फोनचा वापर फक्त बोलण्यासाठी आणि ऐकण्यासाठी केला जातो, असा आत्ताआत्तापर्यंत माझा आणि उर्वरीत समाजाचा समज होता. खोलीच्या एका कोपऱ्यात ध्यानस्थ ऋषीप्रमाणे किंवा शुंभासारखे किंवा निर्विकारपणे (ज्याला जे आवडेल ते त्याने स्वभावधर्मानुसार घ्यावे) एका जागी मख्खपणे बसून राहणारे फोन एक दिवसइतका मोबाईल अवतार धारण करतील, याची कल्पना मोबाईल बनविणाऱ्यालाही आली नसेल. बसून राहणारा फोन हिंडू फिरू लागला एवढाच काय तो फरक, असे मला वाटत असे. हा फरक 'एवढाच' नसून 'केवढा मोठ्ठा' आहे याची कल्पना तेव्हा आली नाही पण आता चांगलीच आलेली आहे.