करदोरा-एक ग्रामीण कथा

करदोरा

कडाक्याची थंडी पडली होती. म्हातार्‍या माणसांना थंडी जास्तच वाजते, म्हणूनच पर्वती अन् कुंडलिका मुंबईत एका आलिशान बंगल्याच्या बाल्कनीत उन्हाला बसले होते. गळ्यात सोन्याचं डोरलं, हातात पाटल्या अंगावर चांगलं लुगडं नेसून खुर्चीत ती बसली होती. दोघं येणार्‍या-जाणार्‍या मोटार गाड्या पहात होते. सुनबाई सुद्धा मोठ्या गुणाची होती. ती प्रेमानं त्यांची सेवा करीत होती. यशवंता आला. तो आई-वडिलांच्या पाया पडला. 'आई येतो गंs' म्हणून तो कामासाठी बाहेर गेला. त्याच्या पाठमोर्‍या आकॄतीकडं बघत त्यांना आपली तीस वर्षापूर्वीची परिस्थिती आठवायला लागली.... खरंच त्यांची त्यावेळची परिस्थिती पाहिली तर ही प्रगती कुणाला न पटणारीच होती....
    "आवं घरात दान्याचा कण नाही, शिजवावं तरी काय?" पारी आपल्या कारभार्‍याला सांगत होती. अंगावरलं कांबरून त्यानं बाजूला सारलं, चूळ भरली.
    "आलो काय तरी जमतंय काय बघतो." म्हणून तो बाहेर पडला. मे महिन्याचे दिवस. कोल्हापूर पासून  दहा कोसावरलं गाव. काम शोधून मिळत नव्हतं. अशी गावची स्थिती. गेलेला धनी दुपार झाली तरी परत आलेला नव्हता. सकाळपसून पोराच्या पोटात फक्त पाणीच होतं. पोटाला टॉवेल गूडाळून तो कोपर्‍यात बसला होता. त्याच्या पोटात कावळ्यांनी धुमाकूळ घातला होता. पोराची हालत पाहून तीचा जीव तळमळत होता. त्याला काय तरी करून घातलं पाहिजे म्हणून तिच्या जीवाची घालमेल होत होती. सूर्य तर आग ओकत होता. ती पोराजवळ जायची. त्याच्या डोक्यावरनं हात फिरवायची. तिची ती घालमेल यशवंत किलकिलं डोळं करून पाहत होता. गेली वर्षभर पार्वती घरात होती. तिला एका बाजूला लकवा मारलाता. चांगलं चार घास खाऊनपिऊन असलेलं घर हिच्या आजारपणात घाईला आलेलं. दाव्याची जनावरं कधीच विकलीती. आजारपणातून थोडी बरी झालती, पण तोपर्यंत संसाराचा कणाच मोडलाता. मोठ्या हिम्मतीनं तिनं संसार उभा केलता. पण आजारी पडल्यानं वर्षाच्या आतच मोडून पडलाता. डोळ्यातनं टिप गाळण्यापेक्षा ती काही करू शकत नव्हती. दुपारी तीनच्या सुमारास कुंडलिकराव घराकडे येताना दिसलं. कायतरी धनी घेऊन आलं असतील. आता पोराच्या पोटात दोन घास पडतील, या आशेने ती उठली. ते घरात आलतं. दोन कणसांशिवाय त्यांच्या हातात काही नव्हतं. ती कणसं तिनं घेतली. चुलीजवळ गेली. शेणपूट घालून चूल पेटवली. कुंडलिकरावांनी पोराला पाहिलं तसं त्याना रडूच कोसळलं. ते हूंदके देऊन रडाय लागले. पोराला जवळ घेतलं अन् हुंदके देतच,
    "हे देवा परमेश्वरा काय हे दिस दाखावलंस? माझा पोटचा गोळा उपाशी ठेवलास. मी काय करू?"
    एवढ्यात दारावर धाकलं पाटील आलंत.
    "कुंडलूतात्या गार उपसायची हाय, आबांनी तुला बोलावलंया."
    त्याला देवच आपल्या मदतीला धावून आलाय असं वाटलं. संध्याकाळच्या जेवणाची सोय झाली म्हणून त्यानं डोळं पुसलं.
    "मी आलोच मालक. तुम्ही व्हा पुढं."
