भारतात येऊन उणेपुरे दोन महिने झाले. त्याचा हा संक्षिप्त आणि वाकडा तिकडा बखरनामा, जसा सुचेल तसा:
मुंबई विमानतळावर आम्ही उतरलो खरे, पण आमच्या सहा बॆगांपैकी एकही उतरली नाही. त्यामुळे भारतातल्या पहिल्या सकाळी आंतर्वस्त्र खरेदी करण्यात आली ...
मग दोन दिवसांनी बॆगा आल्या. त्यांना आणायला विमानतळावर गेलो. कस्टममध्ये काहीही मनस्ताप न होता सहीसलामत बाहेर पडलो ...
मग त्या घेऊन पुण्यात. मागच्याच वर्षी जागा घेऊन ठेवली होती. ती उघडली तो घरात हीऽऽ धूळ. ती रात्र मित्राकडे घालवली. मग दुसया दिवशी पाणी घालून फरशी धुतली आणि संसार चालू झाला ...
"गुरुवारी लाइट जातात, त्यामुळे लॊंड्र्या बंद असतात, आणि इन्वर्टर नसेल तर घरातल्या इस्त्रीचाही काही उपयोग नसतो" हा धडा अजून मिळायचा होता; त्यामुळे एक इंटरव्यू कपड्यांऐवजी ऐनवेळी रद्द करावा लागला ...
पुण्याच्या रस्त्यांबद्दल बरंच वाईट ऐकलं होतं, पण त्यामानाने रस्ते बरेच सुखावह वाटले. कदाचित खड्डे तात्पुरते बुजवायचं काम नुकतंच पूर्ण झालेलं असावं ...
चारचाकी शिकायला क्लास लावला. अमेरिकेत बारा वर्ष गाडी चालवूनही गियर कळत नसलेल्या शिष्यांनी ड्रायव्हर मास्तरांची खूप करमणूक केली. "ओ! तुमचं नियम सोडा! टेरिंग फिरवा, आन घाला गाडी मधी!" असं खडसावत मास्तरांनी आम्हाला आता चांगलंच तयार केलं आहे. चारचाकी नोंदवून करून झाली. ती येईल दोनेक आठवड्यात ...
मुंबईतून डायरेक्ट अमेरिकेत गेल्याने दुचाकी चालवायची वेळ कधीच आली नव्हती ... त्यामुळे मित्र नको नको म्हणत असतानाही हट्टाने आणि हौसेने दुचाकी नोंदवली आहे. ती आली की शिकूच :) ...
चारचाकी आणि दुचाकी हाती येईपर्यंत तीनचाकी वाल्यांच्या घरांवर आमच्या खर्चाने कौलं चढवत आहोत ...
वाहन शिकायचा परवाना काढायला आरटीओत गेल्यावर मात्र तिथली शिस्तबद्ध सिस्टीम पाहून सुखद धक्का बसला (असेल, आम्हाला अपवादात्मक अनुभव आला असेल). तिथल्या पोलिसाकडे मी कौतुकाचे दोन शब्द काढले, तेव्हा तो चक्क लाजला बिजला ...
गॆसची प्रचंड टंचाई होती दिवाळीत. आमचा स्वत:चा गॆस मिळवण्यासाठी अर्जही स्वीकारायला तयार नव्हते (आजच स्वीकारला आहे. प्रतिक्षा यादीत ४३९ वा नंबर आहे). मित्राच्या ओळखीत कुणाचा तरी न-वापरता सिलिंडर मिळाला. तो संपल्यावर नवा आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर सकाळी सहापासून लायनी लावल्या ...
मुलीची शाळा चालू झाली, परीक्षा झाली, दिवाळीची सुट्टी झाली, आता पेपर मिळायला लागले आहेत. मुलीला चालू झालेली पोटदुखी ही पाणी बदलामुळे आहे की "मानसिक" आहे या संभ्रमात आम्ही असतानाच डॊक्टरांना अपेंडिसायटिसची शंका आली. त्याचं निदान अजून व्हायचं आहे, पण तोवर कन्येनं आता तिचा मानसिक स्पीडब्रेकर ओलांडला आहे असं वाटतंय. म्हणजे बरीचशी रुळली आहे. शाळेत कायकाय झालं याचे रिपोर्ट न विचारता मिळायला लागले आहेत ...
मुलीला शाळेच्या पहिल्याच दिवशी "मी <नाव><आडनाव>. <आडनाव> म्हणजे <जात>" अशी स्वत:ची ओळख करून देणाया मैत्रिणी भेटल्या ...
आयते "परीट"घडीचे कपडे वापरण्यात किती सुख असतं ते नव्याने अनुभवत आहोत ...
मध्येमध्ये भारतात येऊन गेलो असलो तरीही दिवाळी ही पहिलीच होती. त्यामुळे सगळं मनापासून नव्याने अनुभवलं, तेही चितळ्यांनी घरोघरी पोहोचते केलेले फराळाचे जिन्नस चाखत :) ...
बोटीनं पाठवलेलं सामान अजून यायचं आहे ... फर्निचर अजून बनतंय ... टी वी घ्यायचाय, पण फ्रीज, धुलाईयंत्र आणि रेडियो मात्र आले. सकाळी संस्कृत बातम्या, वगैरे आणि दिवसा "रेडियो मिरची" वगैरे ऐकणं चालू आहे ...
मराठी पुस्तकांची खरेदी अधाशासारखी झाली सुरुवातीला. त्यावर यापुढे नियंत्रण ठेवण्याचा प्रस्ताव आजच पास झाला आहे ...
सकाळ आणि एक्स्प्रेस नेमाने वाचला जातोय. गम्मत म्हणजे आंतरराष्ट्रीय बातम्यांपेक्षा पुणे पुरवणी आधी वाचावीशी वाटू लागली आहे ...
बॆंकांच्या व्यवहारांची घडी बसू लागली आहे (आउटस्टेशन चेकना मिळत असलेल्या सापत्न वागणुकीने चांगलाच वात आणला होता) ...
आपापल्या परीनं समाजोपयोगी कामं करणाऱ्या, आणि त्यासाठी स्वतःचा पूर्ण वेळ देणाऱ्या दोन व्यक्तींचं काम अगदी जवळून पाहायला मिळालं ...
भारत ऒस्ट्रेलिया लढतीच्या संध्याकाळी आम्ही बॉस्टन-मुंबईकर चक्क पर्वतीवर जाऊन बसलो होतो ...
तुळशीबागेत जाऊन खरेदी झाली ... श्रीकृष्ण भुवन मध्ये मिसळ आणि कावरेत मस्तानी चाखून झाली ... "कोनिझ्झा" खाऊन झाला ... पिझ्झा घरीही मागवून खाऊन झाला ... पुण्याच्या तडीपार असूनही दोन कोटी रुपड्यांस एक या म्याडचाप दराने विक्रीस असलेल्या बंगल्यांच्या स्किमा विझिटून झाल्या ... संभाजी पार्कात किल्ल्यांचं प्रदर्शन पाहून झालं ... लक्ष्मी रोडवर साडीखरेदी झाली ... घाटांची गम्मत पाहत पुणा मुंबई प्रवास झाला; दोनदा; तोही गर्दी नसलेल्या इंद्रायणीतून ...
अजून काय पायजेल? पैस्सा वस्सूल!
- कोंबडी