लोकल गोष्टी
- लोकल प्रवास
- १. फर्जाना यादव
- ३. नटवर
- २. हातातला खजिना
- ४. माझ्या समोर बसलेली ती;
- ५. आईचा मुलगा हरवला..
- ६. गर्दीतले चेहरे..
- ७. ओळख; पहीली आणि शेवटची.
- ८. मैत्री एक्सप्रेस
- ९. दहशत
- १०. मेलडी
- ११. भिकारी पोट्टा
- १२. लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी
- १३. मरणघाई
- १४. नव्या जगात प्रवेश
- १५. बोलपाखरं
- १६. हादरे)
- १७. काही नमुने..
- १८. नावड
- १९. शहाण्या आणि वेड्यांच्यातलं अंतर
- २०. हाता तोंडाची गाठ
- २१. अंधाऱ्या बोळाच्या टोकावर
- २२. पहिली खेप
- २३. संकेत पौर्णिमेचा
- २४. "गॉड ब्लेस यू..! "
- २५. तिखा चटणी मिठा चटणी
- २६. असाही दहशदवाद
- २७. वेगळा-वेगळा
- अच्छा तो हम चलते है..! ( लोकल गोष्टी-२८)
===============
.
.
नुकताच गणेश उत्सव होऊन गेला.. ऑफिस लालबाग मधून शिफ्ट झाल्यामुळे असेल, किंवा स्वाईन फ्ल्यूच्या सावटामुळे असेल.. पण या वर्षी गणेश उत्सवात नेहमी सारखी गर्दी जाणवली नाही. अनंत चतुर्दशीच्या दिवशी (पहिल्यांदाच) ऑफिसला जावं लागल्याने सकाळी साडेदहा अकरा पासून निघालेल्या मिरवणुका बघायला मिळाल्या.. हातातलं काम संपवून दुपारी एक वाजता घरी जाताना.. स्टेशनच्या वाटेवर थोडंफार गुलालात रंगावं ही लागलं. एकदा उडवला जाणारा गुलाल चुकवायच्या नादात पायाखाली सुतळी बॉंब फुटता फुटता वाचले. आणि एकदाचं स्टेशन आलं.
आता अंगावर रंग उडणार नव्हता की पायाखाली बॉंब फुटणार नव्हता म्हणून हायसं वाटलं.. तर स्टेशनवर रोज साडेसहा सातच्या दरम्यान असावी तशी गर्दी.. त्यात अगदी क्वचितच उत्सावाच्या निमित्तानं घराबाहेर पडणाऱ्या बायकांचा भरणा जास्त. त्यामुळे उडलेला गडबड-गोंधळ.. त्यात फस्टक्लास सेकंडक्लास असा काही फरक राहिलाच नव्हता. काही बायका सेकंडक्लास मध्ये चढायला जमेना म्हणून फस्टक्लास मध्ये चढत होत्या.. काहींना आपण चढतोय तो फस्टक्लास आहे हे माहीत नव्हतं.. तर काहींना सेकंडक्लास आणि फस्टल्कास असं काही असतं हेच माहीत नव्हतं.
फस्टक्लासने नेहमी ये-जा करणाऱ्या बायका अशा बायकांना "ये फस्टक्लास है.. " सांगून.. सांगून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करत होत्या. तेव्हा फस्टक्लासचा डबा आहे कळल्यावर काही जणी निघून जात, तर काही दामटून चढत.. काही गोंधळून जात. आशाच दोन सतरा-अठरा वर्षांच्या मुली हातात सेकंडक्लासचं तिकीट घेऊन डब्यात चढल्या.. त्यांचा एकूण अवतार, अंगाला येणारा वास, चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव, आणि हातातलं तिकीट त्या बघून दाराशी उभ्या असलेल्या बायकांनी त्यांना हा फस्टक्लासचा डबा असल्याचं वारंवार सुनावलं..! त्या बिचाऱ्यांना मात्र काही कळत नव्हतं. त्यांना हा फस्टक्लासचा डबा आहे सुनावणाऱ्यांना त्या पुन्हा पुन्हा मग ही गाडी खारला थांबणार नाही का..? म्हणून विचारत होत्या.. ( त्यांना कदाचित डब्यातल्या बायका ही फास्ट ट्रेन आहे असं सांगत असल्या सारखं वाटलं असावं. ) मी ही नुकतीच चढले होते.. त्या गर्दीच्या रेट्यानं ढकलल्या जात-जात माझ्या पर्यंत पोहचल्या.. त्यांनी मलाही तोच प्रश्न विचारला.. मी न बोलता होकारार्थी मान हालवली.. तशा त्या माझ्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या. त्यातली एक ट्रेनच्या हलण्या-डुलण्या सरशी माझा दंड पकडायला लागली. दुसरीचा संभ्रम अजून दूर झाला नव्हता.. तिच कुणा कुणाकडे चौकशी करणं सुरूच होतं. त्यांच्या अंगाला येणारा वास आणि त्यातल्या एकीच्या मला लटकण्यामुळं "हा फस्टक्लासचा डबा आहे. " माझ्या ही तोंडातून निघून गेलं. आणि पुन्हा एकदा त्या दोघी गडबडल्या.. त्यांनीही त्यांचा मागचाच प्रश्न मला विचारला.. मग मात्र त्यांना काहीच माहीत नसल्यानं बघून, (आजचा दिवस हे असं होणारंच. ) जाऊदे..! म्हणत मी शांतपणे उभी राहिले आणि मला माझा एकटीनं केलेला पहिला लोकल प्रवास आठवला..