    माणसं जमाय संध्याकाळ झाली. सहा वाजता गार उपसायला सुरवात झाली. प्रत्येक बुट्टी टाकताना त्याला त्रास होत होता. पोटात आग पडलीती. अंगात त्राण नव्हता, तरीसुद्धा पोराच्या पोटात चार घास पडतील म्हणून जीव ओतून तो गार उपसत होता. पहिली ट्रॉली एका तासात भरली. ट्रॉली शेतात ओतायला गेली. टिपूर चांदणं पडलं होतं. तरीबी ते चांदणं त्याला भकास वाटत होतं. पाटलीनं बाईनं चहा दिला. आज दिवसभरात पाण्याव्यतिरिक्त त्याच्या पोटात चहा चालला होता. त्याच्या पोटातलं कावळं जरा शांत झालं. पुन्हा ट्रॉली भराय सुरवात झाली. घड्याळाचा काटा पुढं सरकतं होता. तसतसं त्याला आपल्या उपाशी बायका पोराचं केविलवाणं चेहरे दिसत होते. कधी एकदा गार उपसून होतीया अन् तांदूळ घरला घेऊन जातोय असं झालंतं. नऊ वाजता गारीचा तळ लागला. त्याला आनंद झाला. हातपाय धुतलं तसं थोरलं मालक म्हणालं,
    "कुंडलिका, हतासरशी येताना शेतातली लाकडं टाकून आणा जावा ट्रॉली येताना रिकामी येतीया."
    "जी मालक" म्हणून तो ट्रॅक्टरच्या मागं चालू लागला. विचाराचं काहूर डोक्यात माजलंत. यायला वेळ झाला अन् दुकान बंद झालं तर? ट्रॉली मागून चालताना आपल्या डोक्यावरती कुणीतरी दहा मणाचं ओझं दिलंय असं वाटाय लागलं. पैसे मिळणार या आशेने तो वाड्यात शिरला, पण पाटलांना गाढ झोप लागली होती. जड अंतःकरणानं तो घराकडे चालला. त्याला वाटलं पाटलीन बाई कडून भाताचा हेंडा पोराला मागून घावा. पण धाकट्या वैनी साहेबांच्या पुढ्यात मागायचं कसं, त्याला लाज वाटाय लागली. त्याचं पाय पुढे सरकत नव्हतं. आता पोराच्या पोटात काय घालायचं याचा विचार त्याला सतावत होता. पोरगं वाट बघत दारातच बसलं होतं. बाला येताना बघून त्याला आनंद झाला. ते पळत त्याच्याकडं गेलं. पण हातात काहीच नव्हतं. पोराला उचलून घेतलं. त्याचं दोन मुकं घेतलं. त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवताना त्याच्या मनाची घालमेल सुरू झाली. डोळ्यातनं टिप गाळीतच तो आत आला. बायकोच्या गळ्याला जाऊन पडला.तो रडाय लागला. बायको समजावण्याच्या सुरात म्हणाली,
    "धनी, नका काळजी करू आजच्या दिस पाणी पिऊनच रात्र काढू."
    माठातलं पाणी तिघंबी प्याली अन् अंथरुणावर पडली. यशवंता या कुशीवरून त्या कुशीवर होत होता. त्याला भूक अनावर झालती. सकाळपासून फक्त मक्याचं दाणं पोटात गेलंतं. त्याला आता कोतमिरेनी रानात केलेली कलिंगडं दिसू लागली. ती कलिंगडं काढायला आल्यात हे त्यानं पाहिलं होतं. सकाळी यशवंता उठला आईला सांगितलं,
    "आलो जरा इथनं."
    तो गेला कलिंगडच्या रानात. कोतमिरे कलिंगड राखणदारीला असायचा. पण तो नव्हता. या संधीचा फायदा त्यानं घेतला. इकडं तिकडं बघितलं, तिथलं एक मोठं कलिंगड तोडलं. लांब झाडीत बसून त्यानं ते दगडानं फोडलं. जसजसं कलिंगड पोटात जाऊ लागलं तसतसं त्याला बरं वाटू लागलं. एवढयात पाठीमागून म्हादबानं त्याच्या पेकटात लाथ घातली. तसं ते 'आईs गं' करतच ओरडलं.
    "चल तुला दावतो इंगा, चल चावडीत."
    असं म्हणत त्यानं त्याला ओढाय सुरुवात केली. यशवंता हात जोडून म्हाणाला.
    "एवढ्या डाव चूक माफ करा. परत अशी चूक आईच्यानं हुणार नाही."
    "चूक करतंस नी माफी मागतंस. तुझ्या आईला तुझ्या", असं म्हणत त्यानं ओढायला सुरुवात केली.
    शेतातनं गावात आल्यावर म्हादबाला चेव चढला. परत कोणी आपल्यात चोरी करताना दहा वेळ विचार करावा म्हणून त्यानं मारायला सुरुवात केली. यशवंता रडत होता. लोक विचाराय लागली.
