सुरस आणि चमत्कारिक

ग्रीष्माच्या उग्र सहस्त्ररश्मींनी रुक्ष झालेल्या हिरण्यगर्भा मेदिनीला पर्जन्यधारांच्या सुखद आगमनाची चाहूल लागली होती. नैऋत्येकडून वाहणाऱ्या शीतलक वातलहरी अधिकाधिक प्रबल होऊ लागल्या होत्या. राजमहालाच्या प्रवेशद्वारांवर आणि गवाक्षांवर असलेली कलाबतूपूर्ण रेशीमवस्त्रे वारंवार विचलित होत होती आणि महालातील सुवर्णदीपांमधील दीपशिखा पवनलुप्त होतात की काय असेच वाटत होते.
निशापती महाराजांनी आपल्या हातातील द्राक्षफलांच्या गुच्छातील अखेरचे पुष्ट रसाळ फळ आपल्या ओष्ठांनीच अलग केले. त्यांच्या दंतपंक्तींची आणि कंठमण्याची सूक्ष्म हालचाल झाली. हातातले शुष्क फलदेष्ठ त्यांनी शेजारच्या रिक्त फलपात्रात टाकले आणि आपल्या मृदू करकमलांनी एक तालिकाध्वनी केला.
महालाच्या द्वाराबाहेर अष्टप्रहराच्या कर्तव्यपूर्तीनंतर क्लांत होऊन किंचित्काल आसनस्थ झालेला भ्रातृभजन तडिताघात व्हावा तसा जागृत झाला. महालातला ध्वनी ऐकताच त्याचे मंडूकाप्रमाणे दिसणारे नेत्र तात्काळ प्रज्वलित झाले. स्वतःलाही जाणवणार नाही असा पदरव करीत तो महालात प्रविष्ठ झाला आणि आपले किंचित ताठरलेले पृष्ठ लीन करीत त्याने महाराजांना प्रणाम केला.
"भ्रातृभजना.. "
"आज्ञा महाराज"
"सेनापती पीतप्रतापांचे नगरात आगमन झाले आहे काय? "
"होय महाराज. पश्चिमेकडील स्वारी संपन्न करून सेनापती आज प्रातःकालीच नगरात परतले आहेत. "
"मग ते अद्याप आमच्या दर्शनार्थ कसे उपस्थित झाले नाहीत? "
"महाराज, क्षुद्र मुखी विराट ग्रास घेतो आहे, क्षमा असावी. पण सेनापती पीतप्रतापांचे स्वास्थ्य गतकालातील अखंड कार्यबाहुल्यामुळे किंचित ढळले आहे. गुरुदेव राजवैद्य दल्यप्रवाद यांनी त्यांना काही घटका विश्राम करण्याचे बळ केले आहे. "
" गुरुदेव वैद्यराज? हे काय गूढ आहे भ्रातृभजना? "
"महाराज, वैद्यराज आपल्या गुरुकुलाचेही प्रमुख नाहीत का? तेंव्हा आपल्याला गुरुदेव आणि वैद्यराज या दोन्ही उपाध्यांनी संबोधावे असा त्यांचा आग्रह असतो, महाराज. "
"या कसल्या बाललीला आहेत भ्रातृभजना? पण असो. ते आमचे निष्ठावंत सहकारी आहेत, त्यामुळे असले प्रमाद आम्ही दुर्लक्षित करावे हेच रास्त.  भ्रातृभजना, आमच्या अष्टप्रधान मंडळातील अन्य सदस्यांचे स्वास्थ्य कसे आहे? "
"ईश्वराची कृपा आहे, महाराज. काही दिनांपूर्वी नगरात निर्माण झालेल्या वातचक्रामुळे आपल्या उच्च्तम नगरश्रेष्ठांचे स्वास्थ्य म्लान होते की काय असा किंतु मनी उद्भवला होता. पण आता हे कृष्णनभ दूर झाले आहेत महाराज. "
"भ्रातृभजना, हे सगळे आमच्याच कुशल नेतृत्वामुळे साध्य झाले, हे तुझ्या स्मरणात आहे ना? "
"याचे मला कसे विस्मरण होईल महाराज? आपण स्वतःच मला ते निदान अष्टशत वेळा कथन केले आहे महाराज. "
"आमच्यासारखे सम्राट असल्यामुळेच या नगराची प्रतिष्ठा नित्यदिनी गगन चुंबू पाहत आहे, हे तू जाणतोस ना भ्रातृभजना? "
"होय महाराज. "
"आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? "
"नाही महाराज. "
"इतर कोणाच्या पाहण्यात?"
