स्वतंत्र

रात्र अजून संपली नाही
सूर्य असेल, सावली नाही


कैद खगास पारधी सांगे
झेप जटायुची भली नाही


मुक्त जगीन, तव खुळा हट्ट
तू जनरीत जाणली नाही


शिस्त बरी जुनाट कारेची
वाट स्वतंत्र आपली नाही


सांग जरा उनाड वार्‍याला
ज्योत तुला सरावली नाही


तू तिमिरा गळ्यास घेता का
चंद्रप्रभा दुखावली नाही ?


दीप नवे, नव्या मशाली ह्या
राख, मिलिंद, पेटली नाही