लेखनप्रकार : गूढकथा.
राधेच्या पायांतील शक्ती क्षीण होत चालली होती. आपण रस्ता चुकलो हे तिला जाणवत होते तरी काट्याकुट्यांची पर्वा न करता जिवाच्या आकांताने वेड्यासारखी धावत होती. अंग ठणकत होतं, डोळ्यांतील अश्रूंची संततधार थांबत नव्हती, कपाळातून रक्तही ठिबकत होतं, पायांत पेटके येत होते. काळोखात एक दोनदा तिने मागे वळून पाहिले. नवरा आपल्या पाठलागावर असावाच या विचारात तिने हमरस्ता केव्हाच सोडला होता आणि पाय नेतील तिथे ती धावत होती... श्वास फुलला, उर फुटायची पाळी आली, पुढे एकही पाऊल टाकणं अशक्य झालं तशी रानातल्या एका मोठ्याशा दगडावर तिने बसकण मारली.
धाय मोकलून रडावं अशी इच्छा अनावर होत होती पण त्याहूनही प्रबळ इच्छा घरी परतायची होती. घरी... तिच्या हक्काच्या घरी, तिच्या आई-बाबाच्या. राधेच्या डोळ्यासमोरून गेल्या काही महिन्यांतल्या घटना तरळून गेल्या.
राधाची बारावी झाली तशी बाबांना आपल्या लाडाकोडात वाढलेल्या पोरीच्या लग्नाचे वेध लागले होते. पुढे शिकायची राधाची इच्छा होती पण आईबाबांना तिला एकटीला लांब तालुक्याच्या गावी पाठवायचे नव्हते. फार पुढे शिकून करायचे तरी काय होते म्हणा, चांगल्या भरल्या घरात पोरीला दिली की घरदार, जमीनजुमला हेच सांभाळायचं होतं. सहा महिन्यांपूर्वी साखरगावच्या सावंतांच्या मुलाशी, राजा सावंताशी तिचं लग्न ठरलं तेव्हा आई-बाबा किती आनंदात होते. थाटामाटात त्यांनी आपल्या एकुलत्या एका लेकीचं लग्न लावून दिलं होतं. सावंतांची भरपूर शेतीवाडी होती. पोरीला कशाची ददात पडणार नाही असं बाबांना वाटत होतं. लेकीला लग्नात चांगले ठसठशीत दागिने केले होते, जावयाला नवी मोटरसायकलही घेऊन दिली होती. सासू सासरे, नणंद, सासरची इतर मंडळी सर्वांचा मान ठेवला होता. काही करायचं म्हणून कमी ठेवलं नव्हतं. राधाही आनंदात होती. नवरा देखणा होता, शिकलेला होता. सासरचा वाडाही चांगला ऐसपैस होता. नणंद तिच्याच वयाची होती.
लग्नानंतर दोन महिने कसे भुर्रदिशी उडून गेले ते राधाला जाणवलंही नाही. घरात सासू-सासरे तिला प्रेमाने वागवत होते. नवराही लाड करत होता. नणंदेशी चांगली मैत्री जमली होती. 'आपली दृष्ट तर लागणार नाही ना या आनंदाला?' असे चुकार विचार राधेच्या मनात येत. एके दिवशी रात्र होऊ लागली तरी नवरा घरी परतलाच नाही. रात्र पडली तशी राधेने सासूकडे विचारणा केली पण तिने ताकास तूर लागू दिली नाही. इतरवेळेस दिलखुलास गप्पा मारणार्या नणंदेनेही 'दादा शेतावरच झोपला असेल.' असे म्हणून वहिनीची बोळवण केली. त्या रात्री राधेच्या डोळ्याला डोळा लागला नाही. दुसर्या दिवशी सकाळीच नवरा परतला. राधेने त्याला विचारणा केली तशी त्याने तिला उडवून लावले. 'शेतावर काम होते, परतायला उशीर झाला' असे काहीतरी त्रोटक उत्तर दिले.
