त्या दिवशी खूप दिवसांनी त्याला फोन केला तर त्याच्या कॉलर ट्यूनमधून नेहमीसारखाच रेहमान भेटला. युवराज चित्रपटातलं मनमोहिनी हे गाणं!
"लट उलझी सुलझा जा बालम…
माथे की बिंदिया बिखर गयी है…
अपने हाथ सजा जा बलमा"
अरेच्च्या ही चीज ओळखीची असूनही अनोळखी का बरं वाटते आहे? भीमपलासच्या कोमल ग नि ची जादू असावी का? का रेहमानच्या पॉपचा परिणाम आहे? काही कळत नव्हतं. बसमध्ये, शाळेत, जेवताना सारखं मागे कुठेतरी हेच गाणं वाजत होतं. आणि मग एकदम चमकून गेलं! रेहमानने मूळ चिजेतून चक्क एक ओळच गाळली आहे!
"लट उलझी सुलझा जा बालमा,
हाथ में मेरे मेहेंदी लगी है,
माथे पे बिंदिया बिखर गयी है,
अपने हाथ सजा जा बालमा! "
मग रेहमानच्या सिंथेसाईझरच्या सुरांनी मला थेट माझ्या आठवणींच्या जगात नेऊन पोचवलं.
पहिल्यांदा आठवला तो व्यास बाईंचा गाण्याचा क्लास. त्याला गाण्याचा क्लास का म्हणायचं हेच आधी मला कळायचं नाही. कारण ते तर एक छान गाणारं घरच होतं. बाबांबरोबर पहिल्यांदा मी तिथे गेले तेव्हा बाहेर हा चपलांचा खच पडला होता. "बाबा, एवढ्या लोकांसमोर मी काय गाणार? आपण घरी जाऊयात. " असं मी म्हटल्यावर बाबा म्हणाले होते, " अगं देवळाबाहेर पण बऱ्याच चपला असतात. म्हणून काय माणसं देवळात जात नाहीत का? " तेव्हापासून आजपर्यंत मला गाणं म्हटलं, ऐकलं, गुणगुणलं की देवळात आल्याचाच भास होतो.
शेवटी हो नाही करत करत आत पाय ठेवला. आजूबाजूला बघण्याची तर हिंमतच होत नव्हती. अलगद जाऊन समोर पाठमोऱ्या बसलेल्या लोकांच्यात गुपचुप मिसळून जावं असं वाटत असतानाच एकदम सगळं शांत झालं. आणि आतापर्यंत दिसणाऱ्या पाठींचे चेहरे होऊन वीसएक डोळे माझ्याकडे बघून लुकलुकायला लागले. तेवढ्यात लांबून एक आवाज म्हणाला, " सरगम म्हणून दाखव पाहू! " पेटीच्या सुरात सूर लपवत म्हटलं एकदाचं सरगम. त्याबरोबर तो आवाज बाबांना म्हणाला, "चला आता तुम्ही बाहेर बसा. एका तासाने गाणं संपलं की पुढचं बोलूयात. " अशा प्रकारे फारसं नाट्यमय काहीही न घडता आमच्या गळ्यावर सुरेलपणाचं शिक्कामोर्तब झालं. आणि मग आठवड्यातून दोन दिवस डोक्याबरोबरच गळाही चालता व्हायला लागला.
क्लासमध्ये अगदी नवीन नवीन असताना मी सगळ्यात मागे, कधीही पळून जाता येईल किंवा चपलांच्या ढिगातून चपला लवकर मिळतील अशा मोक्याच्या ठिकाणी बसायचे. पण एक दिवस पहिल्या फळीतल्या काही लोकांच्या अनुपस्थितीमुळे बाईंनीच मला पुढे बसायला बोलावलं. गृहपाठ, परीक्षा, मार्कं, प्रश्न ही भानगड नसल्यामुळे मीही लगेच पुढे गेले. आणि मग एवढे दिवस लांबून बघितलेला व्यासबाईंचा चेहरा एकदम झूम इन केल्यासारखा जवळ आला. आतापर्यंत बाईंच्या आवाजाशी माझी ओळख होती. पण आता त्यांच्या गालावरच्या खळीशी, मध्येच लखकन चमकणाऱ्या खड्याच्या चमकीशी, लता मंगेशकरांसारख्या लांब पण पातळ वेणीशी हळूहळू ओळख व्हायला लागली.
