फॅमिली (२)

 त्याच्या फॅमिलीला भेटण्याची उत्सुकता वाढली.

                  दुसरे दिवशी मी ऑफीसला गेलो तेंव्हा खाजगीत बापटला ती हकीकत सांगितली. तो तर चाटच पडला. त्याने त्याच्या स्वभावाला अनुसरून ती बातमी हळू हळू सगळ्यांपर्यंत पोहोचवली देखील. त्या दिवसापासून बहुतेक साऱ्यांचीच शृंगारपुरेकडे पाहण्याची नजर जरा बदलली. जो तो त्याच्याशी मैत्री करण्याची अहमहमिका करूं लागला. पालेकर तर त्याचा खास मित्र बनला. कारण पालेकरचे अजून लग्न झालेले पण तो बोहोल्यावार उभा रहायच्या तयारीत होता. शृंगारपुरेला जणू त्याने गाईड बनवले आहे असे वाटावे असे त्यांचे आपसात कुजबुजणे चाललेले असायचे. शृंगारपुरेने त्याला एकदा आपल्या बटव्यातला बायकोचा फोटो दाखवला होता. तसा तो, ते लावण्य पाहून, अगदी वेडावलाच.   आपल्यालाही अशीच बायको मिळावी असे स्वप्न पाहू लागला. मध्येच एकदा पालेकर चार दिवस रजा टाकून मुलगी पहायला गेला तेंव्हा त्याने शृंगारपुरेलाही बरोबर चलण्याची विनंती केली पण ती त्याने, फॅमिली घरी एकटी कशी राहील या सबबीवर, नाकारली.

                 चार दिवसांची रजा संपवून पालेकर कामावर पुन्हा रुजू झाला त्या वेळी शृंगारपुरे त्याच्या फॅमिलीने आदल्या दिवशी केलेल्या चिरोट्याचा डबा सर्वांना वाटण्यासाठीं उघडत होता. पालेकरला पाहताच त्याने " या पालेकर. अगदी वेळेवर आलांत. आमच्या फॅमिलीने... " शृंगारपुरेने एवढे शब्द उच्चारले असतील नसतील एवढ्यात पालेकर तीरासारखा त्याच्या अंगावर धावला. त्याने तो डबा उधळून दिला आणि शृंगारपुरेची कॉलर पकडून मारण्यासाठीं मूठ उगारली. काय होते आहे ते कुणाच्याच लक्षात येइना. पण एका अनाकलनीय सावधतेने मी वेगांत पुढे धावलो. पालेकरच्या कमरेला हातांचा विळखा घालीत त्याला मागे खेचला आणि ओढत ओढत ऑफिसच्या बाहेर घेऊन गेलो.

                 बाहेर जिन्याच्या पायरीवर पालेकर ओंजळीत चेहरा झाकून धरीत मटकन बसला. कसल्या तरी संतापाचा उद्रेक त्याला आवरता येत नव्हता. " पालेकर काय झालंय? " मी त्याच्या खांद्यावर थोपटत विचारले. चेहऱ्यावरचा हात काढीत लालबुंद डोळ्यांनी पालेकर उसळला,

" फ्रॉड आहे साला हा हलकट. कसली फॅमिली अन् कसलं काय. च्यूत्या बनवतो साला आपल्याला. याच्या तर......... "