हा प्रकार त्यानंतर नेहमीच होऊ लागला. आठवड्यातून दोन-चारदा नवरा गायब होत असे. घरातल्या गडीमाणसांकडून राधेच्या कानावर हळूहळू एकएक गोष्टी येऊ लागल्या. खालच्या आळीत नवर्याचे प्रकरण होते म्हणे. घरातल्या कोणालाही ते पसंत नव्हते पण करतात काय? लग्नानंतर पोरगं ताळ्यावर येईल असे सर्वांना वाटायचे. राधेला या प्रकाराची कुणकुण लागली तशी तिने सासूला स्पष्टच विचारले. सासूने कोणतेही आढेवेढे न घेता गोष्ट कबूल केली. एक मूल झालं की सगळं बरं होईल. राजा मनाने चांगला आहे. तो ताळ्यावर यावा असंच आम्हाला वाटतं. संसारात पडला की जबाबदारी येईल. सासर्यांनीही सुचवलं की वंशाला दिवा लवकर येऊ दे. राधेला थोडा धीर वाटला. सासू-सासरे म्हणतात तोही उपाय करून पाहायला तिची हरकत नव्हतीच. दरम्यान नवरा राधाला घेऊन तिच्या आईबाबांना भेटून आला. राधेने या प्रकाराची त्यांना कल्पना दिली नाही. उगीच त्यांच्या जिवाला घोर का म्हणून ती गप्प राहिली.
पुढचे काही महिने असेच निघून गेले. सहा आठ महिन्यांत काही नवीन घडलं नाही तशी सासर्यांनी तालुक्याला जाऊन तपासणी करून घ्यावी असे सुचवले. राधाला घेऊन नवरा तालुक्याला जाऊनही आला. तपासणीत राजात दोष असल्याचे आढळले. वैवाहिक जीवनात तशी बाधा नव्हतीच, हा दोषही योग्य औषधोपचाराने दूर होण्यासारखा होता. राजाला मात्र हे काही केल्या पटेना. "डॉक्टर लेकाचे काही बाही सांगतात. मी पूर्ण पुरुष आहे. तुलाच नाही आणि चार बायकांना नांदवेन मी. मला कोणत्या औषधोपचारांची गरज नाही."आणि तेव्हापासून घरातली सगळी चक्रं उलटीपालटी फिरायला लागली. सासर्यांनी राधाशी बोलणं सोडलं. सासू तिला कोणत्याही कामाला हात लावू देईना. बोलली तर घालून पाडून काहीतरी बोलत असे. नणंदही दूर दूर राहत असे. राजा तर तिचा जणू दुःस्वासच करत होता. सरळ शब्दांत बोलणं त्याने सोडून दिलं होतं. रोज काही ना काही कारण काढून भांडण सुरू करे. एक दोनदा तिच्यावर हातही उगारला होता. राधेचं जगणं कठिण होऊ लागलं होतं. आई-बाबांकडे जावं, एकवार त्यांना भेटूनतरी यावं अशी इच्छा होत होती. तसे तिने नवऱ्याकडे, सासूकडे बोलूनही दाखवले होते परंतु तिला उडवाउडवीची उत्तरे मिळत.
असेच एके दिवशी राजा रात्र बाहेर काढून सकाळी परतला तसा राधेने त्याला जाब विचारला. 'नांदवायचं नसेल तर घरी सोडून या. आईबापाला मी जड नाही.' म्हणून सांगितलं. शब्दाला शब्द वाढत गेला. राधाही हट्टावर आली होती. राजाने हात उगारला, "घरी जायचंय? जाऊन त्यांना माझ्याबद्दल सांगायचंय? गावात आमच्या घराचं नाव बद्दू करायचंय? थांब! घराबाहेर पडता येणार नाही अशी दशा करेन तुझी." सट्टदिशी थोबाडीत ठेवून दिली तशी "आई गं!" म्हणत राधा खाली बसली. राजाच्या अंगात जसा राक्षस शिरला होता. त्याने लाथा बुक्क्यांनी तिला बडवायला सुरुवात केली. राधा बेंबीच्या देठापासून ओरडत होती पण सासू तिच्या वाटेला फिरकली देखील नाही. राजाने तिचा हात धरला आणि तिला फरफटवत तो गोठ्याच्या दिशेने घेऊन गेला. गोठ्याच्या मागच्या बाजूला धान्य साठवायची खोली होती. त्यात त्याने राधाला ढकलले.
"घरी जाऊन बापाला काय सांगशील? नवरा, नवरा नाही म्हणून? माहेरी कशी जातेस बघू. जीव घेईन माहेरचं नाव पुन्हा काढलंस तर. याद राख. राहा पडून या अंधारवाड्यात. डोकं ताळ्यावर येतं का ते बघ."