ह्यासोबत
- आझाद हिंद सेना १ - प्रास्ताविक
- आझाद हिंद सेना २ - हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंघर्षाचा आढावा
- आझाद हिंद सेना ३- नेताजी
- आझाद हिंद सेना ४ - कात्रज, पन्हाळा, आग्रा...
- आझाद हिंद सेना ५ - पूर्वरंग
- आझाद हिंद सेना ६ - जर्मनीत आगमन
- आझाद हिंद सेना ७ - जर्मन अध्याय: सेना, ध्वजवंदन, राष्ट्रगीत
- आझाद हिंद सेना ८ - पूर्वेकडे प्रस्थान
- आझाद हिंद सेना ९ - जपानचा झंझावात आणि आझाद हिंदची उभारणी
- आझाद हिंद सेना १० - जडणघडण, संकट व नव्याने उभारणी
- आझाद हिंद सेना ११ - 'प्रभु आले मंदिरी'
- आझाद हिंद सेना १२ - "चलो दिल्ली" आणि राणी लक्ष्मी पलटण
- आझाद हिंद सेना १३ - हंगामी सरकारची स्थापना
नेताजींचे आयुष्य हा सर्वार्थाने आणि सातत्याने एक संघर्ष होता. नजरकैदेतुन इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन निसटलेले नेताजी प्रथम पेशावरला आले. तिथे अकबरमिया हजर होते. पेशावरात फार दिवस न काढता नेताजी मजल दरमजल करत अनेक हाल अपेष्टाना तोंड देत अखेर काबुलमध्ये पोहोचले. त्यांच्या बरोबर भगतराम तलवार सावलीसारखा होता. रस्ता कितीही खडतर असला तरीही लवकरात लवकर त्यांना हिंदुस्थानची सरहद्द ओलांडायची होती, आपण ज्या कार्यासाठी देश सोडुन निघालो आहोत ते पूर्ण न होता शत्रूच्या हातात पडु नये यासाठी त्यांच्या जीवाची तगमग सुरू होती. अखेर एकदाचे काबुल गाठले. बर्फाने आच्छादलेले उजाड डोंगरसुद्धा त्यांना सुंदर भासत होते कारण ते इंग्रजांचे अंकित नव्हते. मात्र काबुलमध्ये पावला पावलावर धोका होता. प्रत्येक उतारुकडे संशयाने पाहिले जात होते. आपले अस्तित्व लपवण्यासाठी नेताजींना अत्यंत खबरदारी घ्यावी लागणार होती. अखेर भगतरामने आपल्या जुन्या साथीदाराला साद घालायचे ठरवले. तो साथिदार म्हणजे उत्तमचंद मल्होत्रा. हुतात्मा भगतसिंहाच्या काळातच तुरुंगवास सोसून बाहेर पडलेला उत्तमचंद काबूलमध्ये स्थायिक झाला होता, त्याचे काचसामान व रेडिओ दुरुस्तीचे दुकान होते. काळाबरोबर माणसे व त्यांचे विचार व तत्त्वेही बदलतात हे कटु सत्य माहीत असलेल्या भगतरामने आधी चाचपणी केली. आपण एका हिंदुस्थानी क्रांतिकारकाला घेऊन आलो आहोत आणि तो लवकरच रशियाला जाणार आहे, तेव्हा आपल्याला त्याच्यासह आसरा देण्याची गळ घातली. उत्तमचंदाने गमतीत विचारले की तो क्रांतिकारक म्हणजे सुभाषचंद्र बोस तर नव्हेत? आणी ते तेच आहेत हे समजताच त्याने हात जोडून त्यांना घेऊन येण्याची विनंती केली व आपल्या घरात आसरा दिला व उत्तम आदरातिथ्य केले.