                 पालेकरने हळूं हळूं शांत होत जे कांही मला सांगितलं ते असं होतं. पालेकर नाशिकला जी मुलगी पहायला गेला होता तिथे पाहण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मुलीकडच्या बायकांत एक तरूण स्त्री हुबेहूब शृंगारपुरेच्या बायकोसारखी दिसली होती. शृंगारपुरेच्या बायकोचा फोटो पालेकरनेही पाहिला होता. तिच्या गालावरचा तीळही त्याच्या लक्षांत राहिलेला होता. आधी असेल कुणीतरी, असतात कांही माणसे एका सारखी एक दिसणारी, म्हणून पालेकरने जरा तिकडे दुर्लक्ष केले. पण ती इकडून तिकडे वावरतांना पालेकरने तिच्या गालावरही तसाच तीळ पाहिला आणि तो चक्रावला. मग त्याने सरळच चौकशी केली तेंव्हा..... ती पूर्वाश्रमीची शृंगारपुरेचीच बायको होती.   सध्या घटस्फोटित होती. लग्नानंतर तिला एका विदारक सत्त्याला सामोरे जावे लागले होते. लग्नापूर्वी भावी पतीचे गोरेगोमटे रूप पाहून ती हरखली होती. पण तिची भयानक फसगत झालेली होती. तिच्या स्वप्नांचा ढग अभ्रकाचा आहे हे तिला पहिल्या रात्री समजले तेंव्हाच ती उध्वस्त झाली होती. पण कांही औषधोपचाराने सुधारणा होईल या आशेवर दीडदोन वर्षे गेली. पण ती होणारच नव्हती. कारण तो दोष जन्मजात होता आणि हे शृंगारपुरेलाच काय पण त्याच्या मातापित्यांनाही माहिती होता. पण लग्नानंतर कदाचित कांही चमत्कार होईल या आशेवर त्यांनी त्याचे लग्न करून दिले होते. शृंगारपुरेने सुरुवातीस दादापुता करीत दत्तक मूल घेण्याबाबत बायकोअचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण तिने घटस्फोटाची मागणी करतांच तिचा छळ चालू केला होता. शृगारपुरेच्या आईवडिलांनीही त्याला त्यातच साथ दिली. पण दुसऱ्याच वर्षी त्यांना कोर्टात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागले होते. शृंगारपुरेच्या वकिलांनी अटोकाट प्रयत्न करून त्याची फसवणुकीच्या आरोपाखालील सक्तमजुरीची शिक्षा टाळली होती पण घटस्फोट अगदी सहजगत्या मंजूर झाला होता.

                       सुन्न झालेले डोके जरासे हलके झाले तसे आम्ही दोघेही आपापल्या जागेवर परत आलो तेंव्हा सेक्शनमध्ये सगळे आपापल्या कामांत गर्क होते. निदान तसें दाखवीत होते.   एक विचित्र शांतता आसमंतात पसरलेली होती. मी शृंगारपुरेच्या टेबलाकडे पाहिलं. शृंगारपुरे नव्याने तासलेल्या शिसपेन्सिलच्या टोकाकडे एक टक पाहत निश्चल उभा होता. त्याची पेन्सिल जराही बोथट झालेली त्याला चालत नसे. अधून मधून तो नेहेमी पेन्सिलींना टोक करत असलेला दिसायचा. ही त्याची संवय मला तेंव्हा चमत्कारिक वाटली होती तरी त्या क्षणी मला त्यात कांही अर्थ दिसायला लागला होता. मला पाहून तो जवळ आला.

" काय झालं? काय म्हणाले पालेकर? "
" अंऽऽ कांही नाहीं. असंच. त्याला जरा बरं वाटंत नाहीये"
" तो माझ्या बद्दल कांही बोलला? "
" नाही... तसं कांही नाही.. नाही म्हणजे तुमच्या बद्दल कांही नाहीं. जस्ट पर्सनल... "
" म्हणजे सगळंच"
" कां तुम्हाला असं कां वाटतं"
" मला माहिती आहे.... तो कुठे गेला होता हे माहिती आहे. मीच त्याला ते स्थळ संगितलं होतं... "
"........... "
"..... चुकून. म्हणूनच मी...... जाउ दे, माणसाला आपली सांवली फक्त अंधारातच टाळता येते..... "

                     असं कांहीसं पुटपुटत तो सेक्शनबाहेर गेला. बराच वेळ तो परत आला नाही म्हणून मी त्याच्या टेबलाकडे पाहिलं.   मी टेबलाजवळ गेलो. टेबलावर चिरोट्याचा डबा तसाच होता. डब्याखाली शृंगारपुरेचा चार ओळीचा राजिनामा होता.

समाप्त