आवराआवरीचा क्रॉनिक आजार-२

पहिला भाग हा इथे आहेः आवराआवरीचा क्रॉनिक आजार


'स्वयंपाकघर आवराआवरी' हा सर्वात भीषण प्रकार. घाई म्हणून, गरज लागेल म्हणून वेळोवेळी घेतलेल्या आणि जपलेल्या अनेक वस्तू आणि त्यांच्यामुळे होणारी अडथळ्याची शर्यत.'आवरायला कशापासून सुरु करायचं' हा सर्वात मोठा प्रश्न असतो. रांगत रांगत मी ओट्याखालच्या अरुंद जागेत जाते.
'जपून हं ढोले! तिथे अडकशील!'
'कळलं! इतकी विशाल झालेली नाही अजून मी.'
ओट्याखालचा संसार बघून मला भंगारवाल्याचा दुकानात आल्याचा भास होतो. तिथे नारळ, प्लॅस्टीकच्या पिशव्या, पोळपाट, विळी, मिक्सरचे खोके यांच्या गर्दीत जमिन दिसतच नसते. जरा अंधाराचा अंदाज घेऊन शोधाशोध करते तोच एक प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा मनोरा खाली कोसळतो. कोकाकोला, कधीकाळचे कोकम सरबत, मँगोला, बिस्लेरी अशा अनंत बाटल्या.
'काय हे? काहीतरी अडगळ जमा करुन ठेवत असतेस'
'इतके वाटते तर दर आठवड्याला कोकाकोला पित नको जाऊस.'
'बाटल्या मी फेकत असतो पिऊन. तू परत साबण घालून धुवून का ठेवतेस?'
'असू दे. पाहुणे आले की त्यांना जाताना पाणी न्यायला लागतात.'
'पण तोपर्यंत त्या १८५७ च्या बंडातल्या काळातल्या दिसतात ना! परवा ते काका धूळ जमलेली जुनाट बाटली बघून घाबरुन 'मी प्रवासात पाणी पित नाही' म्हणून तसेच निघाले ना!'
'असू देत. मला त्या अर्ध्या कापून त्यात फुलं ठेवायला लागतात'
'किती भिकार दिसतात अर्ध्या कापलेल्या बाटलीत ठेवलेली फुलं. त्या दिवशी अशीच कोपऱ्यात फळीवर ठेवलेली बाटली भर रात्री माझ्या डोक्यात पडून झोपेतून दचकून उठलो. बघतो तर डोक्यावर निशीगंधाची फुलं. बनियानवर पाणी आणि गादीवर चेपलेली कापलेली बाटली. यापुढे फुलं फळीवर अजिबात ठेवायची नाहीत. वाटलं तर फुलं गादीवर ठेव बहुमानाने. मी बापडा त्या ४ बाय ५ इंचाच्या फळीवर झोपतो. शेवटी काय, फुलं महत्वाची. नवरे काय, पैशाला पासरी मिळतात.'
अजिबात समजतच नाही या माणसांना! आता बाटल्या फेकायच्या आणि मग लागल्या की प्रवासात पाण्याच्या बाटल्यांना पंधरा पंधरा रुपये टिचवायचे. मी पण बाटल्या निमूट एका पिशवीत ठेवून कचऱ्याजवळ ठेवते. (नंतर गुपचूप परत ओट्याखाली!) 


तितक्यात सासूबाई येतात. 'त्या श्रीखंडाच्या रिकाम्या डब्या फेकू नका हं! मला लागतात फराळ द्यायला.'
फ्रिजच्या आवरणाची लक्तरे झालेली. 'ए थांब ते फेकू नको! मी त्याचे चांगले भाग कापून शिवून मायक्रोवेव्हचे कपडे बनवणार आहे.'
'पण बाजारातून एक मायक्रोवेव्हचं कव्हर विकत आणायला प्रॉब्लेम काय आहे?'
'कशाला आणि खर्च?'