    "काय झालंरं म्हादबा?"
    "कलिंगड चोरूज खाईतं नव गा. गावलंय सरपंचाकडं नेतो." सरपंचाला म्हादबानं वॄत्तांत सांगितला. त्यानी शिपाई पाठवला. तो गेला बोलावाया.
    "कुंडलिका सरपंचानी बोलावलंय."
    "कारं काय काम हाय?"
    "तुझ्या पोरग्यानं प्रताप केलाय."
    "काय केलं त्येनं?"
    "कलिंगड चोरलं, म्हादबाच्या शेतातलं." हे ऐकताच कुंडलिका मटकन् खालीच बसला. शिपाई त्यातनं म्हणालाच, "असलं पोरगं जन्माला आलं तवाच नरडं का दाबलं नाहीस." कुंडलिकाला माहिती होतं पोरगं असं का वागलं. शिपायाच्या पाठीमागून चालताना तो नशिबाला दोष देऊ लागला. आणखी काय काय बघायला लावतोस देवा? झटकन् त्यानं म्हादबाचं पायच धरलं.
    "एवढा डाव माफ करा मालक, बारकं प्वार हाय त्येला काय कळतंया. एवढ्या डाव चूक पोटात घाला मालक."
    यात आपल्या पोराची काय चूक नाही हे माहीत असूनही त्यानं जड अंतःकरणानं त्याला मारलं. ते रडत म्हणाय लागलं.
    "बाबा परत नाही असं करत, उपाशी पाणी पिऊन राहतो. पण मारू नगंस, बाबा लय लागतंया मारू नगंस."
    त्यानं हातच जोडलं तसं कुंडलिकाला कालवल्यासारखं झालं. त्याला आपणच रडावं असं वाटाय लावलं. चाबकाच वाद आपणच मारून घ्यावं असा विचार त्याच्या मनात आला. हात सैल झाल्याचं पाहून यशवंता पळत सुटला. त्याचा गाव आता खूप लांब राहिलाता. पळत-पळत रेल्वे स्टेशनवर आला. भितभितच त्यानं रेल्वेच्या डब्यात प्रवेश केला. कोपर्‍यात जाऊन बसला. थोड्याच वेळात रेल्वे सुरू झाली.
    सकाळी त्याला जाग आली तेव्हा रेल्वे थांबलेली होती. तो बाहेर आला. लोकांचा महापूर दिसत होता. सर्वजण  गडबडीत होते. भितभितच चड्डी अन् अंगरखा घातलेला यशवंता मुंबईच्या गर्दीत घुसला.
    सुरवातीचे दोन दिवस त्यानं भिकच मागितली. संध्याकाळी फुटपाथवर झोपायचा. तिथेच बुट पॉलिश करणारी मुलं झोपायची. ती फार पैसे खर्च करायची. नवीन नवीन पदार्थ खायची ते पाहून त्यालाही वाटू लागलं. आपण बूट पॉलिस करावं. पण साहित्य खरेदीसाठी त्याच्याजवळ पैसे नव्हते. आपण काय करावं अन् पैसे जमा कारावेत? भीक मागावी का? इतक्यात त्याचा हात कमरेला गेला. त्याच्या कमरेला एक चंदीचा करदोरा होता. त्याच्या आईन सोन्याचं डोरलं विकून पितळेचं डोरलं केलं. पण पोराच्या कमरेचा करदोरा विकला नव्हता. यशवंताला हे माहीत होतं. याचं पैसे येतील. त्यानं त्यातल्याच एका पोरग्याला विचारलं.
    "मला चांदीचा करदोरा विकून बूट पॉलिस साहित्य घ्यायचं आहे. हा कूठं विकूया?"
    ते म्हणालं,
    "मीच घेतो. तुझ्याकडं पैसे झालं की परत माझं मला पैसे दे, अन तुझा करदोरा परत घे."
    त्यानं करदोर्‍याच्या बदल्यात याला साहित्य घेऊन दिलं. बूट पॉलिशचा धंदा सुरू झाला. पहिल्याच दिवशी त्यानं चांगला तीस रुपयांचा धंदा केला. चौथीची परीक्षा पास झालता. त्या चौथीच्या पुस्तकातलं इतिहासाचं पुस्तक त्याचा जीव की प्राण होतं. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला की त्याला वीरश्री चढायची. म्हणूनच त्यानं पहिल्या कमाईचं इतिहासाचं पुस्तक खरेदी केलं. रोज सकाळी कामावर जाताना त्या पुस्तकातल्या महाराजांच्या फोटोच्या पाया पडायचा अन् जायचा. त्यामुळे त्याच्यात वेगळंच बळ यायचं.
