गाणे....रडवणारे

            हिंदी गाणी आपल्या आयुष्याचा अविभाज्य बनले आहेत( खरं तर आताच नव्हे पहिल्यापासून आहेतच).जसे जसे आपण आयुष्याची एकेक पायरी चढतो, तसे तसे वेग-वेगळी गाणी आपल्या सोबत आठवण बनून राहतात.एखादे गाणे ऐकले की वाटते मी १०-१२ च्या परीक्षेचा अभ्यास करत आहे, तर कधी कॉलेजच्या मैत्रिणींबरोबर, रूम वर पडून आहे.तर एकूण काय की प्रत्येकाचे आपले एक हसवणारे, रडवणारे,खुलवणारे, उदास करणारे, प्रेमात पडल्यावरचे असे गाणे असतेच.
             परवाच कुठेतरी मी, मला रडवणारे गाणे पुन्हा एकदा ऎकले आणि वाटले काहीच फरक नाहीये. तोच आवाज, ते शब्द आणि तोच परिणाम.:-(( पण तरीही ते माझ्या आवडत्या गाण्यापैकी एक आहे.ते म्हणजे 'प्रेमरोग' या चित्रपटातील, लताजींच्या आवाजातील, पद्मिनी कोल्हापुरे वर दर्शविलेले गाणे.......'ये गलियां ये चौबारा' !!!
             तसे पाहिले तर हे गाणे फार आनंदात असलेल्या एका मुलीवर आहे आणि तरीही मला रडू येतं. आता मला शिक्षणासाठी नंतर नोकरीसाठी बाहेर पडून ९-१० वर्षे झाली आणि घरातून बाहेर राहण्याची, एकटी राहण्याची सवयही झालीय. पण मी पहिल्यांदा जेंव्हा घर सोडलं, तेंव्हा मला जाणवला काही शब्दांचा अर्थ.
'देख तू ना हमे भुलाना, माना दूर हमें है जाना. मेरी अल्हड सी अटखेलियां सद पलकों मे बसाना'.
किती खरी!!
त्यानंतरची कॉलेजची ४ वर्षे पटकन गेली अगदी  फुलपाखरासारखी आणि पुन्हा एकदा ते गाणं आलं. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी, नोकरी मिळाल्याचा आनंद, नवीन जागी जाण्याची उत्सुकता तर होतेच. तरीही तिथून जाताना मात्र काही शब्द आठवत होते.
'कल भी सूरज निकलेगा, कल भी पंछी गायेंगे. सब तुझको दिखाई देंगे, पर हम ना नजर आयेंगे. '
नवीन ठिकाणी, जुन्या दिवसाची, त्या मित्र-मैत्रिणींची किती आठवण झाली काय सांगू? परत कॉलेज वर गेल्यावर असं वाटलं....

'अब हम तो भये परदेसी, की तेरा यहा कोई नही.....'


खरंच तिथं कोणी आपलं नव्हतं.असो. अजूनही कधीतरी एकटं असताना हे गाणं ऐकलं की अस्वस्थ होतं. असं हे माझं रडवणारं गाणं. तुमचंही आहे काय?


-अनामिका