ह्यासोबत
शि. टी. १: हे 'विजय'. स. र. तेंडुलकरांमधले रमेश वेगळे.
शि. टी. २: महाविद्यालयातल्या निबंध स्पर्धेत तरी जरा बरे विषय ठेवावेत!
आम्ही नाट्यवाचनाची सुरुवात (क्रिकेटप्रमाणे) तेंडुलकरांपासून केली (शि. टी. १) आणि नव्यांना संधी देण्यासाठी म्हणून गडकरी, शिरवाडकर, अत्रे, चिं. त्र्यं., पु. ल. आदींना डच्चू दिला. तेंडुलकरांचं एक (एकमेव? ) निर्विवाद नाटक 'अशी पाखरे येती' हाती घेतलं. त्याने 'थोडेसे रुमानी' झालो; पण नंतर कोतवाल, गिधाडं यांच्या तावडीत सापडण्यापेक्षा कानेटकरांकडे वळलो. नदीम-श्रवण यांनी जशा एकाच चालीचं विच्छेदन करून अनेक चाली बांधल्या, तशी कानेटकरांनी एकाच साच्यातून अनेक नाटकं लिहिली. एक कर्व्यांवर तर दुसरं राजवाड्यांवर, एक 'प्रेमा तुझा रंग कसा' तर दुसरं 'प्रेमाच्या गावा जावे', इ. त्यांच्या काही नाटकांची नावं तर आम्हांला 'कायच्या काही'च वाटली - 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'जिथे गवतास भाले फुटतात', 'अश्रूंची झाली फुले', इ.... 'वेड्याचं घर उन्हात' हे मात्र अगदी शहाण्यासारखं सुचलेलं वाटलं. नाटकांत पुरुषोत्तम दारव्हेकरांची 'चंद्र नभीचा ढळला' ही शोकांतिका अजून लक्षात आहे आणि श्याम फडके यांचा 'तीन चोक तेरा' हा फार्सही. (झोपी गेल्यामुळे मात्र आम्ही अनेक फार्स फारसे बघितले नाहीत. )
बाकी... १८४० च्या दशकापासून सुरुवात; पण १८८० च्या दशकात किर्लोस्करांपासून 'व्यावसायिक प्रयोग'(! )... देवल, खाडिलकर, रांगणेकर, विद्याधर गोखले इ.... बरं (आणि बरंच) संगीत, थोडे संवाद आणि जराशी नाटकं.... या गाळलेल्या जागा भरून हे वर्णन (दोन अंकांपासून पाच अंकांपर्यंत? ) वाढवता येईल. कोल्हटकरांपासून (श्री. कृ. / बाळ) रत्नाकर मतकरींपर्यंत एलकुंचवारमार्गे पुढेही नेता येईल. मामा वरेरकर ('हाच मुलाचा बाप') आणि 'वस्त्रहरण' ही पण नावा घेवची लागतली ... नायतर आमच्या नावान शिमगो होतलो! 'मराठी रंगभूमीला वाईट दिवस आलेत' अशी चर्चा सतत होत असते; पण अनेक नाटकं येत राहतात (थोडी 'उन्मेष'मधल्या एकांकिकांत पाणी मिसळून बनवलेली असतात हे खरं असलं तरी). त्यांतली काही 'सही' आहेत, काही 'काही बाही' आणि काही नुसतीच 'ही' आहेत असं आमचं मत आहे.
मधुकर तोरडमल नाटकांत जरी 'हे' वाटत असले, तरी त्यांचं आत्मचरित्र चांगलं आहे. आम्ही स्वा. सावरकरांपासून बाबुजींपर्यंत, डॉ. पुरंदऱ्यांपासून ('शल्य-कौशल्य') व्ही. शांतारामपर्यंत, प्रिया तेंडुलकरांपासून ('पंचतारांकित') आनंद यादव/लक्ष्मण मान्यांपर्यंत, 'जेव्हा माणूस जागा होतो' (गोदावरी परुळेकर) पासून 'नाच ग घुमा', 'नाथ हा माझा' पर्यंत अनेकांची कथनं वाचली... चरित्रं खूप आहेत; पण स्मृतिचित्रं थोडीच.
कल्याणजी-आनंदजी, महेंद्र कपूर इत्यादींनी अनेक दशके हजारो गाणी (अनुक्रमे) संगीतबद्ध केली, गायली; पण 'सर्वांत आवडते संगीतकार किंवा गायक' यांच्यात त्यांचं नाव कुणी घेत नाही. अशा कलाकारांबद्दल मग 'त्यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं' असा मथळा द्यावा लागतो. मराठी कथालेखकांचंही असंच आहे. 'सर्वांत आवडत्यां'त विनोदी लेखक किंवा कादंबरीकार (आश्चर्य आहे! ) बाजी मारून जातात. हे अगदी वा. कृ., पु. भा., पु. शि., र. वा., इ. अल्पाक्षरींपासून व्यंकटेश माडगूळकर, प्रकाश नारायण संत, सुमेध रिसबूड वडावाला, मधू मंगेश कर्णिक, राम शेवाळकर, इ. दीर्घाक्षरींना लागू होतं. आम्हांला संतांची कर्नाटकी शैली ('लंपन') 'आवडायली' आणि शंकर पाटीलही मनातून (काही अपवाद वगळता) 'उतरेना झाले'! गाडगीळ-गोखल्यांमध्ये गोखले आवडले बुवा. अनंत काणेकरांचे लघुनिबंधही. विजया वाडांच्या कथांशिवाय तर दिवाळी अंकांचं पान हलत नसे! - आम्ही हे वाक्य प्रातिनिधिक स्वरूपात पुढच्या मागच्या वाक्याशी संबंध नसूनही घुसडत आहोत.