मुंबईत आल्या आल्याच लोकलच दर्शन घडलं असलं तरी पुढे दोन-तीन वर्ष लोकलने जाण्या येण्याचा फारसा प्रश्न आला नाही. त्यामुळे लोकल प्रवासाची फारशी माहिती नव्हती. या दरम्यान एक दोनदा ठाण्याला गेलो होतो तिच काय ती लोकलशी ओळख. तेव्हाही आई बाबा सोबत असल्या मुळे आम्हाला कसली काळजी घ्यायची जरूरच नव्हती. त्यांनी आईला थोडंफार समजावलं खरं पण तिला एकटीला तरी ट्रेनने कधी कुठे जायला लागणार होतं. ईस्ट वेस्टचा तर ती दहा वर्ष मुंबईत राहून गेल्या नंतरही गोंधळ करते. तिला तसं लोकलनं कधी फिरावंच लागलं नाही. त्यामुळे ते साहजिकच आहे म्हणा. पण आम्हाला ( मला ) मात्र लोकलनं फिरावं लागणार होतं.. आणि दरवेळेला काही बाबा सोबत असू शकत नव्हते.
दहावीची परीक्षा संपली. मी पुढे काय करणार हे ( बाबांचा पूर्ण पाठिंबा नसला तरी ) तसं ठरलंच होतं. त्यामुळे नव्या जगात प्रवेश करण्यासाठी काही हालचाल करणे भाग होत. अल्पाईड आर्टसाठीचे रहेजा कॉलेज तर बांद्रा येथेच होते.. दुसरं माहीत झालेलं कॉलेज म्हणजे मॉडर्न ( दादर ) आणि तिसरं म्हणजे जे. जे. या तिन्ही ठिकाणांची पॅमपलेट अभ्यास क्रमाची माहिती मला जमा करायची होती.. त्यातच एक दिवस पेपर मध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या प्रवेश परीक्षेसाठीच्या पूर्व तयारी संबंधी आर्टिस्ट सेंटरची जाहीरात वाचली.. आणि.. मी आणि आई बसने शामाप्रकाश मुखर्जी चौकात धडकलो. आम्हाला तसा सगळाच भाग नवा. शोधत शोधत आर्टिस्ट सेंटरवर पोहचलो तर तेव्हा तिथे या क्लास संबंधी पुढची माहिती सांगेल असे कोणीच नव्हते. (आर्टिस्ट सेंटर कुठे आहे तेवढं कळलं होतं. ) मग तसंच आम्ही जे. जे कॉलेज ही बघून घेतलं आणि परतताना व्ही. टी. स्टेशनवरून ट्रेनने परतलो.
आता मी स्पर्धा, परीक्षांच्या निमित्तानं कधी मधी कुठे-कुठे जातही होते. शाळेतून जाताना शिक्षक सोबत असले तरी घरी येताना एक-एकटंच यावं लागायचं.. आणि आता तर मला जायचं असलेली दोन्ही ठिकाणं आम्ही बघून ही आलो होतो त्यामुळे सेंटरने सांगितलेल्या दिवशी आईने मला एकटीलाच फोर्टला पाठवले.
माझी दोनही काम पूर्ण करून मी त्या दिवशी प्रमाणेच स्टेशनला पोहचले.. स्टेशन मध्ये शिरल्यावर पहिल्याच प्लॅटफॉर्मवर बांद्र्याला जाणारी ट्रेन सुटते ही मला असलेली माहिती. तेव्हा मला ( आईलाही) इंडिकेटर बघायचं माहीत नव्हतं. थोडावेळ थांबल्या नंतर लोकल आली आईनं तिथून सुटणारी ट्रेन बांद्र्याला येईल सांगितलं असल्यामुळे मी कुणाला काही न विचारता ट्रेन मध्ये जाऊन बसले.. लोकलने व्ही. टी. स्टेशन सोडलं.. कुठली कुठली स्टेशन मागे पडत होती.. बराच वेळ गेला तरी बांद्रा काही येईना.. मग मात्र मला थोडी धाकधूक वाटायला लागली.. तेवढ्यात एक खूप मोठी खाडी लागली.. (बांद्राची खाडी तर छोटीशी आहे..! ) आणि मी कुठेतरी दुसरीकडेच आली आहे हे मला पुरत कळून चुकलं. तेव्हा माझी अवस्था थोडी फार या मुलींसारखीच झाली होती.
चौकशी करत-करत ट्रेन मधून मी जेव्हा उतरले तेव्हा नवीनच उभारलेल्या जुईनगर स्टेशन वर पोहचले होते. चकाचक फ्लोरींग, हे एवढं मोठं.. माणसांची मोजकीच वर्दळ असलेलं ऐसपैस स्टेशन त्याही परिस्थितीत आवडून गेलं.. परत जाण्यासाठी
तिकीट विंडो शोधायला थोडा वेळ लागला.. पण लगेच तिकीट मिळालं..! मग मात्र नीट चौकशी करून ट्रेन मध्ये बसले.. कुठेतरी ट्रेन बदललीही आणि (नवी) मुंबई दर्शनाचा पराक्रम सांगायला घरी पोहचले.
अज्ञान, थोडी भीती, खूप सारा आनंद ( कदाचित स्वतःची स्वतः वाट शोधल्यामुळे) असं काय-काय त्या दिवशी अनुभवायला मिळालं.
( कोणतीही गोष्ट स्वतंत्रपणे केल्यावरच जास्त चांगल्या प्रकारे कळते नाही..! )
.
.
=======================================
स्वाती फडणीस........................................