आसरा तर मिळाला पण पुढे काय? नेताजी व भगतराम आता दूतावासाच्या चकरा घालू लागले. रशियन दूतावासात काही केल्या प्रवेश मिळत नव्हता. एकदा राजदूताला रस्त्यात भेटायचा प्रयत्नही निष्फळ झाला. रशियामध्ये आपल्याला प्रवेश मिळेल व मग पुढे हालचाल करून राजाश्रय घेता येईल असा नेताजींचा अंदाज चुकला. हिंदुस्थानातून आलेला हा मनुष्य इंग्रजाचाच राजकीय डाव असेल असा संशय रशियाला होता व त्यामुळे त्यांना तिथे प्रतिसाद मिळाला नाही. क्रांतिवादी रशिया आपल्या देशाच्या संग्रामाला साहाय्य देईल अशी त्यांची कल्पना होती, मात्र इंग्लंड आणि रशियाचे संबंध वरकरणी वाईट नसले तरीही रशिया- जर्मनी मैत्री करारामुळे ते फारसे सलोख्याचे नव्हते आणि विश्वासाचेही नव्हते. या काळातील अनेक प्रसंग, अनेक उदाहरणे हेच दाखवून देतात की महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र परस्परांविषयी अत्यंत सावधतेचे व संशयाचे वातावरण होते. शिवाय पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध या दरम्यान अनेक राजकीय समीकरणे बदलली होती. एक मार्ग अडला तर नेताजी स्वस्थ बसणार नव्हते. त्यांनी थेट जर्मन दूतावास गाठला. अफगाणिस्थानातील जर्मन राजदूत श्री. पिलगेर यांनी त्यांना वरकरणी फारशी अनुकूलता न दाखवता एखाद्या भेटायला आलेल्या माणसाशी बोलावे तसे औपचारिक संभाषण सुरू केले. मात्र एकीकडे त्यांनी दूतावासातील स्थानिक कर्मचाऱ्यांना काही ना काही कारणाने बाहेर पिटाळले. बंद दारा आड बैठक सुरू होताच पिलगेरमहाशयांनी एका वर्तमानपत्रातली त्यांची छबी व ते गायब झाल्याचे वृत्त त्यांना दाखवले.पिलगेर यांनी मात्र ओळख पटताच नेताजींचे सहर्ष स्वागत केले. हिंदुस्थानच्या महान क्रांतिकारकाचे जर्मनी खचितच स्वागत करील आणि त्यांना सर्वतोपरी मदत करील अशी आशा व्यक्त केली व आपण त्यांच्या साठी शक्य ते सर्व प्रयत्न करू असे आश्वासन दिले. मात्र अनेक अफगाण व्यक्ती दूतावासात कामाला होत्या व त्या तितक्याश्या विश्वासार्ह नसल्याने जागतिक महत्त्वाच्या अशा व्यक्तीचे व अर्थातच हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामाचे अस्तित्व धोक्यात येऊ शकत होते. पिलगेर ने आपण सविस्तर अहवाल जर्मनीतील मुख्यालयाला सादर करून त्यांना अधिकृत आश्रय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदतीची हमी दिली. मात्र त्याचवेळी त्याने असा इशारा दिला की नेताजी ओळखले जाण्याचा धोका लक्षात घेता यापुढील भेटी या दूतावासात न घेता त्या भेटी सिमेन्स कंपनीचा स्थानिक अधिकारी थॉमस याच्या निवासस्थानी घेतल्या जाव्यात.
नेताजींना त्या दिवशी फार मोकळे वाटले. आपण ज्या ध्येयासाठी देश सोडला ते आता मार्गी लागत आहे याचे समाधान त्यांना सतत होत असलेल्या दगदग व हाल-अपेष्टांपेक्षा मोठे होते. त्यांना नवा हुरूप आला. मात्र अनेक दिवस, अनेक भेटी होऊनही काही भरीव निष्पन्न न झाल्याने नेताजी अस्वस्थ होऊ लागले. दरम्यान पिलगेर ने त्यांना आपले दोस्तराष्ट्र इटलीच्या दूतावासात जाऊन राजदूत कारोनी यांची भेट घेण्याचे सुचविले. बर्लिनपेक्षा रोम आपले स्वागत करायला अधिक उत्सुक आहे आणि तेच आपली व्यवस्था करतील असे त्यांनी सुचविले व त्यांना सुयश चिंतले. कदाचित त्या वेळी हिटलर स्वतः: युद्धविषयक धोरणात गुरफटला असावा, त्याचे अधिकारीही अनेक सीमांवर विखुरलेले त्यामुळे त्याला हे वृत्त समजून नेताजींना जर्मनीत येऊन देण्याविषयी निर्णय तत्काळ घेता आला नसावा आणि त्याच्या प्रत्यक्ष संमतीखेरीज काही हालचाल करणे दूतावास वा परराष्ट्र खात्याला शक्य नसावे. तसेच पूर्वी मुसोलिनी व नेताजी यांचे भेट झालेली असल्याने ड्यूस त्याचाविषयक योग्य सल्ला देऊ शकेल असेही कदाचित त्याला वाटले असावे. अर्थात प्रत्यक्ष युद्धात आतापर्यंत जर्मनी अधिक अग्रेसर असून इटली त्यामानाने मोकळे होते तेव्हा काही मुलकी कारभार आपल्या वतीने त्याने युतीराष्ट्रावर सोडला असावा अशा तर्कासही वाव आहे. इटलीच्या राजदूताने, सिन्यॉर कारोनीने त्यांचे स्वागत केले व अर्थातच भरघोस मदतीचे आश्वासनही दिले. सद्यपरिस्थितीत या आश्वासनावर विश्वासण्याखेरीज नेताजींकडे इलाजच नव्हता. मात्र हळू हळू, काम लवकरच होईल, आम्ही संदेशाची वाट पाहत आहोत, वगैरे उत्तरांमुळे नेताजी फार बेचैन झाले.
