने उसळून जात विचारले. त्यावर शिष्याने उत्तर दिले,
"हे पहा.मी केस जिंकलो तर मी फी देणे आवश्यक आहे या तुमच्या दाव्याला अर्थ उरत नाही आणि मी हरलो तर आपल्या करारानुसारच
मला फी द्यावी लागणार नाही. "
कोण बरोबर? की दोघेही ?