हे मादकनयनमधुले - तक्रार इतकीच असे

हे मादकनयनमधुले - तक्रार इतकीच असे
परके मला मानियले - तक्रार इतकीच असे ।ध्रु।

मी दर पथात कचरलो - दर कोपऱ्यावर भ्यालो
गेलीस फिरवुन मुद्रा - जेव्हा कधी मी दिसलो
नाहीस मज ओळखले - तक्रार इतकीच असे ।१।

होसी कधी फुंकरही - बनसी कधी मैत्रिणही
मधुशालमद्यवितरिके- अंगारही तू दंवही
मम पात्र रिक्तच ऱ्हाले - तक्रार इतकीच असे ।२।

कल्पान्त दर रंग असे - नि खट्याळ दर ढंग असे
हृद्भंग करुनी जाणे - सौंदर्यिचे अंग असे
रमणे असंभव झाले - तक्रार इतकीच असे ।३।

अर्थ : १. मधुशाल = मधुशालेतील (बहिःशाल किंवा वात्सशाल(गोठ्यात जन्मलेला) आठवा!  ) (मधुशाला म्हणजे गुत्ता (बहुधा))
पर्याय : २. चुचकारण्या ना जमले
अर्थ ३. मधुल = गोड  संस्कृत कोशात पाहा. (हे मादक नयन असणाऱ्या गोड मुली तरुणी,... )

टीपा :

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

वृत्त गा गाऽलगागा गागा - गा गाऽलगागा गागा ... असे आहे. हे उद्धव (गा गागागागा गागा - गा गागागागा गागा) सारखे वृत्त वाटते. फक्त तिसऱ्या गा ऐवजी ऽल असे करून एक मात्रा कमी केली पण ओळीची गायची लांबी तितकीच राहिली. उद्धव वृत्तातल्या कुठल्याही गाण्याच्या चालीत हे गाणे म्हणता येईल मात्र उलटे करता येणार नाही. असो.

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...    ले- गागाऽलगा गागागा  असे जमवा बरका!   यमकाची जागा ठळक केलेली आहेच.