मुखवट्यांवर मुखवटे घालून सारे

मुखवट्यांवर मुखवटे घालून सारे
बेगडी आतून बाहेरून सारे

तो कुणी वेडा असावा वा कलंदर
सोसले त्याने कसे हासून सारे?

तो कसा नात्यांतला व्यवहार होता?
ढाळले अश्रूसुद्धा मोजून सारे!

सांत्वनांनी आणल्या आठ्या कपाळी
हुंदकेही वागले फटकून सारे

नावही माझे तसे अर्वाच्य होते
ओठही झाले मुके बोलून सारे

ही तशी फसवीच इथली रोषणाई
शहर हे दिसते कुठे येथून सारे?

ही कुणाची स्पंदने हृदयात माझ्या?
पाहती मज श्वास का रोखून सारे?

मी कधी त्यांना म्हणालो, "दाद यावी"?
चेहरे बसले तरी पाडून सारे

चित्त