वैनायक वृत्त : आवाहन
मनोगतच्या वाचकांपैकी ज्या कोणाला खाली दिलेल्या 'वैनायक' वृत्तातील कविता
वाचनाच्या विशिष्ट पद्धतीची /पद्धतीबद्दल माहिती असेल त्यांनी येथे ती माहिती
द्यावी अशी माझी विनंती आहे. अशी कांही पद्धत आहे याबद्दलचा संदर्भ असा-
" मूर्ती दुजी ती
(सावरकरांची निवडक कविता)
संपादक- डॉ. ना. ग. जोशी
व्हीनस प्रकाशन, पुणे
या जुन्या पुस्तकात खालील माहिती दिलेली आहे.
वैनायक वृत्त
काव्य प्रांतात त्यांचा एक प्रयोग सावरकरी विशेषांनी भरलेला आहे. तो म्हणजे 'वैनायक' वृत्ताची
निर्मिती. कमला व गोमंतक(पूर्वार्ध) यासाठी त्यांनी त्याचा वापर केला.
यात सहा सहा मात्रांचे तीन गट किंवा आवर्तने आणि शेवटी एक गुरू अक्षर, अशी चरण योजना असते.
यमक नसते आणि वाक्यार्थाचा संदर्भ तसाच पुढील ओळीत घुसत जातो. वैनायक ही निर्यमक
'धवलचंद्रिका' जाती आहे. हे वृत्त 'मूर्ती दुजी ती', 'मरणोन्मुख शय्येवर' या
कवितांमध्येही वापरले आहे.
या वृत्ताची खरी महत्ता सावरकरी पद्धतीने सावेश, साघात, वक्तृत्वपूर्ण शैलीने पठण केले असता विशेष लक्षात येते.
वैनायक वृत्ताच्या खऱ्या शक्ती संभाषण धर्तीच्या काव्यवाचनानेही पटतात.
"
हे वृत्त त्यांनी शंभर वर्षांपूर्वी अंदमानातील बंदिवासात शोधले.
ज्या कोणाला या पद्धतींची माहिती असेल त्याने एक कर्तव्य म्हणून त्याची
ध्वनिमुद्रीत क्लिप /सीडी तयार करून उपलब्ध करून दिल्यास ते सावरकरांना केलेले मोठे
अभिवादनच ठरेल. श्री हृदयनाथ मंगेशकर वा श्री शंकर अभ्यंकर यांचा याबाबतीत मोठा
व्यासंग आहे. त्यांच्या क्यासेट वा सीडी मध्ये हे वृत्त 'त्या विशिष्ट
पद्धतीने वाचलेले' कोठे येऊन गेले असेल तर तशी माहिती दिल्यास तीही बहुमोल
ठरेल.यांच्यापैकी कोणी या पद्धतीच्या वाचनाची सीडी काढली तर
दुधात साखर! काव्य प्रांतातील एका महाकवीला ते केवढे मोठे अभिवादन
ठरेल! आज 'जयोस्तुते', 'सागरा प्राण तळमळला', ' हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी
राजा', 'जयदेव जयदेव जयजय शिवराया' हे सर्व अद्वितीय काव्य उत्तम चाली व गायनामुळे
सर्वतोमुखी आहे याचे श्रेय मंगेशकर कुटुंबाला जाते. या वृतातील काव्याचे वर
वर्णन केलेल्या विशिष्ट पद्धतीने वाचन (गायन नव्हे) त्यांच्या एखाद्या नव्या 'सीडी
'त अंतर्भूत करावे असे मनोगतच्या माध्यमातून मी त्यांना पण आवाहन
करतो.