नामाख्यान

"कालच्या पार्टीला हरीनं नेसलेली साडी किती सुंदर होती नाही का?"
"दुर्गानं दाढी काढून टाकायला नको होती. चांगली शोभून दिसत होती!"
अशा अर्थाची वाक्यं ओरिसा मध्ये तुमच्या कानावर पडतील. तुमच्या मनात काही तरी वेडेवाकडे  विचार येण्याच्या आत मला याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. तर ते असं की ज्या व्यक्तीचा हरी असा उल्लेख केला आहे ती मुलगी आहे आणि ज्या व्यक्तीचा दुर्गा असा उल्लेख केला आहे तो मुलगा आहे! 

हे असं का होतं? तर इथली काही नावं! सध्या पन्नाशीच्या आतबाहेर असणाऱ्या इथल्या काही बायांची नावं हरिप्रिया, बिष्णुप्रिया अशी असतात तर बऱ्याच पुरुषांची नावं रमाबल्लभ, दुर्गाप्रसाद अशी असतात आणि मग त्यांची संक्षिप्त रूपं हरी, बिष्णू आणि रमा, दुर्गा अशी होतात. इथले माजी मुख्यमंत्री जे. बी. पटना‌ईक यांचं संपूर्ण नाव जानकीबल्लभ पटना‌ईक. त्यांचा उल्लेख जानकीबाबू असा केला जातो. (बल्लभ चे स्पेलिंग Ballav  असे करतात. त्यामुळे RamaBallav हे आपल्यापैकी काही जण रमाबल्लव असे वाचतील आणि त्याचा अर्थ रमेचा स्वैपाकी असा लावतील! ते टाळायचे असेल तर हे वाचा!)

इथे नावांमध्ये विविधता तशी कमी आढळते. अशोक तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पुरीपासून द्वारकेपर्यंत सगळीकडे डझनावारी भेटतात. तसेच इथेही आहेत. आमच्याकडे एका प्रशिक्षणासाठी आलेल्या लोकांमध्ये एकाच कचेरीतील, एकाच विभागातील दोन अशोक कुमार मिश्रा होते. त्यांना वेगळं कसं ओळखतात असं विचारल्यावर उत्तर आलं की एक ए आणि दुसरा बी अशी व्हॅल्यू ऍडिशन त्यांच्या नावात कचेरीने केलेली आहे. बिभूतीभूषण हे इथलं एक अगदी कॉमन नाव, साधारण आता चाळिशीच्या पुढे असलेल्या लोकांमध्ये आढळतं. त्यानंतरच्या वयोगटात प्रशांतकुमार, सुशांतकुमार, सुदीप्त, प्रदीप्त ही मुलांची सरसकट नावं. अर्धेंदू, पूर्णेंदू, शुभेंदू, ललाटेंदू हीही नावं बरीच आढळतात. देबाशिष, शुभाशिष तर भरपूर. मुलींच्या नावांमध्ये स्मिता फारसं आढळत नाही पण स्मिताला शक्य तेवढे  उपसर्ग लावून बनवलेली नावे कानावर खूप येतात. उदा: अस्मिता, सस्मिता, सुस्मिता, शुचिस्मिता, मधुस्मिता,  इतकंच नव्हे तर बिस्मिता सुद्धा!  आपल्याकडे फारशी प्रचलित नसलेली पण इथे सरसकट असणारी मुलींची नावं म्हणजे नमिता, मिनती, प्रणती. संघमित्रा ह्याही छान नावाच्या दोन/तीन मुली मला माहिती आहेत. हे नाव शाळेतल्या इतिहासानंतर मी फक्त इथेच ऐकलं.  कलिंग युद्ध, त्यानंतर अशोकाचं हृदयपरिवर्तन ह्यामुळं हे नाव इथे प्रचलित झालं असेल. (जाता जाता: कलिंग, उत्कल ही ओरिसाचीच नावे. कलिंग युद्धाच्या वेळी अशोकाची छावणी ज्या टेकडीवर  होती ती टेकडी भुवनेश्वरच्या जवळच आहे.) इकडे संस्कृतप्रचुर आणि थोडी क्लिष्ट नावे देण्याकडे  बऱ्याच लोकांचा कल दिसतो. स्वातीस्निग्धा, सुमनसुधा, प्रज्ञापरिमिता अशी मुलींची नावे, तसेच मानसरंजन, बिश्वभूषण, तरुणकांती, नीलमणी अशी मुलांची नावे सर्रास आढळतात.   