    इकडे आईनं अंथरूण घरलं होतं. 'यशवंता यशवंता'चा जप करत होती. कुंडलिका हिचं दु:ख पाहायचा अन् परगावी राहणारी लोकं गावी आली की विचारायचा,
    "आमचा यशवंता कुठं दिसला का?"
    अशातच यशवंताला एक गाववाला भेटला. त्या गाववाल्यानं सगळी हकीकत यशवंताला सांगितली. त्याच्याकडून त्यानं घराकडे शंभर रूपये पाठवले. त्या शंभर रुपयापेक्षा आपलं पोरगं व्यवस्थित हाय हे ऐकून ती उठून बसली. सगळीकडं सांगत सुटली,
    "माझ्या यशवंतानं पैकं पाठवलं पैकं." दोघंबी त्या नोटकडे बघत आनंदाश्रू गाळू लागली.
    इकडे पावसाळा सुरू झाला होता. सर्वांनीच बुट पॉलिस बंद करून छत्री दुरुस्तीचा धंदा सुरू केला. वर्षात तसे त्याचे तीन धंदे व्हायचे. बुट पॉलिश, छत्री दुरुस्ती बरोबर तो स्टोव्ह रिपेअरी सुद्धा करायचा. पैसे मिळत होते. इतर मुलांच्या प्रमाणं हा चैनी करत नव्हता. ती पोरं याला सिगारेट ओढायला सांगायची, पण पैसे लागत्यात म्हणूनही तो तिकडे कानाडोळा करायाचा. मित्रांच्या ओळखीनं बँकेत खातं उघडलं. पैसे साठाय लागले. गावकडे पैसे पाठवायचा. त्यानं जीवनात एक ठरवलं व्यसन कुठलं लावून घ्यायचं नाही.अन् काय वाटेल ते झालं तर चालंल पण चोरी करायची नाही. फक्त कष्ट आणि कष्ट करायचं. एखादे संकट आलं की चौथीचं इतिहासाचं पुस्तक काढून शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायचा. पुन्हा त्याच्यात हिमंत यायची, त्याचं बळं वाढायचं.
   दिवसामागून दिवस जात होते. आज त्याच्या जीवनातला महत्वाचा टप्पा होता. त्यानं रिक्षा घेतली होती. रिक्षाची चाकं फिरू लागली. पैसे जमाय लागलं. वर्षात तीन धंदा करणारा यशवंत गप्प बसंना. सहा महिन्यातच त्याच्या लक्षात आलं. जुन्या रिक्षा देणे-घेणेचा धंदा आहे. हा कमिशन बेसिसवर चालतो. मग काय त्यानं रिक्षा चालवत चालवत कमिशन बसिसवर रिक्षा देणे-घेणेचा व्यवसाय सुरू केला. ज्या स्टॉपवर रिक्षा थांबायची तिथे ओळखी करून घ्यायचा. कुणाची रिक्षा द्यायची आहे? कुणाला पाहिजे आहे काय? विचारायचा. अशानं ओळखी वाढल्या. विक्री वाढली. रिक्षा विकून त्यानं टॅक्सी घेतली. टॅक्सी देणे-घेणेचा सुद्धा व्यवसाय सुरू केला. कुणाला न फसवता धंदा करायचा. लोकांचा विश्वास वाढल. जो-तो म्हणायचा,
    "टॅक्सी पाहिजे, आमचा दोस्ता हाय की यशवंता. जावा त्याच्याकडं."
    प्रगतीची एक एक पायरी चढत होता. लग्न झालं मुलगा झाला. एकाच मुलग्यावर ऑपरेशन केलं. आज यशवंता चाळीस वर्षाचा झालता. दादर मध्ये एक घर घेतलं. स्वतःचा कार बाजार सुरू केलता. आजची परिस्थिती पाहून आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळत होते.
    यशवंता ज्यावेळी मुंबईत आला, त्यावेळी त्याच्याजवळ फक्त होती चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा अन् करदोरा. तो करदोरा त्यानं जपून ठेवलाय. आजही ज्या ज्या वेळी त्याच्यावर संकट येतात त्यावेळी तो शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतो अन् संकटाला दोन हात करतो.

