किती स्तब्धता ही .... प्रवाही अताशा

जुनी ओढ नाही कुणाही अताशा
किती स्तब्धता ही प्रवाही अताशा

सजावे असे वाटते एकदा.... पण
तुझा वेळ जातो कसाही अताशा

जुनी स्वप्न सारी खरी होत गेली
छळे का तरी पूर्तताही अताशा?

कुठे तू पहाटेस होतोस जागा?
कुठे जागते होत लाही अताशा?

उगी खेचुनी न्यायचे एक नाते
टिको ही अपेक्षाच नाही अताशा

उशीला अता काम निम्मेच आहे
फुलांना नसे काम काही अताशा

प्रवासात एकाच गाडीत जावे
तसे होत आहोत राही अताशा

निरोपास बोलायचे काय .... चिंता!
तुलाही अताशा, मलाही अताशा