इथे आडनावेही - इथे आडनावाला 'टायटल' म्हणतात-  मोजकीच आहेत. पटना‌ईक, साहू, महंती ही नावं अगदी आपल्या जोशी, देशपांडे, कुलकर्णी याच्यांसारखी.  कुठेही जा, अर्धा/पाव डझन सहज भेटलील. ओरिसाच्या आजपर्यंतच्या १३/१४ मुख्यमंत्र्यांमध्ये ३ पटना‌ईक आहेत. अर्थात त्यातील दोघे - बिजू पटनाईक आणि नवीन पटनाईक हे पितापुत्र आहेत.  पटना‌ईकांच्या स्पेलिंगात कधी कधी थोडा ’पाठभेद’ असतो. म्हणजे  पटना‌ईक, पट्टना‌ईक, पटनायक, पट्टनायक.  आपल्याकडे साठे, साठ्ये असते तसेच. आणखी सरसकट आढळणारी आडनावं म्हणजे मिश्रा, महापात्र, पंडा. दास हेही आडनाव खूप असतं. आमच्या शंभरेक लोकांच्या कचेरीत ७ दास आहेत. पण दास हे टिपिकल ओडिया नाव नाही कारण ते बंगालमध्येही असतं.

प्रधान, देब(देव), रा‌ऊत, भुजबळ, नायक (आपल्याकडच्या ना‌ईकसारखे) अशी महाराष्ट्रातील काही आडनावे इथे आढळतात. बारीक अशा आडनावाची बारीक आणि लठ्ठ माणसे भेटतात! आपल्याकडे अभ्यंकर, भांडारकर, दादरकर, वडुलेकर, वेलणकर अशी आडनावे असतात. इथे नुसत्याच ’कर’  आडनावाचे लोक असतात. आपल्याकडे नुसतेच जोशी तर इथे पटजोशी असतात. आपले सामंत तर इथले सामंतराय.

नावांच्या बद्दल घडलेली एक मनोरंजक घटना सांगितल्याशिवाय हे नामाख्यान पुरे होणार नाही. म्हणजे त्याचं असं झालं. माझी एक मैत्रीण इथे आली होती. तिला भुवनेश्वर दाखवायला मी घे‌ऊन गेले. आम्ही टॅक्सीतून हिंडत होतो. घरी आल्यावर ती मला म्हणाली. "ओरिसा मागासलेला आहे हे मला माहीत होतं पण इतका मागासलेला आहे याची मला कल्पना नव्हती." मी म्हटलं "इतका म्हणजे ’कितका’?" तर ती म्हणाली "इथे अजून बालविवाह प्रचलित दिसतायत." मी म्हटलं, "का ग बाई? असं का वाटलं तुला?" तर म्हणाली "आता रस्त्यात स्वागत समारंभांच्या किती तरी कमानी दिसल्या. त्यावर सुकुटी वेड्स टिंकू, झिल्ली वेड्स बापी, कुकून वेड्स मिठू असं लिहिलेलं होतं." मी हसून म्हटलं, "अग ते वरवधू चांगले सज्ञान असतात. तरीही त्यांचं पेट्नेम तसंच चालू राहिलेलं असतं. इथे तशीच पद्धत आहे. जर कमललोचन वेड्स बिश्वबंदिता असं लिहिलं तर लोकांना, विशेषत: नातलगांना चटकन कळणारच नाही की आपण आपल्या भाच्याच्या किंवा पुतणीच्या लग्नाला आलो आहोत."

मलाही सुरुवातीला हे ’पेट्नेम’ प्रकरण जरा मजेशीरच वाटलं होतं. पण ’ठेवलेली’ नावे बहुतेक वेळा क्लिष्ट असल्यानेही सोपे, सुटसुटीत नाव देण्याची जरूर भासत असेल. 'पेटनेम’ला  इथल्या भाषेत डाकऽना असे म्हणतात.(क जरा लांबवायचा आणि म अगदी म्हटल्या न म्हटल्यासारखा उच्चारायचा. डाक म्हणजे हाक, नाम म्हणजे नाव, डाकऽना म्हणजे हाक मारण्याचे नाव).  माझी मुले शाळेत होती तेव्हा त्यांना काही "डाकऽना" नाही ह्याचे वर्गातल्या मुलांना आश्चर्य वाटायचे. शाळेच्या नोंदणीपुस्तकातील नावानेच  हाक मारायची म्हणजे ’काहीतरीच’ असं त्यांना वाटत असावं! 

आता मात्र हे नामाख्यान पुरे करते. कारण तेवढ्यात माझा सुशांतकुमार नावाचा साहेब आला तर कामाच्या वेळात मी हे लिहितेय हे पाहून तो स्वत: अशांत होईल आणि मलाही अशांत करून जाईल, किंवा माझी सस्मिता नावाची मदतनीस आली आणि तिनं हे पाहिलं तर ती सस्मिताची विस्मिता (बिस्मिता) होऊन जाईल!