मला भावलेले दत्ताराम

'दत्ताराम गेले' अशी बातमी कालच सकाळी एका फोरमवर वाचली. मन थोडे बधिर झाले पण दिवसभरच्या कामाच्या गडबडीत मी ती विसरून गेलो. एकदा वाटले, ही बातमी खोटी असावी. पण जेव्हा संध्याकाळी परत बघितले तेव्हा खात्री पटली. वाईट बातम्या कधीच खोट्या नसतात. घरी परतत होतो, तेव्हा ह्या बातमीची मला पुरती जाण आली होती. आजूबाजूला शहरातली नेहमीची गजबज होती, नेहमीचीच रोषणाई होती, पण मनात मात्र अंधार दाटून आला होता.

बेरीज वजाबाकी

परदेशात येऊन आपण काय मिळवतो आणि काय गमावतो?

बेरीज : पैसा, स्वातंत्र्य , कामाचे समाधान, शिस्त इ....

वजाबाकी: आपली माणसे, समाज, देशातील चवीचे खाणे, आपली बोलीभाषा आणि बरेच काही....

परदेशात स्थायिक झालेले बरेच सभासद मनोगतावर आहेत म्हणून आपले मत द्यावे. देशातील नागरिकही यावर मत देऊ शकतील.

मन पाखरू पाखरू...

