गदिमाः काही खास 'जागा'!

आपल्या मराठी साहित्यात शब्दप्रभू ग. दि. माडगूळकरांचे स्थान वादातीत आहे.या माणसाच्या लेखणीतून उतरलेल्या अनेक गीतांनी गेल्या तीन-पिढ्यांचे मराठी भावजीवन समृद्ध केले आहे.त्यांचे काव्य, विशेषतः भावगीते व चित्रपट गीते ही  सहज-सुंदर,गेय आहेतच पण गदिमा काही ठीकाणी, एखादा गायक जशी गाताना एखादी खास 'जागा' घेतो,तसे एखादा शब्द असा काही लिहून जातात की त्यातून अर्थ किंवा गेयतेच्या दृष्टीने एक सौंदर्यस्थळ निर्माण होते.कधी कधी प्रथमदर्शनी अशी एखादी जागा लक्षात येत नाही किंबहुना माझ्या लक्षात आली नाही. पण नंतर जाणवलेल्या अशा काही खास 'जागा' येथे देत आहे.इतर कोणाला असे काही खास सापडले तर अवश्य उधृत करावे.


१. 'संथ वाहते कृष्णामाई' या चित्रपटातील 'गंगा आली रे अंगणी' या समूहगीतातील या ओळी पाहा.
'युग यंत्राचे आले रे
अवघड सोपे झाले रे
घाम पुन्हा ना गळो
कुणाचा कोठे निष्कारणी'


या 'निष्कारणी' शब्दातून गदिमा फार मोठे सत्य सांगून जातात.यंत्रामुळे निष्कारण घाम गाळणे थांबले आहे तरी यंत्रे मानवाची सर्वच कामे करणार नाहीत व काही ठिकाणी मानवाला 'सकारण' घाम गाळावाच लागेल.अर्थात 'मानवी कष्टाला पर्याय नाही, माणसाला कर्तव्य चुकलेले नाही .माणसाने यंत्रावर सारे काही सोपवून आळशी बनू नये' असा इशारा एका शब्दाच्या  सहज पण नेमक्या योजनेतून गदिमांनी दिला आहे.केवळ नतमस्तक व्हावे अशी प्रतिभा!


२‍ 'जगाच्या पाठीवर' या चित्रपटातील 'विठ्ठला, तू वेडा कुंभार' या गीतातल्या ओळी पाहा.
'माती, पाणी, उजेड, वारा
त्यात मिसळशी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत , ना पार ॥


यात कुंभार त्याने तयार केलेली मडकी (घट) एकमेकावर रचून ठेवतो.त्यातही खालच्या ओळीत जास्त व त्यावरच्या ओळीत थोडी कमी अशी रचना असते. त्यामुळे घटांची एक 'उतरंड' तयार होते. जरा कल्पना केल्यास डोळ्यासमोर चित्र सहज उभे राहते. ती उतरंड आहे तो 'ढीग' नाही. तसेच विठ्ठलाने निर्मिलेल्या घटनांही 'तो' एका 'रचनेत' ठेवतो, हे गदिमांनी सूचित केले आहे. 'उतरंड'हा शब्द गेयतेच्या दृष्टीने कठीण असला तरी सुधीर फडक्यांनी तो इतका सुरेल म्हटला आहे की क्या बात है!


३. 'घननीळा लडिवाळा' या गीतातही अशीच एक पण वेगळ्या ढंगाची जागा आहे.
  'सांजवेळ ही आपण दोघे
   अवघे संशय घेण्याजोग़े
   चन्द्र निघे बघ झाडामागे..'
 मराठीत 'ळ' अक्षर काव्यात फारसे वापरलेले नाही असे कोणीतरी उपहासाने म्हटल्याने गदिमांनी उत्तरादाखल 'घननीळा लडिवाळा' हे १३ वेळा 'ळ' चा वापर केलेले गीत लिहिले,असे सांगतात. वरच्या ओळीत गदिमांनी 'अवघे'च्या ऐवजी 'सगळे' संशय घेण्याजोगे असे लिहिले असते तर आणखी एक 'ळ'युक्त शब्द आला असता. पण या कवीने 'अवघे' हा शब्द वापरून दोघे,अवघे,निघे अशी रचना करून एक वेगळी रंगत आणली आहे.'सारे,सगळे'या पेक्षा 'अवघे' मध्ये अधिक 'समावेशकता,व्याप्ती' आहे असा भास होतो. (उदा 'अवघाचि संसार'). गाताना माणिक वर्मांनी 'अवघे'तला 'घे' किंचित लांबवून त्यात एक अर्थपूर्ण गंमत केली आहे.

४. 'गोरी गोरी पान फुला सारखी छान, दादा मला एक वहिनी आण ' या गाण्यात
   'हरीणांची जोडी तुडवी गुलाबाचे रान' अशी ओळ आहे.
तसे पाहू गेल्यास 'तुडवीणे' के क्रियापद नकारात्मक,किंचित हिंसक क्रिया/भावना व्यक्त करणारे आहे.''गोरी गोरी पान' सारख्या एक प्रकारच्या बालगीतात असा शब्द वापरणे रसभंग करणारे ठरू शकले असते. परंतु अण्णांनी 'तुडवी' म्हणजे असंख्य गुलाब पसरलेल्या रानातील रस्त्यावरून 'दौडत' जाणारी हरिणाची जोडी असा मस्त भाव निर्माण केला आहे व तोच भाव आशा भोसले यानी गायनातून छान व्यक्त केला आहे.(संगीतकार श्रीनिवास खळे)


'गदिमा' ह्या सागरात अशी शब्द्ररत्ने भरपूर आहेत.शोध घेत राहणे हे आपले काम!


(जयन्ता५२)