बाईंच्या डाव्या हाताच्या बोटात सोन्याची अंगठी होती. गाणं शिकवत असताना बाई पेटी तर वाजवतंच पण पेटीच्या भात्यावर अंगठीवाल्या हाताने ताल देत. कुणी बेसूर होत असेल तर पेटीवरचा उजवा हात जोरात चाले आणि बेताल होत असेल तर भात्यावरचा डावा हात जोरजोरात ताल देऊ लागे. आमच्या घरी पेटी आणल्यावर मी बाईंची नक्कल करत तसंच भात्यावर ताल देत एक गाणं वाजवलं तर कुणीतरी म्हणालं, "व्वा! पेटीवर तबला चांगला वाजवतेस तू! "
मग एक दिवस बिहागातली ही चीज शिकले. बिहाग शिकले तेव्हा त्यातल्या शुद्ध-तीव्र मध्यमाच्या लपाछपीतून तयार होणारा तरल, अवखळ शृंगार कळण्याचं माझं वय नव्हतं. आता मात्र त्या सुरेल धुक्यामागे लपलेली प्रेयसीची आर्जवं, तगमग अस्पष्ट दिसते आणि शब्दांचं चित्र होतं.
"लट उलझी सुलझा जा बालमा,
हाथ में मेरे मेहेंदी लगी है,
माथे पे बिंदिया बिखर गयी है,
अपने हाथ सजा जा बालमा! "
सोळा शृंगार करून प्रियकराची वाट पाहणारी कुणी यौवना. पण ज्याच्यासाठी हे सगळं करायचं तो मात्र कुठेतरी दूर. मग तिचे मेंदीने भरलेले हात तिच्या मदतीला येतात. ती मनातच त्याला म्हणत्येय, "ह्या बटा बघ नां कशा गुंतून बसल्यात…. आणि त्यातच ही बिंदी पण विस्कटली आहे…आता तूच ये आणि आपल्या हातांनी नीट करून जा"…एवढंच. ह्या चिजेत शृंगारिक असं काहीच नाही. पण शृंगार मुळी शब्दांत नसतोच. तो असतो मनात. गाण्याच्या ओळी ह्याच अदृश्य ’अंतरा’ने जोडलेल्या असतात नाही का?
ही चीज ऐकली आणखी एक आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ती म्हणजे मेंदीची. मेंदीचे कोन मिळत नव्हते तेव्हापासून मी मेंदी लावत आलिये. किंबहुना मेंदी प्रत्यक्ष हातांवर लागेपर्यंतच्या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी एक सोहळा होत्या. हिरव्या भुरभुरीत मेंदीचा रानटी वास, त्यात चहाचं लालभडक आधण मिसळलं जात असताना हळूहळू गडद होत जाणारा तिचा रंग, आणि मऊशार पोत, निलगिरीचा उग्र वास हे सगळं मला काल केल्यासारखं आठवतंय. मेंदी लावण्यापूर्वीची बालसुलभ उत्सुकता, अपेक्षा, आनंद असे अनेक भाव मेंदी म्हटलं की आजही माझ्या मनात दाटून येतात. मेंदी लावताना कोनातून एका तालात झरणाऱ्या, आपसूक एका सुबक आकृतीत पडणाऱ्या ओल्या रेषा पाहतंच राहाव्यात असं वाटे. कदाचित माझ्या उनाड स्वभावात नसलेला आखीवरेखीवपणा तात्पुरता का होईना पण मेंदीच्या रेषांतून माझ्या हातात आल्याचं समाधान मला तेव्हा मिळत असावं. माझ्या हातावर मेंदी "पुरे आता" इतकी रंगते. त्यामुळे माझे हात बघून कुणीतरी, "सासरी लाड होणार तुझे" असं थट्टेने म्हणालं होतं. पण मेंदी रंगल्याच्या आनंदापलीकडे दुसरा कसलाच विचार यायला तेव्हा मनात जागाच नव्हती.
आईकडून मुद्दाम मागवलेला मेंदीचा कोन इथे कित्तीतरी दिवस फ्रीजमध्ये तसाच पडून आहे. त्यातली मेंदी कोरडी झाली असली तरी मेंदीशी जोडलेल्या आठवणी मात्र अजून ओल्याच आहेत. गुलजारच्याच शब्दांत सांगायचं तर…
"इकबार वक्त से लम्हा गिरा कहीं,
वहां दास्तां हुई, लम्हा कही नहीं"
रेहमानच्या गाण्यातून वगळलेल्या ओळीच्या आता आठवणी झाल्या आहेत. रेहमानचं मनमोहिनी ऐकताना त्या नसलेल्या ओळीची जागा ह्या आठवणी घेतात आणि गाणं पूर्ण होतं.