एकच मजकूर अनेक ठिकाणी लिहू नये...
सुधारणा करून लिहिण्यासदेखील वाव नाही एकंदरीत...
काळ्या दगडावरची रेष म्हणावी. आता दगड महत्त्वाचा की रेष? रेषेचे महत्त्व न पाळल्याने रामायण झाले...पण ५००० वर्षांनीही आपण दगडामध्येच अडकतो.
दगडाचेही किती प्रकार पण आपले आणि परके करायचे व आपला दगड टणक म्हणायचा...दगडात झरा असो की नसो.
आपले दगड दुसरीकडे गेले तर त्यांनी आपली टिमकी वाजवायची पण दुसरे दगड आपल्याकडे आले की त्यांनी आपले व्हावे ही अपेक्षा करायची...
बाळ्या आणि कार्टे...

उजवे आणि डावे म्हणजे नक्की काय लहानपणी कळत नसे...धुता-जेवता, बाया-दाहीना, लेफ़्ट-राइट एव्हढेच समजत असे...
राइट किती राँग आहे कळायला ३५ वर्षे, काही राज्ये आणि काही देश लागले... लहानपणापासूनच हुशार(!) म्हणे...
६ डिसेंबर ९२, १२ मार्च १९९३, ९ सप्टेंबर २००१ ते ७ जुलै २००६ सगळ्याचे रंग सारखेच असतात हे कळले. गंमतच आहे...हिरवा, भगवा, निळा, तिरंगा, आडवा तिरंगा आणि  लाल पट्टे, लाल फुल्या एकत्र केले तर पांढरा होतो...काळ्याचे पांढरे आणि पांढऱ्याचे काळे...

