ससा आणि कासवाची गोष्ट

तुमच्या आणि आमच्या लहानपणी ऐकलेली गोष्ट आज मी नव्या पीढीच्या मुलांसाठी सांगणार आहे बरं!
             ही गोष्ट आहे ससा आणि कासवाची. एक होता ससा. जसा सगळ्या गोष्टींमध्ये असतोना तसाच. गोरा गोबरा, मऊ, लांब कानांचा, मण्यासारख्या लालचुटुक डोळ्यांचा आणि टुण्ण टुण्ण उड्‍या मारत झटकन पसार होणारा. एकदा एका कासवाशी त्याची मैत्री झाली. पण कासव होतं हळू, जसं नेहमी असतं तसचं. दोघेही एकाच पालकच्या मळ्यात कोवळा पाला खायला जायचे. ससा कासवाला म्हणाला,''किती रे तु हळू'' '' कासव म्हणालं, ''पण तुला माहिती आहे का, सगळ्या गोष्टींमध्ये ना मीच शर्यत जिंकतो.'' <!--break--> सशाला त्याचं हे म्हणणं जरा आवडलं नाही. नाक मुरडत ससा म्हणाला ''मग काय भाऊ लावायची का शर्यत परत एकदा? या समोरच्या डोंगरावरच्या त्या आंब्याच्या झाडापर्यंत''  कासवं म्हणालं '' हो पण जरा मला सराव करायला दोन दिवसांचा वेळ लागेल. तुला चालेल का?'' ससोबा म्हणाला, '' ठीक आहे मग रविवारी सकाळी नऊ वाजता इथेच भेटूया.'' शर्यत ठरल्यानंतर ससा तडक त्याच्या आजोबांकडे गेला. त्यांना म्हणाला,'' हे काय हो आजोबा प्रत्येक गोष्टीत कासवंच शर्यत का जिंकतं. मला ही गोष्ट खोटी पाडायची आहे. आता काय काय करु ते सांगा.'' ससोबाचे आजोबा त्याला म्हणाले,'' बाळा, जर न थांबता धावलं ना तरच जिंकता येईल शर्यत आणि झोप तर अगदी वर्ज्य. मी झोपल्यामुळेच शर्यत हारलो होतो. '' ससा म्हणाला,'' ठीक आहे मी लक्षात ठेवीन आणि शर्यत जिंकूनच दाखवीन.''


             रविवारी सकाळी ठरलेल्या वेळेवर कासव आणि ससा यांची शर्यत सुरु झाली. ससोबा अगदी वेगाने धावत सुटले. कासवही निरनिराळ्या युक्त्या लढवत कधी घरंगळत तर कधी वेगाने चालण्याचा प्रयत्न करत निघाले होते. अर्ध्या रस्त्यात ससोबांना एक मोठी टोपली दिसली त्यातून कोवळा पाला, गाजरं आणि मुळे डोकावत होते. ससोबांनी अदमास घेतला. कासव अजून ‍किमान दोन तास तरी त्यांच्या आसपास फिरकू शकणार नव्हते. ससोबा झाडाच्या सावलीत बसले आणि टोपलीतला पाला, गाजरं खाऊ लागले. टोपलीतल्या वस्तू संपत असताना ससोबांना एक छानशी गोल चमकणारी वस्तू दिसली. ससोबांनी ती आपल्या चेहर्‍या समोर धरली. तो एक आरसा होता. त्यांनी यापूर्वी ही वस्तू कधी ‍पाहिलीच नव्हती. पाण्यात अस्पष्ट दिसणारं त्यांचं रुपडं इतकं स्पष्ट दिसत होतं की ससोबा हरखले. ते त्या आरशात स्वत:ला न्याहाळू लागले, लांबलांब कान, छानदार डोळे, मिष्कील मिशा. आपल्या चेहर्‍याच्या विविध मुद्रा पहाण्यात ते इतके रमले की शर्यत बिर्यत साफ विसरले. संध्याकाळी घरी जाणार्‍या सूर्याचे किरण आरशात दिसल्यानंतर ससोबांना शर्यतीची आठवण झाली. ते वेगाने टुण्ण टुण्ण उड्या मारत आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचले, कासव तिथे त्यांची वाट पहात होते. ससोबा स्वत:शीच तणतणू लागले '' पण मी तर खूप पुढे होतो आणि आजोबांनी सांगितल्याप्रमाणे झोपलो पण नाही तरी कसा शर्यत हारलो.'' कासव म्हणाले,'' ससोबा मला सुद्धा आजोबा आहेत. तु जसं तुझ्या आजोबांना विचारलंस ना तसचं मी सुद्धा विचारलं आणि आम्ही दोघे ती भाज्यांची टोपली आणि आरसा कालच रस्त्यात ठेवून आलो होतो.''


तात्पर्य- खरोखर न थांबता पोहोचण्याचा प्रयत्न केला ना तरचं शर्यत जिंकता येते.