अखेर एक दिवस त्यांनी उत्तमचंदांना चोरवाटेने रशियात गुपचुप प्रवेश करण्याचा मानस बोलून दाखवला व वाटाड्या शोधायला सांगितला. हे कर्म कठीण असले तरी 'एक रामकिशन शहीद झाला तसा मीही झालो तरी बेहत्तर पण मी इथे असा सडत राहणार नाही. जर देशाचे कार्य होत नसेल तर मेलेले बरे' असे नेताजींनी उद्विग्नपणे सांगितले. उत्तमचंदाने तत्काळ हालचाली करून एक वल्ली शोधून आणली. या वाटाड्याचे दरोडेखोरांशी संबंध होते व त्याने पूर्वायुष्यात एक खूनही केलेला होता. मात्र याक्षणी हँगो नदीपार जाणाऱ्या सरहद्दीवर असणाऱ्या पाटकेसर पर्यंतचा अवघड रस्ता त्याला उत्तम माहीत होता. याचे नाव महंमद याकूब. त्याला उत्तमचंदांनी मार्गातले धोके पाहता नदीवर पूल असेल का अशी पृच्छा केली त्यावर त्या पुलावर पहारा असतो, कारण त्या मार्गाने सोने , दुर्मिळ जनावरांची कातडी वगैरेंचा चोरटा व्यापार चालतो असे तो म्हणाला. त्यामुळे हवेच्या चामडी पिशव्या नदीत सोडून त्याला धरून तरंगत, पाण्याखाली लपत जायचे असा एकमेव धोकादायक मार्ग त्याने सांगितला. ते दिव्य करायला नेताजी तयार झाले. आणि अचानक एक दिवस कारोनी महाशय उत्तमचंदांच्या दुकानात स्वतः: आले व त्यांनी नेताजींना आनंदाची बातमी दिली की त्यांना न्यायला रोमहून दूत आले असून, दरम्यानच्या काळात ३ मार्च रोजी रशियानेही अल्पकालीन का होईना, पण प्रवासांतर्गत रहिवास परवाना दिला होता. कारोनीने नेताजींना पारपत्र तयार करण्यासाठी प्रकाशचित्राच्या प्रती तत्काळ तयार करण्यास सांगितले. नेताजी सर्व तयारीनिशी सज झाले. १७ मार्च रोजी कारोनीच्या घरी एक भव्य मेजवानी झाली, तित उत्तमचंद, नेताजी, पिलगेर व काही निवडक लोक हजर होते. १८ मार्च रोजी गाडी आली आणि भपकेबाज पाश्चिमात्य पोशाखातले नेताजी नव्या रूपात, नव्या देशात, नव्या नावाने निघाले - ऑरलँडो मॅझोटा, इटलीचा नागरिक, पारपत्र क्रमांक ६४९३२!
