शीर्षक सुचत नाही

कोणी सुखावलेला , कोणी दुखावलेला
रक्तास जीवनाच्या जो तो चटावलेला


तो प्रेमभंग बरवा , ते दु:ख दो दिसांचे
करुणेस पात्र आहे प्रेमात जिंकलेला


ह्रदयास वेदनांचा झाला सराव आता
जखमा करून थकला ह्रदयात पूजलेला


डोळ्यातल्या नशेचा षौकीन मी पुराणा
लावे जिवास चटका प्याला गमावलेला


नौका कशी बुडाली , सागर अशांत नव्हता
अन वादळास होता प्रेमी सरावलेला


पेला रिता मनाचा , साकी दुज्यात गुंते
नशिबी दिसे न माझ्या सागर उधाणलेला


वह्नि तनामनाचा लागे विझू अखेरी
अंधूक होत आहे सुर्यास्त लांबलेला