स्त्रीमुक्तीची गरज... पण कुणाला?
"आधी तिन्ही मुलीच ना? वा वा! आता मुलगा झाला, किती छान!"
प्रत्येकाच्या - स्त्री असो वा पुरुष - एकदा तरी कानावर पडलेलं हे वाक्य, त्या क्षणी किमान मुलींच्या मनात काहीतरी प्रतिक्रिया उमटवून जात असतंच. त्याकडं तितक्या बारकाईनं मुली पहात नसतीलही; पण त्याचा त्यांच्या भावविश्वावर परिणाम होत असतोच. मुलगा आणि मुलगी यातील भेद लहानपणापासूनच समाजातील विविध व्यक्तींकडून आणि पालकांकडूनही केला जातो. त्याची तीव्रता विकसित आणि विकसनशील भागात वेगवेगळी असते एवढंच. मुलीला तिच्या स्त्रीत्वाची जाणीव टोकदारपणे होऊ लागते ती पौंगडावस्थेत आणि महाविद्यालयीन कुमारावस्थेत.आजुबाजूला घडणाऱ्या विविध घटनांमधून आणि अनुभवातूनही. महाविद्यालयीन वय म्हणजेच आयुष्यातील संवेदनशील आणि कोवळे वय. या वयात अनेक गोष्टींकडं बघण्याचा दृष्टीकोन बहुतांशी थोडा टोकाचाच असतो याचं कारण म्हणजे अनेक बदलांबरोबर होऊ लागलेली `आपलं व्यक्तीमत्त्व वेगळं आहे' ही जाणीव! मुलगा किंवा मुलगी म्हणून विशिष्ट भिन्न वर्तन अपेक्षित आहे या समजाविरुद्ध याच वयात मन बंड करून उठतं ते या जाणिवेतूनच. याच प्रक्रियेतून पुढं मुलगी असणं, एक स्त्री असणं ही बाब मुलींच्या अस्मितेचा भाग बनते. वय वाढत जातं तसं स्वतंत्रपणे, पुरूषांच्या बरोबरीनं आणि स्वावलंबी आयुष्य जगण्याकरता प्रत्येक स्त्रीची स्त्रीमुक्तीची स्वतःची वेगळी व्याख्या तयार होऊ लागते.