आम्हाला लुसलुशीत, शब्दबंबाळ साहित्य आवडते

मराठी वाचकांना लुसलुशीत, शब्दबंबाळ साहित्य आवडते असे मला वाटते. एकंदर मराठी साहित्यात (विशेषतः कवितांत) ललितलुलित, गोंडसगोजिरे शब्द, तसेच विशेषणांचा, क्रियाविशेषणांचा भडिमार दिसतो.

उदा.

चिंब दवात, बनात, जणू वितळले तारे

नक्षत्रांचे व्रण आणि चांदण्यांची आग....

संवेदनांची भिरभिरती पिसे आसमंतात काळीभोर अमावस्या

सारख्या ओळी किंवा,

पहाट झुंजूमुंजू,
प्रकाश झुंजूमुंजू
पाण्याशी झुकलेली,
फांदी ही झुंजूमुंजू

ह्या सारख्या ओळी कानांना सुखावून जातात. असल्या कविता वाईट की चांगल्या, हा वेगळा विषय आहे. पण वाचकांना अशा कानांना गोड, लुसलुशीत, झुंजूमुंजू कविता आवडतात, हे खरे.

कधीकधी तथाकथित हुशार वाचकांना (म्हणजे ज्यांना 'उच्च'पणे गुलजार, ग्रेस 'जीवघेणा' आवडत असतो) शब्दमधुर धूसरता आवडते असेही आढळून येतो.

धुक्यात धगते श्रांत कलेवर
पहाट हलते अंधुक अंधुक
निगूढतेच्या डोहाकाठी
पिप्यांत ओल्या डराँव बेडुक
असा हा प्रकार. पण तो वेगळा विषय.

तर ह्या गोष्टीला बऱ्याच अंशी मराठी वाचकच कारणीभूत असावेत. त्यांनी लेखकांना कवींना लोकानुनयी लिहिण्याची सवय लावली आहे. पण लेखक-कवी तेवढेच ह्या गोष्टीला जबाबदार आहेत. त्यांना 'रिस्क' किंवा धोका पत्करायची नसते. आणि असेच चांगलेचांगले कवी शहीद होतात. ज्यांत मुळातच दम नसतो, त्या पोकळ आणि आवखोर साहित्याला ललितलुलित शब्दांचा, विशेषणांचा, कॢप्त्यांचा भुसा लागतो असे माझे मत.

तुमचे मत काय?