"नाही महाराज. या प्रश्नाचे 'होय' असे उत्तर देणाऱ्या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज. "
"संतोष. परम संतोष. "
निशापती महाराजांचे नयन आकुंचित होऊ लागले. अधोउर्द्व अवस्थेतले त्यांचे शरीर हळूहळू धरणीसमांतर होऊ लागले. तृणधान्यांचे पिष्टीकरण करणाऱ्या संयंत्राच्या ध्वनीप्रमाणे भासणारा एक ध्वनी महालात अखंड गुंजारव करू लागला. गुलाबपुष्पांच्या शय्येवरून मार्गक्रमणा करावी तसा भ्रातृभजन महालाच्या बाहेर पडला. राजदालनाचे भव्य द्वार त्यांने कोमलपणाने ओढून घेतले.

उत्तररात्र झाली होती. महाद्वारावर अखंडितपणाने चेतणाऱ्या प्रकाशचुडी वगळता इतरत्र मृगनयनींच्या सौंदर्यसाधनेतील नेत्रशोभकाप्रमाणे दिसणाऱ्या तमाचे साम्राज्य होते. राजनर्तकीच्या पदन्यासाबरोबर तिच्या उत्तरीयातील हिरण्यशलाका चमकाव्यात त्याप्रमाणे काळोखातील वृक्षलतांवरील प्रकाशकीटक झगमगत होते. राजमहालाच्या आसपास नीरव शांतता होती. लांबवरून येणारे नगरापलीकडील अरण्यातील निशाचरांचे अस्पष्ट साद ध्वनीहीनतेच्या सरोवरात शाळीग्राम पडावा तसे तरंग निर्मित होते. वृक्षांवरील दिवाभीतांचा रव शांततेला सुरकुत्या पाडत होता.
निशापती महाराजांच्या दालनाचे द्वार हळूच किलकिले झाले. महालातील ताम्रवर्णी प्रकाशाचे द्वाराबाहेर डोकावणारे वस्त्र गोमयाने शिंपलेल्या जमीनीवर तांबूलभक्षकाचा मुखरस सांडावा तसे दिसू लागले. ते प्रकाशवस्त्र चुरगाळत महालातून सहा आकृती बाहेर पडल्या. हे दृष्य पहायला राजमहालात कुणी जागृत नव्हते, हे भाग्यच. अन्यथा पाहणाऱ्याच्या दंतपंक्ती भयातिरेकाने अविलग झाल्या असत्या.
महालातून बाहेर पडलेल्या त्या सहा आकृती हुबेहूब निशापती महाराजांच्या प्रतिमा होत्या. देहयष्टी, मुखचंद्रमा, पदलालित्य... तसूभरही भिन्नत्व नव्हते. सूक्ष्मपणे पाहणाऱ्याला फक्त एक अंतर जाणवले असते, ते म्हणजे त्यांच्या तनुवरील पेहराव्याचा रंग.
प्रत्येक आकृतीच्या अंगावर वेगवेगळ्या रंगाची वस्त्रे होती.
एकाद्या अदृष्य तंतूने बांधल्याप्रमाणे समांतर हालचाली करत त्या प्रतिमा अश्वशाळेच्या दिशेने मार्गक्रमणा करू लागल्या. अमावस्येच्या रात्री कौशल्याने धनचौर्य करणाऱ्या शर्विलकाच्या कसबाने त्यांनी अश्वशाळेतले सहा अश्व रज्जूमुक्त केले. क्षणार्धात सहा अश्वस्वार वातवेगाने राजमहालाच्या प्रवेशद्वाराबाहेर पडले.