फ्रिजमधे सोड्याच्या बाटल्या, १८५७ मधील आले पाचक, कोकम सरबत, कधीकाळी केलेली मिरचीची चटणी, सॉसेस यांच्यासमोर मी हतबुद्ध होऊन खाली बसते. दुपार काय, संध्याकाळपर्यंत पण हा शीत डोंगर साफ व्हायचा नाही.  मनाचा हिय्या करुन आधी भाजीच्या कप्प्यावरची काच धुवायला ओट्यावर टेकून ठेवते. दुसऱ्याक्षणी काच उभ्याची आडवी होऊन ओट्यावरील चहाच्या कपाचा मोरीत ढकलून खिमा करते.   
'कुठे म्हणून न्यायची सोय नाही तुला. कायम फोडाफोडी. चांगले सहा एका रंगाचे कप फळीवर बघवतच नाहीत का तुला?'
'कप ओट्यावर कोणी ठेवला ते आठव.फळीवर ठेवला असतास तर हे असं झालं नसतं!'
'हो हो! तुम्ही कायम शहाणे. आम्ही मूर्ख. आधीच रविवारची अर्धी दुपार गेलीच आहे, उरलेली छान भांडणात घालवू.आता पुढच्या रविवारी ऑफिसात गेलो तर मला दोष नाही द्यायचा.' नवरा बाडबिस्तरा आवरुन संगणकाकडे मोर्चा वळवतो.


'हे काय? इस्त्रीला द्यायच्या कपड्यात माझा बनियान?उद्या फडकीही द्याल हो इस्त्रीला.' (अरे बापरे!काल कपडे घाईघाईत दांडीवरुन काढून न बघताच टाकले..)
'हो. आम्ही लंगोट्या पण देऊ इस्त्रीला. तुला काय करायचंय? स्वतः कधी काढतोस का कपडे?डोन्ट हाक शेळ्या सिटींग ऑन ऊंट.'
'आँ?? मी कपडे काढण्याचा इथे काय संबंध?'
'शब्दशः विनोद करुन वात नको आणूस रे. स्वतः दांडीवर वाळत टाकलेले कपडे दांडीवरुन काढतोस का? असं मी म्हणत होते.जा बाबा, तुझं काम कर. इथलं आवरलं की मी बोलावते जेवायला.'


समोरचे फ्रिजमधील ब्रम्हांड बघून आता आवराआवरीचा उत्साह जरा ओसरायला लागतो. मग धपाधप ओल्या फडक्याने पुसून १८५७ मधले सर्व पदार्थ तसेच्या तसे ठेवून मी फ्रिज बंद करते. ओटा आवरण्यासाठी ओट्यावरील दिसतील ती सर्व भांडी, तांब्याचा जग, पाण्याची टाकी सर्व धुवायला टाकते.
'अरे पण सखू आली का नाही अजून?'
तितक्यात बेल वाजते. 'सखूने पाठाव्लं. ती आजारी हाय. आज येनार नाय.'


'अरे देवा! आधी सांगायचं नाही का रे?आम्ही बाकी कामं जरा कमी केली असती..'
आता पुढे भांडी, मग यंत्रात धुणी..मग झाडू..माझ्या डोळ्यापुढे अंधार पसरतो.
सगळं आवरतं एकदाचं.
'हुश्श! यापुढे मी कमीत कमी पाच रविवार तरी काहीही आवरा आवरी करणार नाही.'
'तू काही करुच नकोस. पुढच्या रविवारी मी माझं कपाट आणि फायली आवरणार आहे. तू फक्त तिथे बसून काय काय कुठे कुठे ठेवायचं ते वेगळं काढ.'


(वाचवा!! वाचवा!! सी-६ मध्ये आवरा आवरीच्या आजाराची गंभीर साथ आणि त्यात एका गृहीणीचा बळी!!)