३ एप्रिल १९४१ - म्हणजे घर सोडून बेपत्ता झाल्यानंतर अडीच महिन्यांनी नेताजी जर्मनीत दाखल झाले. स्वागताला डॉ. धवन व डॉ. मेल्चर्स हजर होते. नेताजींचे आगमन गाजले ते वेगळ्याच कारणाने. ते तिथे पोचायच्या आधीच बर्लिन येथे तिसऱ्या राईशचा परराष्ट्र विभाग 'स्वतंत्र भारत' विभागाची कचेरी चालवीत होता. या कचेरीचे काम मुख्यत्वे डॉ. ऍडॅम ट्रॉट, अलेक्झांडर वेर्थ इत्यादी पाहत होते. इथे युद्धकालांतील परस्परविरोधी धोरणाच्या अनेक विभागांचा युद्धकालीन प्रशासन कारभार दिसून येत होता. एकीकडे नाझी व हिटलरनिष्ट लोक नेताजींना अजिबात किंमत नव्हते, मान तर देतच नव्हते वा मानतही नव्हते. दुसरीकडे परराष्ट्र विभागाने त्यांना राष्ट्रप्रमुखाचा मान व वागणूक दिली होती. त्यांना हंगामी स्वतंत्र हिंदुस्थानच्या राष्ट्रप्रमुखाचा मान दिला जावा, 'एक्सलंसी' असे संबोधले जावे असे घोषित केले. नेताजींना शाही इतमामाने बर्लिनच्या लिख्टेन्स्टाईन ऍली, १० हे घर रहिवास म्हणून देण्यात आले. डॉ. ट्रॉट, डॉ. वेर्थ व फ़ुर्टवँग्लर या परदेश विभागाच्या उच्चपदस्थांनी नेताजींना प्रसारकार्यासाठी त्यांच्या इच्छेप्रमाणे अत्यंत शक्तिशाली अशी दोन लघुलहरी प्रक्षेपण केंद्रे उपलब्ध करून दिली. ही प्रक्षेपणे दिवसभर अनेक भारतीय भाषांमध्ये हिल्वरसम (नेदरलॅंड्स) व पोडिब्राड (झेकोस्लोवाकिया) येथून प्रसारित केली जात. केवळ रेडिओ केंद्र व प्रक्षेपण यासाठी एक दशलक्ष जर्मन मार्क्स इतकी रक्कम खर्चे करण्यात आली होती. नेताजी तसेच त्यांचा तमाम सेवकवर्ग यांचा खर्च विभाग करीत होता, तसेच त्यांना खर्चासाठी रक्कमही या विभागानेच पुरवली. हा सर्व खर्च नेताजी व परराष्ट्र विभाग यांच्या परस्परातील करारानुसार तसेच जर्मन सर्वोच्च हुकुमतीनुसार करण्यात येत होता. यासाठी प्रत्यक्ष हिटलरचा हुकूम आला नसला तरी परराष्ट्रमंत्री व हिटलरचा निकटवर्तीय रिबेनट्रॉप याने (एडीएपी, डी एक्स आय आय आय क्र.४६८) द्वारे हिटलरला तसे सूचित केले होते. ="" />
बर्लिनमध्ये पोहोचल्यापासून एक आठवड्याच्या आत नेताजींनी परराष्ट्र विभागाला एक सविस्तर निवेदन दिले:
"बर्लिन, दिनांक ९ एप्रिल, १९४१"
(गोपनीय)
या युद्धात इंग्लंडरूपी महासत्ता खिळखिळी होऊन खचितच कोलमडून पडणार आहे. मात्र या स्थितीतही हिंदुस्थानला वसाहतीच्या स्वराज्याच्या दर्जा पलीकडे काही देण्याचे अभिवचन हे इंग्रज देत नाहीत. अक्ष राष्ट्रांच्या साहाय्याने लष्करी आक्रमण करून या उन्मत्त सत्तेचे कंबरडे मोडणे हाच आता एकमेव मार्ग आहे. तेव्हा या परिस्थितीत मी असे निवेदन सादर करू इच्छितो की या क्षणी हिंदुस्थान व अक्ष सत्ता हे दोन्ही, आपले एकमेव ध्येय परस्पर सहकार्याने साधू शकतात आणि ते म्हणजे इंग्रजी सत्तेचा सर्वनाश. यात युरोप, अफगाणिस्तान, अफगाण सीमेवरील आदिवासी रहिवासीत प्रदेश तसेच खुद्द हिंदुस्थानातील कामगिरीचा समावेश असेल. निवेदनाचे प्रमुख मुद्दे असे:
१ युरोपातील कामगिरी. युरोपात - बर्लिनमध्ये आझाद हिंद सरकारची स्थापना/ अक्ष राष्ट्रे व हिंदुस्थान यात युद्धातील विजयानंतर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची हमी देणारा करार, तसेच स्वतंत्र हिंदुस्थानात या राष्ट्रांना विशेष स्थान/ युरोपातील सर्व युती राष्ट्रात आझाद हिंद सरकारची स्थापना ज्यायोगे हिंदी जनतेला या राष्ट्रांच्या सच्च्या प्रयत्नांची खात्री पटेल/ आझाद हिंद रेडिओ वरून हिंदी जनतेला आवाहन करणारे प्रभावी प्रक्षेपण, ज्यायोगे जनता इंग्रजी सत्तेविरुद्ध उठावास प्रवृत्त होईल.
