आर्किमिडीजने काय केले ?

एका ठिकाणी सत्यनारायणाची कथा सुरू होती. धनसंपत्तीऐवजी लतापल्लवाने भरल्यामुळे आपली नौका पाण्यातून वर आलेली साधुवाण्याने पाहिली हे ऐकल्यावर मला आर्किमिडीजच्या सिध्दांताची आठवण झाली. आरती, तीर्थ प्रसाद ग्रहण वगैरे झाल्यावर गप्पा मारतांना सहज ते माझ्या बोलण्यात आलं.
"म्हणजे काय? आपल्या पूर्वजांना सगळं कांही माहीत होतंच मुळी." कोणीतरी म्हणालं.
"अहो, या इंग्रजांनी आमचं ज्ञान पळवून नेलं आणि आपल्या नांवानं खपवलं." कुणीतरी री ओढली.
"आर्किमिडीजनं म्हणे उध्दरणशक्तीचा शोध लावला म्हणजे काय तर पाण्यावर लाकूड तरंगतं असं सांगितलं कां?"
"अरे रस्त्यातून नागडा पळणारा येडा तो."
"आपल्या वानरसेनेनं बघा, रामनामाच्या जोरानं पाण्यावर दगड तरंगवले."
"अहो नासानं सुध्दा लंकेचा पूल मान्य केलाय्. त्याचे दुर्बिणीतून फोटो सुध्दा काढलेत."
मग आर्यभट, भास्कराचार्य, ज्ञानेश्वर वगैरेंच्या श्लोक, ओव्या वगैरे मधील वैज्ञानिक शोधांचे उल्लेख सांगून झाले,  आर्किमिडीज पासून कोपर्निकस, पास्कल, न्यूटनपर्यंत सगळ्या थोर शास्त्रज्ञांचं महत्व मोडीत निघालं आणि माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना मेकालेची अवलाद म्हणून हिणवणं झालं. तशी ही सारी मंडळी चांगली पदवीधर होती, निदान कॉलेजात शिकत होती. त्यांना अडाणी म्हणून सोडून देता येत नव्हते. मग मी त्यांच्याच कलानं घ्यायचं ठरवलं. विचारलं, "तुम्हाला पोहायला येतच असेल, निदान कधी तरी गळ्यापर्यंत पाण्यात उभं राहिलाच असाल. तेंव्हा हलकं हलकं वाटलं की नाही?"
"अहो हीच तर पाण्याची उध्दरणशक्ती, ते आपल्याला वर उचलत असतं."
मी म्हंटलं, "ज्यानं कधी उध्दरणशक्तीचं नांव सुध्दा ऐकलेलं नाही अशा एखाद्या अशिक्षित खेडुताला सुध्दा हलकं वाटतच असेल ना?"
"वाटणारच. हा तर निसर्गाचा नियम आहे." उत्तर आलं.
"पाण्यात शिरल्यावर हलकं वाटणं, कांठावरील झाडांची पाण्यात पडलेली पानं, फांद्या तरंगतांना दिसणं हे तर सर्वसामान्य बुध्दी असलेल्या कुठल्याही प्राण्याला समजतं. आर्किमिडीजच्या काळातील माणसांना ते माहीत नसेल कां?" मी विचारलं.
"मग त्या आर्किमिडीजनं काय केलं?"
" सांगतो. पण त्याआधी आणखी एक गोष्ट. लोखंड, तांबे, पितळ, सोने, चांदी वगैरे धातूसुध्दा हजारो वर्षापासून माणसाच्या वापरात आहेत. त्याचा गोळा किंवा पत्रा पाण्यात पडला तर बुडतो हे त्यांनी पाहिले असेल. तसेच रिकामा तांब्या किंवा घागर अलगद पाण्यावर सोडली तर तरंगते हेही पाहिलं असेल."
"या तर रोजच्या अनुभवाच्या गोष्टी झाल्या. त्यात आर्किमिडीजनं वेगळं काय सांगितलं?"
"त्यानं या रोजच्या अनुभवाच्या गोष्टींचा सखोल अभ्यास केला. हलकं वाटतं म्हणजे खरोखरच त्या वस्तूचं वजन कमी होतं कां हे त्यानं तराजूवर मोजून पाहिलं. एखाद्या वस्तूचं पाण्याबाहेर असतांना नेमकं किती वजन असतं आणि पाण्यात कितपत बुडवल्यावर ते किती कमी होतं याचा हिशोब ठेवला. आधी एक पात्र पाण्याने शिगोशीग भरून घेतलं. त्या पाण्यात ती वस्तू बुडवल्यावर बाहेर सांडणारं पाणी गोळा करून त्याचं वजन केलं. या वजनांची तुलना केली. दोन्ही वजनं सारखी भरली. दगड, लाकूड, लोखंड वगैरेचे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे घेऊन त्यावर हाच प्रयोग करून पाहिला. त्या प्रयोगातील निरीक्षणांचा अभ्यास केला आणि पूर्ण खात्री पटल्यानंतर एका समीकरणाच्या रूपांत आपला सिध्दांत मांडला.  हा समीकरणरूपातील सिध्दांत म्हणजे उध्दरणशक्तीचा शोध. "
"पण त्या रस्त्यातून नागड्यानं धांवत सुटण्याचं काय?"
"ती एक मजेदार गोष्ट आहे. ग्रीसच्या राजानं एक सोन्याचा मुकुट बनवून घेतला होता. पण सोनारानं लबाडी करून त्यात भेसळ केली असावी असा संशय त्याला आला. हे खरं की खोटं हे शोधून काढायचं कठीण काम त्यानं आर्किमिडीजला दिलं. त्या काळच्या तंत्रज्ञानानुसार सोन्याचा खरेपणा शोधायचे दोनच रूढ मार्ग होते, एकतर भट्टीत टाकून तापवून नाहीतर तीव्र आम्लामध्ये बुडवून पहाणं. दोन्हीमध्ये तो सुंदर नक्षीदार मुकुट खराब होणार. निदान तशी शक्यता होतीच. तसे न करता त्यातील सोन्याचा कस कसा पहायचा हे एक फक्त आर्किमिडीजलाच नव्हे तर दरबारातील विद्वत्तेपुढे आव्हान होते. त्यासाठी सोन्याच्या तिस-याच कुठल्यातरी गुणधर्माचा उपयोग करता येईल कां असा विचार आर्किमिडीज करीत होता. पाण्याच्या टबात उतरल्याबरोबर त्याला पाण्याच्या उध्दरणशक्तीची जाणीव झाली व त्याचा उपयोग सोन्याची घनता मोजण्यासाठी करता येईल ही नामी कल्पना सुचली. मनावरील एक मोठे दडपण उतरल्यामुळे त्याला इतका आनंद झाला की अंगावर कपडे चढवण्याचं सुध्दा भान राहिलं नाही. कुठल्याही कारणाने अत्यंत भावनावेग झाला की माणसाचं देहभानसुध्दा हरपतं."
"म्हणजे आर्किमिडीजनेच उध्दरणशक्तीचा शोध लावला म्हणायचं? "
"उध्दरणशक्तीची नित्य व्यवहारातील अनेक उदाहरणे आपल्याला साहित्यामध्ये मिळतील. पण समीकरणाच्या ज्या स्वरूपात आर्किमिडीजने निसर्गाचा हा नियम मांडला आणि उदाहणाने दाखवून दिला तशा अर्थाचा दुसरा संदर्भ आपल्याला मिळत नाही तोपर्यंत तरी तसेच म्हणावे लागेल."