'कुमार', 'किशोर', 'चांदोबा', गोट्या, बोक्या, फा. फे., दिवाकर आणि श्यामच्या आईचा मुलगा श्याम यांच्या सान्निध्यात आमचं बालपण गेलं. महाविद्यालयात असताना एका निबंध स्पर्धेत (विषय - विद्यार्थी आणि राजकारण; शि. टी. २) प्रथम पारितोषिक म्हणून व. पु. काळ्यांचं एक पुस्तक मिळालं. (त्या वयात कुठली संगत कशी लागेल हे सांगता येत नाही. ) जी. ए. कुलकर्णींच्या भयंकर गोष्टी वाचायचा छंदही काही काळ आम्हांला जडला होता. त्याचं कारण म्हणजे इतर कथालेखक त्यापेक्षा भयंकर लिखाण करत होते! ... मराठी माणूस एक तर कवी म्हणून जन्माला येतो किंवा कथालेखक म्हणून. काहीच जमलं नाही तर वाचक होतो. कविता आणि कथा दोन्हींची संख्या ('बटाट्याच्या चाळी'त जसे वंशाचे दिवे दिवाळीच्या हुरुपात वाढायचे त्याप्रमाणे) वाढत राहते. फरक इतकाच की कथावाचकांची संख्या काव्यरसिकांएवढी कमी नाही. मात्र 'पुढचे पाठ आणि मागचे सपाट' ही म्हण तयार करणारे कथावाचकच असावेत!
पूर्वी 'म. टा. 'नं आमच्या दिवसाची सुरुवात व्हायची (तळवलकर संपादक असेपर्यंत); पण (म. टा. चे) संपादक आणि (महाराष्ट्राचं) सरकार असे दोन्ही बदलले आणि आमच्यावर 'शिव शिव' म्हणत बसायची वेळ आली. ('आपलं महानगर' वागळे यांच्या दुनियेतून बाहेर येऊ पाहात नव्हतं. ) आजकाल अग्रलेख 'उद्बोधनाय लोकानाम' न वाटता विनोदी वाङ्मयात समाविष्ट करण्याजोगे वाटतात ('हास्यास्पद' वर्गात. ). तळवलकरांनी 'बालवाङ्मय' हे संबोधन फार दूरदृष्टीनं वापरलं होतं. (आम्हांला 'कसं बोललात' आणि 'चिंटू' आवडतात... आणि रद्दी विकायला आवडते! )
मराठीत समीक्षाग्रंथ (श्री. के. क्षी. ), इतिहास (शेजवलकर), चरित्रं (वसंत पोतदार), प्रवास-वर्णनं (गाडगीळ? - हे सगळीकडे सापडतात), बाल/स्त्री/दलित-साहित्यही लिहिलं गेलं. (हे लिहिणं आवश्यक आहे - धावफलकावर जशा 'अवातंर धावा' लिहितात तसं. काही लेखकांना, डकवर्थ लुईसच्या वाढीव घावांप्रमाणे, कुठल्याही नावाशी जोडता येत नाही. गो. नि. दा, दुर्गा भागवत इ.... कधी कधी अवांतर धावा सामन्याचा रोख बदलतात; पण ह्या इतिहासाचा रोख बदलू शकेल असं 'अवांतर' लिखाण काही आमच्या वाचनात आलं नाही....
उपसंहार
'महाराष्ट्रातला कुठला लेखक पुढच्या शतकात वाचला जाईल? ' असं एकदा 'सोबत'कार ग. वा. बेहेरे यांना विचारण्यात आलं होतं, त्यावर त्यांनी 'एकही नाही' हे उत्तर दिलं होतं! आम्ही या उत्तराचा शोध घेतलेला नाही; पण आम्ही या शतकात आल्यावरही (जन्मसन आणि नोकरी या दोन गोष्टींमुळे) जे स्मरणात राहिलं आहे त्याचा (गाळीव) इतिहास लिहिला एवढंच. यांतल्या काही लेखकांनी हसवलं, काहींनी रडवलं आणि काहींचं लिखाण वाचून हसू आलं! ... पुलंनी म्हटल्याप्रमाणे आपलं जीवन सुंदर करायला येऊन गेलेली ही माणसं! त्यांच्यासोबतचा हा प्रवास आनंद देऊन गेला हे खरं!
आता काही 'प्रकरणं' तरी (आमच्या झाकलेल्या मुठीसारखी) झाकलेली ठेवून आम्ही हा इतिहास संपवतो.
- ख. रे. खोटे (कुमार जावडेकर)