२ अफगाणिस्तानातील कामगिरी. काबुल येथे हिंदुस्थान व युरोप यांच्या संपर्का साठी केंद्रे निर्माण करणे / या केंद्रांना वाहने, मालमोटारी, टपालसेवा, दळणवळण-संपर्क इत्यादी सुविधा पुरविणे.
३ अफगाण-हिंदुस्थानच्या मधील स्वायत्त विभागांतर्गत कामगिरी. आझाद हिंदचे कार्यकर्ते वायव्य सीमेवर कार्यरत आहेतच/ त्यांच्यासह वायव्य सीमेकडून हिंदुस्थानवर निकराचा हल्ला/ इंग्रज विरोधी तत्त्वे - उदा. इपीचा फकीर - या सारख्यांचे स्वतंत्र व पूरक हल्ले/ प्रत्यक्ष रणावर युरोपातील अनुभवी युद्ध सल्लागाराची नेमणूक/ या भागात प्रचारकेंद्रे व मुबलक प्रचारसाहित्याची उपलब्धता/ प्रक्षेपण केंद्रे
४ खुद्द हिंदुस्थानातील कामगिरी. हिंदुस्थानात युरोप व स्वायत्त भागतील प्रसारण केंद्रांवरून प्रक्षेपण/ स्वायत्त भागातील प्रचारसेवेतर्फे हिंदुस्थानात प्रभावी प्रचारपत्रक वितरण/ आझाद हिंदच्या हिंदुस्थानातील विविध भागात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांतर्फे सरकारच्या कारभारात अडथळे निर्माण करणे/ हिंदी जनतेने सरकारला काहीही सामग्री व रुपयाभर देखिल न देण्याचे आवाहन करणारा प्रचार/ जनसामान्यांना सरकारला कर न देण्याचे आवाहन/ लष्करात उठावाची तयारी/ दारुगोळा व लष्करी साहित्य कारखान्यांत घातपात व नाश करणे/ दळणवळण सेवा कोलमडून टाकणे ज्यामुळे ब्रिटिश सैन्याचा प्रवाह गोठेल/ हिंदुस्थानातील जनतेचा बंड करून उठाचे आवाहन
५ आर्थिक बाबी. या योजनेचा सर्व आर्थिक भार अक्ष राष्ट्रांनी उचलावा व हा खर्च हे स्वतंत्र हिंदुस्थानला दिलेले कर्जे समजावे/ स्वातंत्र्या नंतर हिंदुस्थान सव्याज कर्जफेड करेल/ चालू विनिमय दरांनुसार डॉइश मार्कचे अफगाणी चलनात व अफगाणी चलनाचे रुपयात परिवर्तन/ युरोपात दहा रुपये मूल्याच्या कागदी नोटा छापून त्या भारतात आणण्यासंबंधी विचार करणे.
६ ब्रिटिश सत्ता उखडून टाकण्यासाठी प्रत्यक्ष लष्करी मदत. इंग्रज सैन्यात प्रत्यक्ष इंग्रजी गोरे सैनिक अवघे सत्तर हजार आहेत. जर इंग्रजी सैन्यातले हिंदुस्थानी सैनिक आपले हत्यार उलटून इंग्रजांविरुद्ध उचलतील व त्याच वेळेस जर आझाद हिंदच्या साथीला पन्नास हजार सशस्त्र लष्कर अक्ष राष्ट्रे देतील तर एकाच आघातात इंग्रजी सैन्याचा धुव्वा उडेल.
परक्या देशात जाऊन, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना मदतीचे आवाहन करून वर त्यांनी काय करावे व आमच्या अपेक्षा काय, आमचे दायित्व काय हे रोखठोकपणे सांगणारा असा धैर्यवान व दूरदर्शी महापुरुष एकमेवाद्वितीयच म्हटला पाहिजे.