बार्सिलोना

१९९२ चे बार्सिलोना ऑलिंपिक आणि स्पेनमधील सुप्रसिद्ध केशर एवढीच 'बहुमूल्य' माहिती मला स्पेनबद्दल होती.पुढे स्पॅनिश मंडळींशी दोस्ती झाल्यावर त्यांचा साधारण आपल्या पुलावासारखा असलेला pyella rice आणि टॉर्टिला नव्हे टॉर्टियाशी ओळख झाली.स्पेनमधील कातालोनिया,जर्मनीतील बायर्न, आणि महाराष्ट्रातील पुणे यांच्यातील सारखेपण एकच, इतरांपेक्षा आपले वेगळेपण, आपली वैशिष्ट्ये जपत राहणे!अगदी भाषेपासून ते विमानसेवेपर्यंत कातालोयनांचे इतर स्पेनपासून वेगळेपण दिसते,स्पेनमध्ये आयबेरियन एअर लाइन्स आणि कातालोनियन एअर लाइन्स अशा दोन मुख्य विमानसेवा आहेत.(तशी बायरिश डॉइश आणि पुणेरी मराठीही आपले वेगळे अस्तित्व दाखवतेच म्हणा!)तर एवढ्या 'ज्ञाना'वर आम्ही बार्सिलोनाला जाणाऱ्या विमानात बसलो.
उण्यापुऱ्या दोन तासाचा तर विमानप्रवास!हवा चांगली असल्याने खिडकीतून आधी मेडेटेरेयन समुद्र आणि किनाऱ्यावर वसलेले बार्सिलोना दिसू लागले‌.सारे सोपस्कार आटोपून बाहेर आलो तर नुसती जत्रा भरल्यासारखे दिसत होते.भरपूर गजबजाट होता.फ्रांकफुर्ट सारख्या अतिव्यस्त विमानतळाबाहेरही असा गजबजाट नाही.टॅक्सीवाल्याला मोडके का होईना इंग्रजी येत असल्याने हॉटेलपर्यंत सरळ आलो‌. स्वागतकक्षात ठेवलेले नकाशे,माहितीपत्रके घेऊन खोली गाठली.
बार्सिलोनातील मुख्य चौक 'प्लासा दे कातालोनिया'! ही इथली 'हॅपनिंग प्लेस'! शहरदर्शनाच्या दुमजली उघड्या टपाच्या बस इथूनच सुटतात.युरोपात बऱ्याच ठिकाणी अशा बस आहेत.(आपल्या हिंदी चित्रपटांमधून अशा बसचेही दर्शन युरोपदर्शनाबरोबर कधी कधी घडते.)त्याचबरोबर मेट्रो रेल्वेचे चांगले जाळे बार्सिलोनात आहे.आम्ही मेट्रो आणि उघड्या टपाची शहरदर्शन बस दोन्हीचा वापर करायचे ठरवले.
फ्रांकफुर्ट मध्ये आठवडी पास मिळतो जो बस,ट्राम,मेट्रो आणि लोकल रेल्वे असा सगळीकडे चालतो.इथे १ वेळ,१० वेळा,३० वेळांसाठी तिकिट असते,आणि ते ही फ्रांकफुर्ट सारखेच सगळीकडे चालते,फक्त इथे मात्र प्रत्येकवेळी तिकिट पंच करावे लागते.म्हणजेच '१० वेळा' वाले तिकिट फक्त १०च वेळा वापरता येते आणि ३० वेळा वाले ३० च वेळा.आपल्या पासासारखे नाही.तर ते १० वेळांचे तिकिट काढून आम्ही मेट्रोतून आणि पायी भटकायचे ठरवले‌. शहराचा नकाशा आणि रेल्वेचे जाळे दाखविणारा नकाशा हातात असला की भाषा येत नसली तरी फारसे अडत नाही.'सांट इस्टासिओ' ह्या 'बार्सिलोना मेन स्टेशन' जवळील मेट्रोने आम्ही 'डायगोनल'ला गेलो.इथल्या इमारतींवरचे कोरीव काम  आणि रस्ते पाहणे हाच एक अनुभव आहे.सांट इस्टासिओच्या स्टेशनात जातानाही रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सुबक,भव्य इमारती त्यांच्या मधील मोकळ्या जागांत अंतराअंतरावर असलेले  छोटे बागिचे,तिथे खेळत असलेली छोटी मुले,बाकांवर क्षणभर विसावलेले लोकं दिसत होते.
   डायगोनलच्या रस्त्यांवरील चौकांत मोठेमोठे स्तंभ उभारलेले आहेत,त्यावरील कोरीवकामही लक्षणीय आहे.तेथून चालत चालत खाली ग्राशिया आणि तिथून पुढे फाँटेनाला आलो.सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र म्हणून ग्राशिया ते फाँटेना हा पट्टा गणला जातो.(बापरे,एकदम सरकारी प्रवासीपुस्तकातली भाषा झाली की ही!) या भागात अनेक squares आहेत. चौक म्हटले की वेगळेच चित्र डोळ्यापुढे येते.हे स्क्वेअर अगदी आखीव आणि बांधीव आहेत त्यांना जोडणाऱ्या गल्ल्याही फुलझाडांच्या आणि शोभेच्या झाडांच्या कुंड्यांनी सुशोभित केलेल्या आहेत.मोठी वाहने तेथे आणताच येत नाहीत असे रस्ते अरुंद आहेत.प्रत्येक स्क्वेअरमध्ये ५,६ तरी उपाहारगृहे आणि 'रसवंती'गृहे आहेतच.मोकळ्या अंगणात खुर्च्या टेबले टाकून,छत्र्या लावून मंडळींचे पुलावसदृश्य पायला भात,टॉर्टियामध्ये कसले कसले पुरण भरून खाणे चाललेले असते.मोठमोठ्या कढयांमध्ये हा भात शिजल्याचा दरवळ येत असतो.हे squares सजवण्याची दरवर्षी ऑगस्ट महिन्यात स्पर्धा असते,आजूबाजूच्या घरांमधून राहणारे लोक उस्फुर्तपणे त्या स्पर्धेत सहभागी होतात. चारही बाजूच्या गल्ल्या सजवण्याची चढाओढ लागते. स्पॅनिश मंडळी उशीरा रात्री ९ नंतर जेवणारी, मित्रमंडळ बरोबर असेल तर १०,११ सुद्धा ! हसत खिदळत,गाण्यांवर डोलत उशीरापर्यंत जेवणे चालू असतात.जर्मन लोक मात्र रात्रीचे जेवण संध्याकाळी ६ च्या सुमाराला घेतात.(ते 'आबेंड एसन' = 'संध्याकाळचे जेवण' असाच शब्दप्रयोग वापरतात.)त्या सुप्रसिद्ध स्क्वेअरमधील स्पॅनिश जेवणाचा आस्वाद घेऊन बऱ्याच उशिरा आम्ही खोलीवर परतलो‌‌.