महत्प्रयासाने जागृतावस्था प्राप्त झालेल्या भ्रातृभजनाचे नेत्र कोशिकांतून बाहेर पडणार की काय असे वाटण्याइतपत विस्फारले. शेजारीच पडलेल्या मद्यार्काच्या रिकाम्या कुपीकडे त्याने किंचित तिरस्काराने कटाक्ष टाकला. पाहिले ते सत्य की स्वप्न या द्वंद्वात अडकून राहण्याचे त्याला आता प्रयोजन राहिले नव्हते. राजप्रासादाच्या बाहेरून विद्युतवेगाने नाहीशा होणाऱ्या एका अश्वाचा उन्मादध्वनी त्याच्या कानी आला. भ्रातृभजनाचे किंचित स्थूल शरीर अनावर कंपू लागले. वृक्षलतांवरील प्रकाशकीटक त्याच्या मिटत्या नयनांसमोर नर्तन करू लागले. आपणास मूर्छा येते आहे याची जाणीव होण्यापूर्वीच त्याच्या कुडीने धरणीसख्य पत्करले होते.      

नीलभृंगराज, मंडुपकर्णी, चंदनादी उटींच्या औषधी गंधाने भ्रातृभजनाला भान आले. राजप्रासादाच्या उत्तरेस असलेल्या सेवकांसाठीच्या एका विशेष कक्षात गुरुदेव वैद्यराज त्याची नाडीपरीक्षा करत होते. भ्रातृभजनाची भार्या व त्याचे दोन पुत्र त्याच्या शय्येनजिकच उभे होते. त्याच्या पत्नीचे मुख अखंडित अश्रूपतनाने म्लान झाले होते. राजमहालात सेवा करणारे इतर काही दासही सचिंत मुद्रेने उभे होते. नेत्रांचा कोन फिरताच त्याला निशापती महाराजांचे सस्मित मुखकमल दिसले.महाराजांच्या वामांगास सुभाषिणीदेवी उभ्या होत्या. महाराजांना प्रणाम करण्यासाठी त्याने क्षीणसर यत्न केला.
"शय्यास्थितीत रहा  भ्रातृभजना," महाराज म्हणाले. "अद्याप तुझ्या शरीरास बलप्राप्ती झालेली नाही. गुरुदेव वैद्यराज, कसे आहे रुग्णाचे स्वास्थ्य? "
"भय नसावे, महाराज. अतीव शारीरीक कष्ट आणि विश्रामाचा अभाव यामुळे आलेली ही ग्लानी आहे. शिवाय काही मानसिक क्लेश झाल्याचेही लक्षण आहे. आम्ही मात्रेचे चाटण दिले आहेच. पूर्ण विश्राम आणि सात्त्विक आहार यांनी संध्यासमयीपर्यंत तू कार्यतत्पर होशील, भ्रातृभजना.. "
"संतोष, परम संतोष" महाराज म्हणाले. 
"महाराज, काल... काल रात्री.. " भ्रातृभजन अतीव कष्टाने उद्गारला.
"शांत रहा, भ्रातृभजना" महाराज संयत स्वरात म्हणाले. त्यांच्या हाताची तर्जनी त्यांच्या ओष्टांवर विलासिली होती. अन्यजनांना सन्मुख होत त्यांनी एकच उच्चार केला, "एकांत."
कक्षात आता फक्त महाराज, सुभाषिणीदेवी आणि भ्रातृभजन उपस्थित होते. सुभाषिणीदेवींच्या उपस्थितीचे भ्रातृभजनाला यत्किंचितही नवल वाटले नाही. सुभाषिणीदेवी महाराजांच्या कूटनीतीतज्ञ तर होत्याच, पण काही सप्ताहांपासून त्यांनी महाराजांना फलज्योतिषाचे प्रशिक्षण देणेही आरंभले होते. एखाद्या घटनाविशेषानंतर भविष्यात काय होणार हे त्या महाराजांना लिखित स्वरुपात सांगत असत.
"महाराज, काल... काल रात्री मी.. " 
"आम्हास सर्व ज्ञात आहे, भ्रातृभजना" निशापती महाराज म्हणाले. "काल रात्री आमच्या महालातून तू आमच्या प्रतिकृती बाहेर पडताना पाहिल्यास..."
"यथार्थ, महाराज, पण त्या कोण....? "
"भ्रातृभजना," महाराजांना कंठोद्रकाचे किंचित कष्ट झाले. "त्या आम्ही निर्मिलेल्या प्रतिमा आहेत. ते आमचेच मायाजाल आहे. "
"पण महाराज, हे तोतये.. "
"ऐयार म्हण भ्रातृभजना, ऐयार."
