भिकारी पोट्टा ( लोकल गोष्ट- ११)

.
.
लोकलमध्ये (सर्वत्रच) नेहमीच बऱ्याच किरकोळ घटना घडत असतात.. इतक्या सरास दिसणाऱ्या सामान्य.. की  आपल्या लक्षातही येत नाहीत. मग त्यांत लक्ष घालणं.. त्यांना लक्षात ठेवणं या तर फार दूरच्या गोष्टी..! पण रोजच्याच प्रवासात रोजच्या प्रवाशांपैकी कोणी कधी रोजची अनास्था दूर सारून नेहमी पेक्षा वेगळं वागताना दिसतं..

आज तसंच झालं.
ऑफिसमधून घरी येताना.. नेहमी प्रमाणे एक मुलगा डब्यात झाडू मारायचं निमित्त करून भीक मागायला आला. कोणी जाओ जाओ करून हटकलं, कोणी त्याचा झाडू अंगाला लागू नये म्हणून पाय वरती उचलून घेतले ( तसा सेकंड क्लासच्या डब्याच्या मानानं फस्ट क्लासच्या डब्यातल्या सिट खाली फारसा कचरा नसतो. ) त्या मुलानं ही उगाच इकडे तिकडे कचरा सारवायचं सोंग वठवून पोटावर जोरात चापट्या मारत भीक मागायला सुरुवात केली.. अशा वेळी निदान दोन तीन हात तरी पैसे द्यायला पुढे येतात. आज मात्र कोणी ढिम्म लक्ष देत नव्हतं.. त्याच पोट वाजवणं सुरूच होतं. याच्या पुढची स्टेप म्हणजे बसलेल्या बायकांच्या हाताला पायाला हात लावून लक्ष वेधून घेणं. बऱ्याचदा तो असा जवळ येऊ नये म्हणून ही कोणी एखादं नाणं देऊन टाकतं. ( स्पेशली सकाळी ऑफिसला जायच्या वेळेला घरातली काम आटपून नुकतीच अंघोळ करून आवरून जात असताना ते कळकट काळे हात खरंच नकोसे वाटतात. ) आता तो ती ट्रिक वापरणारच होता.. तेवढ्यात माझ्या शेजारी बसलेल्या पारशी आंटीने त्याच कचरा उडवणं भलतंच मनावर घेतलं,   आणि त्याला डब्यातून बाहेर घालवण्याचा पवित्रा घेतला. तसा हा ही बऱ्याचदा दिसणारा प्रसंग. अशा वेळी कधी ना कधी एखादी बाई असा आरडा ओरडी करतेच..!

एक दोनदा हाकलून जाईल तर त्याचा तरी निभाव लागायचा कसा..? तो तर आजू-बाजूच्या गर्दीच्या वर्ताण गेंड्याच्या कातडीचा. ( तो कसला आंटी हुसकावण्याला दाद देतोय. आंटी अजून एक-दोन वेळा ओरडेल आणि स्वतःशीच धुसफुसत जाग्यावर बसेल. ) शेवटी भीक मागणं हाच त्याचा धंदा आहे.

आज मात्र वेगळंच झालं.. चवताळलेली आंटी एक-दोनदा ओरडली खरी.. पण मग तिलाच काय वाटलं कोण जाणे. तिने जातीनं उभं राहून त्या पोट्ट्या कडून अख्खा डबा नीट झाडून घेतला.. दाराशी सरकवलेला सगळा कचरा त्याला बाहेर टाकायला लावला.. आणि मग त्याच्या हातावर चांगली दहाची नोट ठेवली. पण त्यानंतर पुढचं स्टेशन आल्यावर एक सेकंद ही त्याला डब्यात ठेवून घेतलं नाही.. की तिच्या व्यतिरिक्त आणि कोणासमोर हात पसरू दिला नाही.

डबा जरा साफ झाला. त्या मुलाला जर खरंच काम करायचं असेल तर आजची ही दहाची नोट त्याला नक्कीच सुखावून गेली असेल. पण भीकच मागायची असेल तर इथून हुसकवल्यावर त्यानं नक्कीच दुसरा डबा गाठून तो पुन्हा पोट बडवत असेल. तिथे त्याला अशीच कोणी आंटी भेटेल का..? अशीच एक तरी आंटी प्रत्येक डब्यात पाहिजे नाही. जी भिकाऱ्याला रिकाम्या हातानं ही पाठवणार नाही.. आणि त्याच्या मोकळ्या हातांना आणखीन सोकावू ही देणार नाही.

आंटीनी खूपच चांगली ऍक्शन घेतली होती. मला त्यांचं अगदी मनापासून कौतुक वाटत होतं. खरं तर त्यांना ते तसं बोलून दाखवायला पाहिजे होतं. पण नेहमीच्या सवयीने मी नुसतंच स्मित केलं. ते त्यांच्यापर्यंत पोहचलं असावं.. अशी आशा करते. त्यांना तशी त्याची काहीच जरूर नव्हती. त्यांनी त्यांच्या मनात आलेलं कार्य पूर्णत्वाला नेलं होत, त्याचं समाधान त्या प्रेमळ चेहऱ्यावर झळकत होतं.

बसता बसता त्या माझ्यासमोर आणखीन एक वाक्य बोलून गेल्या..   " आपण दिवसभर काम करतो तेव्हाच आपल्याला पैसे मिळतात ना..!   मध्ये कुठेतरी भिकाऱ्यांना पैसे द्यावे की नाही वर चर्चा वाचली होती..   त्या चर्चेला या पारशी आंटी जणू उत्तर दिलं होतं.
.
.
===============================
स्वाती फडणीस.................................... ०६-०९-२००९