कोलंबस आणि खाकी चड्डी

अस्मादिक साधारण ४ थी किंवा ५ वीत असतील. 'इति करी हास, भूगोल करी पास आणि इंग्रजी गणित करी सर्व विषयांचा सत्यानाश' अशी म्हण त्या काळात म्हणजे १९८०च्या दशकात, खूप प्रसिद्ध होती. ह्या काळात जवळ जवळ सगळ्या पुण्यातली होतकरू शाळकरी पोरे ’रेषा मारायला’ आ.दे., रे.स्व, हु.पा., से.स. विभागात लक्षी रोडच्या आजुबजूबाजुला घुटमळायची, असा तो काळ. समवयस्क, पुणेरी, चाणाक्षं आणि अनुभवी वाचकांना लक्षात आले असेलच. असो, मुख्य विषया कडे वळूयात:

माफ करा..

मला कदाचित विकी आणि वेतळु मालिका थांबवावी लागणार असे वाटत आहे. माझे भाग २ आणि ३ खूप दिवस पुव्री प्रशासकांच्या हवाली केले होते, पण मला प्रकाशकांनी ते भाग संपादीत करून प्रकाशीत करणार किंवा ते ’केराच्या टोपलीत’ पाठवले ह्याची काहीच ’मागुन भरवणी’(feedback) केली नाही...
वाचकांनी माफी द्यावी ही माफक अपेक्षा..

जुन्या नव्या गीतांची देवाण-घेवाण

बरेच दिवस एक गाणे शोधत होतो ते आज मिळाले....

आणि, असाच एक विचार मनात आला...कि आपल्याला जी गाणी आवडतात ती सहज उपलभ्द झाली तर किती उत्तम होईल..आणि म्हणुनच ही चर्चा सुरु करतोय..आपण आपल्याला आवडती गाणी... ("लिरिक्स") पाठवा... म्हणजे बकिच्यांन्ना सुद्धा तुमची आवड कळेल आणि कदाचित आपली आवड एक निघेलही... ज्यातुन प्रत्येकाला जी लिरिक्स हवी आहेत ति मिळतीलच आणि वर सहित्य देवघेवीपेक्षा आपापसातले कम्युनिकेशन पण वाढेल..कसं काय ?

गाथा माझ्या गझलेची

गझलांची काही संकेतस्थळे जन्माला आली आणि त्यांवर आणि इथे होणाऱ्या गझला वाचून मला न्यूनगंड वाटू लागला. तशा काही कविता/एकाखाली एक ठराविक संख्येने शब्द रचलेली काही गद्ये मी लिहीली होती, पण "हात मर्दा! जिंदगीत एक गझल लिहीली नाहीस? थू तुझ्या जिनगानीवर!" वगैरे धमक्या मन सारखं देऊ लागलं आणि मी ठरवलं. "बास! आता एक तरी गझल लिहील्याशिवाय मी केस बांधणार नाही!"(ती द्रौपदी नाही का, दु:शासनाच्या रक्ताने केस बांधायला मिळेपर्यंत केस मोकळेच सोडते तसे.)

महाराष्ट्र कर्जमुक्त हवा

महाराष्ट्र कर्जमुक्त होण्यासाठी पर्यावरणमंत्री गणेश नाईक यांचे विधान वाचले.यावरून दोन वर्षात महाराष्ट्र कर्जमुक्त होण्यासाठी त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल माहिती मिळवावीशी वाटली.त्यांचे विधान वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.