व्यवहारातून परमार्थाकडे -

        आंबाच्या लोणच्याने काचेची बरणी भरलेली असते. हळू हळू वापरून लोणचे संपते, त्यावेळी बाटलीच्या आतून सर्व बाजूने तेल आणि लोणच्याचा खार चिकटलेला असतो - बाटली ओषट असते - आतमधून एक प्रकारचा दर्प  येत असतो. 
         मग घरातील स्त्री काय करते ? रात्रभर बाटलीत पाणी भरून ठेवते. दुसरे दिवशी बाटली धुते. तरी सुद्धा तेलाचा ओषटपणा राहतोच. तो जाण्यासाठी साबणचुरा वापरते व मग परत धुते. मग त्या बाटलीचा वास घेते. थोडासा दर्प येतच असतो. मग त्या बाटलीत गरम पाणी घालून खळखळून धुते. कधी कधी असे दोन तीनदा करावे लागते. मग बाटलीतला तेलकटपणा, ओषटपणा, दर्प निघून जातो. अशी बाटली परत फडक्याने स्वच्छ व कोरडी केल्यावर मग साजूक सात्त्विक तूप घालून ठेवण्यास योग्य होते. 
        आपला देह म्हणजे असली लोणच्याची बाटलीच आहे. त्यात अनेक प्रकारच्या वृत्तिमुळे ज्या सवयी लागतात (चिकटतात) तो ओषटपणा. तो वृत्तींचा ओषटपणा घालविण्यासाठी - चित्त शुद्ध होण्यासाठी -  भगवंताचे ध्यान (नाम जप इ.) नावाचे गरम पाणी भरले की भोगवृत्तींचा ओषटपणा निघून जातो. तरी सुद्धा अहंकाराचा दर्प येतोच. मग तो देह वैराग्यरूप फडक्याने कोरडा केला की आसक्‍तीचा ओलावा पुसला जावून देह स्वच्छ होतो (चित्त शुद्धि होते). मग अशा देहाच्या हृदयात (साजूक तूप रूपी) भगवंत  आपणच येऊन बसतो.
सौजन्य - गीता फाउंडेशन्‌, मिरज