"पण, क्षमा असावी महाराज,  याचे प्रयोजन? याचे कारण?"
"कारण? " महाराजांचे विकट हास्य सदनाला पुरून उरले. "कारण राजकारण! आमच्या या प्रतिमा विविध नावांनी जनसामान्यांत एकरुप होतील. कुणी शशीकुमार, कुणी रजनीनाथ, कुणी चंद्रभान... पण या सगळ्याचे सूत्रधार आम्हीच. या प्रतिमा आमच्याच बाहुल्या आहेत भ्रातृभजना, आमच्याच सावल्या. आम्ही जे वदतो, त्याला या बाहुल्या दुसऱ्याच नावाने अनुमोदन देतील. आम्ही एखाद्याची प्रशंसा करतो, त्यावर या बाहुल्या स्तुतीसुमने उधळतील. आम्ही एखाद्याला दूषण देतो, त्यावर या बाहुल्या अग्निवर्षाव करतील.. ही सगळी आमचीच क्रीडा आहे. आम्ही प्रजाजनांना  संबोधित करत असताना आमच्या नावाच्या गर्जना करणारे प्रजाजन कोण असतात भ्रातृभजना? ते दुसऱ्या नावाने वावरणारे आम्हीच! "
"पण महाराज.... " भ्रातृभजनाची जिव्हा शुष्क झाली होती. "हे.. हे कपट? कशासाठी?"
"एका सेवकाच्या आकलनापलीकडच्या कथा आहेत या भ्रातृभजना. हीच ती एका सम्राटाची  महत्वाकांक्षा. आज आम्ही सहस्त्र ग्रामांचे सम्राट आहोत. उद्या दशसहस्त्रांचे होऊ. आज सहत्रांचे स्वामी आहोत, उद्या लक्षांचे, खर्वांचे, निखर्वांचे होऊ. कधीतरी... कधीतरी सर्वश्रेष्ठ होऊ. कधीतरी आमचे मनोरथ सफल होतील. कधीतरी आमचा प्रतिशोध संपन्न होईल. "
"मी.. महाराज... मला"
"तुला चिंतित होण्याचे कारण नाही  भ्रातृभजना. आमच्या मायाजालाने आम्ही तुझे स्मरण नष्ट करून टाकणार आहोत. उद्या प्रातःकाली तुला आमच्या वक्तव्यातले काहीही स्मरणार नाही. तू आमच्या सेवेत रहाशील भ्रातृभजना.  संतोष, परम संतोष. देवी.. "
धीरगंभीर पावले टाकीत निशापती  महाराज कक्षाच्या बाहेर पडले. सुभाषिणीदेवी त्यांच्या हातातला एक शुभ्र काचलोलक भ्रातृभजनासमोर लंबवर्तुळाकार दिशेने फिरवू लागल्या.
"देवी.. " भ्रातृभजनाच्या मुखातून क्षीण उद्गार उमटले.
"शांत राहा भ्रातृभजना. सेवकाच्या लोचनांनी मर्यादेत राहावे असे शास्त्रवचन आहे. त्या मर्यादा तू ओलांडल्यास. आज महाराजांच्या दयादृष्टीचा विशेष आहे. अन्यथा तुला अभय लाभले नसते. " सुभाषिणीदेवी म्हणाल्या
"पण देवी, हा. हा प्रतिमाभंग.. "
"सत्तेपुढे विद्वत्ता काय कामाची भ्रातृभजना?" सुभाषिणीदेवींच्या स्वरात किंचित अपराधी कंप होता. "महाराजांच्या सहा प्रतिमा - सहा नावे, पण व्यक्ती एकच. एकमेकांवर पुष्पवृष्टी करतील, एकमेकांचे सन्मान करतील, आणि यातले गूज जाणणारे आपले स्मरण हरपून बसतील. तू भाग्यवान आहेस भ्रातृभजना. उद्या तुझा तरी विवेक निष्कलंक असेल. पण माझे काय भ्रातृभजना? माझे स्मरण पुसणारा लोलक मी कुठून आणू? "
भ्रातृभजनाची शुद्ध हरपत होती.